क्षीरसागर, विठ्ठल : (१ सप्टेंबर १९४३ – १७ जानेवारी २०२४ ) : महाराष्ट्रातील प्रसिद्ध तबला, ढोलकी, ढोलक आणि पखवाज वादक. पूर्ण नाव विठ्ठल बन्सी क्षीरसागर. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सोलापूर येथे झाला. त्यांचे शिक्षण चौथी पर्यंत झाले. संगीताचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला. त्यांचे वडील प्रसिद्ध सनई वादक होते; तर चुलते ढोल वाजवायचे. येथूनच पुढे त्यांच्या मनात वादनाची आवड निर्माण झाली. त्यांनी तबला शिक्षण नबाब शेख दाऊद खाॅ (हैदराबाद), पं. भीमराव कनकधर ( सोलापूर), उस्ताद धूलजी खाॅ (इंदूर) यांच्याकडून घेतले. १९७० पासून ते तबला वाजवायला शिकले. याच दरम्यान तबला वादनातील शास्त्रीयता आत्मसात करीत ते उत्कृष्ट वादक बनले. पुढे ते तबला सोलोवादक म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. आपल्या कलेवर प्रेम करीत व त्याच्याशी एकनिष्ठ राहत त्यांनी जवळपास ४० वर्ष अनेक नामवंत कलावंतांना साथसंगत केली. तबल्यावरील प्रभुत्वामुळे ते तबल्याच्या विविध रचना अगदी सहजपणे आणि उत्कृष्टपणे वाजवायचे. त्यामुळेच त्यांचे वाजवणे कधीच एकसुरी झाले नाही. ते केरवा, त्रिताल अगदी सहजपणे आणि उत्कृष्टपणे वाजवायचे. त्यामुळेच त्यांना महाराष्ट्रातील अव्वल तबला व ढोलकीवादक म्हणून मानले जायचे. ते आकाशवाणी पुणे केंद्रात तबलावादक म्हणून १९८४ ते २००३ या कालावधीत कार्यरत राहिले. कलावंत म्हणून ते तबला, ढोलकी, ढोलक आणि पखवाज वादनात प्रचंड भारावलेले असत. त्यांच्या वर्तनात अतिशय नम्रता होती, त्यामुळेच ते प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे कलावंत म्हणून नावारूपास आलेले होते.
कन्नड चित्रपट संगीताबरोबर लता मंगेशकर, महेंद्र कपूर, जयवंत कुलकर्णी, मन्ना डे, सुधीर फडके, उषा मंगेशकर, सुलोचना चव्हाण, पुष्पा पागधरे, उत्तरा केळकर आणि कन्नड भाषिक गायिका एस. जानकी, पी. सुशीला या नामवंत गायक मंडळीना त्यांनी साथसंगत दिली. त्यांनी शास्त्रीय संगीत नृत्यांगना मुमताज, ख्यातनाम गायिका शोभा गुरटू यांच्या गायन मैफलीला वाद्याची संगत दिली. नामवंत सतारवादक अब्दुल हलीम जाफर खाँ, बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद आमिर खाँ, पं. जसराज, पं.भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या सादरीकरणात वाद्यांची साथ देण्याची संधी त्यांना लाभली. मयुरा, दूरद बेट्टा अशा सुपरहिट कन्नड चित्रपटासाठी त्यांनी तबला वाजवला. कथा अकलेच्या कांद्याची आणि लवंगी मिरची कोल्हापूरची या वगनाट्याकरीता त्यांच्या ढोलकीच्या साथीसाठी टाळ्यांचा कडकडाट होत असे. पंढरपूर येथे स्वरसाधना संगीत संस्थेच्या वतीने वाळवंटात संगीत महोत्सव आयोजित केला होता. दहा हजाराच्या आसपास रसिक ऐकायला होते. त्यादिवशी विठ्ठलराव , पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या बरोबर तबला साथीला होते. मध्यंतरात प्रेक्षकांमधून ढोलकीवादन करा अशी फरमाईश आली. कार्यक्रम तर गाण्याचा असल्यामुळे पंडित अभिषेकी यांची परवानगी काढून पंढरपूरच्या स्थानिक कलाकाराकडून ढोलकी मागवून घेतली आणि फक्त दहा मिनिटे त्यांनी अफलातून वाजवलेले ढोलकी वादन प्रचंड गाजले. त्यांनी स्वतंत्र तबलावादन करताना हातावर पणती ठेवून तबल्यातील रेला वाजवण्याची अवघड कला आत्मसात केली होती.
