आ. १. जळू : (१) हिरुडिनेरिया ग्रॅन्युलोसा व (२) हिरुडो मेडिसिनॅलिस.

वलयी संघातील (Annelida phylum) क्लायटेलाटा (Clitellata) वर्गाच्या हिरुडिनिया (Hirudinea) उपवर्गामध्ये जळूचा समावेश होतो. हिरुडिनिया वर्गात सु. ६०० जळवांचे वर्गीकरण केलेले आहे. जळूचे शास्त्रीय नाव हिरुडिनेरिया ग्रॅन्युलोसा (Hirudinaria granulosa) असे आहे. युरोप व आशियामध्ये स्थानिक जळवा जखमेतील दूषित रक्त काढण्यासाठी वापरण्यात येतात. या उपचारात हिरुडो प्रजातीच्या जळवा वापरतात. त्यामुळे तेथील जळवांना हिरुडो मेडिसिनॅलिस (Hirudo medicinalis) असे नाव दिलेले आहे. हि. मेडिसिनॅलीस  व भारतीय हि. ग्रॅन्युलोसा  यांमध्ये बरेच साम्य आहे.

शरीररचना : पूर्ण वाढ झालेल्या जळूची लांबी सु. २० सेंमी. असून ऊर्ध्व भाग हिरव्या रंगाचा असतो. पाण्याच्या तळाशी असलेल्या रंगाशी त्याचे साधर्म्य असते. अधर बाजू फिकट पांढऱ्या –हिरव्या रंगाची असते. शीर्ष बाजूस अग्रचूषक व सर्वांत मागील बाजूस पश्चचूषक असते. तोंड अग्र चूषकामध्ये तोंड असते. त्याभोवती इंग्रजी उलट्या वाय अक्षराच्या आकाराचे तीन करवतीसारखे जबडे असतात. जबड्याच्या तळाशी लाळ ग्रंथी उघडतात. तोंड ग्रसनीमध्ये उघडते. पश्च चूषकाच्या साहाय्याने जळूचे शरीर भक्ष्याच्या त्वचेवर किंवा आधारास चिकटून राहते.

आ. २. जळू : पचनसंस्था

पचनसंस्था : करवतीसारख्या दाढांच्या साहाय्याने त्वचेमध्ये छेद केल्यानंतर उलट्या वाय आकाराची खूण दिसते. जळूच्या लाळेमध्ये हिरूडीन नावाचे रक्त गोठण प्रतिबंधक द्रव्य असते. त्यामुळे रक्त शोषताना रक्त प्रवाही बनते आणि ते गोठत नाही. एका वेळी जनावराचे किंवा मानवाचे रक्त शोषताना जळू आपल्या आकाराच्या सु. दहा पट रक्त शोषून घेते. एकदा रक्त जळूच्या पचनसंस्थेत साठवले गेले म्हणजे पुन्हा रक्ताची वर्षभर आवश्यकता भासत नाही.

आ. ३. आश्रयदात्याच्या त्वचेतून जळू शुंडाच्या साहाय्याने रक्त शोषून घेते.

जळूचे तोंड ग्रसनीमध्ये उघडते. ग्रसनी पाचव्या खंडापासून आठव्या खंडापर्यंत असून ग्रसनी एका सैल अन्नसंचयीमध्ये (Crop) उघडते. अन्नसंचयीच्या नवव्या खंडापासून अठराव्या खंडापर्यंत प्रत्येक खंडात एक अंधनाल (Caeca) असतात. अंधनालामुळे  जळू एका वेळी भरपूर रक्त साठवून ठेवते. शेवटच्या अठराव्या खंडातील अंधनाल सर्वांत मोठे असून त्याचा विस्तार बाविसाव्या खंडापर्यंत असतो. अन्नसंचयी जठरात उघडते. जठरामध्ये अक्षीय पटले असतात. जठराच्या पुढील भाग आतडे हे आकाराने लहान असून बाविसाव्या खंडपर्यंत विस्तारलेले असते. अन्नसंचयीतील रक्त जठरामध्ये व जठरातून आतड्यात सूक्ष्म थेंबाच्या रूपात येते. अन्नपचन अत्यंत सावकाश होते.

श्वसनसंस्था : जळूमध्ये वेगळी श्वसन संस्था नाही. ओलसर त्वचेमधून श्वसन वायूंची देवाणघेवाण होते. त्वचेवर श्लेष्मग्रंथी असतात. त्यामुळे त्वचा कोरडी होत नाही.

अभिसरण संस्था : अभिसरण संस्था ही रक्तवाहिन्यांनी बनलेली असते. रक्तद्रवात (Plasma) विरघळलेले हीमोग्लोबिन असते. रक्तपेशी रंगहीन असतात. चार लांब रक्तवाहिन्यांमधून शरीरातील सर्व अवयवास रक्त पुरवले जाते. रक्त गोळा करणाऱ्या वाहिन्यांतून ते गोळा होते.

उत्सर्जन संस्था : ही संस्था १७ वृक्ककांची (Nephridia) बनलेली असून प्रत्येक वृक्कक एका सैल पिशवीत असते. सहाव्या खंडापासून बाविसाव्या खंडापर्यंत वृक्ककांची एक जोडी एका खंडात असते. वृक्कके दोन प्रकारची असतात. ११ जोड्या वृषण वृक्कके (१२-२२ खंड) आणि सहा जोड्या वृषणविरहित (६-११ खंड) असतात. वृक्ककामधून निघालेला उत्सर्जित द्रव एका पिशवीत जमा होतो. एका छिद्रातून तो शरीराबाहेर सोडला जातो. या छिद्रास वृक्करंध्र (Nephridiopore) म्हणतात.

