खॉं, निझामुद्दीन : (? १९२७ — २२ जून २०००). भारतातील तबलावादनाच्या लालियाना घराण्यातील एक श्रेष्ठ व उच्चकोटीचे तबलावादक. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर येथील जावरा या लहानशा गावात झाला. त्यांच्या लहानपणीच त्यांचे कुटुंब हैदराबाद येथे स्थायिक झाले. सुप्रसिद्ध तबलावादक उ. अझीम बक्ष खाँ जावरेवाले हे त्यांचे वडील. ते रामपूर, रेवा आणि जावरा या मध्यप्रदेशातील तत्कालीन संस्थानांत एक प्रतिष्ठित तबलावादक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते हैदराबादच्या निझामाच्या सेवेत दाखल झाले. यांच्याकडेच निझामुद्दीन यांनी तबलावादनाचे शिक्षण घेतले. त्याशिवाय त्यांचे मातुल आजोबा मुझफ्फरनगरचे जीनू खाँ तसेच नागपूरचे फराज हुसेन यांच्याकडेही ते तबलावादनातील अनेक महत्त्वपूर्ण बाबी शिकले. चाणाक्ष आणि एकपाठी असलेल्या निझामुद्दीन खाँ यांनी लवकरच तबलावादनात प्रावीण्य मिळवले आणि वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांनी सार्वजनिक रीत्या तबलावादनात भाग घेतला.

निझामुद्दीन खाँ यांनी ऑल इंडिया रेडिओवर त्यांचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली (१९५३). त्यांनी भारतातील प्रमुख संगीत महोत्सवांमध्ये सादरीकरण केले. त्यांच्या कलेचे सादरीकरण करण्याकरिता परदेशात यूरोप आणि अमेरिकेमध्ये त्यांनी तबलावादनाचे कार्यक्रम केले. लंडन येथील रॉयल अल्बर्ट हॉल येथील त्यांची मैफल विशेष गाजली.

निझामुद्दीन खाँ यांचे तबलावादनातील दिल्ली व पूरब या बाजांवर विशेष प्रभुत्व होते; कल्पनातीत हाततयारी, विलक्षण गोडवा, विशेषत: बायॉं अतिशय नजाकतदार पद्धतीने ते सादर करीत. ही त्यांच्या वादनाची वैशिष्ट्ये होत. त्यांच्याकडे खानदानी बंदिशीचा बराच मोठा ठेवा होता. लग्गी या प्रकारात त्यांची हातोटी होती. अनेक ज्येष्ठ गायक-वादकांबरोबर त्यांनी साथसंगत केली होती. केवळ शास्त्रीय नव्हे तर उपशास्त्रीय व सुगम संगीतातही त्यांची साथ अतिशय श्रवणीय असे. “लग्गी-नाडा’ हे त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. बेगम अख्तर, शोभा गुर्टू, निर्मला अरुण, लक्ष्मी शंकर इत्यादी ख्यातनाम गायिकांच्या अनेक ठुमऱ्या व दादरे त्यांनी आपल्या लग्गी-नाड्याने अलंकृत केले आहेत. त्याशिवाय विलायत खाँ, अब्दुल हलीम जाफर खाँ यांना त्यांनी साथसंगत केलेली आहे. त्यांच्या शिष्यांमध्ये दीपक नेरूरकर व सुपुत्र कमाबुद्दीन खाँ यांनी त्यांच्या वादनाचा वारसा पुढे चालवला आहे.

निझामुद्दीन खॉंसाहेबांचे मुंबई येथे निधन झाले.

समीक्षण : सुधीर पोटे