एक शिवरूप. शिवशंकराचे रूप एकीकडे  शांत, वरदायी, त्याचवेळी दुसरीकडे उग्र, विध्वंसक असे दिसून येते. शंकराने आपल्या भक्तांच्या साहाय्यार्थ आणि अन्याय करणाऱ्यांना शासन करण्यासाठी जी प्रखर व संहारक रूपे धारण केली त्यांचा समावेश संहारमूर्तींमध्ये केला जातो. त्यांसंबंधी अनेक कथा लोकमानसात प्रचलित आहेत. या सर्व संहारक प्रतिमा नावांप्रमाणेच शिवाच्या रौद्र अवतारांची जाणीव करून देणाऱ्या व भयावहदेखील आहेत.

अंधकासुरवधमूर्ती, घारापुरी, महाराष्ट्र.

गजासुरवधमूर्ती आणि अंधकासुरवधमूर्ती : गजासुरवधमूर्ती किंवा गजहामूर्ती ही सर्वांत प्राचीन संहारप्रतिमा समजली जाते. वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे कृत्तिकेश्वर नावाच्या शिवलिंगाची पूजा करणाऱ्या ब्राह्मणांना हत्तीच्या रूपात येऊन त्रास देणाऱ्या नीलासुर नामक दैत्याचा शिवाने कसा नाश केला त्याची कथा ‘कूर्मपुराणा’त येते. ‘वराहपुराणा’तील कथेनुसार असुरांचा राजा ‘अंधक’ हा पार्वतीवर मोहित झाला. त्याचवेळी त्याचा साहाय्यक नीलासुर याने हत्तीचे रूप घेऊन शिवाला मारण्याचे ठरवले. नंदीने हे वृत्त वीरभद्राला सांगितले तेव्हा त्याने तत्काळ नीलासुराचा वध केला आणि त्याचे कातडे शिवाला अर्पण केले. ते शंकराने उत्तरीय म्हणून पांघरले. यानंतर शिवाने अंधकासुराचाही वध केला.

अंधकासुराची कथा या कथेला जोडूनच येते. तिचा उल्लेख ‘कूर्म’, ‘वराह’ व ‘वामनपुराणा’त आहे. ‘महाभारता’त शिवाला उद्देशून ‘अंधकघातीन’ असे म्हटले आहे. ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झालेला हा असुर देवांनाही त्रास देऊ लागला होता. देव आपले गाऱ्हाणे घेऊन शिवशंकरांकडे गेले तेव्हा तो शंकरांवरच चालून गेला. त्याचा प्रतिकार करताना शिवाने आपला त्रिशूळ त्याच्या पोटात खुपसून त्यावर त्याला उंच उचलले. त्यामुळे अंधकाच्या पोटातून रक्त गळू लागले आणि त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून एकेक राक्षस निर्माण होऊ लागला. त्यांना रोखण्यासाठी शिवाने चामुंडा व सप्तमातृका निर्माण केल्या. पण त्यांनी प्राशन करूनही ते रक्त थांबेना तेव्हा शिवाने विष्णूची मदत घेतली. परंतु अंधकाने क्षमायाचना केल्यावर त्याला अभय दिले आणि भृंगीश किंवा भृंगीरिती असे नामाभिधान देऊन आपल्या गणांचा अधिपती केले. दुसऱ्या एका कथेनुसार अंधकासुराच्या शरीरातून गळणारे रक्त थांबविण्यासाठी शिवाने आपल्या तिसऱ्या नेत्रातून योगेश्वरी या मातृकेची निर्मिती केली; स्वतः शिवदेखील आपल्या कपालामध्ये ते रक्त गोळा करू लागला.

गजासुरवधमूर्ती, होयसळेश्वर मंदिर, हळेबीडु, कर्नाटक.

गजासुरवधमूर्तीची वर्णने ‘अभिलषितार्थचिंतामणी’, ‘अंशुमद्भेदागम’, ‘शिल्परत्न’ व इतर शैवागमात आढळतात. ‘अभिलषितार्थचिंतामणी’नुसार शिवाला दहा हात असावेत, तर ‘अंशुमद्भेदागम’ त्याला चार किंवा आठ हात असावेत असे सुचवते. चारच हात असल्यास मागच्या दोन हातात गजचर्म असून पुढच्या उजव्या हातात पाश आणि डाव्या हातात गजदंत असावा. आठ हात असल्यास उजवीकडील तीन हातांनी त्रिशूळ, डमरू व पाश धारण केलेले असावेत. आणि उरलेल्या एका उजव्या हाताने एका डाव्या हातासह मिळून गजचर्म धारण केलेले असावे. उर्वरित तीन डाव्या हातांत कपाल, गजदंत व विस्मयमुद्रा असावी. शिवाचा डावा पाय भक्कमपणे हत्तीच्या डोक्यावर ठेवलेला असावा आणि उजवा पाय थोडा वाकवलेला असावा. शिवाच्या मागल्या दोन हातांत धरलेले गजचर्म प्रभावळीसारखे दिसेल असे शिल्पांकित करावे. शिवप्रतिमा सर्व प्रकारच्या आभूषणांनी सजलेली असावी व रेशमी वस्त्रे तसेच व्याघ्रचर्म ल्यालेली असावी. त्याच्या उजवीकडे लहानग्या स्कंदासह उभ्या पार्वतीची प्रतिमाही असावी असे वर्णन आहे. विशेष म्हणजे बरीच लोकप्रिय असूनही अंधकासुरवधमूर्तीची वर्णने मात्र कोणत्याही ग्रंथात आढळत नाहीत.

