संस्कृती : संस्कृती ही मानवाच्या जीवनशैली, मूल्ये, विश्वास, आणि प्रथा यांचे एकसंधित प्रतिबिंब आहे. जगभरातील संस्कृती विविधता आणि वैशिष्ट्यांनी भरलेल्या आहेत, ज्यामुळे प्रत्येक समाजाची वेगळी ओळख तयार होते. या विविधतेतूनच जगातील कला, संगीत, भाषा, आणि साहित्याची संपन्नता दिसून येते. एडवर्ड टायलर यांनी संस्कृतीला “ज्ञान, विश्वास, कला, नैतिकता, कायदे, रूढी आणि कोणत्याही समाजातील व्यक्तीने आत्मसात केलेल्या सवयींचा एकत्रित समूह” असे संबोधले आहे. क्लिफोर्ड गीर्झ यांनी संस्कृतीला “अर्थपूर्ण प्रतीकांच्या जाळ्यातून बनलेली व्यवस्था, ज्याद्वारे मानव समूह त्यांच्या जगण्याला अर्थ देतात” असे म्हटले आहे. रेमंड विलियम्स यांच्या मते, संस्कृती ही स्थिर नसून सतत बदलत राहणारी आणि मानवी कृतींनी आकार घेत असलेली प्रक्रिया आहे. यामध्ये कला, परंपरा, तंत्रज्ञान आणि सामाजिक रचना यांचा समावेश होतो.
संस्कृती म्हणजे काय ?
सामाजिक मानववंशशास्त्रानुसार संस्कृती म्हणजे ज्ञान होय. मानवतेबद्दलचे हे ज्ञान शिकलेले किंवा आत्मसात केलेले आहे; परंतु जन्मत: प्राप्त झालेले नाही. संस्कृती ही एक जटिल आणि गतिमान संकल्पना आहे. ज्यामध्ये कला, संगीत, साहित्य, भाषा, चालीरीती, परंपरा आणि सामाजिक प्रथा यासह मानवी अनुभवाचे आणि मानवी क्रिया-कलापांचे सर्व पैलू समाविष्ट आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, योजना, नियम, तंत्र, आरेखन तसेच उन्नत जीवन जगण्यासाठी बनवलेल्या धोरणांचाही यात समावेश होतो. रेमंड विलियम्स या संस्कृती अभ्यासकाच्या मते संस्कृती ही स्थिर नसून ती सतत बदलत आणि विकसित होत असते.
संस्कृतीच्या प्रमुख घटकांत भाषा, सण उत्सव, कर्मकांड, समारंभ, धार्मिक मूल्य, खानपान परंपरा, प्रतिके, रितीरिवाज (नियम), स्थापत्ये, निषिद्ध आणि विशुद्ध बाबी इत्यादी अनेक बाबींचा समावेश केला जातो. संस्कृती भाषेतील सर्वसाधारण समान लकबी आणि बोलण्याच्या पद्धतीद्वारे ओळखली जाते. संस्कृतीचे आविष्करण भाषेच्या माध्यमातून व सण उत्सवाद्वारे प्रगटीकरणातून होत असते.
संस्कृतीची वैशिष्ट्ये
प्रत्येक मानवी समूहाची एक संस्कृती असते. ती प्रत्येक समाजाची वेगवेगळी असते. समूहातील सदस्याला संस्कृती “आपण कोण आहोत?” ही ओळख प्रदान करते. उदाहरणार्थ, पंजाबी, बंगाली इत्यादी. संस्कृती ही व्यक्तीला आपुलकीची भावना, अभिमान, अस्मिता देते. माणूस एका विशिष्ट संस्कृतीत जन्म घेतो.
संस्कृती समाजीकरणाची प्रक्रीया
संस्कृती त्याला जन्मानंतर प्रयत्नपूर्वक आत्मसात करावी लागते. ही प्रक्रिया सामाजिकरणातून घडते. संस्कृती ही समाजातील सदस्यांद्वारे संप्रेषित होत असल्याने ती व्यक्तीला एक सामाजिक वारसा या स्वरूपात मिळते. जन्मानंतर संस्कृतीत सामाजिक चिन्हे, कलाकृती इत्यादी व्यक्तीकडे संप्रेषित केली जातात. संस्कृती विविध संस्थांद्वारे व्यक्तीच्या भावनिक गरजा पूर्ण करते. उदाहरणार्थ विवाहसंस्था व कुटुंबसंस्था इत्यादी. विशिष्ट समुदायातील धार्मिक प्रथा व चालिरीती एकसमान असतात. त्या समुदायातील व्यक्तीने समान मान्यताप्राप्त वर्तनाची पुनरावृत्ती करणे अपेक्षित असते. जेणेकरून त्या व्यक्तीच्या वर्तनास एक विशिष्ट सांस्कृतिक ओळख प्राप्त होते.
संस्कृती एक संघटन संस्था
संस्कृती एकात्मतेकडे नेते. विविध जाती धर्माच्या लोकांना संस्कृती एकत्र आणते. संस्कृती एक संघटन संस्था आहे. उदाहरणार्थ, कुटुंब व विवाह संस्था लोकांना स्थिर व सुव्यवस्थित जगण्याची हमी देते. संस्कृतीच्या सातत्यपूर्णतेमुळे सांस्कृतिक परंपरा, रचना एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रसारित होतात. प्रत्येक पिढी त्यात काही जोडते, काही वर्ज्य करते. त्यायोगे संस्कृती गतिमान राहते व तिला अनेक पैलू पडतात. उदाहरणार्थ, विवाह प्रथा, परंपरा यामध्ये आधुनिकतेचा समावेश होत राहतो.
संस्कृती गतीमान असते
संस्कृतीची प्रतिके ही भौतिक जग (अन्न, आच्छादन व निर्वाह) आणि अधिभौतिक जग (श्रद्धा, विश्वास व धारणा) या दोन्हींचे प्रतिनिधित्व करतात. संस्कृतीमध्ये नाविन्य सामावून घेण्याची क्षमता असते. उदाहरणार्थ, नव्या तंत्रज्ञानाचे संगीत, संगणकीकरणाने आणलेली गतिमानता.
सांस्कृतिक अभ्यास सामाजिक शक्तीच्या, सत्तेच्या संदर्भात प्रतिनिधित्व करण्याच्या पद्धती म्हणून संस्कृतीचा शोध घेतो. सांस्कृतिक अभ्यासातून सामाजिक संरचना, आचरण आणि वृत्ती याविषयी अंतर्दृष्टी मिळते.
संदर्भ : Barker, Chris, Making Sense of Cultural Studies: Central Problems and Critical Debates, Google Books, SAGE, 2002.