पृथ्वीच्या अक्षाचे उत्तर टोक म्हणजेच उत्तर ध्रुव होय. पृथ्वी गोलाकार असून ती आपल्या अक्षाभोवती म्हणजेच स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेस फिरते. पृथ्वीच्या मध्यातून जाणारा तिचा
परिवलन अक्ष उत्तरेस ज्या बिंदूवर भूपृष्ठाला छेदतो, तो बिंदू म्हणजेच उत्तर ध्रुव किंवा भौगोलिक उत्तर ध्रुव होय. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही ध्रुवांचे भूपृष्ठीय अक्षांश अनुक्रमे ९०° उ. व ९०° द. असते. पृथ्वीवरील सर्व रेखावृत्ते उत्तर गोलार्धात पृथ्वीच्या अगदी उत्तर टोकाशी ज्या बिंदूवर एकत्रित येतात, तो बिंदू म्हणजे भौगोलिक उत्तर ध्रुव; तर दक्षिण गोलार्धात ती रेखावृत्ते पृथ्वीच्या दक्षिण टोकाशी ज्या बिंदूवर एकत्र येतात, तो बिंदू म्हणजे दक्षिण ध्रुव होय. भौगोलिक उत्तर ध्रुवाशिवाय चुंबकीय उत्तर ध्रुव, भूचुंबकीय उत्तर ध्रुव, पृथ्वीचा अक्षीय उत्तर ध्रुव, भूसंतुलन उत्तर ध्रुव असे अनेक उत्तर ध्रुव बिंदू आहेत. पृथ्वीचे हे सर्व उत्तर ध्रुव एकच नसून ते एकमेकांपासून काही अंतरावर असणारे भिन्न बिंदू आहेत. हे सर्व ध्रुव आर्क्टिक महासागराच्या जवळजवळ मध्यभागी आहेत. सामान्यत: जेव्हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव असे म्हटले जाते, तेव्हा पृथ्वीचा भौगोलिक उत्तर ध्रुव अभिप्रेत असतो. भौगोलिक उत्तर ध्रुव चुंबकीय उत्तर ध्रुवाशी किंवा भूचुंबकीय उत्तर ध्रुवाशी जुळत नाही. सर्व दिशांनी येणारी होकायंत्रे उत्तरेकडील ज्या बिंदूची दिशा दर्शवितात, तो आर्क्टिक महासागरातील बिंदू म्हणजे चुंबकीय उत्तर ध्रुव होय. चुंबकीय उत्तर ध्रुव सतत जागा बदलत असतो. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीस कॅनडाच्या अगदी उत्तर भागातील क्वीन एलिझाबेथ बेटांच्या उत्तरेस चुंबकीय उत्तर ध्रुव होता. त्याचे अक्षांश व रेखांशीय स्थान अनुक्रमे अंदाजे ८२° १५′ उ. व ११२° ३०′ प. असे होते. तो हळूहळू वायव्येस सरकत असतो. भूचुंबकीय उत्तर ध्रुव पृथ्वीच्या भूचंबकीय क्षेत्राच्या अगदी उत्तर टोकाशी असून त्याचे अक्षांश व रेखांश अनुक्रमे ७९° ३०′ उ. व ७१° ३०′ प. असे आहे. भूसंतुलन उत्तर ध्रुवाचीही जागा बदलत असते. हा बिंदू व भौगोलिक उत्तर ध्रुव बिंदू जवळपास एकच असतात. उत्तर ध्रुव आर्क्टिक महासागराच्या साधारण मध्यात, ग्रीनलंडपासून उत्तरेस सुमारे ७२५ किमी. वर आहे. भौगोलिक उत्तर ध्रुवाचे जे स्थान आहे, तेथील महासागराची खोली सुमारे ४,०८० किमी. आहे. महासागर गोठून हा संपूर्ण भाग बर्फाच्छादित झालेला आहे; मात्र तो संथपणे सरकत (प्रवाहित) असतो. त्यामुळे दक्षिण ध्रुवासारखे येथे कायमस्वरूपी संशोधन किंवा अन्य कोणतेही अभ्यास केंद्र स्थापन करणे शक्य होत नाही. उत्तर ध्रुवावर वर्षातून फक्त एकदाच सूर्योदय आणि एकदाच सूर्यास्त अनुभवास येतो. २१ मार्च या विषुवदिनाच्या दरम्यान येथे सूर्योदय होतो; त्यानंतर तीन महिने सूर्य वर वर येत राहतो; २१ जून या अयनदिनाच्या दरम्यान सूर्य क्षितिजापासून सर्वाधिक वर आलेला असतो; त्यानंतर तीन महिने म्हणजे २३ सप्टेंबरच्या विषुवदिनापर्यंत खाली खाली जात राहतो आणि सूर्यास्त होतो. २१ मार्च ते २३ सप्टेंबर या सहा महिन्यांच्या उत्तर गोलार्धातील उन्हाळ्याच्या कालावधीत उत्तर ध्रुव प्रदेश सूर्यप्रकाशित असतो, तर २३ सप्टेंबर ते २१ मार्च या सहा महिन्यांच्या हिवाळ्याच्या कालावधीत तेथे अंधार असतो, त्यावेळी तेथे फक्त संधिप्रकाश मिळत असतो. उन्हाळा या ऋतुमध्ये सूर्य कायमच क्षितिजाच्या वर असतो, तर हिवाळ्यात तो कायम क्षितिजाच्या खाली असतो. उत्तर ध्रुवावर सर्व रेखावृत्ते एकत्र होत असल्यामुळे तेथे कोणताही काल विभाग नसतो. त्यामुळे तेथील कोणतीही वेळ ही स्थानिक वेळच असते. तसेच या प्रदेशात घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरल्यास ती पूर्व दिशा असते. याउलट, घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने गेल्यास ती पश्चिम दिशा मानली जाते. ग्रीनलंडच्या अगदी उत्तर किनाऱ्याजवळील कॅफेक्लुबेन किंवा कॉफी क्लब बेट हा ध्रुवापासून सर्वांत जवळचा (सुमारे ७०० किमी.) भूभाग आहे. तसेच कॅनडाच्या एल्झमीअर बेटावरील अलर्ट हे कायम मानवी वस्ती असलेले सर्वांत जवळचे (सुमारे ८१७ किमी.) ठिकाण आहे.
तापमानाच्या दृष्टीने दक्षिण ध्रुवाच्या तुलनेत उत्तर ध्रुव उबदार असतो; कारण दक्षिण ध्रुवाच्या तुलनेत उत्तर ध्रुव समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर आहे. तसेच उत्तर ध्रुव आर्क्टिक महासागराच्या मध्यवर्ती स्थानी आहे, तर दक्षिण ध्रुव सदैव हिमाच्छादित अंटार्क्टिका खंडावर आहे. वैश्विक तापमानवाढीमुळे अलिकडच्या काळात येथील बर्फाच्या थरांची जाडी कमी झालेली आढळते. सरकते हिम आणि खाद्याच्या अभावी प्राणी क्वचितच येथे स्थलांतर करतात. काही प्रमाणात ध्रुवीय अस्वल, आर्क्टिक कोल्हा व भूप्रदेशावरील इतर प्राणी आढळतात. गोलाकार सील ध्रुवावर आढळले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, तसेच तेथील पाण्यात काही जातीचे मासे आढळतात. प्रत्यक्षात उत्तर ध्रुवावर मानवी वस्ती नाही. सातत्याने सरकणाऱ्या हिमामुळे येथे कायमस्वरूपी वस्ती स्थापन करणेही शक्य होत नाही. केवळ कॅनडा, ग्रीनलंड व रशियाच्या आर्क्टिक प्रदेशालगतच्या भागात इन्युट जमातीचे लोक राहतात. उत्तर ध्रुववृत्त (आर्क्टिक वृत्त) प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आर्क्टिक परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. कॅनडा, डेन्मार्क, फिनलंड, आइसलँड, नॉर्वे, स्वीडन, रशिया, व संयुक्त संस्थाने हे देश या परिषदेचे सदस्य आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार अजून तरी उत्तर ध्रुव किंवा ध्रुवासभोवतालच्या आर्क्टिक महासागरावर कोणत्याही देशाची मालकी नाही. आर्क्टिक महासागराच्या भोवतालच्या रशिया, नॉर्वे, डेन्मार्क (ग्रीनलँड), कॅनडा आणि संयुक्त संस्थाने या पाच देशांचा या भागातील अधिकार किनाऱ्यापासून (आर्थिक पट्टा वगळता) २०० नॉटिकल मैल (३७० किमी.) पर्यंतच आहे. त्यापलीकडील प्रदेशावर आंतरराष्ट्रीय सागरतळ प्राधिकरणाचे नियंत्रण आहे.