साधारणतः गजासुरवधमूर्ती व अंधकासुरवधमूर्ती या एकत्र शिल्पांकित केलेल्या दिसतात. या मिश्र प्रतिमा इ. स. सातव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंतच्या काळातील आहेत. ‘वराहपुराणा’तील कथेप्रमाणे प्रथम शिवाने गजासुराचा वध केला आणि नंतर अंधकासुराचा; त्यानुसार त्या मिश्र मूर्तीत शिवाच्या वरच्या दोन हातांत गजचर्म दाखवलेले असते. गजासुरवधाच्या प्रतिमा फार लोकप्रिय आहेत. अनेक मध्ययुगीन मंदिरांवर त्या आढळतात. वेरूळच्या तसेच घारापुरी लेण्यांमध्ये अंधकासुरवधप्रतिमा दिसतात. कर्नाटकातील अमृतपुरा (जि. चिकमंगळुरू) येथील अमृतेश्वर मंदिरात एक गजासुरवधाची प्रतिमा आहे. होयसळ कालखंडातील या मंदिराच्या महानासिकेवर (दर्शनी भागावर) ही अतिशय अलंकारिक प्रतिमा कोरलेली आहे. शिवाला सोळा हात असून त्यांपैकी अनेक भग्न झाले आहेत; मात्र उर्वरित अवशेषांवरून पाश, दंत, त्रिशूळ, अक्षमाला आणि कपाल अशा आयुधांची कल्पना येते. मागच्या दोन हातांनी गजचर्म धरले आहे, त्याची जणू प्रभावळच शिवाच्या मस्तकामागे दिसते. या गजचर्मरूपी प्रभावळीच्या भोवती अष्टदिक्पालांच्या मूर्ती कोरल्या आहेत. शिवाच्या पायांखाली गजासुराचे डोके आहे. शिवाने जटामुकुट, रुंडमाळा व इतर आभूषणे धारण केली आहेत. त्याच्या उजवीकडे ब्रह्मा व डावीकडे विष्णू आहेत. लखनौ संग्रहालयात असलेली प्रतिमा अष्टभुज आहे. येथे शिवाच्या दोन हातात त्रिशूळ असून इतर हातांत खड्ग, डमरू, ढाल व सर्प धारण केलेले दिसतात, तर दोन हातांनी हत्तीचे पुढचे व मागचे पाय धरले आहेत. त्रिशूळ अंधकासुराच्या पोटात खुपसला आहे.

सारनाथ (वाराणसी) वस्तुसंग्रहालयात अंधकासुरवधाची एक विशाल प्रतिमा आहे. प्रत्यालीढासनात उभ्या (उजवा पाय पुढे व डावा मागे अशा स्थितीत उभे राहणे.) शिवाला दहा हात आहेत. त्याने खड्ग, खटवांग, धनुष्य, बाण, कपाल, डमरू, ढाल, घंटा ही आयुधे धारण केली आहेत. त्याने अंधकाला त्रिशुळाच्या टोकावर उचलून घेतले आहे. मुंबईतील घारापुरी लेण्यात अंधकासुरमर्दनाचे एक अतिशय उत्कृष्ट शिल्प आहे. येथे अष्टभुज शिव आलीढासनात उभा आहे. दोन्ही बाजूच्या एकेका हातांनी मिळून एक लांब त्रिशूळ पेलला आहे व त्याच्या फाळावर अंधकासुर दर्शविला आहे. याशिवाय इतर हातांमध्ये घंटा, कपाल, खड्ग, डमरू ही आयुधे दिसतात. शिवाचे मागचे दोन हात भग्न आहेत, त्यात गजचर्म धरले असावे असे वाटते. पायाखाली हत्तीचे डोके दिसते. ही प्रतिमा बरीच भग्न झाली आहे, तरीही शिवाच्या वेगवान हालचाली आणि चेहऱ्यावरील कृद्ध भाव पाहून त्याच्या संहारक रूपाचे प्रत्यंतर येते.

त्रिपुरान्तकमूर्ती, कैलास लेणे, वेरूळ, महाराष्ट्र.

त्रिपुरान्तकमूर्ती : ही कथा ‘तैत्तिरीय संहिता’, ‘ऐतरेय ब्राह्मण’, ‘शतपथ ब्राह्मण’ व ‘महाभारता’त येते. तारकासुराचे तीन मुलगे विद्युन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष यांनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवास प्रसन्न करून घेतले; जेथे आपल्या मनासारख्या हालचाली करता येतील, एक हजार वर्षांनी ज्यांचे एकीकरण होईल आणि जी एका विशिष्ट बाणानेच नष्ट होतील अशी तीन पुरे मागून घेतली. त्याप्रमाणे मयासुराने त्यांना स्वर्ग, अंतरिक्ष आणि पृथ्वी येथे एक सोन्याचे, एक चांदीचे व एक लोहाचे अशी तीन पुरे बांधून दिली. तिघे पुत्र तेथे राहून देवांना त्रास देऊ लागले. शेवटी देवांनी ब्रह्मदेवाला त्रिपुरनाशाचा उपाय विचारला. शंकराने आपल्या बाणाने ही तिन्ही पुरे नष्ट करणे हा एकच उपाय आहे असे ब्रह्मदेवाने सांगितले. मात्र शंकराने त्यासाठी देवांच्या अर्ध्या शक्तीची मागणी केली. ती त्यांनी आनंदाने पुरविली. त्यामुळे शिव प्रचंड शक्तीशाली झाला आणि त्याला ‘महादेव’ ही उपाधी प्राप्त झाली. विष्णू त्रिपुरनाशासाठी स्वतः बाण बनला, अग्नी त्या बाणाचे टोक आणि यम त्या बाणाची पिसे बनले. वेदांचे धनुष्य करण्यात आले व सावित्री त्याची प्रत्यंचा झाली. ब्रह्मा शिवाचा सारथी झाला. अशा प्रकारे तयार झालेल्या बाणाच्या साहाय्याने शिवाने या तिन्ही असुरांचा त्यांच्या पुरांसह नाश केला. या कथेच्या तपशिलाबद्दल संहिता, ब्राह्मण्ये व ‘महाभारत’ यांत वैविध्य आढळते.

