पुरातन मानवाची एक विलुप्त जाती (स्पीशीझ). या मानवाच्या कवटीचा जीवाश्म चीनच्या ईशान्येकडील हेइलाँगजिआंग (हेलुंगजिआंग, Heilongjiang) प्रांतातील हार्बिन शहरात मिळाला आहे. ‘हेइलाँगजिआंग’ चा अर्थ होतो काळी ड्रॅगन नदी (ब्लॅक ड्रॅगन रिव्हर). त्यावरून या जीवाश्माला ड्रॅगन मॅन (ड्रॅगन मानव)  असे नाव देण्यात आले असावे. पुरामानवशास्त्रात ही कवटी हार्बिन कवटी या नावाने ओळखली जाते. कवटीचा हा जीवाश्म सुमारे ९० वर्षांपूर्वी मिळाला असला तरी तो २०१८ मध्ये प्रकाशात आला आणि त्याच्या सखोल अभ्यासानंतर पुरामानवशास्त्रात एका नव्या वादाला तोंड फुटले. ही कवटी लाँगी मानव (Homo longi) या एका नवीन जातीची असल्याचे काही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे, तथापि अनेक अभ्यासकांना ते मान्य नाही. चिनी भाषेत लाँग म्हणजे ड्रॅगन. त्यामुळे ड्रॅगन मानव हे लाँगी मानव जातीचे टोपणनाव असावे.

हार्बिन कवटी

हार्बिन कवटी प्रकाशात येण्याची कहाणी रंजक आहे. सन २०१८ मध्ये एका शेतकऱ्याने चीनमधील हेबेई जीइओ विद्यापीठाच्या (Hebei GEO University) संग्रहालयात एक जवळजवळ संपूर्ण अशी मानवी कवटी आणून दिली. कवटीच्या या जीवाश्मातील हाडांची प्रमाणे अनोखी होती. कवटी दान करणाऱ्याने असे सांगितले की ही कवटी १९३३ मध्ये सोन्गहुआ (Songhua) नदीवर डोंगजियांग पूल बांधत असताना मिळाली होती. ती महत्त्वाची आहे असे लक्षात आल्यावर त्या शेतकऱ्याच्या पूर्वजांनीजपानी शासकांकडून ती पकडली जाऊ नये म्हणून ती एका विहीरीत दडवून तीन पिढ्या सांभाळून ठेवली होती. कवटी स्वीकारणाऱ्या जी कियांग (Ji Quiang) या चिनी वैज्ञानिकांनी आणि पुराजीववैज्ञानिक झिजुन नी (Xijun Ni) (चिनी विज्ञान अकॅडमी) यांनी एकत्र संशोधन करून असे प्रतिपादन केले की, या कवटीमुळे आशिया खंडात इरेक्टस मानव आणि निअँडरथल मानव यांच्यापेक्षा निराळी अशी तिसरी उत्क्रांतीची धारा अस्तित्वात होती. हे आद्य मानव निअँडरथल मानवांपेक्षा आधुनिक मानवांना जवळचे होते.

ड्रॅगन मानवाचे कल्पनाचित्र

हार्बिन कवटीचे कालमापन युरेनियम शृंखला कालमापन पद्धतीने करण्यात आले असून ही कवटी १४८०० (अधिकउणे २०००) वर्षपूर्व या काळातील म्हणजे मध्य प्लाइस्टोसीन कालखंडातील आहे. या कवटीचे आकारमान १४२० मिली. आढळले आहे. हे आकारमान निअँडरथल व आधुनिक मानवांच्या कवटीच्या आकारमानाशी मिळतेजुळते आहे. ही कवटी काहीशी लांबट असून आधुनिक मानवी कवटीप्रमाणे त्यात गोलाई आढळत नाही. तसेच चेहऱ्याची उंची मानवी कवटीच्या तुलनेत अपेक्षेपेक्षा कमी आहे. हाडे तुलनेने कमी जाड असून त्यांच्यात इरेक्टस मानवांप्रमाणे दणकटपणा दिसत नाही. ही कवटी नाक रुंद असलेल्या ५० वर्षे वयाच्या पुरुषाची असावी आणि याचे शरीर मोठे असल्यामुळे त्याला हिवाळ्यात कोणत्याही भागात गेल्यास त्रास होत नसावा असाही अंदाज काही संशोधक व्यक्त करतात. या कवटीच्या आधारे संगणक वापरून २०२३ मध्ये ड्रॅगन मानवाचे कल्पनाचित्र सिसेरो मोरेस (१३ नोव्हेंबर १९८२) या ब्राझिलियन वैज्ञानिकांनी केले आहे.

इतर कोणतीही हाडे न मिळाल्याने ड्रॅगन मानवाविषयी इतर काही माहिती उपलब्ध नाही. तथापि या कवटीच्या सर्वप्रकारे केलेल्या अभ्यासातून असे दिसते की, ड्रॅगन मानवाच्या उत्क्रांतीची शाखा आधुनिक मानवांच्या शाखेला समांतर असावी.

 

 

 

संदर्भ :

  • Bae, Christopher J.; Liu, Wu; Wu, Xiujie; Zhang, Yameng & Ni, Xijun, “Dragon man” prompts rethinking of Middle Pleistocene hominin systematics in Asia, The Innovation, 4 (6), 2023.
  • Moraes, Cicero, ‘A Aproximação Facial do Homo longi (Harbin, China ~148.000 AP)’, OrtogOnLine Mag, Vol. 4 (2), 2023.
  • Qiang, Ji; Wu, Wensheng; Ji, Yannan; Li, Qiang & Ni, Xijun ‘Late Middle Pleistocene Harbin cranium represents a new Homo species’, The Innovation, 2, 2021.
  • चित्रसंदर्भ : १. हार्बिन कवटी : जी कियांग व इतर, २०२१ ; २. ड्रॅगन मानवाचे कल्पनाचित्र : सिसेरो मोरेस, २०२३.

समीक्षक : मनीषा पोळ


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.