पुणे जिल्ह्यातील एक गिरिदुर्ग. समुद्रसपाटीपासून २५६६ फूट उंचीवर असणारा हा किल्ला ‘येकोल्याचा किल्लाʼ या नावाने देखील ओळखला जातो. पुणे शहरापासून ८५ किमी. अंतरावर आणि लोणावळा पासून ३० किमी. अंतरावर मुळशीच्या पश्चिमेला असणाऱ्या ‘कोरसबारसʼ या मावळात घनगड किल्ला आहे.

घनगड, जि. पुणे.

येकोले गावातून गडावर जाणाऱ्या वाटेवर गारजाईचे मंदीर व दीपमाळा दिसतात. या मंदिरात गारजाई देवीची मूर्ती असून मंदिराच्या भिंतीवर एक शिलालेख आहे. या मंदिराजवळून गडावर जाण्यासाठी वाट आहे. ५० मी. चढून गेल्यावर आपण भग्न झालेल्या पहिल्या दरवाजातून किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात प्रवेश करतो. दरवाजासमोरच दोन कोरीव गुहा किंवा लेण्या दिसून येतात. लेण्याशेजारून जाणारी वाट किल्ल्याच्या माथ्याकडे जाते. या वाटेवरील पायऱ्या तुटलेल्या असल्याने वाटेवर एक लोखंडी शिडी बसविलेली आहे. शिडी जिथे संपते, तेथे बाजूलाच पाण्याचे एक टाके आहे. कातळातून कडेकडेने चालत गेल्यावर पुढे तीन टाक्यांचा समूह आहे. येथून गडावरील कठीण चढण सुरू होते. ३० मी. चढून वर गेल्यावर बालेकिल्ल्याच्या दरवाजातून गडमाथ्यावर प्रवेश होतो. दरवाजाच्या दक्षिणेला एक मोठा दुमजली बुरूज आहे. माथ्यावर आजमितीस काही घरांचे अवशेष व जोती शिल्लक आहेत. माथ्यावर एकूण पाण्याची तीन टाकी आहेत. किल्ल्यावरून सुधागड, सरसगड व तेलबैल्याच्या नैसर्गिक भिंती असा परिसर दिसतो. तसेच नाणदांड, भोरप्याची नाळ, सवाष्णीघाट या कोकणातील घाटवाटा, सालतरची खिंड दिसते.

गारजाई देवीची मूर्ती, घनगड, जि. पुणे.

किल्ला नेमका कोणी बांधला हे ज्ञात नसले, तरी या किल्ल्याचा प्रथम उल्लेख निजामशाहीत केलेला आढळतो. हा किल्ला कोळी सामंताकडून अहमदनगरच्या निजामशहाकडे आला. पुढे निजामशाही बुडाल्यानंतर हा किल्ला आदिलशाहीतील सरदार ढमाले देशमुख यांच्या ताब्यात होता. छ. शिवाजी महाराजांनी आदिलशाही सरदार असलेल्या ढमाले देशमुखांना स्वराज्यात सामील करून घेतले, त्याचबरोबर हा किल्ला स्वराज्यात सामील झाला (१६४७). पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांना द्यावा लागला (१६६५). पुढे छ. शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला (१६७०-७१). महाराजांच्या नंतर किल्ला मोगलांनी ताब्यात घेतलेला दिसतो. छ. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर (१६८९) काही काळासाठी या किल्ल्याचा ताबा मराठ्यांकडे होता. १७०० मध्ये हा किल्ला शंकराजी नारायण सचिवांच्या ताब्यात होता; परंतु छ. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला परत मोगलांच्या ताब्यात गेला. १७१३ मध्ये याचा ताबा परत मराठ्यांनी घेतलेला दिसतो. पंतसचिवांच्या हुकमानुसार कान्होजी आंग्रे यांनी कोरीगड, राजमाची तुंग, तिकोना, लोहगड यांबरोबर घनगड जिंकून घेतला. पुढे १७१४ मध्ये बाळाजी विश्वनाथांच्या मध्यस्थीने छ. शाहू महाराज व आंग्रे यांच्यात झालेल्या तहात हा किल्ला छ. शाहू महाराजांकडे आला. पुढे भाऊसाहेबांच्या तोतया प्रकरणात सुखनिधान या कनोजी ब्राह्मण तोतयास या किल्ल्यावर काही काळ कैदेत ठेवण्यात आले होते. तसेच तोतयाला मदत करणारा धोंडो गोपाळ केळकर यालाही येथे कैदेत ठेवल्याचे उल्लेख मिळतात.

गारजाई मंदिराच्या भिंतीवरील शिलालेख, घनगड, जि. पुणे.

बारभाई प्रकरणात राघोबा दादांना मदत करणाऱ्या सखाराम हरी गुप्ते यांना या किल्ल्यावर कैदेत ठेवले होते (१७७७). त्या वेळी या किल्ल्याचा हवालदार अर्जोजी ढमाले असल्याचे तत्कालीन पत्रांतून दिसते. किल्ल्याचा कारखानीस रामचंद्र गोविंद याने सखाराम गुप्तेंना सोडवण्याची योजना आखली; मात्र ही गोष्ट किल्ल्याचे हवालदार अर्जोजी ढमाले यांना समजली. या फितव्यात एकूण आठ व्यक्ती सामील होत्या, त्यांतील दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. परंतु इतर सहा जणांना पकडण्यात आले. त्यांमधील चौघांना तोफेच्या तोंडी दिले गेले, तर राहिलेल्या दोघांचे उजवे हात तोडण्यात आले. फितुरी उघड झाल्याने गुप्तेंवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला, परंतु १७७९ मध्ये किल्ल्यावरच सखाराम हरी गुप्तेंचा कैदेतच मृत्यू झाला. सखाराम हरी गुप्तेंची पत्नी त्यांना भेटायला किल्ल्यावर येण्यास निघालेली असताना तिला वाटेत तेलबैला जवळील घाटात गुप्ते यांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली. या बातमीने बसलेल्या धक्क्यामुळे तिचे त्या घाटातच निधन झाले, तेव्हापासून त्या घाटाला ‘सवाष्णी घाट’ अथवा ‘सतीचा घाट’ म्हणून ओळखले जाते. १७७७ ते १७८३ या काळात महिला कैद्यांबरोबर अनेक राजकैदी या किल्ल्यावर ठेवल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांतून मिळतात. पेशवाईच्या शेवटी हा किल्ला बाळाजी कुंजीर यांच्या ताब्यात होता. बाळाजी कुंजीर यांच्याकडून कर्नल प्रॅाथर याने हा किल्ला कोणतीही लढाई न करता जिंकून घेतला (१७ मार्च १८१८).

संदर्भ :

  • गोगटे, चिं. गं. महाराष्ट्र देशातील किल्ले : भाग १ व २ (सुधारित आवृत्ती), शिवसमर्थ सेवा प्रकाशन, नाशिक, २०१९.
  • पारसनीस, द. ब.; वाड, ग. चि. पेशवे रोजनिशी: खंड १ ते ९, डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी, पुणे, १९०७-११.

                                                                                                                                                                                          समीक्षक : सचिन जोशी