मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. भाषेप्रमाणेच अग्नीचा वापर करणे हे मानव प्रजातींचे एक निश्चित असे वैशिष्ट्य असून चार्ल्स डार्विन यांनी त्याला भाषेखालोखाल महत्त्वाचे मानले आहे. मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात अग्नीसंबंधी तंत्रज्ञानाने (पायरोटेक्नॉलॉजी) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अग्नीच्या वापराचा शोध हा असा आहे की, त्याचा निश्चित असा एकच शोधकर्ता नाही. बहुधा गेल्या पंधरा लाख वर्षांच्या काळात प्राचीन मानवांना निसर्गात लागणाऱ्या वणव्यांचे निरीक्षण करून आपणही अग्नीचा फायदा करून घेऊ शकतो ही कल्पना सुचली असावी.
अग्नीवर नियंत्रण मिळवण्याचे मानवांना अनेक फायदे झाले. अग्नीमुळे भक्षक वन्यप्राण्यांपासून संरक्षण मिळू शकले व आत्यंतिक थंडी असतानाही उब मिळवता आली. तसेच अन्न शिजवता अथवा मांस भाजता आल्याने त्यातील ऊर्जा अधिक प्रमाणात मिळवता आली. त्याचबरोबर विविध प्रकारच्या अन्नसाधनांचा उपयोग करता आला. विशेषतः कच्चे मांस खाताना रोगजंतूंचा जो धोका असतो तो मांस भाजल्याने कमी होतो. तसेच मांसाचे पचन अधिक चांगले होत असल्याने अधिक सुलभपणे प्रथिने मिळाल्याने मेंदूच्या विकासाला चालना मिळाली. अग्नीवर नियंत्रण आल्यानंतर रात्री अंधारात वाटणारी भीती कमी झाली. सध्या अस्तित्वात असलेल्या आदिम पद्धतीने जगणाऱ्या लोकसमूहांच्या (आदिवासी) अभ्यासातून असे दिसते की, शेकोटीभोवती एकत्र बसून लोक ज्या कथाकहाण्या एकमेकांना सांगतात त्यांचे संस्कृतीच्या विकासात व ती टिकून राहण्यात फार मोलाचे स्थान आहे.
मानवजातीच्या सांस्कृतिक उत्क्रांतीत अग्नीच्या शोधाचे महत्त्व फार मोठे आहे हे सर्वमान्य असले तरी हा शोध नेमका केव्हा लागला व अग्नीसंबंधी तंत्रज्ञानाचा विकास कसा झाला आणि मानवजातीच्या सांस्कृतिक उत्क्रांतीमधील या तंत्रज्ञानाची भूमिका याबद्दलची आपले ज्ञान खूपच मर्यादित आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अग्नीच्या वापराचे पुरावे तुटक आणि विखुरलेले आहेत. विशेषतः उघड्यावर पेटवलेला विस्तव विझल्यानंतर वारा किंवा पावसाचे पाणी यांमुळे तेथून राख निघून जात असल्याने अग्नीचा प्रत्यक्ष पुरावा मिळणे अतिशय अवघड होते. गुहांमध्ये पेटवलेल्या विस्तवांच्या बाबतीत असेच काहीसे घडते. गुहांमध्ये झिरपणाऱ्या पाण्यामुळे राख अथवा कोळशाचे अंश हळूहळू नाहीसे होतात. तथापि सावकाश झिरपणाऱ्या पाण्यात क्षार विरघळत जाताना अखेर वालुकामय अंश तेथील मातीत शिल्लक राहतात. त्यामुळे शेकोटीचा थेट पुरावा नसूनही विस्तव पेटवल्याचे सिद्ध करता येते. गुहेच्या स्तरांमधील मातीचा सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने अभ्यास करून प्राचीन काळात ज्वलनाची क्रिया झाल्याचे कळू शकते. फ्रान्सच्या डोर्डोन (Dordogne) भागातील रॉक डी मार्सल (Roc de Marsal Cave) या गुहेत निअँडरथल मानवांचा विस्तवाशी संबंध असल्याचे या पद्धतीने शोधता आले आहे. तेथील मुस्टेरियन अवजारे आणि निअँडरथल मानवांच्या अवशेषांचा कालखंड ४३,००० वर्षपूर्व (अधिकउणे २६००) असा आहे.

शेकोटीच्या जागी योग्य पद्धतीने मिळवल्यास वनस्पतींचे वालुकायुक्त फायटोलिथ (Phytolith) सहजपणे आढळतात. त्यामुळे इतर काही नाही तरी पुरातत्त्वीय स्तरांमध्ये विस्तवाचे असे अप्रत्यक्ष निदान करता येते. इझ्राएलमधील माउंट कार्मेल पर्वतातील केबारा (Kebara Cave) या गुहेत निअँडरथल मानवांनी ६०,००० ते ४४,००० वर्षपूर्व या काळात विस्तव वापरल्याचा निष्कर्ष फायटोलिथवरील संशोधनातून काढणे शक्य झाले. इतर काही पुरावे मिळाले नाहीत तरी शेकोटीच्या खालची जी माती भाजली जाते तिच्या चुंबकीय गुणधर्मात झालेले बदल ओळखता येतात. याच प्रकारे विस्तवाशी संपर्क आलेले दगड ओळखता येतात. या पद्धतीचा वापर करून इझ्राएलमधील गेशेर बेनोट याकोव (Gesher Benot Ya’akov) या अश्युलियन संस्कृतीच्या पुरातत्त्वीय स्थळावर अग्नीचा उपयोग केला असल्याचे ओळखता आले आहे (२००८).
निसर्गात वणवे लागतात. मानवांनी ते पाहून अथवा अपघाताने भाजले गेलेले मांस खाता येते हे कळल्यावर अग्नीवर नियंत्रण मिळवण्याचा विचार केला असावा. तथापि प्राचीन काळात लागलेल्या नैसर्गिक आगी आणि मानवाने मुद्दाम पेटवलेला विस्तव यांच्यात फरक कसा करायचा हे अनेकदा स्पष्ट होत नाही. शिवाय निसर्गात लागलेल्या आगीतून मिळवलेला विस्तव सतत वापरत ठेवणे आणि चकमकीसारखे दगड वापरून नव्याने विस्तव पेटवण्याचे कौशल्य मानवांनी कधी मिळवले हे दोन मुद्दे महत्त्वाचे ठरतात. म्हणूनच अग्नीचा प्रथम वापर आधुनिक मानवांनी केला की आता विलुप्त झालेल्या निअँडरथल मानवांनी अथवा इरेक्टस मानवांइतक्या प्राचीन पूर्वजांनी, या विषयी अनेक मते असून अद्याप कालनिश्चितीवर पुरातत्त्वज्ञांमध्ये एकमत झालेले नाही.
अग्नीचा वापर करण्यासंबंधीचा सर्वांत प्राचीन पुरावा दक्षिण आफ्रिकेतील असून वंडरवेर्क (Wonderwerk Cave) नावाच्या गुहेत जळलेले क्रिप्टोक्रिस्टलाइन दगड, पूर्णपणे जळलेली हाडे व राखेचे अंश २०११ मध्ये मिळाले. या स्तरांचा काळ १५ ते १७ लाख वर्षपूर्व असा असून त्याच स्तरांमध्ये अश्युलियन दगडी अवजारे मिळाली आहेत. अग्नीचा वापर इतका प्राचीन व सेपियन मानवांच्या आधीचा असावा याचे पहिले पुरावे १९७०-८० या दशकातच मिळाले होते. केनियात कूबी फोरा या ठिकाणी एफएक्सजेजे२० नावाच्या गुहेत अनेक स्तरांमध्ये जळलेल्या मातीचे पट्टे आढळले होते. त्याचा काळ १५ लाख वर्षपूर्व असा होता. दीर्घकाळ हा पुरावा निर्णायक नाही असेच मानले जात होते. तथापि २०१९ मध्ये कूबी फोरा येथीलच ओकोटे (Okote) या गुहेत अशाच प्रकारे लाकडासारखे काहीतरी जळल्याने जमीन भाजली गेल्याचे आढळले आहे. अर्थात ही आग मानवनिर्मित आहे किंवा नाही ते स्पष्ट झालेले नाही. अशाच प्रकारे दक्षिण आफ्रिकेतील मोन्टागू गुहा व स्वार्टक्रान्स गुहा या दोन अश्युलियन संस्कृतीच्या स्थळांवर शेकोटीच्या खुणा आढळल्या आहेत. यातील स्वार्टक्रान्स गुहेतील अग्नीचे पुरावे असलेल्या स्तरांचा काळ १२ ते १३ लाख वर्षपूर्व असा आहे.