त्रिपुरान्तक प्रतिमेचे वर्णन सर्व आगमांमध्ये केलेले आहे. एकट्या ‘अंशुमद्भेदागमा’तच हातांच्या व पायांच्या संख्येप्रमाणे वेगवेगळी आठ वर्णने आढळतात. मात्र रक्तवर्णी व एकमुखी प्रतिमा, त्रिनेत्र आणि शेजारी पार्वती असणे हे सर्वमान्य आहे. चतुर्भुज शिव आलीढासनात उभा असावा, त्याच्या हातांत बाण, टंक, मृग व धनुष्य असावेत; अष्टभुज असल्यास उजव्या हातांत बाण, कुऱ्हाड, खड्ग, अस्त्र व डाव्या हातांत धनुष्य, विस्मयमुद्रा, कवच आणि कटकमुद्रा असून शरीर अतिभंग अवस्थेत असावे. शिवाला दहा हात असल्यास उजव्या हातांत वज्र, धनुष्य, शंख, सूचिमुद्रा व विस्मयमुद्रा तर डाव्या हातांत बाण, चक्र, सुळा, टंक, ढाल असावेत. याशिवाय शिव प्रत्यालीढासनात उभा असावा. एक पाय अपस्मारपुरुषावर असावा. रथ असल्यास उजवा पाय त्याच्या पातळीच्या खाली ठेवलेला असावा. ब्रह्मा हा सारथी असावा, श्वेत बैलाचे रूप घेऊन विष्णू रथ ओढत असावा आणि हा रथ हवेत असावा असे सांगितले आहे.

अतिशय कलात्मक व बारकाव्यांनिशी शिल्पांकित केलेल्या तीन त्रिपुरान्तक प्रतिमा वेरूळच्या लेण्यांमध्ये आहेत. दशावतार लेण्यातील प्रतिमा सर्वांत प्राचीन आहे. यामध्ये दोन घोडे रथ ओढत आहेत. चतुर्मुख ब्रह्मा सारथी आहे. अतिभंग अवस्थेत व प्रत्यालीढासनात उभ्या शिवाला दहा  हात आहेत. त्यांपैकी काही भग्न झाले आहेत. उरलेल्या हातांतील खड्ग, ढाल, धनुष्य व बाण दिसतात. तो पाठीवरील भात्यातून बाण काढत आहे. चौखूर उधळलेला रथ, शिवाची एकाग्र दृष्टी व करारी चेहरा यांमुळे हे शिल्प जिवंत झाले आहे. कैलास लेण्यात शिल्पपटाच्या मागच्या भिंतीवर आणखी एक त्रिपुरान्तक शिवप्रतिमा आहे. इथे शिव द्विभुज असून त्याच्या उजव्या हातात धनुष्य व डाव्या हातात बाण आहे. तो आलीढासनात उभा आहे व सारथ्याच्या भूमिकेत चतुर्मुख ब्रह्मा आहे. तिन्ही असुर भयभीत होऊन रथापुढे धावत आहेत. शिव आपल्या बाणाने त्यांच्या तीन पुरांवर नेम धरत आहे, असे हे शिल्प आहे.

कामांतक शिव : प्रेमाची देवता, काम/मदन याचा अंत शिवाच्या हातून कसा झाला याची कथा ‘लिंगपुराणा’त येते. तारकासुर हा उन्मत्त होऊन देवांना त्रास देऊ लागला. त्याचा वध केवळ शिवपुत्र कार्तिकेयाच्या हातूनच होऊ शकणार होता. यावेळी शिवाची प्रथमपत्नी सती हिच्या अग्निप्रवेशामुळे शिव विरक्त होऊन हिमालयात तपश्चर्या करत होता. मात्र हिमवानाची मुलगी पार्वती शिवप्राप्तीसाठी तप करत होती. त्यामुळे सर्व देवांनी एकत्र येऊन शिवाची तपश्चर्या भंग करण्यासाठी कामदेवाची नियुक्ती केली. कामाने आपले पुष्पांकित धनुष्य सज्ज केले आणि मदनबाण शिवाच्या दिशेने सोडला. साधना भंग झाल्यामुळे शिव आत्यंतिक क्रोधायमान झाला आणि त्याने आपला तृतीय नेत्र उघडून तत्काळ कामदेवाला भस्मसात केले. पण त्याचवेळी त्याचे लक्ष पार्वतीकडे गेले आणि मदनबाणाच्या प्रभावामुळे त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रेम उत्पन्न होऊन त्याची परिणती विवाहात झाली. कालांतराने त्यांना कार्तिकेय हा पुत्र झाला आणि त्याने पुढे तारकासुराचा वध केला. इकडे कामपत्नी रतीच्या विनंतीवरून शिवाने त्याला पुनः जिवंत केले.

‘उत्तरकामिकागम’, ‘सुप्रभेदागम’, ‘पूर्वकारणागम’ या ग्रंथांत दिलेल्या वर्णनाप्रमाणे शिव हा योगदक्षिणामूर्तीमध्ये असावा, काम अथवा मदन हा त्याच्यासमोर कोसळलेला असून त्याची उंची शिवाच्या उंचीच्या एक सप्तमांश किंवा एक दशांश एवढीच असली पाहिजे. त्याचा वर्ण सोनेरी पिवळसर आणि आभूषणे सोनेरी असावीत, त्याच्या उजव्या हातात उसाचे धनुष्य आणि फुलांनी शृंगारलेले पाच बाण असावेत, किंवा एक बाण असावा. ‘पूर्वकारणागमा’तील माहितीनुसार शिवाला तीन नेत्र, चार हात असावेत. मागील दोन हातात सर्प व अक्षमाला तर पुढच्या उजव्या हातात पताका/पताकामुद्रा आणि डावा हात सूची मुद्रेत असावा. मदनाची उंची शिवाच्या निम्मी असावी. तो पीठावर किंवा रथावर उभा असून त्याच्या ध्वजावर माशाचे चिन्ह असावे.

