प्रस्तावना : बहुतेक विकसित देश ‘पारंपारिक औषधे व आरोग्य सेवा’ या संकल्पनेवर अवलंबून असतात. लोकांना निरोगी ठेवण्यासाठी तसेच आरोग्य सेवा देताना औषधे वितरीत करण्यासाठी औषधनिर्माता व शस्त्रक्रिया करण्यासाठी वैद्य, परिचारिका आणि इतर आरोग्य व्यावसायिकांचा आरोग्य प्रणाली व व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यकतेनुसार समावेश करतात.
आरोग्यदायी आहार आणि जीवन पद्धती ही आजच्या काळासाठी महत्त्वाची दोन अंगे आहेत. संपूर्ण जगात जंतुसंसर्ग, कुपोषण अशा समस्या टाळणे तसेच पर्यावरण आणि वयैक्तिक स्वच्छता राखणे इ. बाबी ह्या पूर्वापार भेडसावणाऱ्या आरोग्याशी निगडीत समस्या आहेत. शुद्ध पाणी, योग्य पोषण आहार, जन्मापासूनच आवश्यक लसीकरण आणि आरोग्य शिक्षण इ. रोग प्रतिबंध, रोग अवरोधन आणि आरोग्य संवर्धन यासाठी प्राथमिकतेने आरोग्यसेवा उपलब्ध करणे ही प्रत्येक सरकारी आरोग्यसेवा प्राधिकरणाची जबाबदारी असते व त्या ठिकाणच्या भौगोलिकतेप्रमाणे सेवा पुरविल्या जातात.
आरोग्य व त्यासंबंधित समस्या : व्यक्तीच्या कार्यक्षमतेमध्ये आरोग्य महत्त्वाची भूमिका बजावते. कारण चांगल्या आरोग्यामुळे चांगली कामगिरी होऊ शकते. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्थिती चांगली असते तेव्हा आरोग्य चांगले रहाते. अशा प्रकारे कोणत्याही आजारापासून दूर राहता येते.
विकसित व विकसनशील देशात लोकांच्या आरोग्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या काही बाबी म्हणजे वाढते शहरीकरण, कारखानदारी, शेतीउद्योगातील जलद गतीने होणारे बदल, हवामानातील चढ उतार, वातावरणातील स्थित्यंतरे इ. या सर्वांचा परिणाम संसर्गजन्य आजार, चिरकारी रोग (chronic disease) तसेच मानसिक आजार आणि लैंगिक (एच.आय.व्ही.सारख्या) आजारांचा प्रादुर्भाव वाढलेला आढळतो.
विकसित आणि विकसनशील देशांना भेडसावणाऱ्या आरोग्य समस्या व आव्हाने : (१) वयोवृद्धांची वाढती संख्या; (२) आरोग्यास घातक जीवनपद्धती; (३) मानसिक आजार व त्यामुळे होणारे किंवा वाढलेले मृत्यू/आत्महत्यांचे प्रमाण; (४) असंसर्गजन्य व क्लिष्ट रोगांचे वाढलेले प्रमाण आणि त्यामुळे होणारे मृत्यू; (५) जलद गतीने पसरणारे संसर्गजन्य रोगकारक जंतू, विषाणू व जीवाणू इ. ज्यामुळे जगभर पसरणारी महामारी; (६) भूकंप, त्सुनामी, अतिवृष्टी, अपघात, ज्वालामुखीचा उद्रेक यांसारखी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपत्ती; (७) दूषित हवामानाचा, वातावरणाचा आरोग्यावर होणारा परिणाम; (८) आरोग्य समस्यांशी निगडीत आव्हाने पूर्ण करताना शासकीय यंत्रणांमधील त्रुटी व अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभाव; (९) विविध विकासनशील आरोग्यसेवा देण्यासाठी प्राथमिकता देण्याचे नियोजन व त्यातील अडथळे; (१०) नव्याने उद्भवणारी एक समस्या म्हणजे प्रतिजैविकांचे प्रतिरोध (antimicrobial resistance) इत्यादी.
आरोग्य समस्या व विकासाचे नियोजन : एकोणिसाव्या शतकापासून बदलत जाणाऱ्या नवीन सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि वैद्यकीय सुधारणांचा लोकांच्या आरोग्यावर काही बाबतींत सकारात्मक परिणाम झालेला आहे. उदा., सार्वजनिक स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, पोषण आहार यांमुळे जीवन पद्धतीतील बदल आणि वाढते आयुर्मान इ.
जगातील व्यक्तींच्या आयुर्मानाचा स्तर वाढण्यासाठी विसाव्या आणि एकविसाव्या शतकातील पुढील गोष्टी कारणीभूत आहेत : (१) रोग प्रतिबंधात्मक प्रतिजैविके, (२) सामाजिक सुरक्षितता, (३)आरोग्यासाठीची विमा योजना, (४) वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञान इत्यादी. तथापि, साधारणत: सर्वच जनतेला आरोग्याच्या वारंवार उद्भवणाऱ्या जुन्या आणि नवीन समस्या व त्यातील आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) : जागतिक आरोग्य संघटना ही आरोग्याला चालना देण्यासाठी, जगभरातील लोकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच विकारक्षम (vulnerable) लोकांची सेवा करण्यासाठी जगभरात कार्य करते. सार्वत्रिक आरोग्य व्यवस्थेतील प्रगतीचे उद्दिष्ट साधण्यासाठी जगतिक आरोग्य संघटनेमार्फत (WHO) विकसित व विकसननशील देशांसाठी खालील बाबींचा आरोग्य व्यस्थापन व नियोजनात समावेश केला जातो.
