केळवकर, कृष्णाबाई : (२६ एप्रिल १८७९ -२ सप्टेंबर १९६१) : कोल्हापूर संस्थानमधील पहिल्या स्त्री-वैद्य (डॉक्टर). त्यांचा जन्म अलिबाग येथे झाला. वडील कृष्णाजी दादाजी केळवकर (वसई) व आई रखमाबाई यांना एकूण दहा अपत्ये होती. त्यांपैकी काशीबाई हे अपत्य केवळ दोन वर्षांचे असताना निधन पावले. उर्वरित नऊ अपत्यांपैकी कृष्णाबाई या तिसरे अपत्य होत्या. त्यांच्या वडिलांवर समाजसुधारणा चळवळीचा प्रभाव होता. त्यांनी स्वतःच आंतरजातीय विवाह केला होता. द्वारकाबाई, यमुनाबाई आणि कृष्णाबाई या तिन्ही मुलींना त्यांनी शिक्षणासाठी पुण्यातील हुजूरपागा शाळेत दाखल केले (१८८७). त्या वेळी कृष्णाबाई यांचे वय अवघे आठ वर्ष होते. कृष्णाजी केळवकर प्रार्थना समाजाचे अनुयायी असल्याने केळवकर कुटुंबीयांना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि भारत सेवक गोपाळ कृष्ण गोखले यांचा सहवास मिळाला. त्या काळी महात्मा फुले यांच्या स्त्री उद्धार कार्याची चळवळ प्रभावी होती; तथापि त्यास सनातनी लोकांचा विरोध होता. नामदार गोखले आणि ‘सुधारक’कार प्राचार्य गोपाळ गणेश आगरकर यांच्या प्रयत्नांनंतर केळवकर भगिनींना फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. सुरुवातीला चिकाच्या पडद्यामागून  (बांबूंच्या बारीक कामट्यांचा केलेला पडदा) शिकावे लागत होते. नंतर मात्र हा पडदा दूर होऊन खुल्या शिक्षणाला सुरुवात झाली. पुण्यातील या शिक्षण काळात न्या. रानडे आणि गोखले यांनी केळवकर भगिनींचे स्थानिक पालक म्हणून कर्तव्य पार पाडले.

कृष्णाबाई यांचे शिक्षण मॅट्रिक (१८९३), फिमेल हायस्कूल, पुणे; जूनिअर कॉलेज शिक्षण (१८९५), फर्ग्युसन कॉलेज, पुणे; एल. एम. एस. (१९०१), ग्रँट कॉलेज, मुंबई; एल. एम. (१९०३), डब्लिन (आयर्लंड) येथे झाले. फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या कृष्णाबाई या पहिल्या विद्यार्थिनी होत्या (१८९४). वयाच्या १४ व्या वर्षी प्रवेशित झालेल्या कृष्णाबाई मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिक्युलेशन परीक्षेत इलाख्यात १० व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. १८९५ साली त्यांना इंटर आर्ट्स परीक्षेत सर्वाधिक गुण संपादन केल्याबद्दल ‘गंगाबाई भट शिष्यवृत्ती’ मिळाली. कृष्णाबाईंना शिक्षणासाठी मदत करणारे प्राचार्य आगरकर यांच्या अकाली निधनानंतर नामदार गोखले यांनी त्यांना शेवटपर्यंत मदत केली. १८९५ मध्ये पुण्यात भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात स्वयंसेविका म्हणून कृष्णाबाई आणि त्यांच्या वडील भगिनी द्वारकाबाई यांनी कोल्हापूर संस्थानचे प्रतिनिधित्व केले.

कोल्हापूर संस्थानचे अधिपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कृष्णाबाईंना दरबारची खास शिष्यवृत्ती देउन ग्रँट कॉलेज मुंबई येथे वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवले (१९०१) आणि १९०२ साली कोल्हापूरच्या अल्बर्ट एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल येथे सहायक शल्यविशारद या स्वतंत्र पदावर त्यांची नेमणूक केली. येथे कृष्णाबाईंनी स्त्रियांसाठी स्वतंत्र विभाग सुरू केला होता. पुढे त्यांना भारतीय उद्योगपती जमशेटजी टाटा यांची शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे फेलो ऑफ रॉयल कॉलेज ऑफ सर्जन या शिक्षणासाठी त्या डब्लिन (आयर्लंड) येथे गेल्या (१९०२). सदर पदवी अभ्यासासाठी त्या वेळी वयाची २४ वर्षे पूर्ण व्हावी लागत होती. परंतु कृष्णाबाईंचे वय केवळ २२ असल्याने त्यांना ‘प्रसूतिशास्त्र’ हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागला. तेथील शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी पुन्हा अल्बर्ट एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सेवा सुरू केली. १९०४ मध्ये शाहू महाराजांनी आदेशाद्वारे त्यांच्या वेतनात २५ रुपयांची वाढ केली. पुढे १९२४ पर्यंत त्या अल्बर्ट एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या.

कृष्णाबाईंची रुग्णशुश्रूषा व शस्त्रक्रिया कार्यपद्धतीबाबत तत्कालीन ‘हिंदी पंच’ या अँग्लो-गुजराती नियतकालिकाने गौरविले होते (१९०८). वैद्यकीय व्यवसायाबरोबर त्या लोकसेवेतही पुढे होत्या. १९०१ पासूनच त्या प्रार्थना समाजाच्या अधिकृत सदस्य होत्या. १९०५ मध्ये त्यांनी दक्षिण भारत जैनसभेच्या वार्षिक अधिवेशनात ‘स्त्रियांची कर्तव्ये’ या विषयावर दिलेले व्याख्यान ‘श्रीजीनविजय’च्या अंकात प्रसिद्ध झाले. ‘मनोरंजन (१९०६), ‘सुबोधपत्रिका’ (१९०७) या नियतकालिकांत त्यांनी रुग्णसेवा, स्त्री आरोग्य, नवजात बालक जन्म या विषयांवर प्रबोधनपर वैद्यकीय लेखन केले. १९२८ मध्ये कोल्हापुरात कौटुंबिक मंडळाची स्थापन करण्यात त्यांचा पुढाकार होता. त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांना ‘कैसर ए हिंद’ या पदवीने सन्मानित केले होते. भावंडांच्या शिक्षणासाठी त्या अविवाहित राहिल्या.

कोल्हापूर येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Lala, R. M., For the love of India: The life and times of Jamsetji Tata, Penguin Publication, Delhi, 2004.
  • Ramanna, Mridula, ‘Women Physicians as Vital Intermediaries in Colonial Bombay’, Economic and Political Weekly, Vol. 43, No. 12/13, March—April 2008.
  • केळवकर, प्रल्हाद ‘खासगी संग्रह’, कोल्हापूर.
  • ढेरे, अरुणा, ‘विस्मृती चित्रे’, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, द्वितीयावृत्ती, २००१.
  • पवार, जयसिंगराव, संपा., ‘राजर्षी शाहू, पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ’, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी कोल्हापूर, २०१९.
  • पवार, गो. मा. संपा., ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य’, लोकवाङ्मय गृह, मुंबई, २००४.
  • छायाचित्र संदर्भ : कुलकर्णी, पा. ना. संपा., ‘शताब्दी महोत्सव (१८८०-१९८०)’, स्मरणिका, राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर, १९८१.

समीक्षक : अवनीश पाटील