‘योगसूत्रे’ हा ग्रंथ योगदर्शनचा पाया आहे. इ. स. पूर्व २ रे शतक हा सर्वसाधारणपणे योगसूत्राचा काळ समजला जातो. योगसूत्रांच्या संख्येविषयी मतभेद आहेत. त्यानुसार ही संख्या १९४ किंवा १९५ मानली जाते. प्रस्तुत सूत्रे चार पादात विभागली आहेत. प्रत्येक पादात एक मुख्य संकल्पना व त्या संकल्पनेचे स्पष्टीकरण करण्यासाठी आलेले आनुषंगिक विषय यातून पादाची रचना पूर्ण होते. पादाला दिलेल्या नावावरून त्या पादातील मुख्य संकल्पना कोणती हे स्पष्ट होते. ही नावे पुढीलप्रमाणे (१) समाधिपाद (२) साधनपाद (३) विभूतिपाद (४) कैवल्यपाद.

(१) समाधिपाद : या पादात ५१ सूत्रे आहेत. ज्यांचे चित्त शांत, स्वस्थ व समाहित (एकाग्र) आहे, अशा साधकांसाठी समाधिपाद सांगितला आहे.

योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध असे प्रथम पादाच्या प्रारंभीच स्पष्ट केले आहे. हा चित्तवृत्तिनिरोध संप्रज्ञात व असंप्रज्ञात समाधीत क्रमश: केला जातो. तो साधण्यासाठी अभ्यास व वैराग्य हे उपाय सांगून या दोन्ही समाधींचा विचार या पादात केलेला असल्याने समाधिपाद हे नाव सार्थ ठरते. समाधिपादामध्ये योगाचे स्वरूप, उद्दिष्टे, चित्त, ध्यान आणि ध्यानामधील चित्ताची अवस्था हे विषय आलेले आहे. पतंजलींनी चित्ताची तुलना स्फटिकाशी केली आहे. समापत्ति, सबीज, निर्बीज तसेच धर्ममेध समाधि अवस्थेपर्यंत जाण्यासाठी चित्ताची एक सम्यक् ठेवण घडवावी लागते. ती घडविण्याची साधने कोणती, येणारे अडथळे व ते अडथळे कसे दूर करावेत इत्यादी गोष्टींचा विचार समाधीच्या दिशेने जाण्यासाठी आवश्यक ठरतो. तो विचार या पादात केला आहे.

चित्तवृत्तिनिरोधासाठी वृत्तिनिरोधाचा अभ्यास, वैराग्य, ईश्वराला शरण जाणे ही प्रमुख साधने या पादात सांगितली आहेत. चित्तातील स्त्यान (चित्ताला कोणतेही कार्य करण्याची इच्छा न होणे म्हणजे स्त्यान), संशयादि विक्षेप, दु:ख दौर्मनस्य विकारादि विक्षेप सहभुव प्रणवाच्या जपाने दूर होतात. मैत्रीची भावना, वैराग्यशील साधूंच्या जीवनाचे चिंतन इत्यादी उपायांमुळे चित्त प्रसन्न अवस्थेत राहते. समापत्तिसारख्या वृत्तिनिरोधाच्या प्रक्रियांचा अभ्यास करत करत निर्बीज समाधिपर्यंत जाता येते असे पहिल्या पादात सांगितले आहे.

(२) साधनपाद : यामध्ये ५५ सूत्रे आहेत. ज्याचे चित्त सहजपणे एकाग्र होऊ शकत नाही म्हणजे व्युत्थित आहे त्यांच्यासाठी हा पाद सांगितला आहे. समाधिसाठी चित्त अंतरंग योगाकडे प्रवृत्त व्हावे यासाठी कराव्या लागणाऱ्या साधनेतील बहिरंगाच्या म्हणजेच यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार या साधनांचा विचार प्रस्तुत पादात केला आहे, म्हणून या पादाचे साधनपाद हे नाव सार्थ आहे.

योगाभ्यासाकडे वळण्यातील मोठा अडथळा म्हणजे भोग्य विषयांसंबंधी वाटणारी आसक्ती होय. ही आसक्ती ज्या राग, द्वेषातून प्रकट होते त्या रागद्वेषांना क्लेश अशी संज्ञा आहे. सुखाचा भ्रम निर्माण करणाऱ्या परंतु वस्तुत: दु:ख देणाऱ्या चित्तवृत्तींचा निचरा योग्य आचार, विचार, अध्ययनाने तसेच ईश्वराला शरण जाण्याने होतो. तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान या साधनांना पतंजलींनी ‘क्रियायोग’ म्हटले आहे. सुख-दु:खाचे संस्कार चित्तात राहतात व साठत जातात. या संस्कार साठ्याला ‘कर्माशय’ म्हणतात. हा कर्माशय पुनर्जन्माला व भावी सुख-दु:खाला कारण ठरतो असे सांगितले आहे.

