तमिळनाडूतील एक प्रसिद्ध अधोजल पुरातत्त्वीय स्थळ आणि प्राचीन बंदर. याच स्थळाला कावेरीपट्टणम अथवा कावेरीपूमपट्टणम म्हणूनही ओळखले जाते. शिलप्पधिकारम (सिलप्पईकरम; Silappaikaram) आणि मणिमेखलै (मणिमेखलई; Manimekhelai) या दोन प्रसिद्ध तमिळ महाकाव्यात पुम्पुहार हे चोल राजसत्तेचे राजधानीचे शहर असल्याचे उल्लेख आहेत. राजधानीचा विस्तार चार कवथम (सु. ५० चौ.किमी.) होता व तेथे साठ हजार कुटुंबे राहत होती.

मणिमेखलै महाकाव्यात हे शहर समुद्रात बुडण्याविषयी एक कथा आहे : एकदा चोल राजा इंद्रदेवाचा उत्सव करण्यास विसरला म्हणून रागावलेल्या देवीने समुद्राला हे शहर गिळंकृत करायला सांगितले. याशिवाय मौखिक परंपरांमध्ये पुम्पुहार समुद्रात बुडल्याच्या घटनेची स्मृती जतन झालेली आहे.

पुम्पुहारच्या उत्तरेला पलायार नदी, तर दक्षिणेला कावेरी नदी आहे. पुम्पुहारचे पुरातत्त्वीय स्थळ कावेरी नदी आणि बंगालच्या उपसागर यांच्या संगमावर आहे. पुम्पुहारचा विस्तार उत्तरेला सध्याच्या पुडुप्पुरम ते दक्षिणेला असलेल्या तरंगमबाडी (ट्रान्केबार) या गावापर्यंत असल्याचे दिसते. १९६२-६३ मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने केलेल्या उत्खननात कावेरीपट्टणमच्या किलियायूर भागात चोलांची तांब्याची नाणी सापडली होती. तसेच येथे कावेरी नदीच्या गाळात विटांची इंग्रजी ‘टीʼ अक्षरासारखी रचना मिळाली होती. हा माल उतरवून घेण्याचा धक्का होता, हे लक्षात आले. या धक्क्याचे रेडिओकार्बन कालमापन इ.स.पू. ३१६ असे आले.

पुम्पुहार (तमिळनाडू) येथील पाण्यातील भिंत.

गोव्यातील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान (NIO) यांनी १९८९ मध्ये ट्रान्केबार-पुम्पुहार भागात अधोजल पुरातत्त्वीय संशोधनाला प्रारंभ केला. १९९६-९७ मध्ये झालेल्या विस्तृत संशोधनात पाच ते आठ मी. खोलीवर विटांची अनेक बांधकामे, प्रारंभिक इतिहासकाळातील मातीची भांडी (इ.स. पहिले शतक) व काही विहिरींचे अवशेष मिळाले. कावेरीच्या मुखापासून आत ६०० मी. अंतरावर जास्त खोल पाण्यात (६ ते १० मी.) घडीव दगडी शिळा मिळाल्या. पाण्यात एका टिकाणी २३ मी. खोलीवर एक मोठे (४० मी. लांब व २० मी. रुंद) अंडगोलाकार बांधकाम आढळले. या बांधकामाच्या भिंतींची उंची ३ मी. एवढी होती. पाण्याखालील भूवैज्ञानिक संशोधनात २० मी. खोलीवर कावेरी नदीचे जुने पात्र (Palaeochannel) मिळाले. या पात्राची रुंदी ३०० ते ५०० मी. होती. प्राचीन पुम्पुहारच्या परिसरात वनगिरी गावात अकराव्या शतकातील चोल शैलीचे यल्लम्मन मंदिर आहे. या मंदिराच्या दक्षिणेला चिन्नवनगिरी भागात एक गोल विहीर सापडली. ही विहीर व वनगिरी येथील विहिरींचा कालखंड इ. स. पू. दुसरे शतक असा आहे. पुम्पुहार येथे पाण्यात मिळालेल्या एकूण अवशेषांवरून पुम्पुहार येथे प्राचीन शहराचा मोठा भाग समुद्रात बुडला होता, हे सिद्ध झाले. या शहराचा काळ इ.स.पू. ३०० ते इ.स. चौथे शतक असा ठरवता आला आहे. समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने प्राचीन शहर बुडले व त्याचे अवशेष सध्याच्या किनाऱ्यापासून बंगालच्या उपसागरात अस्तित्वात आहेत.

पुम्पुहार (तमिळनाडू) येथील बुडलेल्या जहाजाचे अवशेष.

पुम्पुहारच्या १९६२-६३ मधील सर्वेक्षणात तेथे कोणत्यातरी बुडलेल्या जहाजाचे अवशेष असावेत, असे लक्षात आले होते. १९९६-९७ मध्ये ही जागा निश्चित करण्यात आली. समुद्रात ३.५ किमी. अंतरावर १९ मी. खोल पाण्यात उत्खनन करण्यात आले. लाकडी जहाजाचा जवळजवळ तीन चतुर्थांश भाग गाळात रूतलेला होता. उत्खननात तेथे २.१ मी. लांबीची लोखंडी तोफ, बंदुकीची दारू साठवण्याच्या पेट्या, तांब्याचे खिळे मारलेल्या लाकडाच्या फळ्या आणि शिसाचे आठ गोळे (Ingots) मिळाले. हे गोळे आणि अगोदर मिळालेल्या गोळ्यांचे एकूण पाच प्रकार होते. एका प्रकारच्या गोळ्यांवर एका बाजूला ‘डब्ल्यू ब्लॅकेटʼ (W: BLACKETT) व दुसऱ्या बाजूला १७९१ किंवा १७९२ हे वर्ष कोरलेले होते. काही गोळ्यांवर डच ईस्ट इंडिया कंपनीचे (VOC) चिन्ह होते. डब्ल्यू ब्लॅकेट कंपनीच्या अभिलेखीय माहितीवरून दिसले की, ही इंग्लिश कंपनी १६९६ पासून शिसाचा व्यापार करत होती. ही कंपनी ब्रिटनमधील नॉर्थ पेनी खाणींमधून उच्च प्रतीचे शिसे मिळवत असे. जहाजाचा आकार व बांधणी पाहता हे जहाज इंग्लिश किंवा डच नसून ते एखाद्या स्थानिक व्यापाऱ्याचे असावे आणि ते १७९१-९२ नंतर लगेचच केव्हातरी बुडले असावे.

संदर्भ :

  • Gaur, A. S. ‘Ceramic Industries of Poompuharʼ, An Integrated Approach to Marine Archaeology, Proceedings of the Fourth Indian Conference on Marine Archaeology of Indian Ocean Countries, (Ed., Rao, S. R.), pp. 127-132, NIO, Goa, 1997.
  • Gaur, A. S. & Sundaresh, ‘Underwater Exploration off Poompuhar and possible causes of its Submergenceʼ, Puratattva, 28: 84-90, 1997-98.
  • Soundar Rajan, K. V. Kaveripattinam Excavations 1963-73, A Port City on Tamilnadu Coast, ASI, New Delhi, 1994.

                                                                                                                                                                                           समीक्षक : शंतनु वैद्य