रसूलनबाई : (१९०२ — १५ डिसेंबर १९७४). हिंदुस्थानी उपशास्त्रीय संगीतातील बनारस घराण्याच्या भारतामधील प्रमुख गायिका. रसूलनबाई यांचा जन्म उत्तर प्रदेश राज्यातील कच्छवा बाजार, मिर्झापूर येथे एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. त्यांना त्यांच्या आई अदालतबाईंकडून संगीताचा वारसा मिळाला. रसूलन आणि बतूलन या दोनही बहिणींना त्यांच्या आईने संगीताचे प्राथमिक शिक्षण दिले. रसूलनबाई यांची लहान वयातील प्रगती पाहून त्यांना वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी मियाँ शौरी घराण्याचे उस्ताद सम्मू खाँ यांच्याकडे टप्पा या उपशास्त्रीय संगीत प्रकाराच्या शिक्षणासाठी पाठवण्यात आले. त्यानंतर सारंगीवादक आशिक खाँ आणि उस्ताद नज्जू खाँ यांच्याकडूनही त्यांनी गाण्याची तालीम घेतली.

रसूलनबाई यांनी टप्पा गायनाबरोबरच पूरब अंगाची ठुमरी, चैती, दादरा अशा विविध संगीतप्रकारांवर प्रभुत्व मिळविले होते. धर्मजयगड संस्थानच्या दरबारात रसूलनबाईंच्या गाण्याचा पहिलाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर त्यांना रामपूर, रतलाम, दरभंगा, रेवा, पन्ना, इंदूर अशा विविध संस्थानिकांकडून गाण्याच्या कार्यक्रमाची आमंत्रणे येऊ लागली. तसेच अनेक संगीत संमेलनांमध्ये त्यांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले. पुढील ५० वर्षे म्हणजे १९१६ ते १९६६ या काळात त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतशैलीची आणि बनारस घराण्याची प्रभावशाली गायिका म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्यांचा आवाज भरदार मर्दानी असा होता; दिलखेचक अशा अदाकारीने आणि भावनाशीलतेने त्या विविध ताना आणि मुरक्यांनी कठीण अशा हरकती सहज आपल्या गळ्यातून तयारीने सादर करीत असत. त्यांच्या आवाजातील सहजतेमुळे ठुमरीतील बारकावे रसिकांपर्यंत पोहोचत. त्यांनी ठुमरीला एका वेगळ्या उंचीपर्यंत पोहोचवले.

सुरुवातीला भारतीय आकाशवाणीवर ठुमरी सादर करणाऱ्या काही महत्त्वाच्या गायिकांपैकी एक प्रमुख गायिका म्हणून रसूलनबाई यांची ओळख होती. त्यांनी गायलेल्या ‘फूल गेंदवा न मारो, लगत करेजवा में चोट’ ही भैरवी ठुमरी, ‘कंकर मोहे मार गइलन ना’ हा दादरा, ‘नाहि लागे जियरा हमार नइहर में’ ही कजरी, ‘मान राजी रखना वे’ हा टप्पा इत्यादी रचना प्रसिद्ध आहेत.

रसूलनबाई यांना हिंदुस्तानी संगीत गायनातील योगदानाबद्दल १९५७ मध्ये संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९७२ पर्यंत त्यांनी विविध आकाशवाणी केंद्रांवर आणि दूरदर्शनवर गायनाचे अनेक कार्यक्रम सादर केले. त्यांचे शेवटचे सार्वजनिक गायन काश्मीरमध्ये झाले. अनुबोधपट निर्मात्या सबा दिवाण यांच्या ‘द अदर साँग’ या चित्रपटात रसूलनबाईंच्या ‘लगत करेजवा में चोट’ या गीताच्या सुरुवातीच्या रचनेच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन गणिका, त्यांचे उपशास्त्रीय संगीतातील योगदान, सामाजिक स्थिती, गणिकांच्या भूतकाळातील स्थिती व वर्तमानातील त्यांची स्थिती, गणिका परंपरा यावर भाष्य करण्यात आले आहे.

रसूलनबाई यांनी कारकीर्दीच्या उत्तरार्धात सुलेमान नावाच्या बनारसी साडी व्यापाऱ्याशी लग्न केले होते; पण ते अयशस्वी झाले. बनारसचे त्यांचे वडिलांचे घरही विकल्याने त्या चरितार्थासाठी मुंबईला स्थायिक झाल्या. तेथेही त्या फार दिवस राहू शकल्या नाहीत. पुढे रसूलनबाईंची शिष्या गीताबेन साराभाई यांनी त्यांना अहमदाबाद येथे राहण्यासाठी बोलाविले. तेथील वास्तव्यात त्यांना अर्धांगवायू या विकाराने ग्रासले. त्यातूनही त्यांचे हितचिंतक व शिष्य यांच्या मदतीने त्या बऱ्या झाल्या; मात्र गुजरातमध्ये सप्टेंबर १९६९ ला उसळलेल्या दंगलीची झळ त्यांना बसली आणि त्यांचे घर उद्ध्वस्त झाले. यानंतर त्या चरितार्थासाठी दिल्ली व अलाहाबाद येथे वास्तव्यास होत्या. त्यांच्या शिष्यपरिवारामध्ये नैना देवी, माधवी भट्ट आणि गीताबेन साराभाई यांचा उल्लेख केला जातो.

एकोणिसाव्या शतकात ठुमरी ही एक उपशास्त्रीय गायन शैली म्हणून नव्या रूपात उत्तर भारतीय संगीतामध्ये उदयास आली. हा गीत प्रकार तेथे त्याकाळी गणिका सादर करत असत. गणिकांनी प्रचारात आणलेल्या या प्रकाराला एक प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या गायिकांमध्ये रसूलनबाईंचे नाव घेतले जाते. रसूलनबाईंचे वयाच्या ७२ व्या वर्षी अलाहाबाद येथे निधन झाले.

पहा : संगीत, हिंदुस्थानीसुगम शास्त्रीय संगीत

संदर्भ : 

  • Banerji, Projesh, Dance In Thumri, New Delhi, Retrieved 11 June 2013.
  • व्होरा, आशाराणी, नारी कलाकार, नवी दिल्ली, २०२२.

समीक्षण : सुधीर पोटे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.