भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था, पुणे : चित्रपट व दूरदर्शन या क्षेत्रातील बहुतांश घटकांचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणारी भारतातील एक महत्त्वपूर्ण संस्था. पुणे शहरातील प्रभात फिल्म कंपनीच्या पूर्वीच्या विस्तृत परिसरात ही संस्था आहे. १९५१ साली भारत सरकारने नियुक्त केलेल्या चित्रपट चौकशी समितीच्या शिफारशींनुसार केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकारकक्षेत १९६० साली ‘फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या नावाने ही संस्था स्थापन करण्यात आली व २ ऑक्टोबर १९७४ साली ती स्वायत्त झाली. १९७० साली संस्थेला सध्याचे नाव देण्यात येऊन १९७१ पासून दिल्लीला सुरू झालेले ‘दूरचित्रवाणी प्रशिक्षण केंद्र’ ऑक्टोबर १९७४ मध्ये या संस्थेत अंतर्भूत करण्यात आले. २२ एप्रिल २०२५ रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाने या संस्थेला विशिष्ट श्रेणीअंतर्गत अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे.

विद्यार्थ्यांच्या रचनात्मक अभिव्यक्तीला वाव मिळावा आणि चित्रपटाशी संबंधित उद्योजकतेला प्रोत्साहन मिळावे तसेच चित्रपट, दूरदर्शन आणि संबंधित क्षेत्रांसाठीचे उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि या क्षेत्रासाठी कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे हा या संस्थेच्या स्थापनेचा उद्देश आहे. ही संस्था चित्रपट व दूरदर्शन यांचे शिक्षण देणाऱ्या संस्थांचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघ असलेल्या सीआयएलईसीटी (CILECT – The International Association of Cinema, Audiovisual and Media Schools) याची सभासद असल्याने येथील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची व शिकण्याची संधी मिळते.

या संस्थेच्या स्थापनेपासून गजानन जहागीरदार, जगत मुरारी, देवेंद्र दीक्षित व गिरीश कार्नाड यांसारख्या चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठांनी संस्थेच्या प्रमुखपदाची धुरा वाहिली. सध्या संस्थेच्या सोसायटीचे अध्यक्ष प्रसिद्ध अभिनेते रंगनाथन (आर.) माधवन हे असून कुलपती धीरज सिंग हे आहेत (२०२५). त्यांच्या मार्गदर्शनाखाली एफटीआयआय सोसायटी, प्रशासकीय व्यवस्थापन, शासकीय विभाग, अकादमिक विभाग व स्थायी वित्त विभाग हे पाच प्रमुख विभाग येथे कार्यरत आहेत. याशिवाय चित्रपट व दूरदर्शन या शाखांसाठी प्रमुख व्यवस्थापक (डीन) आणि प्रत्येक शाखेत अध्यापन करणारे अनुभवी व कुशल अध्यापक येथे कार्यरत आहेत.

संस्थेतर्फे चित्रपट निर्मिती या विभागांतर्गत तीन वर्षांचा पुढील अभ्यासक्रम शिकवला जातो. यामध्ये (१) दिग्दर्शन व पटकथालेखन (Direction & Screenplay-writing), (२) चलच्चित्रीकरण (Cinematography), (३) संपादन (Editing), (४) ध्वनी लेखन आणि ध्वनी आरेखन (Sound Recording & Sound Design) आणि (५) कला दिग्दर्शन व निर्मिती आरेखन (Art Direction & Production Design) या विषयांतून मास्टर ऑफ फाईन आर्ट्स (एमएफए) ही पदवी दिली जाते. तसेच दोन वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये (१) पडद्यावरील अभिनय (Screen Acting) व (२) चित्रपट, दूरदर्शन आणि वेबसीरीज यांसाठीचे पटकथालेखन (Screenwriting) या विषयांतून मास्टर ऑफ फाईन आर्ट्स (एमएफए) ही पदवी दिली जाते. दूरदर्शन या विभागांतर्गत एक वर्षांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवला जातो. यामध्ये (१) दिग्दर्शन (Direction), (२) इलेक्ट्रॉनिक चलच्चित्रीकरण (Electronic Cinematography), (३) दृश्यफीत संपादन (Video Editing), (४) ध्वनिलेखन आणि दूरदर्शन अभियांत्रिकी (Sound Recording & Television Engineering) हे अभ्यासक्रम शिकवले जातात. संस्थेतील शिक्षण तात्विक आणि तांत्रिक अशा दुहेरी स्वरूपाचे आहे. त्यामुळे प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिला जातो. लिखित अभ्यासक्रम आणि व्यवहारातील उपयोग अशा दोनही बाजूंचा समावेश असलेले पद्धतशीर प्रशिक्षण यामध्ये दिले जाते. या प्रशिक्षणाची सुरुवात चित्रपट निर्मितीच्या एखाद्या विषयावरील अभिमुखता पद्धतीने दिल्या जाणाऱ्या तासाने होते. म्हणजेच त्या विषयाची तोंडओळख, मूलभूत तंत्र, त्यातील जबाबदाऱ्या इत्यादी गोष्टी त्यामध्ये शिकवल्या जातात आणि नंतरच उमेदवारांनी निवड केलेल्या शाखेतील विशेष प्राविण्य मिळवण्याच्या उद्देशाने पुढील शिक्षण दिले जाते. याशिवाय मुक्त शिक्षण केंद्राच्या माध्यमातून ४५० लहान कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रमही संस्था आयोजित करत असते.

