यालाच नेपल्सचे आखात असेही संबोधले जाते. भूमध्य समुद्राचा फाटा असलेल्या टिरीनियन समुद्रातील हा एक लहानसा उपसागर आहे. इटलीच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावर अर्धवर्तुळाकारात पसरलेल्या या उपसागराचा विस्तार उत्तरेस मिसेनो भूशिरापासून दक्षिणेस सेरंतो द्वीपकल्पाच्या कांपानेला भूशिरापर्यंत झालेला आहे. सर्वसाधारणपणे या उपसागराची लांबी ३२ किमी., रुंदी १६ किमी. व क्षेत्रफळ सुमारे ८७० चौ. किमी. आहे. याची मध्यभागी रुंदी २० किमी., तर दक्षिणेस काप्री व प्रोसिडा बेटांजवळ २.५ किमी. असून उपसागराची खोली १०० ते १८० मी. आहे. विलोभनीय नैसर्गिक सृष्टीसौंदर्यासाठी या उपसागराचा परिसर प्रसिद्ध असून त्या सौंदर्याची शोभा सभोवतालच्या तीव्र उताराच्या ज्वालामुखी शिखरांनी वाढवलेली आहे. त्याच भागात व्हीस्यूव्हिअस हा प्रसिद्ध जागृत ज्वालामुखी आहे. इ. स. ७९ मध्ये व्हीस्यूव्हिअस ज्वालामुखीचा जो महाकाय उद्रेक झाला होता, त्या उद्रेकातून बाहेर फेकल्या गेलेल्या लाव्हा, चिखल व राख यांच्याखाली पाँपेई आणि हर्क्यूलॅनिअम ही नगरे जमिनीत ४.६ मी. खोल गाडली गेली होती. या दोन प्राचीन नगरांचे असंख्य अवशेष नेपल्स समुद्राच्या किनारी भागात पाहायला मिळतात.

नेपल्स उपसागराच्या उत्तर किनाऱ्यावर नेपल्स हे प्रमुख शहर व बंदर असून त्यावरूनच उपसागराला हे नाव दिले गेले आहे. याशिवाय किनाऱ्यावर अनेक नगरे आणि रिझॉर्ट (हवेशीर ठिकाणे) असून पॉट्झॉली, पोर्टची, टॉरी अनुंत्सीआत, कास्तेलमारे दी स्ताब्य व सरेन्तो ही त्यांपैकी प्रमुख नगरे आहेत. या उपसागराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावर इस्किया, प्रोचीडा व दक्षिणेस काप्री ही बेटे आहेत. पॉट्झॉली आखात हे या उपसागराचे वायव्येकडील प्रवेशद्वार आहे. दक्षिणेकडील सरेन्तो द्वीपकल्पामुळे नेपल्सचा उपसागर सोलेर्नो आखातापासून अलग झालेला आहे. नेपल्स उपसागरात देवमासा व डॉल्फिन हे जलचर मासे आढळतात. उपसागराचा परिसर व त्यातील बेटे ही पर्यटकांची विशेष आकर्षण क्षेत्रे आहेत.

समीक्षक : मा. ल. चौंडे