वेरूळ येथील कैलास लेण्यात दर्शनी भिंतीसमोर आणि मागे अशा दोन ठिकाणी कामांतक शिवप्रतिमा दिसतात, मात्र त्या अतिशय झिजून गेल्या आहेत. गंगैकोंडचोलपुरम् (तमिळनाडू) येथील बृहदीश्वर मंदिरात एक सुस्थितीतील प्रतिमा आढळते. ही मूर्ती चोल शिल्पकलेच्या पद्धतीनुसार तीन खणांमध्ये शिल्पांकित केली आहे. मधल्या खणात शिव ललितक्षेप मुद्रेत बसला आहे, कारण मदनामुळे त्याचा ध्यानभंग झाला आहे. डाव्या खणात मदन व रती दिसत आहेत, उजवीकडे पार्वती सेविकेसह दाखवली आहे. अशीच एक सुंदर प्रतिमा कंबोडिया येथील बांटीस्राय मंदिरात आहे.

शरभेष : शैव आणि वैष्णव पंथांतील वैर आणि शैव अनुयायांनी आपल्या पंथाला सर्वश्रेष्ठ ठरविण्याचा केलेला प्रयत्न शरभेष मूर्तीतून दिसतो. त्याची कथा पुढीलप्रमाणे आहे : विष्णूने नरसिंहावतार घेऊन हिरण्यकशिपूचा वध केला; मात्र त्याचा राग शांत न होता वाढतच गेला व सर्वांना त्याचा त्रास होऊ लागला. तेव्हा उन्मत्त विष्णूला ताळ्यावर आणण्यासाठी शिवाने एक विलक्षण रूप धारण केले. तोच हा शरभ. त्याला दोन डोकी, आठ पाय, सिंहासारखे तीक्ष्ण नख्या असलेले पंजे, लांब शेपूट व दोन शुभ्र पंखही होते. भीतीदायक गर्जना करत हा शरभ नरसिंहाला सामोरा गेला, त्याने नरसिंहावर प्रभुत्व मिळवले व त्याची चिरफाड करून त्याला ठार मारले. नंतर नरसिंहाच्या डोक्याने आपला जटामुकुट सुशोभित केला व त्याचे कातडे पांघरले. विष्णू भानावर आला आणि शिवाची स्तुती करत आपल्या निजधामी परतला.

‘कामिकागमा’त शरभेष मूर्तीचे वर्णन असे आहे की, शरभेषाच्या शरीरावर पक्षाप्रमाणे सोनेरी झळाळी असावी. त्याचे डोळे लाल व दोन पसरलेले पंख असावेत. सिंहासारख्या आठ पायांपैकी चार जमिनीवर ठेवलेले असून बाकीचे चार वर उचललेले असावेत. शरीराचा वरचा भाग मानवी असावा. तोंड सिंहाचे असून दोन्ही बाजूंनी सुळे बाहेर आलेले दिसावेत. डोक्यावर किरीटमुकुट असावा आणि त्याने आपल्या दोन पायांत नरसिंहाला घट्ट धरलेले असावे. ‘उत्तरकामिकागम’ ग्रंथानुसार शिवाला सूर्य, चंद्र आणि अग्नी असे तीन नेत्र असावेत. त्याची जीभ म्हणजे वडवानल असते. त्याचे दोन पंख म्हणजे काली व दुर्गा असतात, तर त्याच्या नख्या म्हणजे इंद्र, उदर म्हणजे काळाग्नी, मांड्या म्हणजे काळ आणि त्याची ताकद म्हणजे महावायू होत. ‘श्रीतत्त्वनिधी’ तर शरभेषाला ३२ हात आहेत असे सुचवते. त्याने वज्र, मुष्टी, चक्र, शक्ती, दंड, अंकुश, खड्ग, खट्वांग, परशू, अक्षमाला, हाड, धनुष्य, मुसळ, अग्नी आणि अभयमुद्रा हे उजव्या हातात; तर पाश, गदा, बाण, ध्वज, वेगळे खड्ग, साप, पद्म, कपाल, पुस्तक, हल, मुदगल, वरदमुद्रा हे डाव्या हातात धारण केलेले असून एका हाताने दुर्गेला आलिंगन दिलेले असते.

शरभेष प्रतिमा दुर्मीळ आहेत. भारतीय पुरातत्त्वज्ञ टी. गोपीनाथ राव (१८७२-१९१९) यांनी तमिळनाडूतील त्रिभुवनम् (जि. तंजावर) येथील मंदिरात असलेल्या एका कांस्यमूर्तीचा उल्लेख केला आहे. येथे शरभाला आठऐवजी तीनच पाय व चार मानवी हात आहेत. शरीर व तोंड सिंहाचे आहे. शेपूट आहे. मागील दोन हातांत परशू व मृग, तर पुढील दोन हातात पाश आणि अग्नी. त्याने नरसिंहाला पुढील पायांमध्ये घट्ट आवळले आहे. नरसिंह आपल्या आठही पायांनी सुटण्याची धडपड करतो आहे, असे हे शिल्प आहे. महाराष्ट्रात अनेक किल्ल्यांवर व काही उत्तर मध्ययुगीन मंदिरांवर चार पाय व तीक्ष्ण नख्या, सिंहासारखे विक्राळ तोंड, दोन पंख व लांब शेपटी असे प्राणिशिल्प पाहावयास मिळते, तो शरभ होय. या शरभाने आपल्या पंजात किंवा पायाखाली एक वा अनेक हत्तींना धरून ठेवलेले दिसते.

