इरेक्टस मानवाप्रमाणे पश्चिम व मध्य यूरोपमधील सर्वांत प्राचीन मानव जाती. ‘ॲन्टेसेसर’ हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ ‘अग्रणी’, ‘प्रारंभी बसणारा’ किंवा ‘पूर्वसुरी’ असा त्याचा अर्थ आहे. या जातीचे अवशेष उत्तर स्पेनमधील अतापुर्का (Atapuerca) भागातील ग्रान डोलिना (Gran Dolina) आणि सिमा डेल एलिफान्ते (Sima del Elefante) या दोन गुहांमध्ये मिळाले आहेत. काही पुराजीववैज्ञानिक या जातीस ⇨हायडल्बर्ग मानव मानतात. १९९४ ते १९९६ या कालावधीत ग्रान डोलिना येथे स्पॅनिश संशोधकांना ८० पेक्षा अधिक जीवाश्म मिळाले असून ते सहा जणांचे आहेत. या जीवाश्मांचा काळ सात लाख ऐंशी हजार वर्षपूर्व आहे. तर सिमा डेल एलिफान्ते या गुहेत मिळालेले अवशेष बारा लाख वर्षपूर्व काळातले आहेत.
ॲन्टेसेसर मानव ही जात प्रथम १९९० च्या दशकात प्रकाशात आली. त्यापूर्वी १९६६ मध्ये ग्रान डोलिना (महान सिंकहोल) येथील सर्वांत आधी संशोधन फ्रांसिस्को जोर्डा सेर्डा यांनी केले होते. त्या वेळी त्यांना प्राण्यांचे अवशेष, दगडी अवजारे प्राप्त झाली होती; तथापि पुरेशा संसाधनांच्या अभावी ते पुढे काम करू शकले नाहीत. पुढे १९९७ मध्ये जे. एल. अरसुगा यांनी या जातीस ‘होमो ॲन्टेसेसर’ (ॲन्टेसेसर मानव) असे नाव दिले. या जातीच्या शोधमोहिमेत प्रामुख्याने जोस मारिया बरमुडेज कास्त्रो, जे. एल. अरसुगा व यूडॉल्ड कार्बोनेल या संशोधकांचा सहभाग होता.
ॲन्टेसेसर मानवांच्या कवटीचे आकारमान १००० घ.सेंमी. होते व ते दणकट बांध्याचे होते. इरेक्टस मानवाप्रमाणे त्यांचे दात मोठे होते. त्यांचे हातपाय प्रमाणानुसार लांब होते. ग्रान डोलिना व सिमा डेल एलिफान्ते या दोन्ही स्थळांवर दगडी अवजारे मिळाली असून ती ओल्डोवान प्रकारची आहेत. ही अवजारे मांस तोडण्यासाठी व हाडांमधला मगज काढण्यासाठी वापरली होती. या दोन्ही स्थळांवर प्राण्यांची (प्रामुख्याने घोडे व हरणे) तोडलेली हाडे मिळाली आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यावर दिसणाऱ्या तोडल्यासारख्या खुणा या मानवांच्या जीवाश्मांवरही आढळल्या आहेत. हे मानव स्वजातीचे मांस खात होते किंवा नाही याबद्दल पुरेशी माहिती नाही, तथापि तशी शक्यता मात्र आहे. एक सिद्धांत असा आहे की, ॲन्टेसेसर मानवांपासून पुढे आधुनिक मानवांची जात उदयाला आली. आधुनिक मानवाच्या चेहऱ्याच्या आकारासारखाच यांचाही चेहरा दिसतो. काही संशोधकांच्या मते, हे निअँडरथल मानव, ⇨डेनिसोव्हा मानव व सेपियन मानव यांचा अंतिम सामान्य पूर्वज असावा, तर काहींच्या मते हा इरेक्टस मानव या जातीचा सदस्य असावा.
संदर्भ :
- Bermúdez de Castro, J. M.; Martinón‐Torres, M.; Arsuaga, J. L. and Carbonell, E., ‘Twentieth anniversary of Homo antecessor (1997‐2017): Evolutionary Anthropology, 26 (4), pp. 157-171, 2017.
- Sahra Talamo; Katerina Douka; Maciej T. Krajcarz & Others ‘Carcass Transport Decisions in Homo antecessor Subsistence Strategies, Journal of Human Evolution, 61(4), pp. 425-446, 2011.
- छायाचित्र संदर्भ : ॲन्टेसेसर मानवाचे जीवाश्म, ग्रान डोलिना, अतापुर्का (स्पेन). (https://australian.museum/learn/science/human-evolution/homo-antecessor/)
समीक्षक : मनीषा पोळ