मानवी पचनसंस्थेतील एक महत्त्वाचा अवयव. जठराच्या निर्गमद्वारापासून गुदद्वारापर्यंतच्या अन्नमार्गाच्या भागास आतडे (आंत्र) म्हणतात. आतड्याची रचना व कार्य यांवरून त्याचे लहान आतडे (लघ्वांत्र) व मोठे आतडे (बृहदांत्र) असे दोन प्रमुख भाग आहेत. लहान आतडे अरुंद, तर मोठे आतडे अधिक रुंद परंतु, कमी लांबीचे असते. लहान आतड्यामध्ये अन्नाचे पचन व अधिशोषण होते.
प्रौढ व्यक्तीमधील लहान आतडे ही एक लांबलचक नळी असून तिची लांबी ६.५–७.५ मी. असते. याचा सरासरी व्यास २.५ सेंमी., तर नवजात अर्भकामध्ये १.५ सेंमी. इतका असतो. लहान आतड्याचे आद्यांत्र (Duodenum), मध्यांत्र (Jejunum) व शेषांत्र (Ileum) असे तीन मुख्य भाग आहेत.
आद्यांत्र : हा लहान आतड्याचा प्रारंभीचा भाग असून त्याची लांबी २३–२८ सेंमी. असते. लहान आतड्याचा हा सर्वांत लहान व अधिक जाड असा भाग आहे. त्याचा आकार इंग्रजी C अक्षराप्रमाणे असून ते स्वादुपिंडास बाहेरून वेढलेले असते. या भागात जठरातील अर्धवट पचलेल्या अन्नाचा लगदा येतो. याच भागामध्ये स्वादुपिंड नलिका व पित्तनलिका उघडते. आद्यांत्रामध्ये स्रवलेल्या विकर मिश्रणास आंत्ररस म्हणतात. आंत्ररस व स्वादुपिंडातील विकरे यांमुळे यकृतातील पित्त या अम्ल माध्यमात कर्बोदके, मेदाम्ले व प्रथिने यांचे पचन होते.
मध्यांत्र : हा लहान आतड्याचा मध्यभाग असून याची लांबी सु. २.५ मी. व सरासरी व्यास ४ सेंमी. असतो. याची लांबी एकूण आतड्याच्या लांबीच्या ४०% असते. मध्यांत्रास मोठ्या प्रमाणात रक्त पुरवठा होत असल्यामुळे याचा रंग गडद लाल असतो. याच्या आतील पृष्ठभागावर वृत्तीय वळ्या (वर्तुळाकार घड्या; Plicae circularis) असतात. आद्यांत्रातून अर्धवट पचलेले अन्न या विभागातून त्वरेने खाली जाते. तेथे ते फार वेळ राहत नाही, म्हणून त्यास रिक्तांत्र असेही म्हणतात. मध्यांत्राच्या भित्ती चार थरांच्या बनलेल्या असतात. सर्वांत बाहेरचा थर पर्युदराचा (Mesentery) असतो. त्याच्या आतील दुसरा स्तर स्नायूंचा बनलेला असतो. बाहेरचा थर लांब स्नायू तंतूंचा असून मध्यांत्राच्या अक्षाला समांतर असतो आणि आतला थर आंत्राभोवती गोलाकार असतो. या दोन प्रकारच्या स्नायूंच्या आकुंचनामुळे अन्नात पाचकरस चांगला मिसळला जाऊन अन्न पुढे रेटले जाते.
शेषांत्र : हा लहान आतड्याचा शेवटचा भाग असून तो सु. ३ मी. लांबीचा असतो. याची लांबी एकूण आतड्याच्या ६०% असते. लहान आतड्याचा शेवटचा भाग मोठ्या आतड्याशी एका छोट्या अंधनालेने जोडलेला असतो. जीवनसत्त्व ब१२ च्या शोषणाचे महत्त्वाचे कार्य शेषांत्रामध्ये होते.
मध्यांत्र आणि शेषांत्र हे उदरगुहेमध्ये उदरच्छद आवरणाने (पर्युदराने) वेढलेले असते. उदरच्छदाच्या दुहेरी आवरणातून शिरा, लसीका वाहिन्या आणि चेता अन्नमार्गाकडे गेलेल्या असतात. लहान आतड्याचा सर्वांत बाह्य स्तर चिवट सीरमी पटलांनी (Serosa) बनलेला असतो. सीरमी पटल कोलॅजेन तंतू थर व संयोजी ऊतींनी बनलेले असते. सीरमी पटलाखाली स्नायूस्तर असतो. स्नायू खंड वर्तुळाकार व उभ्या तिरक्या दिशेने एकत्र आलेले असतात. स्नायूस्तरामुळे अन्ननलिकेचा क्रमसंकोच होतो. पचनसंस्थेमध्ये आलेले अन्न पुढे ढकलले जावे यासाठी अनैच्छिक स्नायूंच्या आकुंचनामुळे अन्ननलिकेपासून (ग्रासनली; Esophagus) टप्प्याटप्प्याने आकुंचन होते. आकुंचन पावलेला भाग पुन्हा पूर्ववत होतो. या क्रियेस क्रमसंकोच म्हणतात. अन्ननलिकेपासून सुरू झालेला क्रमसंकोच अन्नमार्गाच्या शेवटच्या भागापर्यंत होतो. जोपर्यंत आतड्याच्या हालचालीस व अन्न पुढे जाणाऱ्या क्रियेस अडथळा येत नाही तोपर्यंत जठर, लहान आतडे व मोठे आतडे असल्याची कसलीही जाणीव होत नाही. कारण या सर्व भागांकडे स्वायत्त चेतासंस्थेकडून चेता मार्फत संवेद जात असतात. तसेच मज्जारज्जूकडून काही चेता यांचे नियंत्रण करतात. त्यानुसार अन्नमार्गाची क्रमसंकोची हालचाल होत राहते व अन्न पुढे ढकलले जाते. सर्वसाधारणपणे लहान आतड्यामधून अन्न पुढे जाण्यासाठी ३–६ तास लागतात.
