तत्त्वज्ञानातील एक संकल्पना. जमिनीवर एखाद्या ठिकाणी आपल्याला एखादी वस्तू (समजा, ‘घडा’) दिसत नाही त्यावेळी आपण म्हणतो की, “जमिनीवर घडा नाही”. या वाक्याचा अर्थ नेमका कसा करायचा? यावर भारतीय दर्शनांमधे मतभिन्नता आढळते. न्याय-वैशेषिक तसेच कुमारिल भट्टांचा पूर्वमीमांसा संप्रदाय यांनुसार ‘जमिनीवर घडा नाही’ याचा अर्थ जमिनीवर घड्याचा अभाव आहे. जगात जसे भावरूप पदार्थ आहेत, त्याप्रमाणे अभाव नावाचा स्वतंत्र पदार्थ आहे. आता या अभावाचे ज्ञान आपल्याला कसे होते? या प्रश्नांवर या दोघांमध्ये मतभेद आहे. न्याय-वैशेषिकांच्या मते जसा घडा आपल्याला डोळ्याने प्रत्यक्ष दिसू शकतो, त्याप्रमाणे घड्याचा अभावही प्रत्यक्ष दिसतो. हे भाट्ट मीमांसकांना मान्य नाही. त्यांच्या मते भावरूप पदार्थ आपल्याला प्रत्यक्ष, अनुमान इत्यादी भावरूप प्रमाणांनी कळू शकतो. पण अभावाचे ज्ञान होण्यास प्रमाण ही अभावारूपच हवे. ‘घडा न दिसणे’ म्हणजे ‘घड्याची अनुपलब्धी’ (मूळ शब्द अनुपलब्धि) हेच घड्याचा अभाव जाणून देणारे स्वतंत्र प्रमाण आहे. यालाच भाट्ट मीमांसक अभाव प्रमाणही म्हणतात. अनुपलब्धी या प्रमाणाच्या बाबतीत दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत. (१) अनुपलब्धी ही योग्यानुपलब्धी किंवा दृश्यानुपलब्धी असेल तरच त्यापासून अभावाचे ज्ञान होऊ शकते. म्हणजे ज्या वस्तूचा अभाव कळतो, ती योग्य किंवा दृश्य असली पाहिजे. ती असती तर दिसली असती असे तिच्या बाबतीत म्हणता आले पाहिजे, काही वेळा अशी परिस्थिती असू शकते की, वस्तू आहे पण ती दिसत नाही. म्हणजेच ती दृश्य किंवा योग्य नाही. अशा अयोग्य वस्तूचा अभाव अनुपलब्धीने कळणार नाही. सांख्यकारिकेत (क्र. ७) ‘वस्तू असून उपलब्धी होत नाही’ अशा परिस्थितींची यादीच दिली आहे. वस्तू जर खूप दूर अंतरावर असेल, अती जवळ असेल, आपले इंद्रिय बरोबर काम देत नसेल, आपले मन ठिकाणावर नसेल, वस्तू सूक्ष्म असेल, वस्तू आणि आपले ज्ञानेंद्रिय यांच्यात अडथळा असेल, आपल्या इंद्रियांवर दुसऱ्या कारणाचा प्रभाव पडल्यामुळे (उदा., प्रकाशाने डोळे दिपून गेल्यामुळे समोर वस्तू असूनही दिसत नसेल) अनेक वस्तू अगदी एकसारख्या असल्यामुळे नेमकी वस्तू ओळखता येत नसेल, तर वस्तू असूनही तिची उपलब्धी होणार नाही. येथे ‘वस्तू असेल, तर दिसेलच’ ही अट पूर्ण होत नाही म्हणजेच ती योग्यानुपलब्धी नसते. (२) अनुमानात जसे हेतूचे ज्ञान होते व त्यावरून साध्याचे ज्ञान होते, त्या पद्धतीने अनुपलब्धीवरून अभावाचे ज्ञान होत नाही; कारण तसे मानले, तर अनुपलब्धीचे ज्ञान कसे होते? असा प्रश्न निर्माण होईल; कारण अनुपलब्धी म्हणजे उपलब्धीचा अभाव. या अभावाच्या ज्ञानासाठी आणखी एक अनुपलब्धी मानवी लागेल. त्या अनुपलब्धीच्या ज्ञानासाठी आणखी एक अनुपलब्धी अशी अनुपलब्धींची न संपणारी मालिका तयार होईल. हा अनवस्थादोष टाळण्यासाठी भाट्ट मीमांसक असे मानतात की, अनुपलब्धी ही अस्तित्वमात्रेकरून अभावाच्या ज्ञानाला कारण होते. तिचे ज्ञान होऊन त्याच्या द्वारा नव्हे. भाट्ट मीमांसकांप्रमाणे वेदांतीही अनुपलब्धी हे प्रमाण मानतात. अनेक दर्शनांना अनुपलब्धी हे स्वतंत्र प्रमाण मान्य नाही. न्याय-वैशेषिकांचा उल्लेख झालाच आहे. त्यांना अभाव हा पदार्थ मान्य आहे. अभावाचे ज्ञान मात्र प्रत्यक्षानेच होते असे ते मानतात. काही दर्शनांना अभाव हा स्वतंत्र पदार्थच मान्य नाही. प्रभाकरांचा पूर्वमीमांसा संप्रदाय, सांख्यदर्शन तसेच धर्मकीर्तींचे बौद्धमत यांनुसार ‘जमिनीवर घडा नाही’ असे आपण म्हणतो, तेव्हा ‘नुसतीच जमीन आहे’ एवढाच त्याचा अर्थ असतो. ‘घड्याचा अभाव’ अशी काही नकारात्मक वस्तुस्थिती अस्तित्वात नसते. धर्मकीर्तींच्या मते ‘घड्याचा अभाव’ नावाची गोष्ट नसली, तरी अभावाचा भाषिक व्यवहार, कृतिव्यवहार होतो ही वस्तुस्थिती आहे. या अभावव्यवहाराचे ज्ञान अनुमानाने होते व त्यासाठी ‘अनुपलब्धी’चा हेतू म्हणून वापर होतो. अशा प्रकारे धर्मकीर्तींनी अनुमान प्रमाणाची चर्चा करताना अनुपलब्धी हा हेतूचा एक प्रकार मानला आहे. साहजिक त्यांना अनुपलब्धी हे स्वतंत्र प्रमाण म्हणून मान्य नाही. त्याचा समावेश ते अनुमानात करतात. जैन तार्किकांनीही अनुमान प्रमाणाची चर्चा करताना उपलब्धी आणि अनुपलब्धी असे हेतूचे दोन प्रकार मानले आहेत.
संदर्भ :
- Bhattacharya, Hari Satya (Tr.), ‘Pramana-Naya-Tattvalokalankara of Vadideva-suri’, Jaina Sahitya Vikas Mandal, Bombay, 1967.
- Datta, D. M. ‘The Six Ways of Knowing’, University of Calcutta, 1960.
- शास्त्री, श्रीनिवास (संपा.), ‘आचार्य धर्मोत्तरविरचिता न्यायबिन्दुटीका न्यायबिन्दुना सहिता’, साहित्य भण्डार, मेरठ, २००७.
समीक्षक : नागोराव कुंभार
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.