बाळूभाई रूकडीकर : (२८ डिसेंबर १८८८ – २२ ऑक्टोबर १९६२). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तबलावादक. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे खरे नाव उस्ताद गुलाम हुसेन. लहानपणी वडिलांबरोबर ते पंतअमात्य बावडेकर यांच्याकडे जात असत. ते त्यांना बाळ म्हणत. त्यावरूनच पुढे बाळूभाई हे त्यांचे नाव प्रचलित झाले. शिवाय बळवंतराव या नावानेही ते ओळखले जात. त्यांचे वडील उस्ताद दादाभाई हे त्यावेळचे प्रसिद्ध तबलावादक होते, तर त्यांच्या आई अमिनाबाई ह्या सुप्रसिद्ध गायिका होत्या. त्यामुळे जन्मापासूनच त्यांना कलेचा वारसा लाभला. वयाच्या सातव्या वर्षापासूनच त्यांनी वडिलांकडून तबलावादनाचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पुढे उस्ताद हैदरबक्षखाँ, उस्ताद रहीमबक्षखाँ, उस्ताद अब्दुल हक व अब्दुल मजीद यांच्याकडूनही त्यांनी तबलावादनाचे धडे घेतले.

बाळूभाई तबलावादनाबरोबरच मृदंगवादनातही निष्णात होते. उस्ताद फैय्याजखाँ, डांगर बंधू इत्यादी प्रसिद्ध गायकांची धृपदधमाराची साथसंगत त्यांनी पखावजावर केली. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी साथसंगतीची सुरुवात उस्ताद इमदादखाँ यांच्या सतारीच्या साथीने केली. पुढे बरकतउल्लाखाँ (सतारवादक), सादतखाँ (जलतरंगवादक), छुन्नुखाँ (सरोदवादक) इत्यादी सुप्रसिद्ध वादनकारांची साथसंगतही त्यांनी उत्तमप्रकारे केली. काही गाजलेल्या नाटकांसाठी व चित्रपटांसाठी त्यांनी तबलावादन केले. सुरुवातीला ५ ते ६ वर्षे ललितकलादर्श मध्ये व त्यानंतर १९३५ ते १९४७ या कालावधीत त्यांनी प्रभात फिल्म कंपनीमध्ये तबलावादकाची नोकरी केली. या काळात त्यांनी गीतांना केलेली उत्तम संगत ध्वनिमुद्रिकांमुळे अजरामर झाली आहे.

बाळूभाईंचे स्वतंत्र तबलावादनापेक्षा साथसंगतीकडे विशेष लक्ष होते. तबला सुरात मिळविण्याची त्यांची पद्धत लक्षवेधक होती. एरवी त्यांचा ठेका स्वच्छ, सुरेल व दमदार होत असे; फक्त साथसंगतीच्या वेळी आवश्यक तेथेच ते बोलांचा भरणा करीत. ह्या त्यांच्या प्रभावशाली गुणवैशिष्ट्यांमुळे उत्तमोत्तम वाद्यवादकांत व गायकांतही त्यांना सतत मागणी असे.

प्रभात फिल्म कंपनी सोडल्यानंतर १९५२ च्या सुमारास त्यांनी सातारा येथे आपल्या मुलीकडे वास्तव्य केले. केंद्र सरकारकडून त्यांना ७५ रु. इतके मानधन मिळत होते. अर्धांगवायूच्या विकाराने पछाडल्याने त्यांना एका जागीच राहावे लागले. त्यामुळे नंतर त्यांना कार्यक्रम अथवा साथसंगत करता आली नाही.

समीक्षक : मनीषा पोळ