भारतातील एक अनुसूचित जमात. ती आसाम, मणिपूर या राज्यांत वास्तव्यास आहे. मणिपूर राज्याच्या चंडेल, चुराचंदनपूर आणि सेनापती या जिल्ह्यांमध्ये त्यांचे वास्तव्य अधिक आहे. तसेच काही आईमोल लोक मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांतही आढळून येतात. २०११ च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या २,६४३ इतकी आहे.
आईमोल लोकांची उत्पत्ती एका गुहेतून झाली असावी, असा समज आहे. या जमातीच्या मुख्य दोन शाखा आहेत. त्यांमध्ये चोंगोम, लैता, लानू, चैथू, चोंग्थू ही त्यांच्या उपशाखा आहेत. या जमातीचे लोक सावळे आणि नाकेले असतात. पुरुष शेकली, हुलीके, चू, लायजक, पुंथल, शुहबोह, पुआनते, पुआंदम आणि स्त्रिया खामटांग, पूवापाम, शेंचील, एतंग, रेणूआम, खोंकीहमोर आणि सैपीखूप असे पारंपरिक कपडे वापरतात. त्यांच्या कापडांवर नक्षीकाम केलेले असते. आईमोल ही त्यांची बोलीभाषा असून ती तिबेटो-बर्मन प्रकारची आहे.
आईमोल लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय असून त्याच बरोबर गाई, म्हशी, डुक्कर, कुकुटपालन इत्यादी व्यवसाय ते करतातत. तसेच शिवणकाम व विणकाम हे व्यवसायसुद्धा ते करतात. हे लोक मांसाहारी आहेत. तसेच त्यांच्या आहारात भात व भाज्यांचा समावेश असतो. डोंगराच्या पायथ्याशी, दाट जंगलात जिथे मध्यम पाऊस असेल तिथे लाकूड, बांबू आणि माती यांपासून ते आपली घरे बांधतात. ती आयताकृती, उतरत्या छपराची, छोटी असतात. घराच्या बाहेर धान्य साठवायला जागा असते. तसेच जनावरांसाठी आडोसा असतो. घराचा दरवाजा पूर्वेला असतो.
आईमोल जमातीमध्ये पितृसत्ताक पद्धती आहे. हे एकपत्नीत्वाचा अंगिकार करतात. त्यांच्यात विभक्त कुटुंबपद्धती आहे. प्रत्येक कुळाची दैवते परंपरेने आलेली आहेत. चोंगोम देवाला जकापशरीपनिनेंग असेही नाव आहे. तो नाग स्वरूपात असून तो पाण्यात राहतो. पूर्वी त्यांची खो-पठीसेन नावाची ग्रामदेवता आणि इन पाठियान नावाची गृहदेवता होती; परंतु आता बऱ्याच आईमोल लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असून ते या देवता मानीत नाहीत. हे लोक मृताला पुरतात. समाजातील न्यायनिवाड्यासाठी ८ लोकांचे मंडळ (पसकरेन) असते आणि त्याचा मुखिया तमसा कोई असतो. ज्याचा मान परंपरेने एकाच घराण्याला दिलेला असतो.
आईमोल जमातीतील अनेक लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असल्यामुळे आणि बाकीचा समाज या लोकांच्या संपर्कात येत असल्यामुळे या जमातीतील लोकांमध्ये आधुनिक पद्धतीचे अनुसरण दिसून येत आहे.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर