मध्य भारतातील ओडिशा, झारखंड, बिहार आणि मध्यप्रदेश या राज्यांत आढणारी एक आदिवासी जमात. छोटा नागपूर पठार, झारखंडचा पूर्व सिंघभूम, गुमला, सिमदेगा जिल्हा; पश्चिम बंगालमध्ये पश्चिम मिदनापूर, बांकुरा आणि पुरुलिया या जिल्ह्यांमध्ये मुखत: डोंगरी भागात खारियांचे जास्त प्रमाणात वास्तव्य आहे. ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील जाशीपूर आणि करांजीया मोरडा या भागांत हील खारिया जमातीचे वास्तव्य आहे. त्यांची लोकसंख्या ४,३२,९७७ (२०२१ अंदाजे) इतकी होती.

खारिया जमातीच्या प्राचीन इतिहासानुसार ते नागवंशी राजा मुंडा यांचे वंशज असल्याचे मानतात. खारिया जमातीचे दूध खारिया, ढेलकी खारिया आणि हील खारिया या तीन मुख्य उपजमाती आहेत. दूध खारिया आणि ढेलकी खारिया हे नेहमी एकत्र असतात; मात्र हील खारिया लोक ढेलकी खारिया आणि दूध खारिया यांच्यापासून वेगळे राहतात. हील खारिया यांना पहाडी खारिया या नावानेसुद्धा ओळखले जाते. या व्यतिरिक्त त्यांना सावरा/साबर, खेरिया, इरेंगा म्हणूनही ओळखले जाते. खारियांमध्ये वेगवेगळी कुळे आहेत. त्यामध्ये ‘गुलगु’ हे कुळ सर्वांत श्रेष्ठ मानले जाते. कुळांची नावे सांगताना गुलगु या कुळाचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. याव्यतिरिक्त बड्या, भूइया, जरू, तेसा, हेम्ब्रोम, सांडी, गिंडी, देहुरी, पिचरिया, नागो, तोलोंग, सुया, धार, कोटल, खारमोई, दिगर, लाहा, सददार इत्यादी कुळे या जमातीत आहेत.

खारिया जमातीतील लोक मुंडा कुळातील दक्षिण मुंडा भाषा म्हणजेच खारिया भाषा बोलतात. ही भाषा ऑस्ट्रोएशियाटिक स्टॉक भाषा समूहात येते; मात्र हील खारिया लोक इंडो-इराणी भाषेसह हिंदी व स्थानिक भाषाही बोलताना आढळतात. खारिया पुरुष हा पारंपारिक रित्या धोतर परिधान करतात. त्याला ‘भागवन’ असे म्हणतात; तर स्त्रिया गुडघ्यापर्यंतच्या लांबीची साडी नेसतात. खारियांमध्ये स्त्रियांबरोबर पुरुषदेखील दागिन्यांचा वापर करतात. त्यांचे दागिने हे मुख्यतः पितळ, निकेल, ॲल्युमिनियम, चांदी इत्यादींपासून बनविलेले असतात. त्यांच्याजवळ सोन्याचे दागिने फार कमी प्रमाणात आढळून येतात. त्यांची घरे मातीच्या भितींची व कवलारू छप्पर असलेले आढळतात. काही लोक आपल्या ऐपतीनुसार पक्की घरे बाधतात. आज या जमातीतील अनेक लोक आधुनिक पद्धतीचे जीवनमान जगताना दिसून येत आहेत.

इंग्रजांच्या काळामध्ये खारिया जमीनदार होते. त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनी असून त्यांचा उदरनिर्वाह त्यावर चालतो. तसेच जे खारीया जंगलामध्ये, डोंगरावर राहतात त्यांचा उदरनिर्वाह कंदमुळे, विविध बिया, फुले, फळे, औषधी वनस्पती, डिंक, मध इत्यादी जंगल संपत्तीवर आणि रोजमजुरीवर अवलंबून असतो. हील खारिया हे शिकारी, मासेमारी करणारे, पशुपालक आहेत. बदलत्या काळानुसार खारिया लोकांतही बदल दिसून येत आहे. अनेक खारिया लोक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवीत आहेत. त्यामुळे काही मुले-मुली उच्च शिक्षण घेत आहेत. अनेक मुले-मुली सरकारी व खाजगी सेवेतही असल्याचे दिसून येत आहे.

खारिया जमातीत कुटुंब हे सामाजिक रचनेचा गाभा असल्याचे मानतात. त्यांच्यात पितृसत्ताक पद्धती आहे. खारियामध्ये एकपत्नीत्व चाल असली, तरी त्यांच्यात बहुपत्नीत्व मोठ्या प्रमाणात दिसून येते. खारियांचे लग्न एकसारख्या कुळात होत नाही. त्यांच्यात वधुमूल्य (गिनिडतड) पद्धत दिसून येते. ढेलकी खारिया व दूध खारिया यांच्या धार्मिक प्रमुखाला पाहन म्हणतात, तर हील खारियाच्या धार्मिक प्रमुखाला दिहुरी असे म्हणतात. ही पदे वंशपरंपरागत आहेत. नाग देव, धरती माई, अग्नि देव, जल देव, ग्राम देव, बुऱ्हा-बुऱ्ही किंवा मर्सी-मसान इत्यादी देवतांची खारिया लोक पूजा करतात. खारिया जमातीतील काही लोक ख्रिश्चन धर्माचे आचरण करतात.

खारिया लोक कर्म, सोहराई, सरहूल, नवाखानी, धान बुनी, गौशाला पुजा इत्यादी सण साजरे करतात. सणांच्या वेळी स्त्री आणि पुरुष हे नृत्य व संगीताचे सादरीकरण करतात. संगीत व नृत्य हे त्यांच्या कार्यक्रमांचा महत्त्वाचा भाग आहे. ते कार्यक्रम व सणांच्या वेळी करताल, ढोल, बासरी, नगारा इत्यादी संगीत साधनांचा वापर करतात; तर नृत्याच्या वेळी ते टाळ्या, शिटी वाजवितात. त्यांच्या नृत्य प्रकाराला हरिओ, किनभार, कुढींग, जाधुरा असे संबोधले जाते. खारिया लोक मृत व्यक्तींना अग्नि देतात, तर काही लोक मृतांना पुरतात. भुतप्रेतांवर त्यांचा विश्वास आहे.

संदर्भ :

  • Sing, K. S., India’s Communities, Vol. III, Delhi, 1997.

समीक्षक : लता छत्रे