अरुणाचल प्रदेशातील एक अनुसूचित जमात. तेराव्या शतकाच्या सुरुवातीला ही जमात तिराप जिल्ह्यात स्थायिक झाले असून ते त्याच जिल्ह्यातील पातकई टेकडीच्या पूर्वेकडील भागातून स्थलांतरित झाले आहेत. हे लोक चांगलांग जिल्ह्यातही आढळतात. त्यांची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १,११,६७९ इतकी होती.

नोक्ते जमात हे तिबेटो-बर्मीज वांशिक गटाचे असून ते आसामच्या पूर्वेकडील भागात व नागालँडमध्ये आढळणारी कोन्यॅक नागा आदिवासी समुदायाशी संबंध असणारी आहे. काही तज्ज्ञांच्या मते, नोक्ते लोक हे १६०० ते १७०० या शतकादरम्यान म्यानमारमधील हुखाँग खोऱ्यातून स्थलांतर करून अरुणाचल प्रदेशात आले असावे. त्यांच्या मूळ वंशजांची उत्पत्ती त्यांच्या स्थानिक देवदेवतांपासून झाल्याची त्यांची धारणा आहे. त्यामध्ये खानबाओ हा मुख्य वंशज असल्याचे ते मानतात. खानबाओला कुनलंग आणि कुनलई ही दोन मुले होती. या दोघांना तंगथोक आणि तंकाम ही दोन मुले होती. हे नोक्ते जमातीचे प्रमुख पूर्वज होत. नोक्तेंची विभागणी द रॉयल लोवांग केपी आणि टांगमो या दोन गटात होत असून ते वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. उदा., बोरदुरियाज, पनिदुरीयाज, जयपुरीयाज इत्यादी.

नोक्ते जमात सामाजिकरित्या लोवांग (उच्चवर्गीय), चन्ना (मध्यमवर्गीय) व मिखिल (निम्नवर्गीय) या तीन प्रकारात विभागली गेली आहे. प्रत्येक वर्गाला स्वतःची कुळी किंवा उपजाती आहेत. जशी लोआनशाकू, मेदामाकू पोंगतेकू, रातुमकू, वोंगसमकू इत्यादी. आसाममध्ये राहणाऱ्या नोक्ते जमातीच्या सुयोंग, बयोंग आणि योगालेंग या तीन कुळी आहेत. हे लोक समुदायाने राहतात.

नोक्ते जमात पुरुषप्रधान संस्कृती असलेली आहे. त्यांची शारीरिक बांधणी मध्यम आकाराची असून त्यांच्या चेहऱ्यावर मंगोलॉइड प्रकारचा रंग आढळतो. नोक्ते जमातीचे पुरुष त्यांच्या वेगळ्या केसांच्या रचनेमुळे ओळखले जातात. त्यांचे केस पुढच्या बाजूने कापलेले असतात व पाठीमागचे केस एकत्रित बांधतात, त्यास ‘चिग्नॉन’ असे म्हणतात. स्त्रिया त्यांच्या लांब केसांचा अंबाडा करून पाठीमागे मानेवर घालतात. जर विधवा स्त्रियांनी परत लग्न केले नाही, तर त्या डोक्याचे केस कमी करतात. सर्व स्त्रिया आपल्या चेहऱ्यावर आणि अंगावर पारंपरिक चिन्हे गोंदवून घेतात. दमट हवामानामुळे नोक्ते पुरुष कमरेभोवती पट्टासहित लुंगी गुंडाळतात आणि खांद्यावर उपरणे घेतात. स्त्रिया गुडघ्यांपर्यंत किंवा पायापर्यंत झगा घालतात, तर अंगात कमरेपर्यंत मोठी चोळी घालतात. कानात आणि हातात विविध धातूंचे दागदागिने घालतात. आज अनेक नोक्ते स्त्री-पुरुष आधुनिक पद्धतीचे कपडे घालत आहेत.

