शिव आणि पार्वती या दैवी जोडप्याचा विवाहप्रसंग ‘कल्याणसुंदर’ या नावाने शिल्पांकित केला गेला आहे. विवाहप्रसंगाची लगबग, पाहुण्यांची गर्दी, सलज्ज वधूवर आणि विधींचे तपशील या सर्व घटकांची रेलचेल दर्शविणारे कल्याणसुंदर शिल्पपट भारतात सर्वत्र आढळून येतात.
दक्ष प्रजापतीने एक यज्ञ केला आणि त्यासाठी सर्व देवदेवतांना निमंत्रण दिले. मात्र स्वतःची मुलगी सती आणि जावई शिव यांना कटाक्षाने वगळले. पित्याच्या या कृतीमुळे अपमानित झालेल्या सतीने त्याच यज्ञकुंडात स्वतःची आहुती देऊन प्राणत्याग केला. पुढे तिने हिमालयाच्या पोटी पार्वती म्हणून जन्म घेतला. याही जन्मात शिवच आपल्याला पती म्हणून लाभावा यासाठी तिने घनघोर तप सुरू केले. त्यावेळी शंकरही तपश्चर्येत मग्न होते. इकडे, तारकासुर नावाचा दैत्य देवादिकांना त्रास देत होता. विधिलिखिताप्रमाणे त्याचे पारिपत्य शंकराच्या पुत्राच्या हातून व्हावयाचे होते. त्यासाठी शंकराने लवकर विवाह करावा म्हणून देवांनी मदनाला त्याची तपश्चर्या भंग करण्यास पाठवले. हे लक्षात आल्यावर क्रोधित झालेल्या शिवशंकरांनी आपला तिसरा डोळा उघडून मदनाला भस्म केले. मात्र नंतर सर्व देवतांच्या इच्छेचा मान राखून त्यांनी पार्वतीशी विवाह केला. या कथेवर आधारित दोन प्रकारच्या प्रतिमा अस्तित्वात आल्या; पहिली कामांतक/मदनांतक शिव आणि दुसरी कल्याणसुंदर.
अंशुमद्भेदागम, पूर्वकारणागम, उत्तरकारणागम इत्यादी आगमग्रंथांमध्ये कल्याणसुंदर मूर्तीचे वर्णन तपशीलवार केलेले आढळते. त्यानुसार या विवाहप्रसंगाच्या चित्रणात वरवधू शिव आणि पार्वती हे पूर्वेस तोंड करून मध्यवर्ती असावेत. चंद्रशेखर शिव हा त्रिभंगावस्थेत एक पाय जमिनीवर व दुसरा पाय किंचित उचललेला, अशा स्थितीत उभा असावा. त्याच्या मागील दोन्ही हातांत परशू आणि मृग असावेत, तर पुढच्या दोन हातांपैकी डावा हात वरदमुद्रेत व उजवा हात वधूच्या हातात असावा. त्याच्या कानात वासुकी सर्पाची कुंडले, पुष्कर सर्पाचा हार, तक्षकाचा उदरबंध व जटामुकुटादी आभूषणे असावीत. शिवाची प्रतिमा चतुर्भुज, त्रिनेत्र आणि रक्तवर्णीय असावी; अपवादात्मक परिस्थितीत तो द्विभुज असतो. शिवाच्या डावीकडे (कधी उजवीकडे) उभी असलेली पार्वती सावळ्या वर्णाची, सलज्ज असून आपला उजवा हात तिने पाणिग्रहणासाठी शिवापुढे लांबविलेला असावा. तिची उंची शिवाच्या छाती, खांदा किंवा हनुवटीइतकी असावी. ती द्विभुज असून रेशमी वस्त्रे आणि यथायोग्य अलंकारांनी नटलेली असावी. ब्रह्मा आणि विष्णू हे अनुक्रमे पुरोहित व वधुपित्याच्या भूमिकेत असावेत. विष्णूच्या हाती उदकपात्र असून तो कन्यादान करत असावा. चतुर्मुख व चतुर्भुज ब्रह्मा हा खाली यज्ञकुंडाजवळ बसून होम व इतर विधी पार पाडत असावा. क्वचित एखाद्या ठिकाणी तो अग्नीजवळ नसून दूर, कमंडलू घेऊन उभा असल्याचे पाहावयास मिळते. विष्णूच्या दोन्ही पत्नी लक्ष्मी आणि भूदेवी पार्वतीच्या मागे, तिला विवाहवेदीकडे आणण्याच्या आविर्भावात असावयास हव्यात. पार्श्वभूमीवर विविध देवतांचे अंकन असावे, त्यात अष्टदिक्पाल, विद्याधर, सिद्ध, यक्ष, गंधर्व, ऋषी, मातृका आणि इतर देवदेवतांचा समावेश असावा. काही ठिकाणी शिव-पार्वतीचा विवाह पर्वताच्या आत म्हणजेच पार्वतीचा पिता हिमालयाच्या घरी होत आहे, असे दर्शविलेले आढळते.
