तेंडुलकर, विजय धोंडोपंत : (६ जानेवारी १९२८ – १९ मे २००८). एक चतुरस्र लेखक, वृत्तपत्रव्यवसायी, लघुकथालेखक, लघुनिबंधकार, अखिल भारतीय कीर्तीचे नाटककार, नव्या रंगभूमीचे प्रमुख आधारस्तंभ. त्यांचा जन्म मुंबई येथे गिरगावात झाला. त्यांचे शिक्षण मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे झाले. १९४३ मध्ये त्यांच्या शालेय शिक्षणात खंड पडला. शालेय शिक्षणापेक्षा घरातील वाङ्‌मयप्रेमी वातावरणाचे संस्कार त्यांच्यासाठी प्रेरक ठरले. त्यांचे वडील कारकुनी करायचे आणि प्रकाशक, लेखक, हौशी नट-दिग्दर्शक होते. वडिलांच्या पुस्तकांच्या दुकानात बसणे, मुद्रिते तपासणे इत्यादींमधून वाङ्‌मयग्रहणाचे व लेखनाचे पाठ तेंडुलकरांना मिळाले. लहानपणी ते पाश्चिमात्य नाटके पाहायचे. त्यातूनच त्यांना नाटके लिहिण्याची स्फूर्ती मिळाली.

प्रसिद्ध साहित्यिक वि. वि. बोकील हे तेंडुलकरांचे पुण्यामधील शिक्षक. बोकिलांप्रमाणेच दि. बा. मोकाशी याच्या कथालेखनाचे तसेच अनंत काणेकर व शिवराम वाशीकर यांच्या संवादलेखनाचे संस्कार तेंडुलकरांच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वावर झालेले आहेत. १९५७ पर्यंत त्यांचे वास्तव्य पुण्यात होते. त्यानंतर पुढे काही काळ ते मुंबईत राहिले. पुणे–मुंबई, मुंबई–पुणे असा अनिश्चित भ्रमंतीचा काही काळ लोटल्यानंतर १९६६ पासून मुंबई हेच त्यांच्या वास्तव्याचे व कामाचे कायम स्थान बनले. मुंबईतील वास्तव्यामुळेच तेंडुलकरांचा प्रयोगशील रंगभूमीशी व ‘रंगायन’, ‘आविष्कार’, ‘भारतीय विद्या भवन कला केंद्र’, ‘अनिकेत’ यांसारख्या नवनाट्याविषयी आस्था बाळगणाऱ्या संस्थांशी व त्यांतील कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचा संबंध आला. रंगभूमीशी आंरभापासूनच आत्मीयतेने निगडित असूनही तेंडुलकरांनी नाटकांकडे व्यावसायिक दृष्टिकोणातून पाहण्याचे कटाक्षाने टाळलेले आहे. वृत्तपत्रीय लेखन आणि नियतकालिकांचे संपादन हेच त्यांचे आरंभीचे आणि नंतरचेही उपजीविकेचे प्रमुख साधन. कोवळी उन्हे (१९७१), रातराणी (१९७१), फुगे साबणाचे (१९७४) यांसारखे त्यांचे स्फुट ललितनिबंधसंग्रह यातूनच जन्माला आले. तेंडुलकर हे नियतकालिकांशी निगडित राहिल्याने त्यांनी लघुकथास्वरूपाचे किंवा व्यक्तिचित्रणात्मक पद्धतीचेही बरेच लेखन केलेले आहे. त्यातील काही काचपात्रे (१९५८), द्वंद्व (१९६१), मेषपात्रे (१९६५), गाणे (१९६६), फुलपाखरू (१९७०) इत्यादी नावांनी संकलित केले गेले आहे. दिवाकरांच्या नाट्यछटाही त्यांनी संपादिल्या आहेत.

