केनिॲन्थ्रोपस प्लॅटिओप्स ही मानवी उत्क्रांतीसंबंधी एक महत्त्वाची प्रजात. केनियात लेक तुर्कानाच्या पश्चिमेला लोमेक्वी येथे ब्रिटिश पुरामानवशास्त्रज्ञ मेव्ह लिकी यांना चपटा चेहरा असणारी एक कवटी (केएनएम-डब्ल्यूटी ४०००००) मिळाली (१९९९). या जीवाश्माचे भूवैज्ञानिक वय ३५ लक्ष वर्षपूर्व आहे.

या जीवाश्मासाठी केनिॲन्थ्रोपस असा नवा पराजाती गट तयार करून त्याचे केनिॲन्थ्रोपस प्लॅटिओप्स असे नामकरण करण्यात आले. ‘प्लॅटिओप्सʼ हा शब्द ‘सपाट चेहराʼ या अर्थाने आहे. काही पुरामानवशास्त्रज्ञ मात्र लिकी यांचे वर्गीकरण मान्य न करता याचा समावेश ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस याच प्रजातीत करतात.

या प्रजातीच्या प्राण्यांच्या शरीराचे इतर जीवाश्म खूप संख्येने न मिळाल्याने त्यांच्या आकाराविषयी निश्चित माहिती नाही. मात्र कवटीचे आकारमान सर्वसाधारणपणे ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिस प्रमाणेच (४३० घ. सेंमी.) आहे. या कवटीमध्ये भुवईच्या ठिकाणी असणारे उंचवटे (Brow ridges) फारसे जाड नाहीत. पायाच्या बोटांवरून हे प्राणी दोन पायांवर चालणारे होते, हे दिसते.

केएनएम-डब्ल्यूटी ४००००० या कवटीचे केएनएम-इआर १४७० या जीवाश्माशी साम्य आहे. केएनएम-इआर १४७० (१९ लक्ष वर्षपूर्व) हा होमो रूडोल्फेन्सिस प्रजातीचा जीवाश्म केनियात कूबी फोरा येथे मिळाला आहे. यावरून केनिॲन्थ्रोपस प्लॅटिओप्स हा होमो रूडोल्फेन्सिसचा पूर्वज असावा, असे सुचवण्यात आले आहे.

संदर्भ :

  • Haile-Selassie, Yohannes; Melilloc, Stephanie M. & Denise F. Su ‘The Pliocene Hominin Diversity Conundrum : Do more Fossils mean less clarity?ʼ, Proceedings of the National Academy of Sciences : 113 (23), pp. 6364–6371, 2016.
  • White, T. D. ‘Paleoanthropology : Early hominids – Diversity or distortion?ʼ Science : 299, pp. 1194-1197, 2003.

                                                                                                                                                                                                                        समीक्षक – शौनक कुलकर्णी