महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील इतिहासप्रसिद्ध गिरिदुर्ग. तो कोल्हापूर जिल्ह्याच्या नैर्ऋत्येला भुदरगड तालुक्यात वसलेला आहे. हा किल्ला कोकणातील सिंधुदुर्ग व घाटमाथ्यावरील कोल्हापूर या जिल्ह्यांच्या हद्दीवर आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ६७९ मी. असून याला प्रसिद्धगड या नावाने देखील ओळखले जाते.

रांगणा किल्ला.

किल्ल्यावर दोन मार्गांनी पोहोचता येते. कोल्हापूर–गारगोटी–पाटगाव–भटवाडी या गाडी रस्त्याने भटवाडीपर्यंत पोहोचून पुढे एक तास पायवाटेने जंगलातून चालत चिकेवाडी गावात पोहोचावे. येथून अर्धा तास चालत गेल्यानंतर किल्ल्यावर पोहोचता येते. कोल्हापूर ते भटवाडी हे अंतर सु. १०५ किमी. असून भक्कम वाहन असल्यास भटवाडीपासून एका कच्च्या रस्त्याने रांगणा किल्ल्याजवळील चिकेवाडी या छोट्या गावापर्यंत जाता येते. पुढे चिकेवाडी येथून चालत अर्ध्या तासात किल्ल्यावर प्रवेश करता येतो. भटवाडी ते चिकेवाडी हे अंतर सु. ८ किमी. आहे. कोकणातून किल्ल्यावर यायचे असल्यास कुडाळहून नारूर या गावी पोहोचावे. नारूरहून तीन चार तासांची खडी चढाई करून कोकण दरवाजामार्गे रांगणा किल्ल्यावर पोहचता येते.

यशवंत दरवाजा, रांगणा किल्ला.

चिक्केवाडीतून पुढे पायवाटेवर एक खिंडीसारखा भाग आहे. येथे एक बांधकामाचे जोते असून ते पूर्वी असलेल्या लष्करी चौकीचे असावे. ही खिंड पार करून केल्यावर एक छोटे पठार दिसते. येथे उजव्या बाजूला झाडीत एक छोटे मंदिर असून ते बांदेश्वर म्हणून ओळखले जाते.

उत्तरेकडील तिसरा दरवाजा, रांगणा किल्ला.

पठारावरून मुख्य सह्याद्रीच्या रांगेपासून सुटलेला रांगणा किल्ल्याचा डोंगर आणि त्याचा भव्य दर्शनी बुरूज बांदेश्वर मंदिराजवळून दिसतो. पुढे सह्याद्री आणि किल्ला याला जोडलेल्या पायवाटेने रांगणा किल्ल्याजवळ पोहोचता येते. येथून गडाच्या दर्शनी बुरुजाच्या बाजूने दरी डाव्या बाजूला ठेवून पुढे गेल्यावर गडाचा पहिला भग्न दरवाजा दिसतो. याला गणेश दरवाजा असे नाव आहे. हा दरवाजा पार करून गेल्यावर बुरुजाच्या बाजूला असलेला दुसरा दरवाजा आहे. सदर दरवाजाची बांधणी भक्कम असून बांधकाम मध्ययुगीन कालखंडातील आहे. याला हनुमान दरवाजा असे नाव आहे. या दरवाजातून पुढे उजव्या बाजूला असलेल्या पायवाटेने गेल्यास बुरूज, बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या व एक छोटा दिंडी दरवाजा दिसून येतो. यानंतर दुसऱ्या दरवाजाजवळ येऊन सरळ पुढे गेल्यावर उजव्या बाजूला आणखी एका अंतर्गत (दिंडी ) दरवाजाची दगडी चौकट दिसून येते. या चौकटीतून आत गेल्यावर एका बांधीव विहिरीच्या बांधकामाचे अवशेष आढळून येतात. या वास्तूला निंबाळकर बावडी असे नाव आहे. या वास्तूपासून पुढे थोड्या अंतरावर गडाचा सुस्थितीत असलेला तिसरा दरवाजा आहे. या दरवाजाच्या बांधणीवर यूरोपियन शैलीची छाप असून याचे बांधकाम अठराव्या शतकात झाले असावे. हा दरवाजा यशवंत दरवाजा म्हणून ओळखला जातो. या दरवाजातून सरळ पुढे गेल्यावर गडावरील सर्वांत मोठा पाण्याचा तलाव लागतो. या तलावात बारमाही पाणी असते. तलावाच्या काठावर महादेवाचे भग्न मंदिर असून जवळच काही समाध्यांचे अवशेष आहेत.

कोकण दरवाजा, रांगणा किल्ला.

