जळगावकर, आप्पासाहेब : (४ एप्रिल १९२६ — १६ सप्टेंबर २००९). महाराष्ट्रातील प्रसिद्ध हार्मोनियम वादक. त्यांचे पूर्ण नाव सखाराम प्रभाकर जळगावकर असे आहे. त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील जळगाव या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. ते दोन वर्षांचे असताना त्यांना दत्तक देण्यात आले. त्यांचे शालेय शिक्षण जेमतेम झालेले होते. लहानवयात त्यांनी गायन शिकायला सुरुवात केली; परंतु तरुणपणी आवाज फुटल्यानंतर त्यांच्या आवाजात बदल झाल्याने ते गायन सोडून हार्मोनियम वादनाकडे झुकले. त्यांचा नित्यक्रम भजन कीर्तन ऐकण्याच्या होता. त्यातच ते रममाण होत असत. त्यातूनच त्यांना हार्मोनियम वादनाविषयी आवड निर्माण झाली आणि त्यांनी स्वत:च ते शिकायला सुरुवात केली. आप्पांनी त्यातील बारीक-सारीक गोष्टी आत्मसात केल्या. नंतर त्यांनी दिल्ली घराण्याचे उस्ताद शब्बू खाँ यांच्याकडून काही काळ संगीताचे शिक्षण घेतले. याशिवाय इतरही घराण्याचे थोडेफार शिक्षण त्यांना मिळाले. त्यातून त्यांनी स्वत:चे वादन विकसित केले.
आप्पा कलेच्या आवडीमुळे सतत भ्रमंती करत राहिले. सुमारे १९४७ मध्ये ते पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात वाद्यपथकाशी त्यांची ओळख झाली. तेथे या पथकात क्लॅरिनेट वाजवण्याचा त्यांना योग आला; पण तेथेही ते फार काळ रमले नाहीत. त्यांचा सगळा कल पेटीवादनाकडे झुकलेला होता. याच दरम्यान कमल नाझरेकर, माणिक वर्मा या लोकप्रिय गायिकांच्या ते संपर्कात आले आणि त्यांना लाभलेल्या ताललयीच्या तंत्रामुळे ते माणिक वर्मा यांच्या सांगीतिक दौऱ्यात त्यांना साथसंगत करू लागले. अशाप्रकारे आप्पांच्या सांगीतिक प्रवासास सुरुवात झाली.
आप्पांना लोकप्रिय गायक गंगुबाई हनगल, पं. भीमसेन जोशी, किशोरी अमोणकर, पं. जसराज, पं. कुमार गंधर्व व तबलावादक उ. झाकीर हुसेन यांच्या समवेतही हार्मोनियमची साथसंगत करायला मिळाली. प्रसिद्ध नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्या तीनशेहून अधिक कार्यक्रमांसाठी त्यांनी हार्मोनियम वादन केले. ताल आणि लय यांचा संगम त्यांच्या वादनातून ते उत्तमरीतीने घडवून आणत असत. त्यांची नैसर्गिक प्रतिभा त्यांच्या वादनातून झळकत असायची. त्यांनी स्वतंत्र वादक म्हणूनही नाव कमावले होते. आप्पा तालबद्ध पद्धतीने टाळ्या वाजवण्यात देखील वाकबगार होते. संगीताच्या विविध पैलूंचा त्यांनी अभ्यास केलेला असल्याने ठुमरी, गझल यांसारख्या उपशास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांतूनदेखील ते हार्मोनियम वादन करायचे.
आप्पांनी भारतभर स्वतंत्ररीत्या हार्मोनियम वादनाचे कार्यक्रम केले. तसेच अनेक नामवंत गायक मंडळीसोबत परदेश दौरेही केले आणि तेथील विदेशी रसिकांचीही त्यांनी दाद मिळवली. केवळ गाण्यापुरते हार्मोनियम वादन मर्यादित न ठेवता आपल्या वादनात नाविन्यता आणत वादन बहुरंगी करण्याचा प्रयत्न ते करायचे. यानिमित्ताने या क्षेत्रातला मोठा चाहतावर्ग व शिष्यवर्ग त्यांना लाभला. त्यांच्या स्वतंत्र हार्मोनियम वादनाच्या आणि साथसंगत केलेल्या अनेक ध्वनिफीती, चित्रफीती संगीत क्षेत्रातील अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरल्या. त्यांना हिंदुस्थानी वाद्यसंगीतातील संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला (२०००). जो खूप कमी हार्मोनियम वादकांना मिळालेला आहे. त्यांच्या शिष्यवर्गामध्ये संतोष घंटे यांचा उल्लेख केला जातो. कारकीर्दीच्या उत्तरार्धात त्यांना अर्धांगवायूचा त्रास झाला होता. त्यांचे वृद्धापकाळाने पुणे येथे निधन झाले.
संदर्भ :
- Ranade, Ashok, Music Contexts (A Concise Dictionary of Hindustani Music), 2006.
समीक्षण : सुधीर पोटे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.