या जमातीचे घरे मुख्यत꞉ बांबू व मातीची आणि दाट वस्ती असलेली असतात. पिकांची लागवड करणे, मासेमारी करणे, शिकार करणे हा नोक्ते जमातीचा मुख्य व्यवसाय आहे. याशिवाय रोजंदारीवर मजुरी करणे हा त्यांचा पूरक व्यवसाय असून पशुपालन, लाकडी वस्तूंवर कोरीव काम करणे ही कामेसुद्धा ते करतात. काही नोक्ते सरकारी नोकरीसुद्धा करत आहेत. नोक्ते जमातीचे लोक मांसाहारी व शाखाहारी असून त्यांचे भात आणि बाजरी हे मुख्य अन्न; तर डाळ, पालेभाज्या, मका, मटण, मासे इत्यादी पूरक अन्न आहे.

नोक्ते लोकांची भाषा सिनोतिबेटीयन भाषा समूहात येत असून ते परस्परांशी बोलताना नोक्ते भाषेतच बोलतात. इतरांशी बोलताना ते आसामी आणि इंग्लिश या भाषांचा वापर करतात.

नोक्ते जमातीच्या लहान मुलांना पुरुष बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी अनेक गावांमध्ये ‘मोरुंग’ नामक वसतीगृहे किंवा युवागृहे आढळत असून त्यास ‘पोह’ असेही म्हणतात. या वसतीगृहात अनुभवी मोठ्या व्यक्तिंकडून तरुणांना युद्ध, धर्म, पौराणिक व लोककथा यांचेही प्रशिक्षण दिले जाते.

नोक्ते लोकांची ग्रामपरिषद असते, त्यास ‘न्गोअंग्थून’ असे म्हणतात. त्याची न्यायिक व्यवस्था ‘गावन’ नामक तलाठी पाहतो. तसेच ‘गावबुरा’ हे प्रमुख व्यक्ती एकमेकांमधील भांडणे सोडवून न्याय देण्याचे काम करतो. वांचो आणि टंगसा या नोक्ते वर्गीय जमातीतच एकमेकांची लग्ने लावली जातात. त्यांच्यात पुनर्विवाहास मान्यता आहे. घराच्या संपत्तीचा वारसदार फक्त मुलगाच असतो. मुलीला संपत्ती मिळत नाही. सुरुवातीला हे लोक वैष्णव हिंदू होते. नंतर विसाव्या शतकात काही नोक्ते ख्रिश्चन, तर काही बौद्ध झाले आहेत.

नोक्ते जमातीचा ‘लोकू’ हा मुख्य सण असून तो फेब्रुवारी महिन्यात शेतीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. लोकू हा शब्द लोफे (बाहेर काढणे) व रंगकू (ऋतू) या दोन शब्दांच्या अनुक्रमे पहिल्या व शेवटच्या अक्षरांचे मिळून तयार झालेला आहे. हा उत्सव ३ दिवसांचा असतो. या वेळी प्राण्यांचा बळी देणे, मेजवानी आणि ‘जुमिन’ नामक पारंपरिक मद्य प्राशन केले जाते. याबरोबरच वोरांग, ओरिया, होजू कुवा इत्यादी उत्सवसुद्धा साजरे केले जातात. या उत्सवांच्या वेळी स्त्री-पुरुष पारंपरिक युद्धनृत्य, लोकगीते, खेळ इत्यादींचे प्रदर्शन करतात. त्यांचा मुखिया हा जमातीच्या लोकांना नामसंग आणि बोर्डूरिया या सणाच्या वेळी मार्गदर्शन करतात.

नोक्ते लोक पूर्वी पारशी लोकांप्रमाणे मृत शरीर नदीकाठी किंवा घराशेजारी उघड्यावर सोडत असत; परंतु आता मृत्युनंतर मृत व्यक्तीला बांबूवर ठेवून दहन करतात, तर ख्रिश्चन नोक्ते मृताला जमिनीत पुरतात.

संदर्भ ꞉ Singh, K. S., People Of India, Oxford University Press, 1998.

समीक्षक ꞉ लता छ्त्रे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.