सर्वसाधारणपणे ५ लाख वर्षपूर्व या काळाच्या आधी प्राचीन मानव (होमिनिन) अग्नीचा वापर करत असल्याचे पुरावे फारच कमी आहेत. पुरातत्त्वीय स्थळांवर प्रत्यक्ष शेकोटीचे अथवा चुलीचे पुरावे प्रामुख्याने ७ लाख वर्षपूर्व काळापासून मिळू लागतात. इझ्राएलमधील गेशेर बेनोट याकोव या पुरातत्त्वीय स्थळावर अग्नीच्या वापराचा पुरावा सुमारे ७ लाख वर्षपूर्व काळातला आहे. जर्मनीतील श्योनिंगन (Schoningen) (५ लाख वर्षपूर्व), चीनमधील झाउकौडियन (Zoukoudian) (४,६२,००० वर्षपूर्व), इंग्लंडमधील बिचेस पिट (Beeches Pit) (४,१४,००० वर्षपूर्व), इझ्राएलमधील केसेम गुहा (Qesem Cave) (४ लाख वर्षपूर्व), जर्मनीतील बिलझिंग्सलेबेन (Bilzingsleben) (३,७०,००० वर्षपूर्व) आणि स्पेनच्या व्हालेन्सिया भागातील बोलोमोर गुहा (Bolomor Cave) (२,२८,००० वर्षपूर्व) या ठिकाणी अग्नी वापरला असल्याचे निश्चितपणे सांगता येते.
अग्नीच्या वापराचे गेल्या २ लाख वर्षांमधले पुरावे भरपूर ठिकाणी आहेत. इझ्राएलमधील ताबुन गुहा (Tabun Cave) (२,००,००० ते १,००,००० वर्षपूर्व), दक्षिण आफ्रिकेतील पिनॅकल पॉइंट (Pinnacle Point) (१,६४,००० वर्षपूर्व), फ्रान्सच्या डोर्डोन भागातील ग्रोटे-१६ (Grotte XVI) (६०,००० वर्षपूर्व) आणि ऑस्ट्रेलियातील लिंच्स क्रेटर (Lynch’s Crater) (४५,००० वर्षपूर्व) ही अग्नीचा पुरावा असलेली महत्त्वाची स्थळे आहेत. भारतात बेलन नदीच्या खोऱ्यात सुमारे ५५,००० वर्षपूर्व या काळातील कोळशाचे सूक्ष्म कण मध्यपुराश्मयुगीन स्थळावर मिळाले आहेत. हा भारतातला अग्नीच्या उपयोगाचा सर्वांत प्राचीन पुरावा आहे.
अग्नीचे मानवी संस्कृतीच्या विकासातील अनन्यसाधारण महत्त्व जगभरातील अनेक मिथ्यकथांमध्ये आणि विविध धर्मातील त्याच्यासंबंधी असलेल्या चालीरीतींवरून स्पष्ट होते. अगदी थेट संबंध लावणे अवघड असले तरी जगात सर्वत्र अग्नीच्या उगमाबद्दलच्या कथाकहाण्यांमध्ये त्याच्या शोधाची स्मृती साठवलेली दिसते.
संदर्भ :
- Adler, Jerry, ‘Why Fire Makes Us Human’, 2013. https://www.smithsonianmag.com/science-nature/why-fire-makes-us-human-72989884/
- Berna, Francesco; Goldberg, Paul; Horwitz, Liora Kolska; Brink, James; Holt, Sharon; Bamford, Marion & Chazan, Michael, ‘Microstratigraphic evidence of in situ fire in the Acheulean strata of Wonderwerk Cave, Northern Cape province, South Africa’, Proceedings of the National Acadmy of Sciences USA, 2012.
- Gowlett, J. A. J. ‘The discovery of fire by humans: a long and convoluted process’, Philosophical Transctions of the Royal Society B, 371, 2016. https://royalsocietypublishing.org/doi/10.1098/rstb.2015.0164
- Jha, Deepak Kumar; Samrat, Rahul & Sanyal, Prasanta, ‘The first evidence of controlled use of fire by prehistoric humans during the Middle Paleolithic phase from the Indian subcontinent’, Palaeogeography, Palaeoclimatology, Palaeoecology, 562, 2021.
- MacDonald, Katharine; Scherjon, Fulco; Veen, Eva van; Vaesen, Krist & Roebroeks, Wil, 2021. ‘Middle Pleistocene fire use: The first signal of widespread cultural diffusion in human evolution’, Proceedings of the National Acadmy of Sciences USA 118 (31), 2021. https://doi.org/10.1073/pnas.2101108118
चित्रसंदर्भ :
- अग्नीचा वापर केल्याची महत्त्वाची स्थळे https://royalsocietypublishing.org/doi/10.1098/rstb.2015.0164
- बेलन नदीच्या (उत्तर प्रदेश, भारत) खोऱ्यातील सुमारे ५५,००० वर्षपूर्व काळातील कोळशाचे सूक्ष्म कण (झा, दीपक कुमार व इतर, २०२१)
समीक्षक : सुषमा देव
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.