स्नायू स्तराखाली अवश्लेष्मल पटल (Submucosa; श्लेष्मल पटलाखालील स्तर) असते. लहान आतड्याच्या आद्य, मध्य व शेष या भागांतील श्लेष्मल पटलातील भाग कार्याप्रमाणे वेगवेगळा असतो. लहान आतड्याची तुलना जर साध्या नलिकेबरोबर केली, तर त्याच्या आतील पृष्ठभागाचे क्षेत्रफळ अवघे अर्धा चौरस मीटर होते. परंतु, प्रत्यक्षात लहान आतड्याच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ २५० चौ.मी. असते. लहान आतड्याचा अंतर्भाग सपाट नसून त्यावर बांगडीच्या आकाराच्या घड्या असतात, याला वृत्तीय वळ्या असे म्हणतात. यामुळे आतड्याचा फक्त पृष्ठभाग वाढत नाही, तर यावरून अन्न जात असता त्याला अडथळा होऊन अन्नाचे पचन होण्यास मदत होते. ते लहान आतड्यात व्यवस्थित मिसळले जाते.
वृतीय वळ्यांवर अनेक पोकळ उंचवटे असतात. एखाद्या टर्किश टॉवेलवर असलेल्या धाग्याप्रमाणे ते दिसतात. त्यांची संख्या एका चौरस मिलिमीटर क्षेत्रफळामध्ये सु. ४० असते. जसजसे आतड्याच्या मध्य भागापासून शेवटच्या भागाकडे जावे तसतशी त्यांची संख्या प्रति चौरस मिमी. दहापर्यंत कमी होते. या उंचवट्यांना उद्वर्ध (Villi) असे म्हणतात. यामध्ये पचलेल्या अन्नाचे शोषण होते. लहान आतड्याच्या आतील पृष्ठभागावरील उद्वर्ध हे बोटाच्या आकाराचे असून आतड्याच्या आतील पोकळीच्या (lumen) दिशेने पसरलेले असतात. मानवी लहान आतड्यातील उद्वर्धाची सरासरी लांबी ०.५–१.५ मिमी. असते. या उंचवट्यांच्या पृष्ठभागावर उंच व उभ्या स्तंभाकार पेशींचा थर असतो. या पेशींमधून अन्नघटक शोषून घेतले जातात. स्तंभाकार पेशीच्या आवरणाखाली असलेल्या गाभ्यात केशवाहिन्या व लसीका वाहिन्या असतात. लसिका वाहिन्यांमध्ये मेद रेणूंचे शोषण होते. मेद पदार्थामुळे त्या पांढऱ्या रंगाच्या दिसतात. त्यांना वसावाहिन्या असेही म्हणतात. उद्वर्धामधून शोषलेले अन्नघटक रक्तवाहिन्या व वसावाहिन्यांमधून वाहून नेले जाते.
लहान आतड्यातील उद्वर्धात शोषक पेशींशिवाय संप्रेरक स्रवणाऱ्या पेशी, जीवाणूरोधक पेशी व मूळ पेशी (Stem cells) असतात. श्लेष्मस्रावी पेशी शोषक पेशी थरामध्ये अधूनमधून विखुरलेल्या असतात. त्यांचा आकार सुरईप्रमाणे असतो. त्यामुळे श्लेष्म पेशींना गॉब्लेट पेशी असे म्हणतात. आतड्यातील श्लेष्म पेशींनी तयार केलेल्या श्लेष्म थरामुळे लहान आतड्याच्या आतील नाजूक पेशींचे रक्षण होते. लहान आतड्याच्या आतील पेशींचा थर सतत नव्या रेणूंच्या संपर्कात असल्याने या पेशी सतत विभाजित होतात. लहान आतड्याचा आतील पेशी थर दर ४-५ दिवसांनी पुन्हा नव्याने तयार होतो. आतड्याच्या श्लेष्म पटलामध्ये मूळ पेशी असतात.
उदर पोकळी विभाजक पडद्यापासून खाली श्रोणीपर्यंत विस्तारलेली असते. जठर, यकृत, मूत्रपिंड (वृक्क), लहान आतडे व मोठे आतडे या उदर पोकळीतील महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा वेगवेगळ्या धमन्यांमधून होतो. लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागास वरील बाजूस असलेल्या उदरपोकळी धमनीतून, तर लहान आतड्याच्या मधील व शेवटच्या भागास आंत्र धमनीतून रक्तपुरवठा होतो.
पहा : जठर, पचन तंत्र (पूर्वप्रकाशित नोंद), मोठे आतडे.
संदर्भ :
- https://www.britannica.com/science/small-intestine
- https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK459366/
- https://opentextbc.ca/anatomyandphysiology/…/23-5-the-small-and-large-intestines/
- https://training.seer.cancer.gov/anatomy/digestive/regions/intestine.html
समीक्षक : नंदिनी देशमुख