प्राचीन काळात यूरोपातील उत्तर समुद्र आणि बाल्टिक समुद्राच्या किनारी भागापासून भूमध्य समुद्रएड्रिअ‍ॅटिक समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत अंबर या खनिज पदार्थाचा व्यापार ज्या व्यापारी मार्गाने (रस्त्याने) केला जाई, त्या मार्गाला अंबर मार्ग म्हणून संबोधले जाई. हा मार्ग मध्य यूरोपमधून उत्तर-दक्षिण दिशेत गेलेला असून त्याची लांबी सुमारे १,९०० किमी. आहे. प्रागैतिहासिक (इतिहासपूर्व) काळात उत्तर आणि दक्षिण यूरोप यांदरम्यानच्या व्यापाराचा हा प्रमुख व्यापारी मार्ग होता.

जीवाश्माच्या रूपाने आढळणाऱ्या पाइन सूचिपर्णी वृक्षांच्या राळेला अंबर म्हणतात. पाइनच्या झाडातून बाहेर पडणारा चिकट द्रव पदार्थ म्हणजे राळ. राळ हळूहळू कडक होत जाते. भूपृष्ठाच्या अंतर्गत हालचालींमुळे राळेचे रूपांतर अंबर या रूपांतरित खडकात होते. अंबर हे मौल्यवान खनिज असून त्याचा वापर नवाश्म युगापासून होताना दिसतो. पुरातत्त्वीय पुराव्यांनुसार अंबरपासून बनविलेल्या वस्तूंचा वापर ख्रिस्तपूर्व सुमारे ३,००० वर्षांपूर्वीपासून केला जाई. त्याच्या उपयुक्ततेमुळे त्याला ‘उत्तरेकडील सोने’ अशी उपमा दिली जाते. अंबरचे लहानसे साठे जगात सर्वदूर आढळत असले, तरी सर्वाधिक मोठे साठे बाल्टिक समुद्रकिनाऱ्यालगतच्या खडकांत असून त्याच्यातील अंबर खणून काढले जाते. तसेच त्याचे खडक बाल्टिकच्या पाण्याखालीही आहेत. अंबरचे समृद्ध साठे असलेल्या बाल्टिकच्या किनारी भागाला तर ‘अंबर किनारा’ असे संबोधले जाते. त्या प्रदेशातून उर्वरित यूरोपीय देशांकडे अंबर व अंबरच्या वस्तू पाठविण्यासाठी या मार्गाचा विकास केलेला आहे. हजारो वर्षांपूर्वीपासून या खुष्कीच्या मार्गाने तसेच व्हिश्चलानीपर या नदीमार्गांनी इटली, ग्रीस, काळा समुद्र किनारा, सिरिया व ईजिप्तपर्यंत अंबरची वाहतूक केली जाई. यूरोपातील या प्राचीन अंबर मार्गाचा वापर प्रामुख्याने इ. स. पू. १९०० ते इ. स. पू. ३०० या काळात इट्रुस्कन व ग्रीक व्यापारी अंबरच्या व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात करीत असत. ख्रिस्तपूर्व सुमारे ९,००० वर्षांपूर्वीपासून मणी, दागिने व शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी अंबरचा उपयोग होत आलेला आहे. ताईत बनविण्यासाठी व औषध म्हणूनही त्याचा वापर होत असे. बाल्टिक अंबरला ‘सक्सिनाइट’ असेही म्हणतात. या उपयुक्त मार्गाने अंबरबरोबरच कथिलाचीही वाहतूक केली जाई.

उत्तरेस रशियातील सेंट पीटर्झबर्गपासून दक्षिणेस इटलीतील व्हेनिसरोमपर्यंत हा मार्ग गेलेला आहे. सांप्रत अंबर मार्ग रशिया, एस्टोनिया, लॅटव्हिया, लिथ्युएनिया, पोलंड, झेक प्रजासत्ताक, स्लोव्हाक प्रजासत्ताक (स्लोव्हाकिया), ऑस्ट्रिया, हंगेरी, स्लोव्हेनिया, इटली या देशांतून गेलेला आहे. या मार्गाने पुढे ग्रीस, काळा समुद्र किनारा, सिरिया व ईजिप्तपर्यंत अंबर पाठविले जाई.  डॅन्झिग (पोलंड), पलांग व नीडा (लिथ्युएनिया), कालीनिनग्राड (रशिया), मालबॉर्क (पोलंड), कार्नंटन (ऑस्ट्रिया), आक्वलेय (इटली) ही या मार्गावरील प्रमुख स्थानके आहेत. या सर्व ठिकाणी अंबर वस्तुसंग्रहालये आहेत. लगतच्या वेगवेगळ्या देशांतील अनेक रस्ते या मार्गाशी जोडलेले आहेत.

समीक्षक : शंकर चौधरी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.