कालारीमूर्ती : मार्कंडेयानुग्रहमूर्ती  आणि कालारीमूर्ती या वास्तविक एकच होत. शिवाने आपला परमभक्त मार्कंडेय याची यमाच्या तावडीतून सुटका कशी केली हे अनेक कथा, दंतकथांतून स्पष्ट होते. तदनुषंगिक प्रतिमा वेरूळ, अंबरनाथ, तंजावर, पट्टडकल येथे पाहावयास मिळतात. निव्वळ कालारीमूर्ती (कालाचा अंत करणारा, काळाचा शत्रू शिव) म्हणता येईल, अशी एक प्रतिमा महाबलीपुरम् (तमिळनाडू) येथे धर्मराजरथ मंदिरात आहे. ही मूर्ती इ. स. सातव्या शतकात घडवलेली असून त्यात शिव चतुर्भुज आहे; त्याच्या खालच्या उजव्या हातात परशू आहे तर वरचा उजवा हात भग्न आहे. खालचा डावा हात सूचिमुद्रेत आहे आणि तो काळाकडे निर्देश करत आहे. मात्र वरच्या डाव्या हातातील आयुध संदिग्ध आहे. शिवाने यमाला लाथ मारून खाली पाडले आहे आणि त्याच्या पायांजवळ पडलेला यम भयभीत नजरेने शिवाकडे पाहत आहे.

जालंधरवधमूर्ती : ‘शिवपुराण’ जालंधर या असुराची कथा विस्तृतपणे सांगते. त्रिपुरनाशनाच्या वेळी शिवाच्या कपाळातून उत्पन्न होणारी आग आणि सिंधु नदी यांच्या संगमातून जालंधराचा जन्म झाला. लवकरच तो एक शक्तिशाली राजा बनला. देवांवर स्वारी करून त्याने विष्णूंचाही पराभव केला. तेव्हा देवांनी शिवाची प्रार्थना केली. नारदांनी जालंधराला भेटून त्याच्यासमोर पार्वतीच्या सौंदर्याचे गुणगान केले, त्यामुळे त्याच्या मनात पार्वतीविषयी अभिलाषा निर्माण झाली. त्यातून त्याचे व शिवाचे युद्ध उद्भवले आणि शेवटी शिवाच्या हातून त्याचा वध झाला.

या प्रकारच्या मूर्तीत शिव द्विभुज, रक्तवर्णी दाखवावा, त्याने छत्र व कमंडलू धारण केलेले असावेत, पायात खडावा आणि जटांमध्ये गंगा व चंद्रकोर असावी. जालंधरही द्विभुज असून अंजलीमुद्रेत असावा, त्याची तलवार मनगटाखाली ठेवलेली असावी आणि त्याच्या हातावर सुदर्शन चक्र असावे असे सांगितले आहे. मात्र अशा प्रकारच्या मूर्तीची अद्याप नोंद नाही.

भैरव, कोप्पेश्वर मंदिर, खिद्रापूर, महाराष्ट्र.

भैरव : भैरव म्हणजे भरण करणारा किंवा भीषण. हे शिवाचे पूर्णरूप आहे. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गावात भैरव वा काळभैरवाच्या मूर्ती आढळतात. त्याला भैरोबा, क्षेत्रपाल असेही म्हटले जाते. त्याला वाराणसीचा रक्षक मानतात. त्यासंबंधीची कथा ‘कूर्मपुराणा’ व ‘वराहपुराणा’त येते. ‘वराहपुराणा’तील कथेनुसार, ब्रह्माने रुद्राला ‘कपाली’ असे हिणवल्यामुळे रुद्र फार क्रोधित झाला आणि त्याने आपल्या डाव्या अंगठ्याच्या नखाने ब्रह्मदेवाचे एक मस्तक कापून टाकले. मात्र ते रुद्राच्या अंगठ्याला तसेच चिकटून लोंबकळत राहिले. काही केल्या ते सुटेना तेव्हा शेवटी रुद्राने ब्रह्मदेवालाच यावरील उपाय विचारला. ब्रह्माने त्याला बारा वर्षांपर्यंत कापालिक जीवनपद्धती अंगिकारण्यास सांगितले. त्याप्रमाणे रुद्राने केसांपासून बनवलेले यज्ञोपवीत, हाडांच्या मण्यांचा हार आणि कवट्यांनी बांधलेल्या जटा असा वेष केला आणि तो तीर्थयात्रेला निघाला. बारा वर्षांनी फिरत फिरत तो वाराणसीला आला आणि तिथेच शेवटी सिमचरीच्या अनुयायांनी ब्रह्माचे ते मस्तक रुद्राच्या अंगठ्यापासून वेगळे केले. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या जागेला आता ‘कपाल-मोचन’ टेकडी असे नाव आहे. ‘कूर्मपुराणा’तील कथा काहीशी वेगळी आहे. त्यानुसार ब्रह्माने स्वतःला सृष्टीचा निर्माता म्हणून घोषित केले, मात्र या गोष्टीला शिवाने आव्हान दिले. वेदांनीही शिवाला पाठिंबा दिला. तरीही त्यातून काही मार्ग निघेना, तेव्हा शिवाने भैरवाला आज्ञा केली की, त्याने ब्रह्माचे एक मस्तक धडावेगळे करावे. या दोन्ही कथांमधून शिवाचे श्रेष्ठत्व जाणवते, तसेच कापालिक संप्रदायाची महतीही कळते.

हीच कथा ब्रह्मशिरच्छेद शिव, कंकालमूर्ती या सदराखालीही येते. ब्रह्मदेवाला मूलतः पाच शिरे होती. त्यांपैकी एक कसे गळून पडले हे या कथेतून स्पष्ट होते. ‘श्रीतत्त्वनिधी’ या ग्रंथात ब्रह्मशिरच्छेदमूर्तीचे वर्णन आहे. श्वेतवर्णीय शिवाच्या उजव्या कानात पत्रकुंडल व डाव्या कानात नक्रकुंडल असावे. त्याने उजव्या हातांत वज्र व परशू तर डाव्या हातात सुळा आणि ब्रह्माचे मुंडके धारण केलेले असावे. अंगाभोवती व्याघ्रचर्म गुंडाळलेले असावे. मात्र या वर्णनाप्रमाणे घडविलेली एकही मूर्ती आढळत नाही. केवळ चतुर्भुज भैरवाच्या खालच्या उजव्या हातात ब्रह्माचे मुंडके असते, ती प्रतिमा ब्रह्मशिरच्छेदमूर्तीच्या काहीशी जवळची वाटते.