एकोणिसाव्या शतकापासून उत्तर ध्रुवावर जाण्याचे प्रयत्न सुरू झाले. इ. स. १८२७ मध्ये ब्रिटिश समन्वेषक अॅडमिरल सर विल्यम एडवर्ड पॅरी यांनी उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची सफर
काढली होती. अनेक अडचणींमुळे ते ८२° ४५′ उत्तर अक्षांशापर्यंतच जाऊ शकले. त्यापूर्वी हा टप्पा कोणीच गाठला नव्हता. पॅरी यांनी त्यापूर्वी उत्तर ध्रुवावर जाण्यासाठी इ. स. १८१९, इ. स. १८२१ – २३ व इ. स. १८२४-२५ अशा तीन सफरी काढल्या होत्या; तर इ. स. १८१८ मध्ये सर जॉन रॉस यांच्या उत्तर ध्रुवाच्या मोहिमेत एक सदस्य म्हणून सामील झाले होते. इ. स. १८९७ मध्ये हायड्रोजन बलूनच्या साहाय्याने उत्तर ध्रुवावर जाण्यासाठी स्वीडिश समन्वेषक सालूमॉन ऑउगस्ट आंद्रे यांच्या नेतृत्त्वाखाली सफर काढण्यात आली होती; परंतु दुर्दैवाने या सफरीत सहभागी तिघांचाही मृत्यू झाल्याने ती सफर असफल ठरली. अमेरिकन समन्वेषक फ्रेडरिक अॅल्बर्ट कुक ही उत्तर ध्रुवावर पोहोचल्याचा दावा करणारी पहिली व्यक्ती होती (इ. स. १९०८); परंतु कुकला या सफरीच्या सफलतेबाबतचे विश्वासार्ह पुरावे देता आले नाहीत. त्यामुळे कुकचा हा दावा वादग्रस्त ठरला. अमेरिकन समन्वेषक रॉबर्ट एड्विन पीअरी हे मॅथ्यू हेन्सन व चार एस्किमोंसह ६ एप्रिल १९०९ रोजी कुत्र्यांच्या स्लेज गाडीने उत्तर ध्रुवावर पोहचले होते. त्यांना नॅशनल जिऑग्राफिक सोसायटीने पाठिंबा व आर्थिक मदत केली होती. पीअरी ही उत्तर ध्रुवावर जाणारी पहिली व्यक्ती असल्याचे मान्य केले गेले असले, तरी काहींनी त्याच्याही दाव्याबद्दल शंका घेतली होती. पीअरी यांनी इ. स. १८९१, इ. स. १८९८ -१९०२, इ. स. १९०६ मध्येही उत्तर ध्रुवावर जाण्यासाठी सफरी काढल्या होत्या. दुसरे अमेरिकन समन्वेषक व वैमानिक रिचर्ड ईव्हेलिन बर्ड यांनी ९ मे १९२६ रोजी आपण विमानाने उत्तर ध्रुवावर फेरी मारल्याचा दावा केला होता; मात्र पुढे या दाव्याच्या खरेपणाबाबत शंका घेतल्या गेल्या. पुढे १९९६ मध्ये खुद्द बर्ड यांची जी दैनंदिनी सापडली, त्यानुसार आमच्यापासून उत्तर ध्रुव केवळ २४० किमी. अंतरावर राहिला आहे; परंतु विमानाच्या तेल टाकीतून तेलाची गळती सुरू झाल्यामुळे तेथून परत फिरण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. बर्ड हे २९ नोव्हेंबर १९२९ रोजी दक्षिण ध्रुवावरही जाऊन आले. बर्ड यांच्या ९ मेच्या दाव्यानंतर तीनच दिवसांनी १२ मे १९२६ रोजी नॉर्वेजियन समन्वेषक रोआल आमुनसेन, अमेरिकन समन्वेषक लिंकन एल्सवर्थ व इटालियन वैमानिक ऊंबेर्तो नॉबीले यांचा आंतरराष्ट्रीय संघ डिझेल एंजिनाचा वापर केलेल्या ‘डायरिजिबल’ या हायड्रोजन वायुयानाने निश्चितपणे उत्तर ध्रुवावर पोहोचला होता.