चलच्चित्रीकरण शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला अंतर्गत (इनडोअर) पद्धतीने करण्यात येणाऱ्या चित्रीकरणातील खाचाखोचा आणि क्लिष्ट गोष्टी शिकवल्या जातात. यासाठी असणाऱ्या प्रयोगशाळेमध्ये सेन्सिटोमीटर आणि डेन्सीटोमीटर सारखी अद्ययावत उपकरणे वापरून उच्च दर्जाची प्रिंट असलेली रिळे (फिल्म्स) बनवायला शिकवली जातात. पुढच्या बाजूने प्रक्षेपण (प्रोजेक्शन) करणारे तंत्रज्ञान वापरून एखादी पळती कार दाखवायची असेल तर ती अशा पद्धतीने बनवलेली रिळे वापरून आणि एक ठराविक मालिका (sequence) लावून दाखवली जाते. हे आपण पूर्वीच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये पाहिलेले आहे. याचबरोबर खास परिणाम साधणारी (special इफेक्ट्स) उदा. सुपरमॅन सारखी दृश्ये शिकवली जातात. प्रत्यक्ष वाद्यवादन करून त्याच्या ध्वनिमुद्रणाचे तसेच संगीत संयोजन प्रशिक्षणार्थींना रिळांच्या संकलनाचे कामही करायला दिले जाते. चित्रपट रसास्वाद किंवा रसग्रहण, संवादफेक आणि शब्दांचे योग्य उच्चार, नृत्यशैली, योगाभ्यास याचासुद्धा अंतर्भाव या प्रशिक्षणात असतो. स्वतःच्या लघुचित्रपटांचे स्वतःच नियोजन आणि चित्रीकरण करणे यांतून विद्यार्थ्यांना समृद्ध अनुभव मिळतो.

संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले निवडक चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसाठी व स्पर्धांसाठी पाठविले जातात. संस्थेच्या द टेन, विलाप, द कॅनिबल्स यांसारख्या चित्रपटांना अशा स्पर्धांतून पुरस्कारही लाभले आहेत. संस्थेच्या आवारात प्रभात संग्रहालय आहे. याची स्थापना १९९५ मध्ये करण्यात आली. या संग्रहालयात प्रभात फिल्म कंपनीने संस्थेला दिलेल्या कलाकृती आणि चित्रांचा समावेश आहे. त्यात प्राचीन दागिने, साहित्य, चित्रे आणि त्या काळातील प्रसिद्ध तारकांनी परिधान केलेले पोशाख देखील समाविष्ट आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आकाशवाणी संबंधित नियमावली नुसार Radio FTII ९०.४ या केंद्राची फक्त ग्रामीण भागातील प्रसारणाची सुरुवात १ जून २००६ रोजी करण्यात आली. २९ जून २००७ पासून मात्र या वाहिनीचे सर्वत्र दैनंदिन प्रसारण सुरू झाले. ‘समाजाच्या सेवेसाठी’ या उद्दिष्टाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

संस्थेचे ग्रंथालय समृद्ध असून त्यात अनेक देशीपरदेशी ग्रंथ आहेत. याचा उपयोग विद्यार्थ्यांना शिक्षण आणि संशोधन यासाठी तर होतोच पण त्याचबरोबर चित्रपटाच्या या जगद्व्यापी उद्योगासंबंधित आधुनिक माहिती आणि अद्ययावत सुधारणा यासंबंधी ज्ञान मिळवण्यासाठीही होतो. संस्थेच्या चित्रपट संग्रहालयात निवडक देशीपरदेशी चित्रपट, विद्यार्थ्यांनी तयार केलेले चित्रपट व शैक्षणिक स्वरूपाचे लघुपट असे अनेक चित्रपट आहेत. ‘Lensight’ नावाचे त्रैमासिक संस्थेतर्फे संपादित केले जाते. समकालीन चित्रपटासंबंधित चर्चा, त्यावरील विविध सदरे तसेच डिजिटल माध्यमाचा चित्रपट क्षेत्रावर होणारा परिणाम इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव या मासिकात केलेला असतो.

आतापर्यंत संस्थेने भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक कलावंत आणि तंत्रज्ञ दिले आहेत. त्यांपैकी चित्रपट-दिग्‍दर्शकांत मणी कौल, कुमार सहानी, सुभाष घई, विकास देसाई, अदूर गोपालकृष्णन, के. जी. गिरीश, सईद मिर्झा इत्यादी; चलच्चित्रीकरणात के. के. महाजन, ए. के. वीर, सुदर्शन नाग, नदीम खान इत्यादी; अभिनयात शत्रुघ्‍न सिन्हा, जया भादुरी, असरानी, रामेश्वरी, शबाना आझमी इत्यादी; ध्वनिमुद्रणांत नरेंद्र सिंग, कुलदीप सूद, हितेंद्र घोष आणि संपादनात अरूणा देसाई, व्ही. पी. गाडगीळ, रमेश अहलुवालिया इत्यादी कलाकार उल्लेखनीय आहेत.

समीक्षण : चारुदत्त मुंढे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.