भैरवाच्या मूर्ती दोन प्रकारच्या असतात : १) सामान्य क्षेत्रपाल, चंड, बटुक, स्वच्छंद व स्वर्णाकर्षण भैरव येतात. २) चौसष्ट भैरव. यांची नावे व वर्णने ‘अभिलषितार्थचिंतामणी’, ‘श्रीतत्त्वनिधी’, ‘मत्स्यपुराण’ इ. ग्रंथांत दिली आहेत. भैरवाच्या उग्र स्वरूपातील मूर्तीच अधिक आहेत. वाऱ्यावर उडणारे केस, बटबटीत डोळे, बाहेर आलेले सुळे, डोक्यावर गळ्यात आणि दंडावर साप, कानांत सर्पकुंडले, डाव्या हातात केसांनी धरलेले मुंडके, त्यातून गळणाऱ्या रक्ताचे थेंब चाटणारे कुत्रे अशी भैरवाची मूर्ती दाखवतात. भैरवाची प्रतिमा बऱ्याच वेळा द्विपाद आणि नग्न असते. क्वचित पायाखाली प्रेत दाखवलेले असते. हातांची संख्या ४, ८, १२, १८ अशी असू शकते. भैरवाच्या मूर्ती उत्तर व दक्षिण भारतात सर्वत्र आढळतात. विशेषतः मंदिरांच्या मंडोवरावर (बाह्य भिंतीवर) देवकोष्ठात त्या असतात. कोलकाता येथील आशुतोष संग्रहालयात एक भैरवाची मूर्ती आहे, तिला एक पाय व दोन हात आहेत. राजस्थानात किराड/किराडू (जि. बाडमेर) येथे इ. स. १४५९ मधील त्रिपाद भैरवाची मूर्ती आहे. तिला आठ हात असून त्यांत तलवार, डमरू, क्षुरिका, कपाल इ. आयुधे धारण केली आहेत. पायात लाकडी खडावा आहेत. गळ्यात व मस्तकावर नाग धारण केला आहे व गळ्यात लांब रुंडमाळा आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात १२ व्या शतकातील भैरवाची एक सुंदर चतुर्भुज प्रतिमा आहे. त्रिभंगावस्थेत उभ्या भैरवाच्या मागील दोन हातात त्रिशूळ, डमरू व पुढील उजव्या हातात तलवार व डाव्या हातात कपाल आहे, त्याच हाताने नरमुंडाचे केस धरले आहेत. नग्न मूर्तीच्या गळ्यात रुंडमाळा व इतर आभूषणे आहेत, कानात चक्राकार कुंडले, पायात वलये आणि पादुका आहेत. मस्तकाभोवती, गळ्यात, मांड्यांभोवती नागाची वेटोळी असून पायांजवळ गण आणि एक कुत्रा दिसतो; तो वर लोंबकळणाऱ्या मस्तकातून गळणारे रक्त चाटत आहे. पार्श्वभूमीवर अलंकारिक मकरतोरण आहे. मार्कंडी (जि. गडचिरोली) येथील मार्कंडऋषी मंदिराच्या बाह्यभिंतीवर भैरवाच्या दोन प्रतिमा असून त्यांपैकी एक चतुर्भुज तर दुसरी अष्टभुज आहे. अष्टभुज भैरवाच्या उजवीकडील हातात खटवांग, कपाल, नरमुंड आणि कर्तरी आहे; तर डावीकडील हातात डमरू, त्रिशूळ, खड्ग आहे. ही प्रतिमा नग्न असून तिला दाढी-मिशा आहेत. त्याच्या कटिसूत्राला दोन घंटा बांधलेल्या आहेत व गळ्यात पाच मुंडक्यांचा लंबहार आहे. त्याच्या पायांमागे तीन कुत्री आहेत. येथील चतुर्भुज प्रतिमाही अशीच उग्र आहे. त्याच्या उजव्या हातांत खड्ग व गजदंत तर डाव्या हातांत खेटक व नरमुंड दिसते. त्याने आपला उजवा पाय खाली पडलेल्या प्रेताच्या पायावर रोवला आहे. गुजरातमधील पाटण येथील सातमजली बारवेच्या भिंतीवर १८ हातांची भैरवप्रतिमा आढळते.

वीरभद्र : एका कथेनुसार एकदा यज्ञस्थळी सर्व देव आणि ऋषीमुनी जमले होते. दक्ष प्रजापती तेथे पोहोचला, त्याने ब्रह्मदेवाला वंदन केले व त्याच्याच आज्ञेने तो स्थानापन्न झाला. यावेळी शिव वगळता सर्वांशी त्याचे वागणे आदराचे होते. शिवाची मात्र तो यथेच्छ निंदानालस्ती करू लागला. शिवाचे स्मशानात राहणे, त्याचे जटा, नाग, व्याघ्रचर्म धारण करणे, नंदी-भृंगी आदी अनुयायी यांवर त्याने तोंडसुख घेतले आणि यज्ञासारख्या पवित्र ठिकाणी शिवाला स्थान मिळू नये अशीही मागणी केली, तेव्हा महादेव तेथून निघून गेला. काही काळाने दक्षाने स्वतःच एक यज्ञ आरंभला, त्यास शिव वगळता सर्व देवांना आमंत्रण होते. सर्व देव आपापल्या पत्नींसह तिकडे निघालेले पाहून शिवपत्नी सतीनेही यज्ञाला जाण्याचा आग्रह धरला. महादेवाने तिला पूर्वीच्या अपमानाची आठवण करून दिली आणि तिथे न जाण्याचा सल्ला दिला. पण प्रत्यक्ष पित्याच्याच घरी यज्ञ असल्याने सती हट्टाने गेली आणि यज्ञस्थळी दक्षाने तिचा व शिवाचा पाणउतारा केला. विलक्षण अपमानित व संतप्त झालेल्या सतीने त्याच यज्ञकुंडात आत्मार्पण केले. हे वृत्त समजताच शिवाच्या क्रोधाला पारावार उरला नाही. त्याने आपली एक जटा तोडून तिच्यातून वीरभद्र नावाची एक भयंकर आकृती निर्माण केली आणि त्याच्याकरवी दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करवला. नंतर वीरभद्राने दक्षाचाही शिरच्छेद केला. त्याच्या संहारामुळे दक्षाचे गर्वहरण झाले व तो शिवास शरण आला, तेव्हा शिवाने बकऱ्याचे डोके त्याच्या धडावर बसवले व त्याला जीवनदान दिले.

