यूरोप खंडातील स्पेनमधील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. अलीकडे विसाव्या शतकात स्पेनमधील बर्गोस प्रांतामध्ये सिएरा दे अतापुएर्का पर्वतरांगांमध्ये मीटर रूळांतर (मीटर गेज) रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना कार्स्ट (karst) भूस्वरूपात मोठ्या प्रमाणात खोल खड्डे केले गेले. ज्यामुळे अनेक ठिकाणी खडक आणि कित्येक मीटर जाडीचे गाळाचे थर उघड झाले. या विविध ठिकाणांची नावे प्रामुख्याने तेथील स्थानिक नैसर्गिक भूभाग (सीमा / क्वेव) उदा., गुहा आणि विस्तृत विवर (डोलिना) यांवर आधारित आहेत. या प्रदेशात १९६४ पासून सुरू झालेल्या उत्खननातून अश्मयुगीन दगडी हत्यारे, मानवी जीवाश्म, विविध प्राण्यांचे जीवाश्म ते कांस्ययुगीन संस्कृतीचे पुरावे मिळाले आहेत.

अतापुएर्का येथे एकूण ११ पैकी पुढील ९ ठिकाणी उत्खनन झाले. या स्थळांना दिलेल्या स्पॅनिश नावांचे अर्थ पुढीलप्रमाणे : क्वेव – गुहा, सीमा – खोल विवर, ग्रान – विशाल, डोलिना – विलयछिद्र, गलेरीया – गॅलरीसारखे दालन/सज्जा, ट्रिंचेरा: रेल्वेसाठी खणलेले बोगदे

सिएरा दे अतापुएर्का (स्पेन) येथील प्राचीन मानववस्ती दर्शवणारी पुरातत्त्वीय स्थळे. चित्रसंदर्भ : Fragments of a million-year-old face found in Spain shed new light on ancient human migrations)

पोर्टलन दे क्वेव मेयोर : १९१० पासून येथील उत्खननातून नवाश्मयुगापासूनची मृद्भांडी मिळाली आहेत.

ट्रिंचेरा गलेरीया : TG (टीजी). १९७८ पासून. येथील उत्खननातून विविध प्राण्यांचे आणि फुलांच्या जीवाश्मांसोबत हायडल्बर्ग मानव (होमो हायडलबर्गेन्सिस) या मानवाचे जीवाश्माचे अवशेष  मिळाले आहेत.

ट्रिंचेरा डोलिना/ ग्रान डोलिना : TD (टीडी). १९८१ पासून. या विशाल गुहेमधील १९ मी. अवसादाची (सेडिमेंट) विभागणी ११ स्तरांत – TD १ ते TD ११ केली आहे. यातील TD १ हा स्तर सर्वांत खालचा असून TD ११ हा स्तर सर्वांत वरचा आहे.

सीमा दे लॉस युसोस : SH (एसएच). हाडांची खाण (पिट ऑफ बोन्स). १९८३ पासून. येथील उत्खननातून ७००० पेक्षा जास्त मानवी जीवाश्मांचे अवशेष मिळाले आहेत. प्राथमिक अभ्यासावरून हे अवशेष मध्य प्लाइस्टोसीन काळातील मानवांचे असावेत.

सीमा डेल एलिफान्टे : TE (टीई). १९९६ पासून. येथील उत्खननातून मिळालेले मानवी जीवाश्म पश्चिम यूरोपमधील सर्वांत जुने म्हणजे आद्य प्लाइस्टोसीनकालीन आहेत. यामुळे मानवी उत्क्रांतीच्या अभ्यासासाठी हे जीवाश्म एक महत्त्वपूर्ण योगदान ठरले आहेत. याशिवाय येथे अनेक प्राण्यांचे, पक्ष्यांचे जीवाश्म आणि दगडी हत्यारे सुद्धा मिळाली आहेत.

क्वेव डेल मिराडो : १९९९ पासून. येथील उत्खनानून नवाश्मयुगीन आणि कांस्ययुगातील शेती करणाऱ्या मानवाशी संबंधित पुरावे मिळाले आहेत.

क्वेव फॅन्टास्मा : २०१७ पासून. ग्रान डोलिनाच्या सु. २०० मी. पूर्वेकडे स्थित ही गुहा चुनखडकाच्या खाणकामामुळे तयार झालेल्या मलब्याखाली झाकली गेल्यामुळे याबद्दल फारशी माहिती नव्हती. परंतु २००३ ते २००५ दरम्यान प्रारंभिक भूभौतिकीय अभ्यासातून गाळांच्या थराचा प्राथमिक अंदाज आला आणि २०१५ मध्ये नवीन भूभौतिकीय सर्वेक्षणांमधून ११ मी.पेक्षा खोल गाळ सापडला, ज्यात पुरातत्त्वीय आणि जीवाश्मांचे अवशेष होते. २०१६ मध्ये खाणीत जमा झालेला मलबा हटवण्याचे काम सुरू झाले, आणि त्यातून एक मोठी गुहा उघडली गेली, जिच्या गाळात प्राण्यांचे जीवाश्म, दगडी साधने आणि निअँडरथल मानवाचा एक अवशेष सापडला. २०१७ मध्ये संपूर्ण मलबा हटवण्यात आला आणि अतापुएर्कामधील सर्वांत मोठे उत्खनन क्षेत्र (सु. ४०० चौ. मी.) उपलब्ध असलेली जागा तयार झाली.

गलेरीया दे लास इस्टेशुअस : २०१७ पासून. ही गुहा कार्स्ट प्रणालीतील पहिली जागा आहे, जेथे उत्तर प्लाइस्टोसीन काळातील पुरातत्त्वीय अवशेष आणि जीवाश्म सापडले आहेत. या काळातील पर्यावरणीय बदल स्पष्ट करणारे पुरावे मिळाले आहेत. तसेच मूस्टेरियन संस्कृतीची दगडी हत्यारे देखील सापडली असून निअँडरथल मानवाचे डीएनएचे (DNA) पुरावे मिळाले आहेत.

ऑर्किड व्हॅली (२०००-२००१) आणि हंदिदेरो (२००४-२००५) : या दोन्ही स्थळांवरील उत्खननातून उत्तर पुराश्मयुगीन हत्यारे प्राप्त झाली आहेत.

सिएरा दे अतापुएर्का येथील २८४ हेक्टरवर पसरलेल्या प्रदेशातील अनेक स्थळांवर १० लाख वर्षांपासूनचे मानवी अस्तित्वाचे आणि  पुरापर्यावरण संबंधीचे असाधारण योगदान देणारे अगणित पुरावे मिळाले आहेत. या स्थळाला यूनेस्कोने (संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना) जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले (२०००).

संदर्भ :

https://www.iphes.cat/atapuerca

समीक्षक : जयेंद्र जोगळेकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.