तेंडुलकरांचे प्रधान कार्यक्षेत्र रंगभूमी हेच आहे. १९५५ पासून त्यांनी नाट्यलेखनास सुरुवात केली. त्यांच्या नाट्यलेखनाचा प्रारंभ एकांकिकालेखनाने झाला. नभोवाणीकरिता लिहिलेली रात्र ही त्यांची पहिली एकांकिका. ती बरीच लोकप्रिय ठरली. ध्वनिमाध्यमाचे त्यात चातुर्याने उपयोजन केले आहे. रात्र आणि इतर एकांकिका (१९५७) हा त्यांचा पहिला एकांकिकासंग्रह. यानंतर त्यांचे अजगर आणि गंधर्व (१९६६) व भेकड आणि इतर एकांकिका (१९६९) हे दोन एकांकिकासंग्रह प्रसिद्ध झाले. तेंडुलकरांनी पाटलाच्या पोरीचे लगीन (१९६५), चिमणा बांधतो बंगला (१९६६), चांभारचौकशीचे नाटक (१९७०), मुलांसाठी तीन नाटिका (१९७३) इत्यादींसारखी काही बालनाट्येही लिहिली आहेत. तसेच त्यांनी काही अनुवादपर नाट्यलेखनही केलेले आहे. त्यात टेनेसी विल्यम्सच्या स्ट्रीट कार नेम्ड डिझायर या नाटकाचा वासनाचक्र या नावाने केलेला अनुवाद विशेष लक्षणीय आहे. मोहन राकेश यांच्या आधे अधुरे या नाटकाचा व गिरीश कार्नाड यांच्या तुघलक या नाटकाचाही त्यांनी मराठी अनुवाद केला आहे.

तेंडुलकरांचे प्रसिद्धी दृष्ट्या पहिले नाटक श्रीमंत (१९५५) हे बरेच गाजले. त्यानंतर त्यांची माणूस नावाचे बेट (१९५६), मधल्या भिंती (१९५८), चिमणीचं घर होतं मेणाचं (१९६०), मी जिंकलो−मी हरलो (१९६३), कावळ्यांची शाळा (१९६४), सरी ग सरी (१९६४), एक हट्टी मुलगी (१९६७) ही नाटके रंगभूमीवर आली. त्यांतील माणूस नावाचे बेट हे नाटक रंगभूमीवरील स्थित्यंतराचे निदर्शक मानावे लागेल. यात तेंडुलकरांनी वास्तवतेचा संपूर्ण पुरस्कार केलेला आहे. चिमणीचं घर होतं मेणाचं हे नाटक प्रयोगशीलतेच्या दृष्टीने व एक हट्टी मुलगी हे नाटक व्यक्तिदर्शनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तेंडुलकरांना अखिल भारतीय स्वरूपाची कीर्ती मिळवून देणारे शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक १९६८ साली रंगभूमीवर आले. या नाटकाला कमलादेवी चट्टोपाध्याय पारितोषिक मिळाले आहे. अनेक भारतीय भाषांत त्याची भाषांतरे झाली आहेत. त्याच्या पाठोपाठ अशी पाखरे येती (१९७०) आणि गिधाडे (१९७१) ही नाटके आली. गिधाडेतील उग्रकठोर वास्तववादी चित्रणाने बरीच खळबळ उडवून दिली. अशी पाखरे येती हे गिधाडेच्या उलट प्रकृतीचे नाटक. तेंडुलकर एकाच वेळी भिन्नभिन्न प्रकृतीची नाटके निर्माण करू शकतात याचेच हे निदर्शक. गिधाडेपेक्षाही तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडर (१९७२) व घाशीराम कोतवाल (१९७३) या नाटकांनी अधिक प्रक्षोभ निर्माण केला. सखाराम बाइंडर तर काही काळ अभ्यवेक्षण मंडळाच्या (सेन्सॉरच्या) अवकृपेस पात्र ठरले. घाशीराम कोतवाल हे नाना फडणीसांच्या जीवनावर आधारलेले नाटक आहे. ऐतिहासिक दृष्ट्या हे चित्रण विवाद्य ठरले; पण या नाटकात केला गेलेला लोकनाट्यातील घटकांचा अवलंब प्रशंसनीय ठरला. या नाटकात पेशवेकालीन ब्राह्मणवर्गाचे जे चित्रण तेंडुलकरांनी केले, त्यामुळे सनातनी ब्राह्मणवर्ग खवळला; पण पुरोगामी ब्राह्मणवर्गाने हे नाटक उचलून धरले. दंबद्वीपचा मुकाबला (१९७४), मल्याकाका (१९७४) व बेबी (१९७६) ही त्यांची त्यानंतरची प्रसिद्ध झालेली नाटके. त्यांनी सुमारे २७ नाटके, २५ एकांकिका लिहिल्या. याखेरीज आठ ते दहा बालनाट्ये लिहिली.

