पूर्व आशियाच्या इंडोनेशिया द्वीपसमूहातील जावा बेटावरील एक मानवी जीवाश्म. जावा बेटावरील काही स्थळांवर मानवी उत्क्रांती आणि मानवी स्थलांतर या विषयासंदर्भात महत्त्वपूर्ण पुरावे सापडले. भूशास्त्रीय दृष्ट्या हे बेट एक अत्यंत सक्रिय विवर्तनिक आणि ज्वालामुखीय उद्रेकांमुळे प्रभावित असे क्षेत्र आहे. इओसीन युगात (५६ ते ३३.९ दशलक्ष वर्षांपूर्वीचा कालखंड) ४५ दशलक्ष वर्षांपूर्वी इंडो-ऑस्ट्रेलियन भूस्तर सुंदा मंचाखाली गेल्यामुळे (subduction zone – नमवणी क्षेत्र) मोठ्या प्रमाणात विवर्तनीय हालचाली आणि ज्वालामुखीय उद्रेक होऊ लागले. यामुळे २६ लाख ते २० लाख वर्षांपूर्वी जावा बेटाची निर्मिती झाली.

येथील केंडेंग पर्वतरांगांमध्ये सोलो नदीच्या खोऱ्यातील अनेक ठिकाणी मानवी आणि विविध प्राण्यांचे जीवाश्म आणि मानवाने बनवलेली दगडी हत्यारे सापडली. त्यांपैकी ट्रिनिल, नॅनडाँग, सांगिरान आणि मोजेकोरेटो या स्थळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. केंडेंग हा इंडोनेशियातील पश्चिम जावा येथील १७३२ मी. (५६८२ फूट) उंचीचा आणि १००० मी. जाडीच्या ज्वालामुखीय गाळाचा पर्वत असून तो संमिश्र ज्वालामुखी या प्रकाराचा आहे (स्ट्रॅटोव्होल्कॅनो – stratovolcano). याचा ज्वालामुखी काहील गोलाकार (caldera) असून तो पूर्वीच्या काळातील मोठ्या प्रमाणात झालेल्या उद्रेकांचे संकेत दर्शवितो. हा ज्वालामुखी १८ लाख ते ७ लाख वर्षपूर्व या काळात सक्रिय होता. स्ट्रॅटोव्होल्कॅनो वारंवार होणाऱ्या उद्रेकांमुळे हजारो वर्षांपासून विकसित होत असतात. त्यामुळे ते गुंतागुंतीच्या ज्वालामुखीच्या संरचनांपैकी असून राख, चिखल, घन लावा प्रवाह, ज्वालामुखीय घुमट अशा मिश्र थरांनी बनलेला आहे. १८९१ मध्ये डॉ. युजीन दुबॉ आणि त्यांच्या चमूने जीवाश्म-समृद्ध गाळांच्या स्तरातून प्राण्यांचे असंख्य जीवाश्म आणि काही मानवी जीवाश्म उत्खनन करून काढले.
जावामध्ये १८९४ मध्ये पहिला मानवी जीवाश्म कवटीच्या रूपात सापडला. तेव्हापासून जावामध्ये सापडलेल्या मानवी जीवाश्मांना जावा मानव (जावा मॅन) असे म्हटले जाते. हे जीवाश्म प्लाइस्टोसीन काळात अस्तित्वात असलेल्या इरेक्टस मानव या प्रजातीचे आहेत. इरेक्टस मानवाचे जीवाश्म आफ्रिका, मध्य आशिया, चीन आणि यूरोपीय देशात प्राप्त झाले आहेत. नवीन संशोधनानुसार दक्षिण आफ्रिकेत त्यांचे सर्वात प्राचीन अस्तित्व २३ लाख वर्षपूर्व ते १८ लाख वर्षपूर्व होते.