सरकते हिमाच्छादन आणि भूभागाचा अभाव यांमुळे येथे कायमस्वरूपी संशोधन केंद्र स्थापन करता येत नसले तरी, रशियन शास्त्रज्ञांनी मे १९३७ मध्ये उत्तर ध्रुवापासून २० किमी. अंतरावर एक केंद्र स्थापन करून त्या बर्फाळ केंद्रावर तीन अवजड व एक हलके हवाई जहाज उतरविले होते. या सफरीत सहभागी असलेले महासागरवैज्ञानिक, वातावरणवैज्ञानिक, रेडिओ प्रचालक, सफर प्रमुख अशा वेगवेगळ्या विषयातील शास्त्रज्ञांनी नऊ महिने या केंद्रावर थांबून शास्त्रशुद्ध संशोधन केले. फेब्रुवारी १९३८ मध्ये दोन बर्फफोडी बोटींच्या साहाय्याने त्यांना परत आणले गेले, तेव्हा त्यांचे संशोधन केंद्र २,८५० किमी. वर, ग्रीनलंडच्या पूर्व किनाऱ्यापर्यंत सरकलेले आढळले. त्यानंतर उत्तर ध्रुवावर अनेक सफरी गेल्या होत्या. सोव्हिएट युनियनवरून गेलेल्या भूवैज्ञानिक व महासागर वैज्ञानिकांच्या संशोधन गटाने इ. स. १९४८ मध्ये निश्चितपणे उत्तर ध्रुवावर पाऊल ठेवले होते. त्यांना या अभ्यासात रशियाच्या सायबीरियापासून उत्तर ध्रुव पार करून कॅनडाच्या एल्झमीअर बेटापर्यंत पसरलेली एक प्रचंड सागरांतर्गत पर्वतमाला आढळली. ‘नॉटिलस’ या अमेरिकेच्या अणुशक्तिवरील पाणबुडीने १९५८ मध्ये आर्क्टिक महासागरात बर्फाखालून उत्तर ध्रुवापर्यंत प्रवास केला होता. उत्तर ध्रुवाकडे गेलेली ‘स्केट’ ही अमेरिकेची दुसरी पाणबुडी १९५९ मध्ये उत्तर ध्रुवाजवळील पृष्ठभागाजवळील सागरी बर्फात फुटली. सोव्हिएट बर्फफोडी बोट ‘आर्क्टिका’ ही पृष्ठभागावरून ध्रुवावर जाणारी पहिली बोट होती (१९७७). त्याशिवाय इतरही अनेकांनी जमिनीवरून उत्तर ध्रुवावर जाण्याच्या उल्लेखनीय व यशस्वी सफरी केल्या आहेत. अमेरिकन समन्वेषक राल्फ समर्स प्लॅस्टेड यांनी इतर तीन सहकाऱ्यांसह १९६८ मध्ये बर्फावरून चालणाऱ्या मोटार वाहनाने (स्नोमोबाइल) केलेली सफर उत्तर ध्रुवावर पोहोचली होती. ब्रिटिश समन्वेषक वॅली हर्बर्ट यांच्या नेतृत्वाखालील सफर कुत्र्यांच्या गाडीने उत्तर ध्रुवावर जाऊन परत आली होती (१९६९). अमेरिकन महिला समन्वेषक व शिक्षिका एन बँक्रॉफ्ट या इतर पाच सहकाऱ्यांसह ‘स्टेगर आंतरराष्ट्रीय ध्रुवीय सफर’ मध्ये सहभाग घेऊन उत्तर ध्रुवावर पोहोचल्या होत्या. उत्तर ध्रुवावर पोहोचणारी ती पहिली महिला ठरली होती. ब्रिटिश समन्वेषक रॉबर्ट स्वान हे ११ जानेवारी १९८६ रोजी दक्षिण ध्रुवावर पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी उत्तर ध्रुवावरील सफरीचे आयोजन करून १४ मे १९८९ रोजी त्यांनी ते उद्दिष्टही साध्य केले. त्यामुळे दोन्ही ध्रुवांवर चालणारी ती पहिली व्यक्ती ठरली.
अनेक भारतीय व्यक्तींनीही उत्तर ध्रुवावर जाण्याचे धाडस केलेले आहे. अजीत बजाज हे स्कीच्या साहाय्याने उत्तर ध्रुवावर जाणारे पहिले भारतीय साहसवीर होत (१९९५). पुणे येथील खेळाडू, धाडशी स्कायडायव्हर (पॅरशूट जंपर), पद्मश्री पुरस्कार विजेत्या शीतल महाजन-राणे यांनी १८ एप्रिल २००४ रोजी उत्तर ध्रुवावर हवाई छत्रीमधून (पॅरशूटमधून) उडी मारण्याचा विक्रम केला. त्यानंतर स्क्वाड्रन लीडर संजय थापर हेही उत्तर ध्रुवावर पोहोचले होते. भारतीय नौसेना संघाने २००८ मध्ये उत्तर ध्रुवाची यशस्वी सफर करून इतिहासच घडविला. जुलै २००९ मध्ये बद्री नारायन बाल्दावा आणि पुष्पा बाल्दावा हे पहिले भारतीय दांपत्य उत्तर ध्रुवावर पोहोचले. हरयाणा राज्यातील ताशी आणि नुंगशी मलिक या, तर सप्त शिखरांवर चढाई करून नंतर दक्षिण ध्रुवावर (डिसेंबर २०१४) आणि उत्तर ध्रुवावर (एप्रिल २०१५) पोहोचणाऱ्या आणि ‘साहसी ग्रँड स्लॅम’ व थ्री पोल्स चॅलेंज’ पूर्ण करणाऱ्या पहिल्या जुळ्या भगिनी होत. राम गोपाळ कोठारी यांनी जुलै २०२५ मध्ये भौगोलिक उत्तर ध्रुवावरील मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केली.
आज मोठ्या, शक्तिशाली बर्फफोडी बोटींच्या साहाय्याने उत्तर ध्रुवाभोवतालच्या महासागरातून माल वाहतूक करणाऱ्या व लष्करी जहाजांसाठी वाहतूक मार्ग तयार केले जातात. आशिया, उत्तर अमेरिका व यूरोप यांच्या दरम्यान खनिज तेल, नैसर्गिक वायू, खनिजे, धान्य इत्यादी मालाची वाहतूक करणारी जहाजे वाहतूक खर्च वाचविण्यासाठी तुलनेने जवळच्या उत्तरेकडील ध्रुवीय सागरी व्यापारी मार्गाचा वापर करतात.
संदर्भ : Kagge, Erling, The North Pole, Penguin, 2025.
समीक्षक : शंकर चौधरी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.