आशय–अभिव्यक्ती दृष्ट्या तेंडुलकरी नाटकात बरीच स्थित्यंतरे झालेली आहेत. तेंडुलकर हे मूलतः वास्तववादी परंपरेचे नाटककार आहेत. प्रसंगवशात त्यांनी कल्पनारम्यतेचा आश्रय घेतलेला दिसतो; पण तो वास्तवाचा पाया बळकट करण्यासाठीच. सामान्य स्तरातील पांढरपेशा वर्ग आणि त्याची सुखदुःखे-विशेषतः दुःखेच–हा त्यांच्या चित्रणाचा व चिंतनाचा मुख्य विषय. साध्या दैनंदिन घटनेतील नाट्य समर्थपणे पेलणे हा त्यांच्या नाट्यलेखनाचा धर्म. त्यांच्या प्रारंभकालीन नाटकांत जी हळवी भावविवशता दिसते, ती उत्तरोत्तर कमी होत जाऊन चित्रणात उग्र, कठोर वास्तवता अधिक प्रमाणात येऊ लागल्याचे जाणवते. मानवी मनातील व जीवनातील हिंस्रता, विकृती, कुरुपता यांचे निडर दर्शन त्यांची नाटके घडवितात (गिधाडे, सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल इ.) त्यात काव्य आणि कारुण्य यांच्या छटाही त्यांच्या नाटकांतून अधूनमधून मिसळलेल्या दिसतात, तंत्रदृष्ट्याही त्यांनी अनेक नवनवे प्रयोग केले. तेंडुलकरी नाटकाचे सारे विशेष शांतता कोर्ट चालू आहे मध्ये कलात्मक रीत्या एकत्र आलेले आहेत. व्यक्तीचे किंवा व्यक्तीसमूहाचे बाह्य आचार–उच्चार व त्याच्या अंतर्मनातील प्रवाह यांतील विरोध, विसंगती, उपरोध परिणामकारक रीत्या या नाटकात चित्रित झाले आहेत.