‘महाभारत’ व ‘भागवता’त आलेल्या या कथेमुळे शिव हा मूलतः वेद व यज्ञसंस्थाबाह्य होता हे कळून येते. शिवाय वीरशैव संप्रदाय हाही वैदिक संस्था आणि वर्णव्यवस्था न मानणारा असावा हे स्पष्ट होते. त्यामुळेच त्यांना वीरभद्र अतिशय पूज्य आहे. वीरभद्राच्या मूर्तींची वर्णने इतर शैवप्रतिमांसोबत येतात, तसेच सप्तमातृकांसोबतही येतात. ‘अग्निपुराण’, ‘मत्स्यपुराण’, ‘श्रीतत्त्वनिधी’, ‘अंशुमद्भेदागम’, ‘कारणागम’, ‘अभिलषितार्थचिंतामणि’, ‘चतुर्वर्गचिंतामणि’, ‘शिल्परत्न’ अशा नऊ ग्रंथांमध्ये वीरभद्राची ११ प्रकारची मूर्तीवर्णने आहेत. ‘श्रीतत्त्वनिधी’मध्ये दिलेल्या वर्णनानुसार तो त्रिनेत्र व चतुर्भुज असावा, त्याने आपल्या हातात खड्ग, बाण, धनुष्य व गदा धारण केलेले असावेत, त्याचे स्वरूप रौद्र असून भयंकर दाढा व गळ्यात रुंडमाळा असाव्यात. त्याच्या डावीकडे भद्रकाली तर उजवीकडे बकऱ्याचे डोके असलेला दक्ष अंजलीमुद्रेत असावा. ‘अंशुमद्भेदागमा’त वीरभद्र नंदीसमवेत असावा असे सांगितले आहे. तो त्रिनेत्र व चतुर्भुज असून त्याने शूल, गदा धारण केलेले असावेत, एक हात अभयमुद्रेत तर दुसरा वरदमुद्रेत असावा. ‘चतुर्वर्गचिंतामणि’मध्येही सोबत नंदी असावा, चार हात त्रिशूळ, वीणा धारण करणारे व कट्यावलंबित असे असावेत असे सांगितले आहे. ‘शिल्परत्ना’त वेगवेगळी वर्णने आहेत: एका वर्णनानुसार वीरभद्र गौरवर्ण असून वेताळावर बसलेला असावा, तो उग्र, पिंगट वर्णाचा, व्याघ्राजिन, चंद्रकोर व सर्प ल्यालेला, हातात खड्ग, शूल, परशू, डमरू, खेटक, कपाल असून एक हात अभयमुद्रेत तर दुसरा वरदमुद्रेत असावा (हातांची संख्या नीट कळत नाही.). सभोवती गण असावेत. दुसऱ्या वर्णनाप्रमाणे वीरभद्र गौरवर्णाचा, पांढऱ्या कमळावर बसलेला, दिगंबर व लहान बालकासारखा असावा. तर तिसरे वर्णन सांगते त्याप्रमाणे तो नंदीवर बसलेला, वरद व अभयमुद्रेत तर मृग व टंक धारण केलेला गौरवर्णीय असावा. त्याने नागाचे यज्ञोपवीत धारण केलेले असावे.

दक्षिण भारतात वीरभद्राचे मोठ्या प्रमाणावर पूजन केले जाते, साहजिकच त्याच्या मूर्ती जास्त सापडतात. चेन्नईच्या शासकीय वस्तुसंग्रहालयात (पूर्वीचे मद्रास वस्तुसंग्रहालय) एक कांस्यप्रतिमा आहे. गोलाकार पीठावर त्रिभंगावस्थेत उभी असलेली ही प्रतिमा बहुधा अष्टभुज असावी, मात्र पुढील दोन हात भग्न झाले आहेत. इतर हातांतील आयुधेही नीट समजत नाहीत. पायात पादुका आणि कपाळावर उभा त्रिनेत्र आहे. वटारलेले डोळे आणि ओठांबाहेर डोकावणारे सुळे त्याचे संहारक रूप स्पष्ट करतात. तेनकाशी (तमिळनाडू) येथील शिवमंदिरात एका खांबावर वीरभद्राची १५ व्या शतकातील एक प्रतिमा आहे. ही मूर्ती दहा हातांची असून उजवीकडच्या तीन हातांत बाण, परशू व खड्ग धारण केले आहेत; उर्वरित दोन हातांपैकी एक भात्यातून बाण काढत आहे तर एका हातात लांब तलवार (आता काहीशी भग्न झालेली) असून ती दक्षाच्या मानेत घुसविली आहे. डाव्या हातांमध्ये धनुष्य, मुसळ, पाश, एक गोल ढाल व एक आयताकृती ढाल अशी आयुधे आहेत. डोक्यावर जटामुकुट असून त्यातून ज्वाळा निघत आहेत. हा वीरभद्र जमिनीवर पडलेल्या दक्षाच्या शरीरावर उभा आहे. हैदराबाद येथील सालारजंग वस्तुसंग्रहालयात वीरभद्राची एक प्रतिमा आहे. तिने पायात पादुका घातलेल्या असून त्याखाली तीन डोकी दाखविली आहेत. त्याच्या डोक्यावर पाच शिवलिंगे असून सूर्य व चंद्रदेखील आहेत. जवळच बकऱ्याचे डोके असलेला दक्षही आहे. जेव्हा वीरभद्र सप्तमातृकामसमवेत शिल्पांकित केलेला असतो तेव्हा तो त्यांच्यासह बसलेला दाखवतात, त्याचे स्वरूप सौम्य असते. वेरूळ येथील लेण्यात अशा काही प्रतिमा आहेत.