पुढे गडावरील महत्त्वाची वास्तू म्हणजे रांगणाई देवीचे मंदिर आहे. सदर मंदिराचा वेळोवेळी जिर्णोद्धार झालेला असून सांप्रत गडावरील मुक्कामाचे ते एकमेव ठिकाण आहे. मंदिर कौलारू असून आत रांगणाई देवीची मूर्ती, तसेच श्रीविष्णु व भैरव यांच्या मूर्ती आहेत. मंदिरासमोर एक उंच दगडी दीपमाळ आहे. या मंदिराच्या बाजूला एक छोटे हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिराच्या मागील बाजूस थोडे उतरून गेल्यावर गडाचा कोकण दरवाजा पाहता येतो. या दरवाजातून खाली उतरणारी वाट कोकणातील नारुर या गावी जाते. कोकण दरवाजाच्या माथ्यावर एक बुरूज असून प्रत्यक्ष दरवाजा थोडा खालच्या बाजूला आहे. सदर दरवाजा आकाराने छोटा असून जवळच पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेली एक दगडी मोरी आढळून येते. ही गडाची पश्चिम बाजू आहे. या दरवाजापासून परत रांगणाई मंदिराकडे येऊन मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या तटबंदीच्या कडेने छोट्या पायवाटेने दक्षिणेकडे वाटचाल केली असता सु. अर्ध्या तासाचे चालीवर गडाचा दक्षिणेकडील दरवाजा दिसतो. या दरवाजातून उतरणारी वाट ही केरवडे या गावात उतरते. पण सांप्रत ही वाट वापरात नाही. सदर दरवाजाच्या बाजूला दोन छोटे बुरूज असून हा एक छोटा दरवाजा आहे. येथून पुढे दक्षिण दिशेला गडाचे प्रमुख आकर्षण असलेली तटबंदीयुक्त चिंचोळी सोंड दिसून येते. या सोंडेला हत्तीमाची सोंड असे म्हणतात. या सोंडेमध्ये गडाच्या बाहेर पडणारा एक चोर दरवाजा असून या दरवाजातून खाली उतरणे धोकादायक आहे. या हत्तीमाचीच्या शेवटी टोकाला एक चिलखती बुरूज आहे. हा बुरूज दोन टप्प्यांत बांधलेला असून या बुरुजात उतरण्यासाठी एक लहान दिंडी दरवाजा आहे. या माचीपासून पुढे पूर्वेच्या दिशेने जाणारी वाट यशवंत दरवाजाच्या दिशेने जाते. वाटेत प्रथम एक गाळाने भरलेला तलाव असून त्याच्या काठावर एका देवळीत शिवलिंग आहे. पुढे गेल्यावर एक छोटे गणेश मंदिर आहे. या मंदिराच्या डाव्या बाजूने जाणारी पायवाट पुन्हा यशवंत दरवाजासमोर येते. कोकणदरवाजा, केरवडे दरवाजा ते हत्तीमाची-यशवंत दरवाजा या गडफेरीस साधारणपणे ५ ते ६ तास लागतात. गडावर प्रवेश करण्यासाठी उत्तरेकडून ठरावीक अंतरावर बांधलेले तीन दरवाजे आहेत. मंदिरामागे पश्चिमेला नारूर दरवाजा, दक्षिणेला माचीजवळ केरवडे दरवाजा आणि पूर्वेला चाफेली गावाकडे जाणारा दरवाजा अशा एकूण चार मुख्य वाटा आणि एक चोर दरवाजा या मार्गांनी गडामध्ये प्रवेश करता येतो.

तलाव, रांगणा किल्ला.

किल्ल्याचा विस्तार प्रचंड असून गडावर घनदाट झाडी आहे. या परिसरात जंगली प्राण्यांचा वावर आहे. त्यामुळे किल्ल्यावर मुक्काम करताना आणि फिरताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

किल्ल्याची निर्मिती शिलाहार राजा भोज याने केली, असे काही इतिहास अभ्यासकांचे मत आहे. यासाठी ग्रँट डफ याच्या सातारा ताम्रपटाचा पुरावा दिला जातो. परंतु हा किल्ला भोज राजानेच बांधला याला सबळ पुरावा नाही. किल्ल्यावरील बांधकामाची रचना पाहता हे बांधकाम आदिलशाही काळातील असल्याची शक्यता आहे. फ़ेरिश्ता लिखीत गुलशन ए इब्राहिमी या ग्रंथात बहमनी सलतनतीचा वजीर महंमद गावान याने १४७० साली काढलेल्या कोकण मोहिमेत रांगणा किल्ला जिंकून घेतला, अशी नोंद आहे. या आधी हा किल्ला संगमेश्वरचा राजा जखुराय याच्या ताब्यात होता.

रांगणाईदेवी मंदिर व दीपमाळ, रांगणा किल्ला.

बहमनी साम्राज्याच्या अस्तानंतर हा किल्ला दीर्घकाळ विजापूरच्या आदीलशाहीच्या अंमलाखाली होता. शिवकाळात सतराव्या शतकात हा आदिलशाही सरदार सावंत यांच्याकडे होता, तर १६६६ साली हा किल्ला छ. शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. पुढे १६६७ साली किल्ल्याला आदिलशाही सरदार बहलोलखान आणि व्यंकोजी राजे यांनी वेढा घातला होता. यावेळी स्वतः छ. शिवाजी महाराज यांनी रांगणा येथे येऊन हे आक्रमण मोडून काढले. औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेत (१६८१–१७०७) किल्ला मराठ्यांच्याच ताब्यात होता. हा किल्ला मोगलांना कधीच जिंकून घेता आला नाही. १७०७ नंतर छ. शाहू महाराज व महाराणी ताराबाई यांच्यामध्ये वर्चस्वासाठी सत्ता संघर्ष झाला. त्या वेळी छ. शाहू महाराजांनी किल्ल्याला अल्प काळ वेढा दिला होता; परंतु हा किल्ला कोल्हापूरकरांच्याच ताब्यात राहिला. पेशवे काळात (१७८१) सावंतवाडीकरांनी किल्ला जिंकून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, तेव्हा कोल्हापूर संस्थानाने हा प्रयत्न खंबीरपणे हाणून पाडला. इंग्रज काळातसुद्धा कोल्हापूर संस्थान जरी इंग्रजांचे अंकित झाले, तरीही रांगणा किल्ला हा कोल्हापूर संस्थानाच्याच अंमलाखाली राहिला.

 

 

 

संदर्भ :

  • अक्कलकोट, सतीश, दुर्ग, सह्याद्री दुर्गभ्रमण मंडळ, सांगली, २००९.
  • घाणेकर, प्र. के. साद सह्याद्रीची! भटकंती किल्ल्यांची, स्नेहलता प्रकाशन, पुणे, २००३.                                                                                                                                                                                        समीक्षक : अंकुर काणे