सातारा जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला. ‘मधुमकरंदगड’ या नावानेही परिचित. महाबळेश्वरपासून नैर्ऋत्य दिशेला सु. ३८ किमी. अंतरावर आणि प्रतापगडपासून दक्षिणेला सु. २८ किमी. अंतरावरील हा किल्ला समुद्रसपाटीपासून सु. १२३६ मीटर उंचीवर आहे. महाबळेश्वरवरील प्रसिद्ध मुंबई टोकावरून (बॉम्बे पॉइंट) दिसणारा मनोहारी सूर्यास्त मकरंदगडाच्याच पार्श्वभूमीवर दिसतो. कोयनेच्या खोऱ्यात असलेल्या या किल्ल्याभोवती घनदाट जंगल असून घोणसपूर, हातलोट या पायथ्याची प्रमुख गावे आहेत.

मकरंदगड

किल्ल्यावर जाण्यासाठी महाबळेश्वरहून पायवाट असून वाहनमार्गानेही पायथ्यापर्यंत जाता येते. त्यासाठी महाबळेश्वर-पार-घोणसपूर असा प्रवास करावा लागतो. मार्गात शिवकालीन कमानीयुक्त दगडी पूल असून तो अद्यापि वापरात आहे. हातलोट मार्गे किल्ल्याचा डावा कडा लागतो. येथील जवळच्या शिवमंदिरात शिवलिंग आहे. मंदिरासमोरून वाट घोणसपुराकडे जाते, तर उजवीकडील वाट मकरंदगडावर जाते. गडावरील मुख्य दरवाजा अवशिष्ट रूपात असून येथून घाटमाथ्यावर पोहोचता येते. किल्यावर दोन उंच शिखरे असून वायव्येकडील शिखराला मधुगड आणि नैर्ऋत्येकडील शिखराला मकरंदगड म्हटले जाते. तुटलेले कडे आणि मुरमाड भागामुळे मधुगडावर जाता येत नाही.

मकरंदगडावर तटबंदीचे अवशेष, पाण्याची टाकी असून माथ्यावर श्री मल्लिकार्जुन महादेवाचे मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंगावर तांब्याची नागमूर्ती व मागे पाषाणातील मल्लिकार्जुन मूर्ती आहे. मंदिरासमोर नंदीची मूर्ती आहे. या किल्ल्याच्या खोगिरासारख्या दिसणाऱ्या आकारामुळे त्याला ‘सॅडलबॅक’ असेही म्हणतात. कोयना खोऱ्यासह प्रतापगड, रसाळगड, सुमारगड, महिपतगड या कोकणातील किल्ल्यांचे दर्शन येथून घडते.

प्रतापगडाबरोबरच या किल्ल्याचे बांधकाम केले असावे. गडाचे एकूण क्षेत्रफळ कमी असल्याने मुख्यतः चौकी, पहाऱ्यासाठीच याचा वापर होत होता. प्रतापगड आणि जवळच्या वासोटा या दुर्गशृंखलेतील दुवा म्हणून मकरंदगडाचे महत्त्व होते. बहुतेक काळ हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी प्रतापगडाबरोबरच मकरंदगडही जिंकून घेतला.

संदर्भ :

  • घाणेकर, प्र. के., ‘साद सह्याद्रीची! भटकंती किल्ल्यांची!!’, स्नेहल प्रकाशन, पुणे, १९८५.
  • तापकीर, संदीप, ‘वाटा दुर्गभ्रमणाच्या : सातारा जिल्ह्यातील किल्ले’, विश्वकर्मा पब्लिकेशन, पुणे, २०१८.
  • पाठक, अरुणचंद्र, ‘महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर : सातारा जिल्हा’, दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन, १९९९.

समीक्षक : सरोजकुमार मिठारी