मल्लारी : मल्लारी किंवा मल्हारी अर्थात खंडोबा हे महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाडके दैवत आहे. खंडोबा हे मराठी समाजाच्या सर्वच स्तरांतील असंख्य लोकांचे कुलदैवत आहे. शिवाने खंडोबा या रूपाने मणि आणि मल्ल या दोन राक्षसांचा सहा दिवस चाललेल्या घनघोर युद्धात पराभव केला आणि सर्वसामान्य जनतेला त्यांच्या त्रासापासून वाचविले. मल्लारीची महाराष्ट्र व कर्नाटकात मिळून अकरा स्थाने प्रसिद्ध आहेत, मात्र कडे-कऱ्हेपठार जेजुरी (जि. पुणे) हे खंडोबाचे आद्य स्थान समजले जाते. तो द्विभुज असून खड्ग आणि डमरू धारण करतो व पांढऱ्या घोड्यावर स्वार होतो. त्याच्यासह घोड्यावर त्याच्या दोन पत्नी म्हाळसा व बाणाई यादेखील असतात. सोबत त्याचे कुत्रे असतात.

‘मल्लारी माहात्म्य’ या ग्रंथात शिवाच्या या रूपाचे प्रतिमावर्णन आहे. शिव हा सोनेरी वर्णाचा, द्विभुज असावा, हातात डमरू व खड्ग असावे. जटांमध्ये चंद्रकोर व अंगावर आभूषणे असावीत तसेच सापाचे वस्त्र असावे. तो पांढऱ्या घोड्यावर स्वार असून सोबत सात कुत्री असावीत, असे सांगितले आहे. मल्हारीच्या ज्या मूर्ती उपलब्ध आहेत त्या उत्तर मध्ययुगीन आहेत. बहुतांशी पंचधातूच्या प्रतिमा आढळतात. त्यांत तो एकटा किंवा दोन पत्नींसह घोड्यावर बसलेला आढळतो. पाषाणप्रतिमा असतील तर तो बसलेला असून द्विभुज किंवा चतुर्भुज असतो. दोन हात असल्यास त्यांत डमरू व त्रिशूळ असतो तर चार हातांची प्रतिमा असल्यास डमरू, त्रिशूळ, खड्ग व खेटक धारण केलेले असते. जेजुरी येथील मुख्य मंदिरात खंडोबा व म्हाळसा यांच्या उभ्या मूर्तींच्या तीन जोड्या आहेत; मात्र त्यांची घडण एकसारखीच आहे. खंडोबाच्या हातांत खड्ग, त्रिशूळ, डमरू, परळ या वस्तू आहेत, तर म्हाळसेच्या उजव्या हातात अनुक्रमे उत्पल, कमलकलिका अशा वस्तू आहेत. डावे हात गजहस्त मुद्रेत आहेत. खंडोबाच्या कानात मकरकुंडले आहेत, तर म्हाळसेनेही आभूषणे घातली आहेत. साधारणतः अशाच प्रकारच्या मूर्ती पाली (जि. सातारा), अणदूर (जि. उस्मानाबाद), मंगसुळी (जि. बेळगावी, कर्नाटक), मैलार (जि. बीदर, कर्नाटक) इ. ठिकाणी पाहायला मिळतात.

संदर्भ :

  • Rao, T. A. G., ‘Elements of Hindu Iconography’, Vol. I, Part I, Motilal Banarsidass Publishers Pvt. Ltd., Delhi, 1914; 1997.
  • Rao, T. A. G., ‘Elements of Hindu Iconography’, Vol. II, Part I, Motilal Banarsidass Publishers Pvt. Ltd., Delhi, 1914; 1997.
  • खरे, ग. ह.,  ‘महाराष्ट्राची चार दैवते’, भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे, १९५; २०१२.
  • खरे, ग. ह., ‘मूर्तिविज्ञान’. भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे,  १९३९; २०१२.
  • जोशी, नी. पु., ‘भारतीय मूर्तिशास्त्र’, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९; २०१३.
  • देगलूरकर, गो. बं., ‘शिवमूर्तये नमः’, स्नेहल प्रकाशन. पुणे, २०१४.

छायाचित्र संदर्भ :

  • अंधकासुरवधमूर्ती, घारापुरी, महाराष्ट्र : देगलूरकर, गो. बं., ‘घारापुरी दर्शन’ स्नेहल प्रकाशन, पुणे, २०१३.
  • त्रिपुरान्तकमूर्ती, कैलास लेणे, वेरूळ, महाराष्ट्र : Rao, T. A. G., ‘Elements of Hindu Iconography’, Vol. II, Part I, Motilal Banarsidass Publishers Pvt. Ltd., Delhi, 1914; 1997.
  • गजासुरवधमूर्ती, होयसळेश्वर मंदिर, हळेबीडु, कर्नाटक : तनश्री रेडीज.
  • भैरव, कोप्पेश्वर मंदिर, खिद्रापूर, महाराष्ट्र : प्रणीता हरड.

समीक्षक : श्रीकांत गणवीर