इंडोनेशिया येथील एक पुरातन मानवी जाती. इंडोनेशियातील फ्लोरेस या बेटावर सन २००३ मध्ये लिआंग बुआ (Liang Bua) या गुहेत एका मादीच्या शरीरातील जवळजवळ सर्व हाडांचे जीवाश्म मिळाले. या मादीचा आकार फारच छोटा होता. तिचे वजन अवघे ३० किग्रॅ. व उंची फक्त १०६ सेंमी. होती. या मादीला ‘हॉबिट’ असे नाव आहे. तिच्या बुटकेपणामुळे हे नाव दिले असावे. हा शोध खळबळजनक होता, कारण आधुनिक मानवांना समकालीन एखादी जात फक्त एका बेटावर अस्तित्वात असणे अगदीच अनपेक्षित होते. या खेरीज इतर बारा फ्लोरेस मानवांचे (होमो फ्लोरेसिएन्सिस) जीवाश्म मिळाले असले, तरी ते सर्व फक्त फ्लोरेस बेटावरचेच आहेत.
फ्लोरेस जीवाश्मांचा काळ १,००,००० ते ६०,००० वर्षपूर्व असून दगडी अवजारे सु. ५०,००० ते १९,००० वर्षपूर्व या काळातील आहेत. या मानवांबरोबर स्टेगोडॉन या हत्तीसारख्या प्राण्यांची शेकडो हाडे मिळाली आहेत. त्यांतील काहींवर कापल्याच्या खुणा आहेत. फ्लोरेस मानवांचा आकार छोटा असला तरी त्या मानाने त्यांचे दात मात्र चांगले मोठे होते. तसेच हे मानव स्वतः छोटे असूनही ते हत्तींची शिकार करत होते. हे मानव तीन फूट सहा इंच उंचीचे होते. त्यांचा मेंदू लहान आकाराचा होता. ते विविध प्रकारची दगडाची हत्यारे बनवीत असत. त्यांची पावले मोठी होती. सुमारे एक लाख वर्षांपूर्वी हे मानव या बेटावर ते कुठून आले की, ते तेथेच स्वतंत्रपणे उत्क्रांत झाले, हे न सुटलेले कोडे आहे. अलीकडेच २०२३ मध्ये अल्बर्टा विद्यापीठातील सामाजिक मानववंशशास्त्रज्ञ ग्रेगरी एल् फोर्थ यांनी आपल्या ‘बिट्वीन एप अँड ह्यूमन : ॲन अँथ्रपॉलॉजिस्ट ऑन द ट्रेल ऑफ द हिडन होमीनॉइड’ ह्या पुस्तकात फ्लोरेस येथील मूळ रहिवाशांनी सांगितलेल्या कथांचा आधार घेऊन प्रागैतिहासिक काळापासूनची फ्लोरेस मानवाची ही जाती सध्याच्या काळातही अस्तित्वात असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. तसेच त्यांनी आपल्या अनेक शोधनिबंधांमधूनही तसा उल्लेख केला आहे. अर्थातच त्यांच्या या दाव्याला विस्कॉन्सिन विद्यापीठातील पुरामानवशास्त्रज्ञ जॉन हॉक्स व इतर संशोधकांनीही विरोध दर्शविला आहे.
आशियातील इरेक्टस मानवांचा भौगोलिक विस्तार मोठा होता. इंडोनेशियातील या समूहांचे दीर्घकाळ विलगीकरण झाल्यामुळे बेटावरील मर्यादित अन्नसाधनांचा परिणाम त्यांच्यावर झाला. त्यामुळे त्यांचा आकार कमीकमी होत गेला, त्यांना खुजेपणाच्या प्रक्रियेतून जावे लागले. जेव्हा हा मानवसमूह फ्लोरेस बेटावर पोहोचला, तेव्हा समुद्राच्या पाण्याची पातळी खाली होती. त्यामुळे मुख्य बेटावरून फ्लोरेस बेटावर जाणे सहज शक्य होते. परंतु पाण्याची पातळी वाढल्याने फ्लोरेस बेटावरील मानवसमूह तेथेच अडकून पडला. त्यातल्या त्यात आकाराने लहान असणारे मानव जिवंत राहिले. तर उदरनिर्वाहाच्या मर्यादित साधनांमुळे आकाराने मोठा असणारा मानवसमूह त्यांची भूकही मोठी असल्यामुळे तग धरू शकला नाही, असा सिद्धांत आहे. तथापि फ्लोरेस मानवांबद्दल माहिती फारच कमी असून अद्याप उत्तरे न मिळालेल्या प्रश्नांची यादी मोठी आहे.
संदर्भ :
- Argue, Debbie; Groves, Colin P.; Michael S. Y. Lee; William L. Jungers, ‘The affinities of Homo floresiensis based on phylogenetic analyses of cranial, dental and postcranial characters’, Journal of Human Evolution, 107 : 107-133, 2017.
- Brown, P.; Sutikna, T.; Morwood, M. J.; Soejono, R. P.; Jatmiko; E. Wayhu Saptomo & Rokus Awe Due, ‘A new small-bodied hominin from the Late Pleistocene of Flores, Indonesia’, Nature, Vol. 431, pp. 1055–1061, 2004. https://doi.org/10.1038/nature02999
छायाचित्र संदर्भ :
- फ्लोरेस मादीच्या हाडांचे जीवाश्म, लिआंग बुआ गुहा, फ्लोरेस (इंडोनेशिया). https://humanorigins.si.edu/evidence/human-fossils/species/homo-floresiensis
- फ्लोरेस मानवाचे कल्पनाचित्र https://www.thecollector.com/homo-floresiensis-what-do-we-know-hobbit-people
समीक्षक : मनीषा पोळ