भारतातील एक अनुसूचित जमात. ही जमात मुख्यत꞉ लक्षद्वीप व केरळ येथे वास्तव्यास आहे. त्यांची २०११ च्या जनगणनेनुसार ६४,४२९ इतकी लोकसंख्या आहे.

हे लोक मनिकू नावाचा मूळ माणूस आपला पूर्वज असून ते मालदीव बेटावरून आले. मालदीव बेटाच्या कंबोराणीच्या मुलीशी मनिकू यांचा विवाह झाला आणि त्यांच्या पुढील वंशाला माणिकफन असे नाव पडले, असे ते मानतात. यांची दोन मुख्य कुळी असून काही उपकुळी आहेत. स्त्रिया आपल्या उपकुळीनुसार ओळखल्या जातात. उदा., माणिक्का हे माणिकफन या उपकुळीचे, बीफन व बीबीज हे ठाकूरफन व ठाकरू या उपकुळीचे, कंबिलो हे रावेरी या उपकुळीचे इत्यादी. ठाकूरफन व ठाकरू यांच्यामध्ये पुन्हा उपउपकुळी असून त्यास बेबे असे म्हणतात. एमिनी या उपकुळीत जो समूह येतो, तो संपत्तीच्या आधारावर असतो. कुडीयातीज हा वर्ग भाडेकरी वर्ग म्हणून ओळखला जातो, तर मेलाचेरी हा वर्ग मूळ भूमीहीन म्हणून संबोधला जातो.

लक्षद्वीप येथील माणिकफन जमातीची लोक बुटकी असून त्यांची सरासरी उंची १६३ से. मी. इतकी आहे. ते मध्यम बांध्याचे असतात. त्यांचे डोके, नाक मध्यम आकाराचे आणि चेहरा हा लांबडा असतो. या लोकांचे राहणीमान हे परिस्थितिनूसार अत्यंत साधे असते. त्यांची घरे पर्यावरणपूरक साधनांनी बांधलेली असतात. त्यांच्यातील कुडीयातीज ही जमात कायम फक्त भाडेकरू म्हणूनच राहतात; मात्र आता काही लोक स्वत꞉ची घरे बांधत आहेत. हे लोक एकमेकांशी माह भाषेत बोलतात, तर इतरांशी ते हिंदी आणि मल्याळम या भाषांतून संवाद साधतात.

मासेमारी आणि नारळाचे उत्पादन करणे हा यांचा मूळ व्यवसाय आहे. या जमातीचे काही लोक हे सुन्नी मदरशामध्ये काम करतात. माणिकफन जमातीची लोक ठाकूरफन, ठाकरू आणि रावेरी या समूहांबरोबर पाणी आणि अन्नाची देवाणघेवाण करतात. ठाकूरफन हे मुख्यत: नाविक आहेत, तर ठाकरू हे बोटींवर काम करतात. रावेरीज हे जहाजांवर कामगार आहेत. हे लोक शाखाहारी व मांसाहारी असून यांचे मुख्य अन्न भात व मासे आहे. तसेच ते गोमांस खातात; मात्र डुकराचे मांस खाणे हे निषिद्ध मानतात.

माणिकफन आणि ठाकूरफन यांच्यात एकमेकांमध्ये लग्न होते. मामे किंवा आत्येबहीण व भाऊ यांच्यात लग्नाला मान्यता असते. खतीब हा लग्न लावण्यासाठी नेमलेला असतो. वधू-वरांकडून आवश्यक शपथ घेऊन तो साध्या प्रकारे लग्न लावतो.

ठाकूरफन, ठाकरू आणि रावेरी यांच्याबरोबर माणिकफन सर्व धार्मिकविधी सामुदायिक पद्धतीने करतात. यांच्यावर इस्लाम धर्माचा पगडा असल्याने त्यानुसार यांचे सर्व समारंभ होतात. जमातीची पारंपरिक ग्रामपरिषद असून गावच्या प्रमुखास बोडुकाका, तर स्त्रियांमधील प्रमुख व्यक्तीला बोडुडाथा असे म्हणतात.

माणिकफन जमातीत मृताचा चेहरा पश्चिमेकडे राहील असे एका कडावर, डोके उत्तरेकडे आणि पाय दक्षिणेकडे असे दफन करण्याची प्रथा आहे.

संदर्भ ꞉ Singh, K. S., People Of India, Oxford University Press, 1998.

समीक्षक ꞉ लता छत्रे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.