भारताच्या पूर्वेकडील राज्यांत आढळणारी एक आदिवासी जमात. ही जमात मणिपूर राज्यात आणि काही प्रमाणात नागालँड व आसाम या राज्यांत आढळून येते. ‘वनस्पतीचे बीज’ असा चिरू या शब्दाचा अर्थ होतो. मुख्यत: मणिपूरच्या सेनापती, टमेंगलोन्ग आणि विष्णुपूर या जिल्ह्यांमध्ये चिरू लोकांचे वास्तव्य आहे. त्यांची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ८,५९९ इतकी होती.

चिरू जमातीची उत्पत्ती ही मंगोलीयाची असून हे लोक स्थलांतर करून रशिया, चिन आणि नंतर बाराव्या शतकात भारतात आले. हे लोक आपल्या समृद्धीसाठी आणि शांततामय जीवन जगण्यासाठी स्थलांतर करून भारतात आले असावे. भारत सरकारने १९५० पासून त्यांना अनुसूचित जमाती म्हणून मान्यता दिली असून ते शासनाच्या सर्व सेवा-सुविधांचा लाभ घेत आहेत.

चिरू जमातीची शारीरिक ठेवण, संस्कृती, जीवनशैली ही नागा लोकांप्रमाणेच म्हणजे मंगोलाइड प्रकारची आहे. त्यांच्या पूर्वजांकडून मिळालेली परंपरा, चालिरीती, भाषा, धर्म हे या लोकांनी पिढ्यांपिढ्या टिकून ठेवली आहे. या जमातीची दानला, रेझा, चोंगदूर, शॅम्पर व डिंगोठी ही पाच कुळे आणि अनेक उपकुळे आहेत. हे लोक आपसांत चिरू आणि मणिपुरी भाषा बोलतात. त्यांची चिरू भाषा तिबेटो – बर्मन प्रकारची आहे.

चिरू जमातीची वेशभूषा आणि पोशाख नागा लोकांप्रमाणे असून रंगीबेरंगी लोकरीच्या कपड्यांचा त्यात समावेश असतो. त्यांची घरे साध्या प्रकारची आणि पर्यावरणपुरक असतात. या लोकांचा शेती, पशुसंवर्धन, मासेमारी, बांबूंपासून बास्केट व इतर वस्तू तयार करणे इत्यादी व्यवसाय आहे. ही जमात मांसाहारी असून भात आणि मासे हा त्यांचा मुख्य आहार आहे. आज चिरू जमातीतील अनेक मुलेमुली शिक्षण घेऊन सरकारी नोकरी आणि इतर व्यवसाय करीत असून आधुनिक काळाप्रमाणे जीवनमान जगत आहेत.

चिरू जमातीत मामेबहिणीशी लग्न करण्यास परवानगी आहे; मात्र आत्तेबहिणीशी लग्न होत नाही. मुलीकडून रोख रक्कम किंवा इतर स्वरूपात हुंडा घेण्याची प्रथा आहे. विधवा विवाहास मान्यता आहे. काही चिरू हे ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळे त्यांचा विवाह ख्रिश्चन पद्धतीप्रमाणे होतो.

चिरू जमातीमध्ये सणाला महत्त्वाचा संस्कृतिक घटक माणतात. त्यांच्या पारंपरिक सणांत संस्कार, विधी, रितिरीवाज यांचा समावेश असून प्रत्येक सणातून त्यांची जीवनपद्धती दिसून येते. या जमातीत मुख्यत: दंताई रोहोई, रेनरेई लमवता, फोईबेई मोरोई, संगरोका, शांगबूक आणि लोईपुईशाक रथाकोई ही सहा सण आहेत. दंताई रोहोई आणि रेनरेई लमवता हे सण त्या त्या वर्षीच्या मुलांची व तरुणांची सामाजिक परिस्थिती दर्शविते. फोईबेई मोरोई हा सण वर्षानुवर्षे वाचनाचे महत्त्व दर्शवितो. संगरोका, शांगबूक आणि लोईपुईशाक रथाकोई हे सण बी पेरणी, कापणी व देवतांची पूजा यांबाबतची असतात. चिरू जमातींची सर्व सण-उत्सव विविध वाद्य, पारंपरिक गाणी आणि वेगवेळ्या ऋतुंमध्ये पारंपरिक पोषाख व वेशभूषांतून साजरे केली जातात.

चिरू जमातीच्या पारंपरिक ग्रामपंचायतीत ‘कुल्लापका’ हा प्रमुख सल्लागार म्हणून किंवा मुखिया म्हणून काम करतो. तो आपल्या समाजाला शिक्षण, आधुनिक आरोग्य सेवा, विविध विकास आणि सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न करतो. त्यांच्यात मृत्यूनंतर मृतांना दफन करण्याची प्रथा आहे.

संदर्भ : Singh, K. S., People Of India, Delhi, 1998.

समीक्षक : लता छत्रे