त्वांग बालक हे दक्षिण आफ्रिकेत ‘त्वांगʼ या ठिकाणी मिळालेल्या ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस जीवाश्माचे नाव आहे. हा जीवाश्म २५ लक्ष वर्षांपूर्वीचा आहे. एका खाणकामगाराला १९२४ मध्ये जोहॅनिसबर्गपासून ६०० किमी. अंतरावर असलेल्या बक्स्टन नावाच्या खाणीत अनेक बबून माकडांचे अनेक जीवाश्म मिळाले होते. त्यांचा अभ्यास करताना या जीवाश्मांमध्ये कवटीचा एक वेगळा जीवाश्म मिळाला. रेमंड डार्ट (१८९३–१९८८) यांनी या कवटीचा अभ्यास केला आणि त्याचे ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस असे नामकरण केले. आफ्रिकेत मिळालेला मानवी उत्क्रांतीशी संबंधित हा पहिला महत्त्वाचा जीवाश्म होता; कारण तोपर्यंत मानवी उत्क्रांतीचा प्रारंभ यूरोप अथवा आशियात झाला असावा, असे मानले जात होते. त्वांग बालकाच्या जीवाश्मामुळे प्रथमच ऑस्ट्रॅलोपिथेकस प्राण्याच्या दोन पायांवर चालण्याच्या क्षमतेचा प्रारंभ झाल्याचे दिसून आले होते आणि मानवी मेंदूच्या उत्क्रांतीसंबधी संशोधनाला कलाटणी मिळाली होती.

त्वांग बालकाची रचना मानवाप्रमाणे होती. उभी आणि गोलाकार ललाटअस्थी, भुवयांची हाडे फार काही मोठी नव्हती. डोळ्याच्या खोबण्या गोलाकार होत्या. कवटीच्या खालच्या बाजूस पुढच्या बाजूने असलेले फोरामेन मॅग्नम (कवटीच्या तळाशी असलेले मोठे छिद्र) होते, सुळेसुद्धा कपींप्रमाणे फार मोठे नव्हते. त्वांग बालकाच्या कवटीमधील हाडे एकमेकांशी जुळलेली नाहीत. त्यावरून मृत्युसमयी हे बालक ३ ते ४ वर्षांचे असावे, असे दिसते. बिबळ्यासारख्या कोणातरी भक्षकाने या बालकाला ठार केले, असे अनुमान सी. के. ब्रेन या पुरामानवशास्त्रज्ञांनी काढले होते; तथापि रोनाल्ड क्लार्क आणि ली बर्गर यांनी २००६ मध्ये केलेल्या अभ्यासातून एखादा गरुड किंवा तत्सम शिकारी पक्ष्याने त्याला मारले असावे, असा निष्कर्ष काढला. या बालकाच्या डोळयांच्या जागी असलेल्या खुणा गरुडांच्या नखांच्या आहेत. गरुड माकडांना उचलून नेतात तेव्हा अशाच प्रकारच्या खुणा माकडांच्या कवटीवर आढळतात. अशा खुणांचा सखोल अभ्यास केल्यानंतर आफ्रिकन क्राउन्ड इगल (Stephanoaetus coronatus) या प्रजातीच्या गरुडाने त्वांग बालकाला भक्ष्य केले असावे, असे अनुमान मॅकग्रा, कुक व शुल्ट्झ यांनी २००६ मध्ये काढले आहे. या प्रजातीचे गरुड ३० ते ४० किग्रॅ. वजनाच्या प्राण्याला उचलून नेऊ शकतात हे पाहता १०-१२ किग्रॅ. वजनाच्या त्वांग बालकाला उचलून नेणे सहज शक्य होते.

त्वांग बालकाच्या मेंदूची रचना व आकार पाहून डार्ट यांनी या मेंदूचे मानवी मेंदूच्या वाढीशी साम्य असल्याचे अनुमान काढले होते. परंतु हॅालोवे व त्यांच्या सहअभ्यासकांचा २०१४ मध्ये प्रसिद्ध झालेला निष्कर्ष निराळा आहे. सूक्ष्म क्ष-किरण (कम्प्युटेड टोमोग्राफी) तंत्र वापरल्याने अनेक प्रकारच्या मानवी वर्तनांशी संबंध असलेल्या मेंदूमधील ललाटपूर्व पालि  (Pre-frontal lobe) या भागाचा त्वांग बालकात विकास झालेला नव्हता, असे प्रतिपादन करण्यात आले आहे.

संदर्भ :

  • Berger, L. R. ‘Predatory bird damage to the Taung type-skull of Australopithecus africanus Dart 1925ʼ, American Journal of Physical Anthropology, 131: 166-168, 2006.
  • Berger, Lee & Hilton-Barber, Brett, In the Footsteps of Eve : The Mystery of Human Origins, National Geographic Society, 2000.
  • Dart, R. A.  ‘Australopithecus africanus : The Man-Ape of South Africaʼ, Nature 115(2884): 195-199, 1925.
  • Tobias, P. V. Dart Taung and the Missing Link, Johannesburg, Institute for the Study of Man in Africa, 1984.

समीक्षक – शौनक कुलकर्णी