विठ्ठल क्षीरसागर यांनी जवळपास २०० चित्रपटात तबला आणि ढोलकीवादन केले. संगीतकार राम कदम, बाळ पळसुले,सुधीर फडके विश्वनाथ मोरे, सी रामचंद्र या संगीतकाराबरोबर त्यांनी अनेक चित्रपट वादनातील कौशल्याने गाजवले. अनेक कानडी आणि हिंदी चित्रपट संगीताच्या ध्वनीफितीत त्यांनी तबला, ढोलकी वाजविली आहे. मराठीतील प्रसिद्ध चित्रपट केला इशारा जाता जाता, पिंजरा, एक गाव बारा भानगडी, सुशीला, फटाकडी, घरकुल, सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, लक्ष्मी, पाहुणी , चंदनाची चोळी अंग अंग जाळी यात त्यांनी वाजवलेली कडक ढोलकी रसिकांच्या स्मरणात आहे. शिवाय घरकुल चित्रपटातील मलमली तारुण्य माझे… या गीताच्या वेळी तबला वादन करताना ते पडद्यावर दिसतात. यावेळेस त्यांनी गाण्यातील लग्गी अप्रतिम वाजवली. संगीतकार राम कदम, बाळ पळसुले या संगीताकारासोबत त्यांचा स्नेह शेवटपर्यंत राहिला. ख्यातनाम ढोलकीवादक लाला गंगावणे (पठारे), पांडुरंग घोटकर यांच्यासह अनेक नामवंत कलावंत मंडळीसोबत त्यांनी ढोलकीवादन केले. त्यांची तालयात्रा ही ध्वनिफित घरगुती व सार्वजनिक कार्यक्रमात खूप गाजली. या तालयात्रा ध्वनिफितीचे ध्वनीमुद्रण हे एका घरात केलेले आहे. त्याकाळी प्रगत ध्वनीमुद्रण यंत्रणा आणि संगणकीय (डिजिटल) माध्यमे नव्हती. त्यामुळे तबला, ढोलकी, ढोलक, पखवाज ही वाद्ये समोरासमोर ठेवून एकाचवेळी वाजवली आहेत. त्यांच्या या वादन कौशल्यामुळे त्यांची तालयात्रा ध्वनिफित संपूर्ण भारतात सण, उत्सव, लग्न, सांस्कृतिक व घरगुती कार्यक्रमातून वाजत राहिली. संगीतकार राम कदम यांनी सख्या साजणा चित्रपटातील ढोलकीवादनासाठी त्यांना सोलापूरहून खास मुंबईत बोलावले होते. पुढे हा चित्रपट खूप गाजला. गायिका लता मंगेशकर यांनी त्यांच्या वादनाचे त्यावेळी टाळ्या वाजवून कौतुक केले होते.
विठ्ठल क्षीरसागर यांच्याकडे वाजवण्याचा एक स्वतंत्र बाज होता. ऐन तारुण्यात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचत, शास्त्रोक्त संगीत क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. २०१८ साली त्यांना संगीतकार राम कदम जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांची वादनाची शैली रसिकांना मंत्रमुग्ध करणारी होती. ते प्रसिद्धीपासून कायम दूर राहिले. पुणे येथे त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
संदर्भ : https://dainiktarunbharat.com/another-star-in-the-music-industry-vitthal-kshirsagar-passed-away/#google_vignette (चित्र संदर्भ – १८ जानेवारी २०२४)
समीक्षक : अशोक इंगळे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