कल्याणसुंदर प्रतिमा सहसा इ. स. सातव्या शतकानंतर विकसित झालेल्या आढळून येतात. त्यांपैकी सर्वांत भव्य आणि कलात्मक आविष्कार म्हणून मुंबई येथील घारापुरी (एलिफंटा) बेटावरील लेण्यातील प्रतिमेकडे बोट दाखवता येईल. यात शिव आणि पार्वती मध्यवर्ती ठिकाणी उभे असून पार्वती शिवाच्या उजव्या बाजूस आहे. चतुर्भुज शिवाचा पुढचा उजवा हात पार्वतीच्या उजव्या हातात आहे. पार्वतीची देहयष्टी अतिशय आकर्षक असून तिची अधोवदन मुद्रा सलज्ज आहे. तिच्या एका बाजूस पिता हिमालय व दुसऱ्या बाजूस लक्ष्मी आणि तिच्या मागे हाती उदकपात्र घेऊन विष्णू उपस्थित आहेत. ब्रह्मा होमाशेजारी बसून पौरोहित्य करत आहे. या मंगलप्रसंगासाठी अंतराळात अष्टदिक्पाल व इतर देवदेवतांनी गर्दी केलेली दिसते. वेरूळच्या धुमार लेण्यातील (लेणे क्र. २९) शिल्पपटाशी घारापुरी येथील शिल्पाचे लक्षणीय साम्य आहे, मात्र कलादृष्ट्या घारापुरीचे शिल्प अधिक उजवे आहे.
वेरूळच्या रामेश्वर लेण्यात (लेणे क्र. २१) उत्तर भिंतीवर भव्य कल्याणसुंदर शिल्पपट आहे. तो तीन भागांत विभागलेला आहे. सर्वांत डावीकडे पार्वती पंचाग्नीसाधना (चारही दिशांना अग्नी व माथ्यावर तळपता सूर्य यांच्या दाहक तेजामध्ये उभे राहून तप करणे) करताना दिसते. तिच्या एका हातात अक्षमाला असून दुसरा हात सैल सोडलेला आहे. तिच्याजवळ एक याचक अन्नाची याचना करताना दिसतो. वराहपुराणातील कथेनुसार प्रत्यक्ष शंकर तिची परीक्षा पाहण्यासाठी याचकाचे रूप घेऊन आले. पार्वतीने अन्नदान करण्यापूर्वी त्यास स्नान करून येण्यास सांगितले, तेव्हा नदीत एका मगरीने त्याचा पाय धरला; याचकाच्या हाका ऐकून पार्वती तेथे गेली असता तिच्या लक्षात आले की, मगरीच्या तोंडातून सोडविण्यासाठी त्याचा हात धरून वर ओढणे आवश्यक होते. उजवा हात शंकरासाठी राखून ठेवलेला असल्यामुळे तिने आपला डावा हात देऊन याचकाला बाहेर यायला मदत केली व त्याचा जीव वाचविला. या भक्तीमुळे शंकर प्रसन्न झाले व त्यांनी आपले खरे स्वरूप प्रकट केले. हा सारा कथाभाग या शिल्पात चित्रित केलेला आहे. उजवीकडच्या शिल्पात ब्रह्मा, बृहस्पती व पार्वतीपिता हिमालय विवाहप्रस्तावासंबंधी चर्चा करीत आहेत. एका बाजूला पार्वतीही उभी दिसते. मध्यवर्ती शिल्पात प्रत्यक्ष विवाहाचे अंकन दिसते. पार्वती शिवाच्या उजवीकडे उभी असून तिचा उजवा हात शिवाच्या उजव्या हातात आहे. विष्णूच्या हाती उदकपात्र असून तो कन्यादानाच्या पावित्र्यात आहे. ब्रह्मा व इतर ऋषीमुनी उजव्या कोपऱ्यात खाली बसून होमादी विधी करत आहेत. सोहळ्यास उपस्थित असलेले इतर देवदेवता आजूबाजूला दिसतात, तर खालच्या सलग पट्टिकेत शिवगण वाद्ये वाजवत, नाचत आहेत. अशीच काही भावस्पर्शी शिल्पे वेरूळ येथील दशावतार लेणे (क्र. १५) आणि कैलास (लेणे क्र. १६) मध्येसुद्धा पाहायला मिळतात. कैलासमधील मंदिरासभोवतीच्या व्हरांड्यात असलेले शिल्प खूप बोलके आहे. या लग्नासाठी पार्वतीचा पुढाकार असल्यामुळे तिने शिवाचा हात हातात घेतला आहे, असे दिसते. तसेच ती विवाहप्रसंगी सलज्जा असल्यामुळे अंगठ्याने जमीन खरवडताना दाखवली आहे.
