कॅनडाची मुख्य भूमी आणि ग्रीनलंड बेट यांदरम्यानचे कॅनडाचे ईशान्येकडील एक बेट. याची दक्षिणोत्तर लांबी सुमारे १,५३० किमी. आणि पूर्व-पश्चिम रुंदी सुमारे ३२०-४८० किमी. असून क्षेत्रफळ ५,०७,४५१ चौ. किमी. आहे. कॅनडाच्या आर्क्टिक द्वीपसमूहांपैकी एक असलेले हे बेट देशाचे सर्वांत मोठे, तर जगातील पाचव्या क्रमांकाचे मोठे बेट आहे. उत्तर अटलांटिक महासागराच्या बॅफिन उपसागरात याचा बराचसा भाग असून ते बॅफिन उपसागर आणि डेव्हिस सामुद्रधुनी यांमुळे ग्रीनलंडपासून अलग झाले आहे. दक्षिणेस असलेल्या हडसन सामुद्रधुनीमुळे हे लॅब्रॅडॉर-अंगावा द्वीपकल्प या कॅनडाच्या मुख्य भूमीपासून अलग झाले आहे. प्रशासकीय दृष्ट्या कॅनडाच्या नुनावत राज्यक्षेत्राचा बॅफिन हा एक विभाग आहे. या आर्क्टिक बेटाला अकराव्या शतकात नॉर्मन समन्वेषकांनी भेटी दिल्याचे मानले जाते. ब्रिटिश समन्वेषक सर मार्टिन फ्रोबिशर यांनी पॅसिफिककडे जाण्यासाठीच्या नॉर्थवेस्ट पॅसेजच्या शोधासाठी काढलेल्या सफरीच्या वेळी (इ. स. १५७६ – १५७८) या बेटाच्या दक्षिण भागाचे समन्वेषण केले होते. ब्रिटिश मार्गनिर्देशक आणि समन्वेषक विल्यम बॅफिन यांनी इ. स. १६१६ मध्ये या बेटाच्या उत्तर भागाला भेट दिली होती. त्यांच्याच नावावरून या बेटाला, तसेच येथील उपसागराला बॅफिन हे नाव देण्यात आले आहे.
बॅफिन बेटाचा किनारा दंतुर असून तेथे अनेक उपसागर आणि फ्योर्ड (समुद्राचे चिंचोळे भाग) आढळतात. त्यांपैकी आग्नेय भागातील कंबर्लंड साउंड व फ्रोबिशर उपसागर आणि उत्तर भागातील अॅडमिरॅल्टी उपसागर हे प्रमुख सागरी भाग आहेत. या बेटाचा पूर्वेकडील भाग पर्वतीय असून तो सतत हिमाच्छादित असतो. त्या भागात हिमनद्या आढळतात. या पर्वतीय प्रदेशात सुमारे २,४०० मी. उंचीपर्यंतची शिखरे आहेत. बेटाचे उत्तर आणि दक्षिण भाग पठारी आहेत; तर पश्चिममध्य भागातील फॉक्स बेसिन सभोवातालचा किनारी प्रदेश सखल आहे. किनाऱ्यावरील मोजक्या वसाहती वगळता बॅफिन बेटावर वस्ती आढळत नाही. एस्किमो हे येथील प्रमुख रहिवाशी असून शिकार, मासेमारी, फरचा व्यापार हे त्यांचे मुख्य व्यवसाय आहेत. बॅफिन बेटाच्या आग्नेय भागात असलेल्या फ्रोबिशर उपसागराच्या शिरोभागी इकाल्यूट हे शहर असून ते नुनावत राज्याच्या राजधानीचे व बॅफिन विभागाचे मुख्य ठिकाण आहे. इकाल्यूट ही पूर्व कॅनडियन आर्क्टिक प्रदेशातील सर्वांत मोठी वस्ती आहे. ओबडधोबड पर्वतीय शिखरे, खोल दऱ्या, निसर्गसुंदर फ्योर्ड, त्यांमधील आर्क्टिक वन्य प्राणिजीवन आणि सागरकिनाऱ्यावरील वन्यप्राणिजीवन यांच्या संवर्धनासाठी बेटाच्या पूर्वेकडील किनारी भागात असलेल्या कंबर्लंड द्वीपकल्पावरील २१,४७१ चौ. किमी. क्षेत्रात ऑयुत्तक नॅशनल पार्क हे राष्ट्रीय उद्यान १९७८ मध्ये निर्माण करण्यात आले आहे.
बॅफिन बेटाच्या उत्तर भागात लोह खनिजाचे साठे सापडले आहेत. बेटाच्या वायव्य टोकाशी असलेला नॅनिसिव्हिक हा प्रदेश चांदी, शिसे आणि जस्त उत्पादक खाणींचा जगातील सर्वाधिक उत्तरेकडील प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. बॅफिन बेटालगतच्या सागरी भागांत देवमासा, वॉलरस व सील हे जलचर आढळतात. कॅनडा आणि संयुक्त संस्थाने यांची रडार केंद्रे बॅफिन बेटावर आहेत.
समीक्षक ꞉ मा. ल. चौंडे