वैराटगड : सातारा जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला. वाई तालुक्यात सह्याद्री डोंगररांगेत वाईच्या आग्नेयीस सु. १० किमी. अंतरावर आणि मेढा (ता. जावळी) पासून ईशान्येस १४ किमी. अंतरावर हा किल्ला असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची ११९४ मी. आहे. त्यावरील पठाराचे क्षेत्र सु. १२ हेक्टर आहे. व्याजवाडी, जांभुळणे, सरताळे आणि म्हसवे ही पायथ्याची प्रमुख गावे.

वैराटगड

गडावर जाण्यासाठी म्हसवे व बावधन खिंड तसेच व्याजवाडीहूनही रस्ता आहे. व्याजवाडी –जांभुळणे गावाकडून तसेच पाचवड-मेढा रस्त्यावर म्हसवे गावातून वाट आहे. व्याजवाडीकडून पायथ्यापर्यंत मोटारीचा रस्ता आहे. गडाचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असून तेथील बुरूज पडला आहे;  मात्र शेजारील पायऱ्या अद्यापि वापरात आहेत. गडाभोवती थोडी तटबंदी असून ठिकठिकाणी जंग्या आहेत. गडावर वैराटेश्वर (महादेव) मंदिर, हनुमान मंदिर, काही अवशिष्ट वास्तू, छोट्या गुहा, तळी आणि खडकांत खोदलेल्या पाण्याच्या टाक्या दिसून येतात.

गडाचा प्राचीन इतिहास फारसा ज्ञात नाही, मात्र तत्संबंधी काही पौराणिक कथा-वदंता रूढ आहेत. पूर्वी येथे विराट नावाची रानटी जमात होती, पांडवांनी त्यांना जिंकले. या जमातीवरून वैराटगड नाव पडले असावे. वनवासातील अखेरच्या वर्षात पांडवांचा अज्ञातवास वाईत झाला असावा म्हणून वाईला विराटनगरी असेही म्हटले जाते; तथापि इतिहाससंशोधक मात्र पांडवांचा अज्ञातवास घडला ती विराटनगरी जयपूर (राजस्थान) येथील असल्याचा अनुमान करतात. मध्य प्रदेशातही एक विराटनगर नावाचे स्थळ आहे. पुढे याच वसाहती वाढत महाराष्ट्रात कृष्णाकाठी स्थिरावल्या आणि त्यांनी तशीच नावे येथील स्थानांना दिली असावीत, असेही अनुमान करण्यात येते.

वैराटगड शिलाहारकालीन असून कोल्हापूरचा शिलाहार राजा भोज दुसरा (कार. ११७५-१२१२) याच्या कारकिर्दीत या किल्ल्याचे बांधकाम झाले. बहमनी काळात या परिसरात लष्करी ठाणे होते. पुढे आदिलशाही, निजामशाही, मोगल आणि त्यानंतर मराठे असा अंमल येथे आलटून पालटून राहिला. ब्रिटिशांनी १८१८ मध्ये हा किल्ला काबीज केला. गडावरून कृष्णा-वेण्णा नद्यांची खोरी, सोनजाई डोंगर, पांडवगड, कमळगड, मांढरदेव, केंजळगड, चंदन-वंदन हा जोडकिल्ला असा सभोवतीचा परिसर नयनरम्य दिसतो.

संदर्भ :

  • खरे, ग. ह.; बोराटे, व. म., ‘अशी आमुची वाई’, पुणे, १९७९.
  • घाणेकर, प्र. के., ‘साद सह्याद्रीची! भटकंती किल्ल्यांची!!’, स्नेहल प्रकाशन, पुणे, १९८५.
  • देशपांडे, सु. र. ‘वाई : कला आणि संस्कृती’, ‘आस्था’ (पर्यावरण मैत्री संस्था), वाई, २०११.
  • पाठक, अरुणचंद्र, ‘महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर : सातारा जिल्हा’, दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन, १९९९.

समीक्षक : सरोजकुमार मिठारी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.