महर्षी पतंजलींच्या योगसूत्रांवर अनेक व्याख्या आणि टीकाग्रंथ लिहिले गेले आहेत, त्यांमध्ये व्यासभाष्याचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. महर्षी पतंजलींनी योगसूत्रांमध्ये वर्णन केलेल्या विषयांचे सखोल विवेचन व्यासभाष्यात केलेले आढळते. त्याचबरोबर अशा काही विषयांचे वर्णन व्यासभाष्यात आढळते, ज्यांचे प्रत्यक्ष वर्णन योगसूत्रांत नाही, परंतु योगसूत्रातील विषयांचे आकृतिबंध समजण्यासाठी ते विषय समजणे आवश्यक आहे. त्यापैकी एक विषय म्हणजे चित्ताचे परिदृष्ट आणि अपरिदृष्ट धर्म. व्यासभाष्यामध्ये परिदृष्ट आणि अपरिदृष्ट असे चित्ताच्या धर्मांचे दोन भेद सांगितले आहेत. प्रत्यक्ष अनुभवाद्वारे ज्ञान होणाऱ्या चित्ताच्या धर्मांना परिदृष्ट धर्म, तर प्रत्यक्ष ज्ञान न होता अनुमानाद्वारे जाणता येणाऱ्या चित्ताच्या धर्मांना अपरिदृष्ट धर्म म्हटले गेले आहे. चित्तात प्रत्येक क्षणी उत्पन्न होणारे विविध विषयांबद्दलचे विचार म्हणजे वृत्ती. आपल्या चित्तात उत्पन्न होणाऱ्या वृत्तींचे प्रत्यक्ष ज्ञान आपल्याला होते, त्यामुळे वृत्ती हा चित्ताचा परिदृष्ट धर्म आहे.

चित्ताचे सात अपरिदृष्ट धर्म :

निरोधधर्मसंस्काराः परिणामोऽथ जीवनम् |

चेष्टा शक्तिश्च चित्तस्य धर्मा दर्शनवर्जिताः ||

(अर्थात् निरोध, धर्म, संस्कार, परिणाम, जीवन, चेष्टा आणि शक्ती हे सात प्रत्यक्ष अनुभवाद्वारे जाणता न येणारे चित्ताचे धर्म आहेत.)

ज्या धर्माचे प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकत नाही असे चित्ताचे सात अपरिदृष्ट धर्म या श्लोकात मांडले आहे. त्याचे विवेचन पुढीलप्रमाणे :

निरोध : चित्तामध्ये ज्यावेळेस कोणतीही वृत्ती नसते, तिला चित्ताची निरुद्ध अवस्था म्हणतात. यालाच असम्प्रज्ञात समाधि असेही म्हणतात. या अवस्थेत चित्ताच्या वृत्ती (विचार) नसतात, परंतु चित्त असते व चित्ताचा त्या निरोध क्षणाशी संबंध असतो. चित्त निरुद्ध अवस्थेमध्ये असताना ‘ते निरुद्ध आहे’ असे ज्ञान होत नाही; कारण ‘चित्त निरुद्ध आहे’ असे ज्ञान होत असेल तर ती व्युत्थान अवस्थाच असते. त्यामुळे चित्ताच्या निरोधाचे ज्ञान निरुद्ध अवस्थेत होत नाही, परंतु ती अवस्था संपून जेव्हा चित्त पुन्हा व्युत्थान अवस्थेमध्ये येते, त्यावेळी ‘माझे चित्त निरुद्ध / निर्विचार झाले होते’ अशा प्रकारचे स्मृतिरूप ज्ञान होते. त्यामुळे निरोध हा चित्ताचा अपरिदृष्ट धर्म आहे.

धर्म : येथे धर्म शब्दाचा अर्थ पुण्य-पापरूप संस्कार असा आहे. व्यक्तीला स्वतःच्या चित्तामध्ये असणाऱ्या पुण्यरूप संस्कारांचे व  पापरूप संस्कारांचे ज्ञान होत नाही. आपण स्वतः केलेल्या शुभ आणि अशुभ कर्मांमुळे उत्पन्न झालेले पुण्य–पापरूप संस्कार स्वतःच्याच चित्तामध्ये असतात, तरी त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकत नाही; परंतु त्यांचे ज्ञान अनुमानाद्वारे होते. आयुष्यात अनुकूल किंवा प्रतिकूल अनुभव आला तर त्या अनुभवाद्वारे / विपाकाद्वारे चित्तातील पुण्य-पाप संस्कार यांचे अनुमान करता येते.

संस्कार : एखाद्या गोष्टीचे ज्ञान झाल्यावर चित्तामध्ये संस्कार उत्पन्न होतो. या संस्कारामुळे भविष्यात त्या वस्तूचे स्मरण होते. उदा., एखाद्या व्यक्तीने रस्त्याने जाताना हत्ती पाहिला. त्या ज्ञानाने त्याच्या चित्तामध्ये संस्कार उत्पन्न होईल आणि नंतर आयुष्यात त्याला हत्तीचे स्मरण होईल. ज्या वेळी वस्तूचे ज्ञान होते, तो कालावधी जरी थोडा असला, तरीही त्या ज्ञानाद्वारे उत्पन्न होणारे संस्कार कायमस्वरूपी चित्तामध्ये राहतात, ते नष्ट होऊ शकत नाहीत. आपण आयुष्यात ज्या ज्या गोष्टी अनुभवल्या त्या सर्वांचे सूक्ष्म संस्कार आपल्या चित्तामध्ये राहतात, परंतु त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. स्मृतीद्वारे त्यांच्या अस्तित्वाचे अनुमान केले जाऊ शकते.

परिणाम :  चित्तामध्ये प्रतिक्षण परिणाम होत असतात. कधी ते स्थिर तर कधी चंचल असते. योगदर्शनानुसार चित्तामध्ये मुख्यत: निरोध, समाधि आणि एकाग्रता हे तीन प्रकारचे परिणाम होतात. परिणाम होण्याआधीची आणि परिणाम झाल्यानंतरची चित्ताची अवस्था आपण जाणू शकतो, परंतु परिणाम होत असताना त्या परिणामाचे ज्ञान होऊ शकत नाही. त्यामुळे परिणाम हा चित्ताचा अपरिदृष्ट धर्म आहे.

जीवन : सांख्य आणि योगदर्शनाप्रमाणे प्राणक्रिया चित्ताच्या अधीन आहे. येथे जीवन हा शब्द प्राणाच्या समानार्थी वापरला आहे. प्राण हे शरीरातील वायूंच्या क्रियांना संचालित करणारे सूक्ष्म तत्त्व आहे. प्राण म्हणजे केवळ श्वसन नव्हे तर श्वसनाव्यतिरिक्त शरीरात वायूच्या अनेक क्रिया होतात, त्या सर्वांना नियंत्रित करण्याचे कार्य प्राणशक्ती करते. श्वासोच्छ्वासाचे प्रत्यक्ष ज्ञान होते, परंतु त्याला नियंत्रित करण्याऱ्या सूक्ष्म शक्तीचे म्हणजेच प्राणाचे / जीवनाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही, तर त्याचे अनुमान करावे लागते.

चेष्टा : चेष्टा अर्थात क्रिया. चित्ताच्या क्रियांचे ज्ञान अनुमानाद्वारे होते. चित्त हे क्रियाशील व गतिशील आहे. विविध वस्तूंच्या संपर्कात आल्यामुळे चित्तामध्ये वृत्ती उत्पन्न होतात, चित्त त्या वस्तूचा आकार घेते व त्यामुळे त्या वस्तूचे ज्ञान प्राप्त होते. परंतु चित्ताच्या क्रियांचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. एखाद्या वस्तूचे ज्ञान झाल्यानंतर चित्ताने त्या वस्तूचा आकार घेतला होता असे अनुमानाद्वारे ज्ञान होते.

शक्ति : चित्ताचे धर्म – अधर्म, ज्ञान – अज्ञान, राग – वैराग्य आणि ऐश्वर्य –  अनैश्वर्य हे आठ प्रमुख भाव आहेत, परंतु या सर्व भावांची अभिव्यक्ती एकाच वेळेला होत नाही. उदा., एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या वस्तूप्रति वैराग्य उत्पन्न झाले, तर त्या क्षणी वैराग्य अभिव्यक्त रूपात आहे. परंतु असे होत नाही की त्या व्यक्तीच्या मनात अन्य वस्तूंविषयी आसक्ती / राग नाही. इतर अनेक वस्तूंविषयी त्याच्या मनात आसक्ती असते, परंतु त्या क्षणी ती प्रकट होत नाही, ती सूक्ष्म शक्तीच्या रूपाने चित्तामध्ये अवस्थित राहते. इतर वेळेला ती प्रकट होते. इतरही जे चित्ताचे भाव प्रकट होत नाहीत, ते शक्तिरूपाने चित्तात राहतात. सत्कार्यवादाच्या सिद्धान्तानुसार सर्व पदार्थ व सर्व भाव हे नित्य आहेत. कधी ते अभिव्यक्त होतात, तर कधी होत नाहीत. जेव्हा त्यांची अभिव्यक्ती होत नाही, त्यावेळीही त्यांचे अस्तित्त्व चित्तात असते, परंतु ते सूक्ष्म शक्तीच्या रूपाने असते. त्यामुळे त्यांचे ज्ञान अनुमानाद्वारे होते.

पहा : व्यासभाष्यचित्तभूमी, असम्प्रज्ञात समाधि, योगसूत्रे

संदर्भ :

  • ब्रह्मलीन मुनि, पातञ्जल योगदर्शन, चौखम्भा संस्कृत संस्थान, वाराणसी, २००३.

समीक्षक : कला आचार्य


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.