तेंडुलकर यांच्या शांतता कोर्ट चालू आहे या नाटकावर याच नावाने चित्रपट करण्यात आला (१९७१). सुप्रसिद्ध दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून अमरिश पुरी, अमोल पालेकर, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे यांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या. विजय तेंडुलकरांचे हे पहिले पटकथा लेखन. मराठी चित्रपटांमध्ये हा समांतर चित्रपटांची नांदी ठरला. त्यानंतर निशांत, आक्रोश, अर्धसत्य, उंबरठा अशा वेगळ्या वाटेवरच्या चित्रपटांच्या पटकथा तेंडुलकरांनी लिहिल्या. त्यांची पटकथा असलेला आणि जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला सामना (१९७५) हा एक महत्त्वाचा मराठी चित्रपट होय. मोहन आगाशे, श्रीराम लागू, निळू फुले अशा दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट गाव आणि गावातल्या राजकारणावर भाष्य करतो. चित्रपटात छोट्या शहरातले राजकीय डावपेच करणारे आणि नीतिमत्ता जपणारा शिक्षक यांच्यातला हा सामना आहे. याला साखर सहकार उद्योगाची पार्श्वभूमी आहे. त्यांच्या मंथन (१९७६) या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तेंडुलकरांना या चित्रपटाच्या पटकथेसाठीही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ऑस्कर पुरस्करासाठी हा चित्रपट भारताकडून पाठवण्यात आला होता. गिरीश कर्नाड आणि स्मिता पाटील यांचा नितांतसुंदर अभिनय असलेला हाही चित्रपट गावचे राजकारण आणि जातीव्यवस्थेवर भाष्य करतो. सिंहासन (१९७९) या चित्रपटाची पटकथाही तेंडुलकरांची. अरुण साधूंच्या दमदार लेखणीतून हा चित्रपट उतरला होता. राजकारण, पत्रकारिता यांचे वेगवेगळे पैलू यात होते. निळू फुले यांनी दिगू टिपणीस या पत्रकाराची भूमिका यात केली. राजकारणी सामान्य माणसांच्या आयुष्याचा कसा खेळ करतात, यावर या चित्रपटात भाष्य केले आहे. यापुढच्या त्यांच्या उंबरठा या चित्रपटावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर उमटली. समाजसेवा करायला घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडलेली स्त्री, तिला येणारे अडथळे, आश्रमातील स्त्रियांचे प्रश्न, राजकीय नेत्यांचे हस्तक्षेप, कुटुंबाचा असहकार अशा अनेक गोष्टींवर या चित्रपटाद्वारे प्रकाश पाडण्यात आलेला आहे. स्मिता पाटील यांचा भावस्पर्शी अभिनय आणि हृदयनाथ मंगेशकरांची सुमधूर गाणी यामुळे हा चित्रपट आजही रसिकांच्या मनात आहे. याशिवाय निशांत (१९७५), आक्रित (१९८१),आक्रोश (१९८०), सरदार (१९९३) या चित्रपटांतूनही तेंडुलकरांच्या लेखणीची धार जाणवते. हे त्यांचे चित्रपट अंतर्मुख करणारे आणि  वेगळेपण दर्शवणारे ठरले. त्यांनी छोट्या दोस्तांसाठी ये है चक्कड बक्कड बुम्बे बो (२००३) हा बालचित्रपटही लिहिला होता.

विजय तेंडुलकर यांच्या पत्नीचे नाव निर्मला. त्यांना राजा हा एक मुलगा आणि सुषमा, प्रिया व तनुजा या तीन मुली. प्रिया तेंडुलकर या लेखिका, निर्माती, दिग्दर्शिका, अभिनेत्री म्हणून रंगभूमी व चित्रपटात कार्यरत होत्या. तेंडुलकरांना खासगी आयुष्यात बऱ्याच दु:खद प्रसंगांना सामोरे जावे लागले. त्यांचे पुत्र राजा आणि पत्नी निर्मला यांचा मृत्यू २००१ मध्ये झाला. त्यानंतर २००२ मध्ये त्यांची मुलगी प्रिया तेंडुलकर यांचे निधन झाले. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर हे त्यांचे भाऊ होत. विजय तेंडुलकर यांचे दीर्घकालीन आजाराने पुण्यात निधन झाले.

विजय तेंडुलकर यांना भारतीय समाजातील हिंसाचार या विषयावरील संशोधनार्थ नेहरू अभ्यासवृत्ती देण्यात आली होती (१९७४–७५). त्यांना व त्यांच्या कलाकृतींना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७१), मंथन या चित्रपटाच्या पटकथालेखनासाठी १९७७ चा राष्ट्रीय पुरस्कार, संगीत नाटक अकादमी अधिछात्रवृत्ती (१९९८), भारत सराकरकडून पद्मभूषण (१९८४), आणि महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र गौरव (१९९९) इत्यादी पुरस्कारांनी त्यांच्या कारकीर्दीचा सन्मान करण्यात आला.

समीक्षक : संतोष पाठारे