द्रष्टा, दृश्य, हान, विवेकख्याति इत्यादी अनेक पारिभाषिक संज्ञांचा निर्देश येथे आढळतो. अष्टांगयोगाचा अभ्यास साधकाने केला पाहिजे. यम-नियमांचे काटेकोर पालन यावर पतंजलींचा भर आहे, हे त्यांनी यम-नियमांना ‘महाव्रत’ म्हटल्याने स्पष्ट होते. चित्तवृत्तिनिरोधात इंद्रियांना विचारपूर्वक त्यांच्या विषयांपासून दूर करण्याची भूमिका घ्यावी लागते. प्रत्याहार साधल्याने चित्ताची चंचलता कमी होऊन अंतरंग योगांगाचा अभ्यास करण्याची क्षमता चित्ताकडे येते.

(३) विभूतिपाद : या पादात ५५ सूत्रे आहेत. अष्टांगयोगातील धारणा, ध्यान आणि समाधी ही अंगे अंतरंग साधना सांगतात. ह्या तीनही अंगांच्या एकत्रित अभ्यासाने म्हणजेच संयमाने योग्याला विविध सिद्धी प्राप्त होतात. या तीन अंगांचे व सिद्धींचे वर्णन प्रस्तुत पादात आहे. साधनेत या सिद्धी एकप्रकारचे अडथळे आहेत असेही सांगितले आहे. संयमाच्या अभ्यासाने साधकाची श्रद्धा वाढत जाते. चित्त एकाग्र होण्यास साह्य होते. चित्त व पुरुष यांचा भेद जाणून आत्मसाक्षात्कार होण्याच्या अवस्थेतील योग्याला सर्वज्ञातृत्व प्राप्त होते. तथापि याबाबतही अनासक्त राहून पुढे वाटचाल करण्यास सांगितले आहे.

(४) कैवल्यपाद : या पादात ३४ सूत्रे आहेत. अष्टांगयोगाच्या अनुष्ठानामुळे चित्तातील रजोरूप व तमोरूप अशुद्धींचा नाश होतो. विवेकयुक्त शुद्ध चित्त अंतर्मुख झाल्यामुळे योग्यासाठी विश्व अंतर्धान पावते आणि योगी स्वत:च्या चैतन्यरूपात राहतो. हेच कैवल्य होय.

कैवल्यपादात सिद्धींचे प्रकार व त्यांची उपपत्ती सांगितली आहे. योग्याला अनेक चित्ते व शरीरे निर्माण करण्याची आवश्यकता का उत्पन्न होते, ध्यानज चित्त अनाशय का, त्याचप्रमाणे कर्म, वासना व त्यांचा विपाक यांचा विचार या पादात केला आहे. चित्तवृत्तींचा ज्ञाता व चित्ताचा स्वामी हा अपरिणामी पुरुषच असतो. बुद्धि वृत्तिरूपाने परिणाम पावते त्यावेळी पुरुष अज्ञानाने तिच्या आकाराला प्राप्त झाल्यासारखा होतो. पण अविद्या नाशानंतर चित्तात आत्म्याचा विशेषपणे साक्षात्कार होतो.  आत्मभावाची निवृत्ती होते. विवेकख्यातिरूप धर्ममेध समाधी सिद्ध होते. सर्व कर्मांची निवृत्ती होऊन परिणामक्रमांची निवृत्ती होते. जीवाला भोग व अपवर्ग प्राप्त करून दिल्याने गुणांचेही काही प्रयोजन उरत नाही व ते आपल्या उपादान कारणात म्हणजे प्रकृतीत विलीन होतात. हेच कैवल्य होय असे या पादात प्रतिपादन केले आहे.

योगसूत्रांची भाषिक वैशिष्ट्ये : बहुतेक सूत्रांत क्रियापद नाही. सूत्रातील पदे समासाने जोडली आहेत. संधीचा वापर करून सूत्रातील वर्णसंख्या कमी केलेली आहे. पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वनामांचा वापर केला आहे. प्रत्येक सूत्राचा मागील व पुढील सूत्राशी संबंध असतो. त्याचा संदर्भ घेतल्याशिवाय सूत्रार्थ उमजत नाही. पदांची अनुवृत्ति आहे. योगसूत्रे आज्ञार्थी नाहीत. ‘असे करा, असे करू नका’, असा आदेश ती देत नाहीत.

पहा : ईश्वरप्रणिधान, चित्त, धारणा, ध्यान, समाधि.

संदर्भ : 

  • कोल्हटकर, केशव कृष्णाजी, भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातञ्जल योगदर्शन, आदित्य प्रतिष्ठान, पुणे, २०१४.
  • Ballantyne, J. R and Deva GovindSastry, Yogasūtras of Patañjali, Parimal Publications, Delhi, 2014.

समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर