भारतीय संगीतविषयक माहितीपर संस्कृत भाषेतील दुर्मीळ ग्रंथ. रागतत्त्वविबोध या ग्रंथाचे लेखन पंडित श्रीनिवास यांनी केलेले असून या ग्रंथाचा निश्चित कालावधी ज्ञात नाही. याची निर्मिती सुमारे १८व्या शतकामध्ये केलेली आहे. या ग्रंथामध्ये एकूण आठ अध्यायांचा समावेश असून या ग्रंथांमधील रागांच्या विविध अध्यायांचे सविस्तर विवरण पंडित अहोबल यांच्या संगीत पारिजात या ग्रंथातून घेतल्याचे दिसून येते. या ग्रंथामध्ये १) प्रास्ताविक, २) श्रुतिजातिविवेक, ३) स्वर, ४) ग्राममूर्च्छना, ५) गमक, ६) मेल, ७) राग प्रकरण, ८) श्रुतिनिर्णय ही आठ प्रकरणे आहेत.
‘प्रास्ताविक’ या पहिल्या प्रकरणात तैत्तिरीयब्राह्मण, याज्ञवल्क्यस्मृती आणि श्रीमद्भागवत इत्यादी ग्रंथांमधील संगीताचे प्रशंसापर अंश, श्लोक दिलेले आहेत. दुसऱ्या ‘श्रुतिजातिविवेक’ या प्रकरणात श्रुति व त्यांच्या जाती यांचे संक्षिप्त वर्णन आहे. तिसऱ्या ‘स्वर’ या प्रकरणात वीणेवर तारेच्या लांबीच्या मापाने शुद्ध स्वरस्थाने दाखवली आहेत. हा भाग जरी संगीत पारिजातातून घेतला असला तरी त्यामुळे संगीत पारिजातातील संदिग्ध अंश स्पष्ट झाले आहेत. यात विकृत स्वरांची मापेही सांगितली असून संवादींची लक्षणे सांगितली आहेत. चौथ्या ‘ग्राममूर्च्छना’ प्रकरणात मूर्च्छनेबद्दलची सामान्य माहिती दिली आहे.
या ग्रंथातील पाचव्या ‘गमक’ प्रकरणामध्ये गमकेची व्याख्या आणि हुङ्कृत, च्यवित, द्विराहत, ढालु, सुढालु, शांत, हुम्फित, पुन:स्वस्थान, अग्रस्वस्थान ही सर्व गमके व त्यांंच्या व्याख्या दिलेल्या आहेत. सहाव्या ‘मेल’ प्रकरणामध्ये प्रामुख्याने त्याची व्याख्या, शुद्ध व विकृत स्वरांनी होणारे ४६ थाट, त्याचे षाडव-औडुव हे प्रकार आणि स्वर दिलेले आहेत. सातव्या ‘रागप्रकरणात’ उद्ग्राह, स्थायी व संचारी या तानांच्या किंवा आलापांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्यानंतर शुद्ध मेलातून उत्पन्न होणाऱ्या सैन्धव रागाचे उद्ग्राह, स्थायी, संचारी व मुक्तायी या आलापखंडाचे स्वरचलन दिलेले आहे. जेव्हा रागाचे आलाप प्रारंभ होतात, त्यास उदग्राह, रागाच्या शब्दाचा पूर्वरंग म्हणजे स्थायी, रागाचा द्वितीय भाग संचारी तर रागाच्या शेवटच्या भागास मुक्तयी असे म्हणत. याप्रमाणे १०२ रागांचे वर्णन व स्वरचलन दिले आहे. यात एक विशेष असे आहे की, पं. अहोबलांनी संगीत पारिजातात २२ श्रुतींचे २२ स्वर धरून त्यांपासून हजारो मूर्च्छना बनवून दाखविल्या आहेत; पंडित श्रीनिवास यांनी येथे असे स्पष्टीकरण दिलेले आहे की, स्वररूपी बारा श्रुतींखेरीज १० श्रुतींपासून राग व स्वर बनत नाहीत. दरेक श्रुतीला स्वर मानून त्यामुळे मेल व राग उत्पन्न करणे चुकीचे आहे.
या ग्रंथातील शेवटचे ‘श्रुतिनिर्णय’ हे प्रकरण महत्त्वाचे आहे. यामध्ये श्रुतिविषयक योग्यअयोग्य सविस्तर चर्चा केलेली आहे. पुढे गांधारग्राम, मध्यमग्राम इत्यादी तीन ग्रामांचे वर्णन केले आहे. शुद्ध, कोमल स्वरांची नावे वीणेवर दाखविली आहेत. एकंदर श्रुतींसंबंधी महत्त्वपूर्ण चिकित्सा या प्रकरणात केलेली आहे.
संदर्भ :
- गर्ग, लक्ष्मीनारायण, संगीत विशारद, २२ वी आवृत्ती, संगीत कार्यालय, हाथरस, २०२०.
- देसाई, चैतन्य, संगीतविषयक संस्कृत ग्रंथ, पुणे, १९७९.
- वर्मा, सिम्मी, प्राचीन एवं मध्यकाल के शास्त्रकारोंका संगीत मे योगदान, नवी दिल्ली, २०१२.