गोचीड हा अष्टपाद (Myriapoda) या संधिपाद संघातील प्राणी आहे.  गोचीड  ॲरॅक्निडा वर्गातील संधिपाद संघातील बाह्य परजीवी असून त्यांची लांबी सु. ३ – ५ मिमी. असते. वय, लिंग आणि प्रजातीप्रमाणे लांबीमध्ये फरक असतो. गोचीड बहुधा सस्तन प्राणी, पक्षी आणि क्वचित सरपटणाऱ्या प्राण्यांच्या रक्तावर पोसते. रक्त प्यायलेली गोचीड फुगलेली दिसते. गोचीड उष्ण आणि दमट प्रदेशामध्ये जगभर आढळतात.

क्यासनूर वन्यविकार (Kyasanur Forest Disease, KFD) आणि क्रेमियन –काँगो रक्तस्रावी ताप (Crimean Congo hammorrhagic fever, CCHF) या दोन गोचीडामधून पसरणाऱ्या विषाणू संसर्गाने मृत्यूमुखी पडणाऱ्या व्यक्तींची संख्या अधिक आहे.  इतर गोचीडामधून पसरणारे लाइम विकार (Lyme disease), क्यू ताप (Q fever) आणि विविध रिकेट्सिया संसर्ग यांचे प्रमाण कमी नाही. भारतात गोचीड उद्भवी आजार सार्वजनिक आरोग्यावर परिणाम करणारे एक प्रमुख कारण आहे.

हीमाफायसॅलिस स्पिनिजेरा

क्यासनूर वन्यविकार किंवा क्यासनूर फॉरेस्ट डिसीज : या आजाराचे सामान्य नाव मंकी फीवर असेही आहे. हा एक हीमाफायसॅलिस स्पिनिजेरा (Haemaphysalis spinigera) प्रजातीच्या गोचीडापासून होतो. पश्चिम घाट परिसरातील वन्य भागात ही गोचीड प्रामुख्याने आढळते. या आजारामुळे ताप, डोकेदुखी आणि स्नायुदुखी उद्भवते. तीव्र आजारामुळे गोचीडाच्या चाव्यामुळे रक्तस्राव आणि चेताविषयक परिणाम होतात. हा प्राणिसंक्रामी  (Zoonotic) आजार आहे. याचा अर्थ प्राण्यांमधून मानवास हा आजार होतो. ही गोचीड पाळीव जनावरे आणि वन्य डुकरांवर असते. परंतु माकड, लहान उंदरासारखे कुरतडणारे प्राणी यामधून संपर्कात आलेल्या माणसास चावते. प्रामुख्याने अर्धवट वाढ झालेल्या हीमाफायसॅलिस  गोचीडामध्ये विषाणूची संख्या अधिक असते.

हायलोमा गोचीड

क्रेमियन –काँगो रक्तस्रावी ताप : हा आजार हायलोमा (Hyalomma) प्रजातीच्या गोचीडापासून पसरतो. हा आजार प्राणिसंक्रामी (Zoonotic) आहे. प्राण्यामधून तो मानवामध्ये पसरतो. या आजाराची लक्षणे तीव्र ताप, स्नायू दुखी आणि भोवळ येणे अशी आहेत. तीव्र आजारामध्ये रक्तस्राव, अवयव निकामी होणे आणि उपचार वेळेत झाले नाहीत तर मृत्यू ओढवतो. सर्वसामान्यपणे आशिया,  आफ्रिका आणि युरोपमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव आहे. या आजाराचा  भारतातील प्रथम संसर्ग २०११ मध्ये गुजरात राज्यात झाल्याचे आढळले आहे. २०१४ पर्यंत हा आजार शेजारील राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात पोहोचला. जानेवारी २०१६ मध्ये याचे रुग्ण केरळमध्ये आढळले. ओमानमधील कत्तलखान्यातील कामगाराकडून भारतात आलेल्या या आजारामुळे क्रेमियन –काँगो रक्तस्रावी ताप भारतात आल्याचे संशोधनामधून निदर्शनास आले.

इक्सोडीस स्कॅप्युलॅरिस

लाइम विकार : हा आजार प्राणिसंक्रामी (Zoonotic) आहे. बोरेलिया जीवाणूच्या इक्सोडीस स्कॅप्युलॅरिस (Ixodus scapularis) या प्रजातीच्या गोचीडामधून होणाऱ्या संसर्गामुळे होतो. ही गोचीड हरीण जातीच्या स्तनी वर्गाच्या प्राण्यावर असतो. या संसर्गामुळे अंगावर पुरळ ताप आणि थकवा जाणवतो. उपचार न केल्यास सांधेदुखी, हृदय व चेतासंस्था यावर परिणाम होतो. वेळीच निदान आणि प्रतिजैविकांचे त्वरित उपचार केल्यास आजार बरा होतो. युरोप आणि आशियामधील भागात या आजाराचा प्रादुर्भाव आहे.

क्यू ताप : क्यू आजार हा सर्वत्र पसरलेला आजार गोचीडातून संक्रमित होणाऱ्या कॉक्झिएला बर्नेटीआय (Coxiella burnetii) या जीवाणूमुळे (Bacteria) होतो. पाळीव जनावरांच्या वर त्वचेतून रक्त पिणाऱ्या विविध गोचीड या जीवाणूचे वाहक आहेत. हा प्राणिसंक्रामी आजार आहे. गोचीडाबरोबर याचा प्रसार हवेतूनसुद्धा होत असल्याचे आढळले आहे.

रिकेट्सिया संसर्ग : रिकेट्सिया आजार हा रिकेट्सिया प्रजातीतील जीवाणूमुळे (Genera) होतो. या प्रजाती बहुरूपीय असल्याने याचे नेमके स्वरूप ओळखणे अवघड असते. दृश्यकेंद्रकी पेशीमध्ये यांचा अधिवास असतो. संधिपाद सजीव उदा., गोचीड , टिक (Tick, मराठी शब्द विरुथी, कवच असलेले गोचीडीसारखे परंतु अधिक सूक्ष्म अष्टपाद),  उवा यामधून पाळीव जनावरे आणि त्यांच्यामधून मानवामध्ये संसर्ग होतो. जगभरात रिकेट्सियामुळे ताप, त्वचेवरील पुरळ, खंदक ताप (Trench fever), अस्वच्छ गर्दीच्या ठिकाणी नाइलाजाने राहणाऱ्या व्यक्तींना होणारे वीसहून अधिक आजार याला रिकेट्सिया आजार या सामान्य नावाने ओळखले जाते. तुरुंग, वसतिगृहे, बालसुधारगृहे येथे या आजाराचा प्रादुर्भाव अधिक होतो. बहुतेक प्रतिजैविकांच्या उपाययोजनेमुळे हा आजार बरा होतो.

उपाययोजना : विषाणू, जीवाणू (Bacteria) आणि परजीवी आजारांबद्दल अधिक माहिती, जागरूकता आणि आधुनिक चाचणी पद्धत तसेच गोचीड नियंत्रण हा गोचीडजन्य आजार कमी करण्याचा उत्तम उपाय आहे.

संदर्भ :

1. https://bansalhospital.com/tick-borne-diseases-and-how-are-they-transmitted#:~:text=Lyme%20disease%252C%20southern%20tick-associated,91-0

2. https://www.cdc.gov/kyasanur/about/index.html

3. https://www.cdc.gov/lyme/index.html

4. https://www.ecdc.europa.eu/en/q-fever/facts

5. https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/crimean-congo-haemorrhagic-fever

समीक्षक : मराठी विश्वकोश संपादक


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.