कालमापनाच्या अभ्यासावरून असे दिसते की, जावा मानव अर्थात इरेक्टस मानव जावामध्ये १५ लाख वर्षपूर्व ते ७ लाख वर्षपूर्व या काळापासून ते साधारण १ लाख १७ हजार वर्षपूर्व ते १ लाख ८ हजार वर्षांपूर्वी पर्यंत होते. शेवटचा ज्ञात इरेक्टस मानव जावामध्ये अस्तित्वात होता, असे आजपर्यंतच्या संशोधनावरून दिसते. जगातील इरेक्टस मानव जीवाश्मांचा सर्वांत मोठा संग्रह जावामध्ये असून १०० पेक्षा अधिक मानवी (होमो इरेक्टस) जीवाश्म सापडले आहेत. सांगिरान येथील इरेक्टस मानवाचे जीवाश्म जागतिक स्तरावर तुलनेने उत्तम स्थितीत सापडले आहेत.
जावामध्ये मोठ्या प्रमाणात मिळालेल्या प्राण्यांच्या अश्मीभूत अवशेषांमध्ये साटिर प्राणिसमूहातील सायनोमॅस्टोडॉन हा खुजा हत्ती, प्राचीन काळातील म्हणजे २० लाख वर्षपूर्व प्लाइस्टोसीन काळातील आहे. साटिर प्राणिसमूहातील प्राणी बेटांवरील जमिनीवर राहणारे पृष्ठवंशीय प्राणी आहेत. याशिवाय हिप्पो, हरणे, मोठ्या आकाराची कासवे, कासव, खेकडे, शिंपले आदी जलचर प्राण्यांची कवचे सापडली आहेत. यातील काही कवचे ही गोड्या पाण्यातील जलचर प्राण्यांची आहेत. प्लाइस्टोसीन काळातील हवामान बदलांबद्दल काही निष्कर्ष काढण्यात आले आहेत. मिळालेल्या पुराव्यांवरून आद्य प्लाइस्टोसीन काळात जावामध्ये दमट हवामान आणि दाट गवताळ प्रदेश अस्तित्वात होते. कालांतराने मध्य प्लाइस्टोसीन काळात हवामान कोरडे झाल्याने सी४ (C4) वनस्पतींचा विस्तार होऊन खुला गवताळ प्रदेश तयार झाले.
दक्षिणपूर्व आशियातील प्रागैतिहासिक स्थळांचे कालमापन असे दाखवते की, जावा बेटावर आदिमानवाचे वास्तव्य दीर्घ काळ होते. मोजोकेरटो येथे १८.१±०४ लाख ते १४.९ लाख वर्षांपूर्वी इरेक्टस मानव अस्तित्वात होते. सांगिरान येथे १५.१ लाख ते ०.९३ लाख वर्षांपूर्वी इरेक्टस मानवाचे वास्तव्य होते. तर ट्रिनिल येथे ५.४० लाख ते ४.३० लाख वर्षांपूर्वी ते राहत होते. आणि सोलो मानव १.१७ ते १.०८ वर्षांपूर्वी नॅनडाँग येथे अस्तित्वात होते. यावरून असे दिसते की, इरेक्टस मानव या जातीचा शेवटचा मानव नॅनडाँग येथील खुल्या अधिवास क्षेत्रामध्ये राहत होता. यानंतरच्या काळात जावा बेटावर पर्ज्यन्यवनाची सुरुवात झाली. या व्यतिरिक्त दक्षिणपूर्व आशियात प्लाइस्टोसीन काळाच्या उत्तरार्धात इंडोनेशियातील फ्लोरेस बेटावर फ्लोरेस मानव (१,००,००० ते ६०,००० वर्षपूर्व) आणि फिलिपिन्समधील लुझोन बेटावर लूझोन मानव (६७,००० वर्षपूर्व) या मानवांचे अस्तित्व होते.
संदर्भ :
- Sander L. Hilgen; Frederik J. Hilgen; Shinatria Adhityatama; Klaudia. Kuiper; Josephine C. A. Joordens. ‘Towards an astronomical age model for the Lower to Middle Pleistocene hominin-bearing succession of the Sangiran Dome area on Java, Indonesia’, Quaternary Science Reviews, Vol. 297, 2022. https://www.sciencedirect.com/science/article/pii/S027737912200419X?via%3Dihub
- चित्रसंदर्भ : जावामध्ये मानवी जीवाश्म सापडलेल्या स्थळांचा नकाशा – After Eduard Pop et al. 2023.
समीक्षक : जयेंद्र जोगळेकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.