झाशीच्या राणीमहाल येथील संग्रहात एक मिश्र प्रतिमा आहे. येथे कल्याणसुंदर आणि उमामहेश्वर हे दोन्ही प्रकार एकाच मूर्तीत दाखविले आहेत. शिव आणि पार्वती एका हाताने पाणिग्रहण करीत असतानाच दुसऱ्या हाताने एकमेकांना आलिंगन देत आहेत. शंकर चतुर्भुज असून त्याच्या मागच्या दोन्ही हातांत त्रिशूळ व सर्प आहेत, तर पुढील हातांपैकी उजवा हात पाणिग्रहण व डावा हात पार्वतीस स्तनस्पर्श करीत आहे. खाली होमाजवळ ब्रह्मदेव विधी पार पाडत आहे. वधूवरांच्या दोन्ही बाजूंस प्रत्येकी आठ घटांच्या उतरंडी ठेवलेल्या असून सर्वांत वरच्या घटांवर कळस आहेत. तमिळनाडूतील तिरुवोट्टियुर येथे कांस्याची एक सुरेख चोलकालीन प्रतिमा आहे. त्यात शिव आणि पार्वती हे वेगवेगळ्या पद्मपीठांवर उभे असून शिवाची प्रतिमा त्रिनेत्री व चतुर्भुज आहे. त्याच्या मागच्या उजव्या हातात परशू व डाव्या हातात मृग असून पुढचा डावा हात अभयमुद्रेत आहे. त्याने आपल्या पुढच्या उजव्या हाताने पार्वतीचा उजवा हात धरला आहे. शिव द्विभंगावस्थेत उभा असून त्याने जटामुकुट, यज्ञोपवीत, हार, कटिबंध ही आभूषणे धारण केली आहेत; तर पार्वतीची द्विभुज प्रतिमा सलज्ज व काहीशी अधोवदन आहे. तिच्या मस्तकावर करंडमुकुट असून ती इतर अनेक अलंकार ल्याली आहे. ही कलात्मक प्रतिमा अकराव्या शतकातील आहे.
या व्यतिरिक्त रतनपुरा (जि. बिलासपूर, छत्तीसगढ), गया (बिहार), औंढा नागनाथ (जि. हिंगोली, महाराष्ट्र), सुंदरेश्वर मंदिर (मदुरा, तमिळनाडू) येथे काही उल्लेखनीय कल्याणसुंदर प्रतिमा आढळतात.
संदर्भ :
- Rao, T. A. G., Elements of Hindu Iconography, Vol., II, Part I, Motilal Banarasidas Publishers Pvt. Ltd., Delhi, 1997.
- खरे, ग. ह., मूर्तिविज्ञान, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, २०१२.
- जोशी, नी. पु., भारतीय मूर्तिशास्त्र, प्रसाद प्रकाशन, पुणे, २०१३.
- देगलूरकर, गो. बं., शिवमूर्तये नम.., स्नेहल प्रकाशन, पुणे, २०१४.
समीक्षक : मंजिरी भालेराव