चेतासंस्था : ही मध्यवर्ती, परिघीय व स्वायत्त चेतासंस्थेने बनलेली असते. मध्यवर्ती चेतासंस्था गंडिका व चेता यांनी तयार होते. ग्रसनीच्या ऊर्ध्व बाजूस असलेले मुख्य गंडिका ग्रसनीभोवती असलेला हाराप्रमाणे दिसणारा परिग्रसनी संयोजी बंध आणि अधर बाजूस असलेल्या गंडिकेमधून शरीरभर चेता गेलेल्या असतात.

प्रजनन संस्था : जळू उभयलिंगी (Hermaphrodite) असून त्यांचे प्रजनन लैंगिक पध्दतीने होते. ज्यामध्ये ते जलाशयाच्या आसपास (जलाशयात नाही) आणि दमट ठिकाणी जवळजवळ ५० अंडी घालतात. उभयलिंगी असूनही नर व मादी संस्था वेगळ्या वेळी कार्यक्षम होत असल्याने स्वफलन होत नाही. फलनानंतर मादीच्या पुढील भागात मेखला (Clitellum) तयार होते. या मेखलेमध्ये अंडी घातली जातात.

आ. ४. जळूची हालचाल

चलनवलन : जळूंची हालचाल ही त्यांच्या अनुलंब आणि गोलाकार स्नायू आणि पश्चचूषकांच्या मदतीने होते शरीराच्या स्नायू क्रमसंकोच (Peristalsis) हे हालचालीचे प्रमुख कारण आहे. त्यांचा पश्चभाग प्रथमतः अधःस्तराला (Substrate) चिकटतो आणि अग्रभाग पुढे तोपर्यंत प्रक्षेपित होतो जोपर्यंत तो खाली टेकला जात नाही. त्यानंतर पश्चभाग पुन्हा उचलला जातो, अनुलंब स्नायूंच्या मदतीने पुढे ओढला जातो आणि पुन्हा पुढे चिटकला जातो. त्यानंतर अग्रभाग उचलला जातो आणि हे चक्र असेच चालू राहते.

पाणथळ ठिकाणी जेथे पाळीव जनावरे नेहमी धुतली जातात किंवा पाणी पिण्यासाठी जातात, अशा ठिकाणी जळवा असतात. अशा पाण्यात जनावरे स्वच्छ करण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तींना नकळत पायांना किंवा हातास जळू लागण्याच्या घटना घडतात. अशी जळू त्वचेला चिकटलेली दिसली तर आरडाओरडा न करता जळू बाजूला काढता येते. ज्या ठिकाणी जळू चिकटलेली आहे त्या ठिकाणी मीठ किंवा हळद टाकल्यास चिकटलेली जळू सुटते. डासांचे क्रीम व तंबाखू एकत्र करून जळू चिकटलेल्या ठिकाणी लावल्यास जळू निघते. तंबाखू हे जळूचे विकर्षक (Repellent) आहे. जळू निघाल्यावर त्याच्या लाळेतील हिरूडील या रक्त गोठण प्रतिबंधक  विकरामुळे बराच काळ रक्त वहात राहते. त्यावर आवळपट्टी बांधल्यास थोड्या वेळाने रक्त थांबते. उघड्या जखमेतून संसर्ग होण्याची शक्यता असल्याने जंतुनाशक व आवळपट्टी दोन्हीचा वापर करावा. ट्रेकिंग करणाऱ्यांनी आवश्यक प्रथमोपचार सोबत असल्याशिवाय पाणथळ जागा, पावसाळी वने, ओढे, तलाव,  झरे, धबधब्याच्या खाली असलेल्या पाणी साठण्याच्या जागा येथे जाऊ नये.

आ. ५. जळू चिकित्सा

प्राचीन संस्कृत वैद्यकीय पुस्तक सुश्रुतसंहितेत जळूंच्या चिकित्सेचे वर्णन केले आहे. यामध्ये बारा प्रकारच्या जळूंचे (सहा विषारी आणि सहा बिनविषारी) वर्णन केले आहे. वेगवेगळे  त्वचारोग, गृध्रसी (Sciatica), स्नायू-अस्थी वेदना अशा वेगवेगळ्या रोगांवर जळू चिकित्सा वापरली जाते. जळू चिकित्सेने (Hirudotherapy) १९७० मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सूक्ष्मशस्त्रक्रिया (Microsurgery) क्षेत्रात  पुनःपदार्पण  केले.

 

संदर्भ :

  1. Bhatia, M. L. (1941). Hirudinaria (The Indian cattle leech). In ‘The Indian Zoological Memoire’, Vol. VIII. (Ed. K. N. Bahl.) pp. 1–82. (Lucknow Publishing House: Lucknow, India.)
  2. https://en.wikipedia.org/wiki/Hirudo_medicinalis
  3. https://en.wikipedia.org/wiki/Leech
  4. https://testbook.com/biology/leech-diagram

समीक्षक : मोहन मद्वाण्णा


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.