- अत्यावश्यक सेवा सुधारण्यासाठी प्राथमिक आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित करणे.
- शाश्वत वित्तपुरवठा आणि आर्थिक संरक्षणासाठी कार्यक्रमांचे नियोजन करणे.
- आवश्यक औषधे आणि आरोग्य उत्पादनांमध्ये गुणात्मक सुधारणा करणे.
- आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षिण देणे आणि कामगार धोरणांबद्दल सल्ला देणे.
- राष्ट्रीय आरोग्य धोरणांमध्ये लोकांच्या सहभागाला पाठिंबा मिळविण्यासाठी प्रेरणा देणे.
- विविध माहिती मिळविण्यासाठीचे सर्वेक्षण तंत्रज्ञान विकसित करून, पृथ:करण करून ती माहिती प्रसारित करणे.
आरोग्य सेवेची व्याप्ती :
- लोकांचे आयुष्यभरासाठी मानवी भांडवल समृद्ध करणे ( Man Power).
- असंसर्गजन्य रोग प्रतिबंधासाठी आवश्यक उपाय योजना करणे.
- मानसिक आरोग्य राखण्यासाठी प्रोत्साहनपर कार्यक्रम राबविणे.
- विकसनशील राज्यांमध्ये हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या रोगांसाठी उपाय योजना करणे.
- प्रतिजैविकांची उत्पादन क्षमता वाढविणे व संसर्गजन्य रोगांचे अवरोधन करणे.
- उच्च प्रभाव असलेल्या संसर्गजन्य रोगांचे उच्चाटन आणि निर्मूलन करणे.
नजीकच्या भविष्यकाळातील आव्हाने आणि संधीचा विचार करता,२१व्या शतकातील सार्वजनिक आरोग्य स्तर राखण्याच्या नियोजनातील महत्त्वाचे पाऊल म्हणजे, २०२० मधील ‘शाश्वत विकास उद्दिष्टे’ आरोग्य धोरण २०२० (Sustainable Development Goals – Health 2020 policy )
आरोग्य सेवेतील आणीबाणीसाठी आयोजन :
- जोखीम ओळखणे, तीव्रता कमी करणे आणि व्यवस्थापित करून आणीबाणीसाठी तयारी करणे व त्वरित प्रतिसाद देणे.
- आपत्कालीन परिस्थिती रोखणे आणि उद्रेकादरम्यान आवश्यक साधनांच्या उपलब्धतेसाठी समर्थन देणे.
- अतिसंवेदनशील परिस्थितीत आवश्यक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी प्राथमिकता देणे.
आरोग्य आणि कल्याणकारी योजना :-
- सामाजिक निर्धार आणि सहभागासाठी लोकांना प्रेरित करणे.
- आरोग्यासाठी आंतरक्षेत्रीय व आंतरराष्ट्रीय दृष्टीकोण समजून घेणे व प्रोत्साहन देणे
- जागतिक आरोग्य संघटनेच्या धोरणांचा समावेश करून आरोग्याला प्राधान्य क्रम देणे.
२१व्या शतकातील सार्वजनिक आरोग्याकडे नवीन दृष्टीकोनातून पाहत असताना लोकांच्या आरोग्यासाठी अस्तित्वात असलेल्या आरोग्य सेवा ही आव्हाने पेलू शकतील काय? आणि आरोग्य सेवेतील व्यवस्थापन परिवर्तनाची लोकांचे आरोग्यमान राखण्यासाठी काय भूमिका असू शकते? या दोन प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे.
आजच्या परिस्थितीत लोकांच्या आरोग्याकडे ही बहुचर्चित अथवा विवादित संकल्पना म्हणून बघितले जाते. “लोकांचे आरोग्य अथवा स्वास्थ” (population health) या संज्ञेचा अर्थ लक्षात घेताना मूळ उद्देश असा गृहीत धरला जातो की, “समूहाला/सर्वांना सारख्या आरोग्य सेवा” म्हणजेच त्या समूहातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सेवा देणे. अशा सेवा की, ज्यामध्ये समूहाच्या आरोग्य गरजा (शारीरिक, सामाजिक, मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिक गरजा) हा केंद्रबिंदू ठरवून आरोग्य सेवांचे नियोजन करणे अपेक्षित आहे. ज्या सेवा केवळ वैयक्तिक किंवा वैशिष्ट्यपूर्ण नसाव्यात.
लोकांचे आरोग्य (public health) ही संज्ञा अनेकदा वापरली जाते. म्हणूनच आरोग्य सेवा ह्या संज्ञेचा उपयोग अधिक विस्तृतपणे व खोलवर विचार करताना संभाव्य दृष्टीकोन लक्षात ठेऊन केवळ औषधोपचार इतका संकुचित अर्थ न घेता “लोकांच्या आरोग्य स्तरातील सुधारणा” (health improvement) किंवा आरोग्य व आरोग्यदायी जीवनमान (health and well-being) या संकल्पनेतून सेवा देण्याचा प्रयत्न विकसित देशांच्या बरोबरीने विकसनशील देश देखील करण्याचा प्रयत्न करतात.
संदर्भ :
- Powell, John, Public Health Policy in Developed Countries, 2015.
- https://academic.oup.com
- https://www.un.org/sustanabledevelopmentgoals July 2015