एक प्रारंभिक मानव जाती. प्रख्यात केनियन पुरामानवशास्त्रज्ञ रिचर्ड लीकी (१९४४-२०२२) यांना रूडॉल्फ मानव (होमो रूडोल्फेन्सिस) या जीवाश्माचा शोध केन्या (केनिया) येथील रूडॉल्फ (आताचे नाव तुर्काना) सरोवराजवळील पुराजीव शास्त्रीय अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेल्या कूबी फोरा येथे लागला (१९७२). त्यानंतर लीकी यांच्या पत्नी, ब्रिटिश मानवशास्त्रज्ञ मेव्ह लीकी (१९४२; ‘मेव्ह इप्स’ या नावानेही परिचित) यांनाही या जातीचे आणखी काही जीवाश्म सापडले (२०१२); तथापि त्याबद्दलचे एकूणच पुरावे खूप कमी आढळतात. या जीवाश्मांचा कालखंड १९.५ लाख ते १७.८ लाख वर्षपूर्व असा आहे.

रूडॉल्फ मानव (कल्पनाचित्र).

रिचर्ड लीकी यांना केन्यात मिळालेल्या कवटीचे (जीवाश्माचे) नाव केएनएम-इआर १४७० असे आहे. ही कवटी पुरुषाची असावी असा अंदाज केला जातो. रशियन वैज्ञानिक व्ही. पी. अलेक्सीव (१९२९-१९९१) यांनी ही जात हॅबिलिस मानवापेक्षा वेगळी आहे असे मत मांडले व तिचे पिथेकॅन्थ्रोपस रूडोल्फेन्सिस असे नामकरण केले. नंतर ही जात ‘रूडॉल्फ मानव’ या नावाने ओळखली जाऊ लागली. रूडॉल्फ सरोवराच्या परिसरात ही जात आढळल्याने त्याच्या नावावरून या जातीस ‘रूडॉल्फ मानव’ असे नाव दिले असावे.

मेव्ह लीकी यांनी रूडॉल्फ मानवांच्या शारीरिक वैशिष्ट्यांचे वर्णन केले. या मानवांचे दात मोठे आहेत, चेहरा अधिक लांब व चपटा असून मध्यभागी रुंद आहे. गालाची हाडे पुढे आलेली असून शरीराचा आकार मोठा आहे. कवटीचे आकारमानही हॅबिलिस मानवापेक्षा मोठे होते.

काही पुराजीववैज्ञानिक रूडॉल्फ मानव यांना हॅबिलिस मानवाचाच एक प्रकार मानतात; तर काहीजण त्यांना ऑस्ट्रॅलोपिथेकस प्रजातीचा एक प्रकार मानतात. रूडॉल्फ मानवांबद्दल बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत. तसेच मानवी उत्क्रांतीच्या वंशवृक्षावर रूडॉल्फ मानव जातीचे नेमके स्थान काय होते, ते अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

संदर्भ :

समीक्षक : मनीषा पोळ


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.