
सस्तन प्राण्यांच्या मार्सुपिलियाफॉर्मिस (मेटॅथेरिया) या एकपूर्वजी गटाच्या मार्सुपिलिया वर्गातील प्राण्यांना शिशुधान प्राणी म्हणतात. मार्सुपियल हे नाव मार्सुपियम या लॅटिन नावावरून घेतलेले आहे. ‘मार्सुपियम’ म्हणजे पिशवी. मार्सुपियम म्हणजे शिशुधानीमध्ये अंडी , पिले आणि जनन अवयव असतात. या प्राण्यांमध्ये मादीच्या उदरावर त्वचेचा झोळ म्हणजे शिशुधानी असते आणि पिलांची वाढ होईपर्यत पिले या पिशवीत स्तनाग्रांना चिकटून राहतात. म्हणूनच त्यांना शिशुधान प्राणी म्हणतात. पिलांची वाढ मातेच्या दुधावर शरीराबाहेर होते. काही थोड्या प्राण्यांमध्ये अशी शिशुधानी नसते, तर काही प्राण्यांमध्ये स्तनाग्रांना वेढणारी त्वचेची घडी असते. या वर्गात ऑपोसम, टास्मानियन डेव्हिल, कांगारू, कोआला, वॉलबी, बॅंडिकूट इ. प्राणी येतात.
वर्गीकरण : शिशुधानी उपवर्गामध्ये दोनगण आहेत; (अ) अमेरिडेल्फिया व (ब) ऑस्ट्रेलिडेल्फिया. सध्या अस्तित्वात असलेले शिशुधानी प्राणी अमेरिका, तसेच ऑस्ट्रेलिया, वॉलेशिया (इंडोनेशियालगतची बेटे) येथे आढळतात. त्यांच्या सु. ३३४ जातींपैकी सु. ७४ जाती दक्षिण अमेरिकेत वेगवेगळ्या ठिकाणी, तर सु. २६० जाती ऑस्ट्रेलिया, टास्मानिया, न्यू गिनी आणि जवळपासची बेटांवर आढळतात. शिशुधान प्राण्यांमध्ये सस्तन प्राण्यांची ही काही लक्षणे आढळतात. उदा., स्तनग्रंथी, तीन मध्यकर्णी हाडे आणि केस.
शारीरिक वैशिष्ट्ये : अधिवासानुसार शिशुधानी प्राण्यांच्या आकारात विविधता आढळते. त्यांच्यात कांगारू (मॅक्रोपस जायगँशियस ) हा आकारमानाने सर्वांत मोठा असून त्याची उंची सु. १.८ मी. तर वजन सु. २०० किग्रॅ. असते. सर्वांत लहान मार्सुपियल माउस (प्लॅनिगेल इंग्रामी ) असून त्याच्या शरीराची लांबी जेमतेम ५ सेंमी. असते. या प्राण्यांच्या अंगावर दाट केस असतात. मागील पाय पुढच्या पायांपेक्षा लांब असतात. शेपटी लांब व मागे वळलेली असून आधारासाठी आणि शरीराचा तोल सांभाळण्यासाठी तिचा उपयोग होतो. डोक्याची कवटी लहान आणि घट्ट असते. श्रोणिमेखलेशी (Pelvic girdle) मागील पायांना आधार देणाऱ्या हाडांच्या शृंखलेशी निगडीत हाडे असतात. या हाडांचा शिशुधानीला आधार मिळतो. शिशुधानी प्राण्यांना आयुष्यभर दातांचा एकच संच असतो. दातांची संख्या सामान्यपणे ४० ते ५० असते. प्रत्येक जबड्यात ३ उपदाढा आणि ४ दाढा असतात. मानेमध्ये सात मणके असतात. बोटांना नख्या असतात.
प्रजनन इंद्रिये : शिशुधानी प्राण्यांची प्रजनन इंद्रिये अपरास्तनी प्राण्यांपेक्षा भिन्न असतात. प्रजनन मार्ग दुहेरी असतो. मादीला दोन गर्भाशये आणि दोन योनिमार्ग असतात आणि त्यांच्या दरम्यान एक जननमार्ग (मध्य योनिमार्ग) असतो जो प्रसूतीसाठी वापरला जातो. नरांचे शिश्न दुभंगलेले किंवा दुहेरी असून वृषण कोशाच्या पुढे असते.
शिशुधानी : बहुधा सर्व शिशुधान प्राण्यांमध्ये शिशुधानी कायमची असते, तर काहींमध्ये ती गर्भावस्थेत विकसित होते (श्रूऑपोसम). शिशुधानी लवचिक असून तिच्यावर केस असतात. निरनिराळ्या प्राण्यांमध्ये शिशुधानीची रचना वेगवेगळी असून तिच्यामुळे पिलांना संरक्षण मिळते. कांगारूसारख्या हालचाल करणाऱ्या प्राण्यांमध्ये ती समोर असते, तर जे शिशुधान प्राणी झाडावर चढतात किंवा वावरतात त्यांमध्ये पिशवी पाठीवर उघडते. सामान्यपणे मादीलाच पिशवी असते परंतु ऑपोसमच्या नराला पोहताना किंवा धावताना शिश्न सुरक्षित राहावे, म्हणून पिशवी असते.
शिशुधान मादीचा गर्भावधी ८ ते ४० दिवसांचा असतो. पिलांची वाढ गर्भाशयात होत असली तरी ते अपूर्ण अवस्थेतील पिलांना जन्म देतात. नवजात पिले आंधळी व अतिशय लहान (२·५ सेंमी. पेक्षा कमी लांबीची) असतात. पिलांचे पुढील पाय मोठे असून बोटांना नख्या असतात, तर मागील पाय लहान व कलिका अवस्थेत असतात. ऑपोसमाची पिले नख्या असलेल्या पुढील पायांच्या साहाय्याने शिशुधानीत प्रवेश करतात व स्तनाग्राला तोंड लावतात. कांगारू व वॉलबी यांच्या माद्या नवजात पिलाला ओठांनी उचलून शिशुधानीतील स्तनाग्राला चिकटवतात. पिलाला दूध चोखून प्यावे लागत नाही. ते मातेकडून त्याच्या तोंडात सोडले जाते. अंगावर केस येऊन आपले अन्न मिळवू लागेपर्यंत पिलू शिशुधानीतच राहते. याला काही आठवडे किंवा महिने लागतात. पिले थोडा वेळ शिशुधानीच्या बाहेर पडली, तरी ती मातेच्या केसाच्या आधाराने मादीबरोबर राहतात.
अधिवास : शिशुधान प्राणी जेथे राहतात, त्या जागा शरीररचनेशी संबंधित असल्यामुळे त्यांच्या अधिवासात विविधता दिसून येते.ते जमिनीवर, झाडांवर, बिळांमध्ये तसेच पाण्यात राहतात.जसे कोआला (फॅस्कॉलॅरक्टॉस सिनेरियस ) आणि वृक्षकांगारू (डेंड्रोलॅगस प्रजाती) झाडांवर राहतात. नोटोरिक्टस टिफ्लॉप्स, नो. कॉरिनस या जाती आणि वाँबट यांच्या पुढच्या पायाच्या नख्या मजबूत असून त्यांद्वारे ते जमिनीत अन्न-निवाऱ्यासाठी बिळे करतात. कांगारू आणि त्यासारख्या इतर प्राण्यांचे मागील पाय मजबूत असतात आणि त्यांचा ते एखाद्या शस्त्राप्रमाणे वापर करतात. शोइनोबॅट सव्होलान्स हा उडणारा (विसर्पी) शिशुधान प्राणी आहे. त्याच्या पुढच्या व मागच्या पायांदरम्यान त्वचेचे पटल असते. त्याद्वारे तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडू शकतो, तसेच शरीराच्या एका कडेनेवरून खाली सरकत येतो. अमेरिकेच्या काही भागात आढळणारा वॉटर ऑपोसम (किरोनोक्टिस मिनिमस ) हा एकमेव जलचर शिशुधान प्राणी आहे.
आहार : शिशुधान प्राण्यांचा आहार, ते जेथे राहतात त्यानुसार असतो. ड्युनॉर्ट (चिचुंदरीसारखा शिशुधान प्राणी ) हा खूप क्रियाशील असतो. कीटक हे त्याचे अन्न असून त्याच्या ऊर्जेची गरज भागण्यासाठी तो मोठ्या संख्येने कीटकांचा फडशा पाडतो. नुंबॅट याची जीभ एखाद्या कृमीसारखी लांब व चिकट असते. तो मुंग्या आणि वाळवी खाऊन जगतो. डॅसियुरिडी कुलातील अनेक लहान प्राणी मुख्यत: कीटक आणि लहान प्राणी (पाली, सरडे, उंदीर) यांवर जगतात.
ऑस्ट्रेलियातील ऑपोसम, बॅंडीकूट आणि अमेरिकेतील ऑपोसम हे सर्वभक्षी असून ते विविध प्रकारच्या वनस्पती आणि कीटक खाऊन जगतात. पुष्कळसे शिशुधान प्राणी शाकाहारी आहेत. वाँबॅट हा झाडाची मुळे, गवत इ. खातो. हनी ऑपोसम हा फुलांतील मकरंद खातो. अशा प्रकारे तो परागणाला हातभार लावतो. टास्मानियन डेव्हिल यांसारखे मोठे शिशुधान प्राणी इतर प्राणी किंवा मृत प्राण्यांचे मांस खातात.
चेतासंस्था : शिशुधान प्राण्यांचा मेंदू कमी विकसित असल्याने अपरास्तनी प्राण्यांच्या तुलनेत त्यांना कमी बुद्धीमान समजले जाते. या दोहोंच्याही मेंदूची तुलना केल्यास, मेंदूची संरचना आणि व्याप्ती (आकारमान) यांत फरक आढळतो. अपरास्तनी प्राण्यांमध्ये, मेंदूंच्या दोन प्रमस्तिष्कांना जोडणारा महासंयोजी पिंड शिशुधानी प्राण्यांच्या मेंदूमध्ये नसतो. तसेच शिशुधानी प्राण्यांचा मेंदू खूप लहान असतो. उदा.,शिशुधानींपैकीच मांजरासारखा दिसणाऱ्या क्युऑलचा मेंदू सस्तन प्राण्यांपैकी मांजराच्या मेंदूच्या निमपट असतो. शिशुधानीचे वर्तनही अपरास्तनींपेक्षा वेगळे असते. त्यांच्या अविकसित मेंदूमुळे त्यांच्या आवाजावर परिणाम झालेला दिसतो. त्यांच्या आवाजाला एक मर्यादा असते आणि आवाजात विविधता कमी असते. ते जरी शांत नसले, तरी त्यांच्यापैकी काहीजण उत्तेजित क्षणी किंवा अडचणीत सापडल्यावर मोठा आवाज काढू शकतात. लहान पिले भूक लागली तरी आवाज काढत नाहीत.

सामाजिक व्यवस्था : शिशुधानी प्राण्यांमध्ये सामाजिक संघटनदेखील कमी आढळते. समागमाचा लहान कालावधी सोडला तर कांगारू, वॉलबी यांसारखे प्राणी चरण्यासाठी गटाने फिरतात. परंतु त्याला सामाजिक संघटन म्हणता येत नाही कारण तेथे कळपाच्या प्रमुखाकडे किंवा नेत्याकड़े कोणाचेही लक्ष नसते. केवळ उडणाऱ्या (विसर्पी) शिशुधानींचे संघटन एक संघ असते.
उत्क्रांतीतील स्थान : शिशुधानी प्राणी हे स्तनी वर्गाच्या उत्क्रांतीतील एक वेगळी शाखा आहे. सुमारे १० ते १२ कोटी वर्षांपूर्वीच शिशुधान प्राणी माहीत झालेले आहेत. विशेषकरून ७.५ ते ८ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील त्यांचे काही जीवाश्म आढळले आहेत. त्यांपैकी पुष्कळ प्राणी हे आताच्या डायडेफिल्डी कुलातील आहेत. शिशुधान प्राण्यांची उत्पत्ती पश्चिम गोलार्धात झाली. मात्र १० कोटी वर्षांपूर्वी झालेल्या पँजिया प्रक्रियेमुळे (ज्यामुळे लॉरेशिया आणि गोंडवाना हे खंड एकमेकांपासून वेगळे झाले) ते ऑस्ट्रेलियात गेले असावेत. मात्र आशिया व आफ्रिका खंडात त्यांचे जीवाश्म आढळून आलेले नाहीत.

साधारणपणे ६.६४ कोटी वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया इतर खंडांपासून वेगळा झाला आणि शिशुधानी प्राण्यांमध्ये विविधता निर्माण झाली. उदा., दक्षिण अमेरिकेत ते सर्वभक्षी आणि मांसाहारी होते, परंतु ऑस्ट्रेलियात शिशुधान प्राणी शाकाहारी असल्याचे आढळले आहे. आधुनिक शिशुधान प्राणी ऑस्ट्रेलियातून जवळच्या न्यू गिनी, सुलावेसी बेटांवर गेलेले आढळले आहेत. डीएनएच्या अभ्यासातून ऑस्ट्रेलियातील सर्व शिशुधान प्राण्यांचे वंशज अमेरिकेतील शिशुधान प्राणी असल्याचे निश्चित झाले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये त्यांना इतर प्राण्यांशी स्पर्धा करावी लागली नाही. त्यामुळे त्यांची संख्या वाढली. महत्त्वाचे म्हणजे अपरास्तनी प्राण्यांपैकी अनेक प्राण्यांची रूपे किंवा सवयी विविध शिशुधान प्राण्यांमध्ये विकसित झाल्याचे दिसते. उदा., चरणाऱ्या कांगारूचे (मॅक्रोपोडिडी) जे पारिस्थितिकीय स्थान आहे तेच स्थान इतर खंडांमध्ये खुरी सस्तन प्राण्यांनी घेतले आहे. परभक्षी डॅसियूर (डॅसियूरिडी) प्राणी हे मार्जार कुलातील प्राण्यांसारखेच आहेत, तर शिशुधानी मोल या प्राण्याचे रूप व सवयी खऱ्या मोलप्रमाणे उत्क्रांत झालेल्या दिसतात. ऑस्ट्रेलियातील शिशुधान प्राण्यांचे रूप व सवयी यांबाबतीत अस्वले, खारी, उंदीर यांच्याशी सारखेपणा दिसून येतो. ऑस्ट्रेलियात कोल्हे, ससे, डिंगो (लांडग्यासारखा एक प्राणी) इ. प्राणी माणसाने बाहेरून आणल्यानंतर त्यांच्यापासून शिशुधान प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. पश्चिम गोलार्धात डायडेल्फिडी व सीनोलेस्टिडी (श्रू ऑपोसम) ही शिशुधान प्राण्यांची दोनच कुले टिकून राहिली आहेत. बहुतकरून अधिक काळ हे प्राणी सर्वभक्षी राहिले आहेत. त्यामुळे अपरास्तनी सस्तन प्राण्यांशी स्पर्धा करूनदेखील ते टिकून राहिले. परंतु इतर मोठ्या परभक्षी शिशुधान प्राण्यांसारखे अधिक विशिष्टीकरण झालेले प्राण्यांचे गट हे अपरास्तनीसारख्या आधुनिक, तसेच परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या स्पर्धक प्राण्यांशी स्पर्धा करू शकले नाहीत. शिशुधान प्राण्यांच्या मेंदूचे आकारमान त्यांच्याएवढ्या आकारमानाच्या अपरास्तनी प्राण्यांच्या मेंदूच्या आकारमानापेक्षा पुष्कळ कमी असते. यामुळे मोठ्या संख्येने अमेरिकेतील शिशुधानी नष्ट होण्यास कारणीभूत ठरले. अशाप्रकारे ऑपोसम सोडून बहुतेक शिशुधान प्राणी उत्तर व दक्षिण अमेरिकेतून नाहीसे झाले.
पहा : शिशुधान प्राणि (पूर्वप्रकाशित).
संदर्भ : 1. https://en.wikipedia.org/wiki/Marsupial
- https://www.britannica.com/animal/marsupial
समीक्षक : मद्वाण्णा, मोहन
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.