स्वरूप व व्याख्या : आंतरराष्ट्रीय परिचर्या परिषद ही जगभरातील परिचारिकांच्या हितासाठी कार्य करणारी पहिली आंतरराष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेची स्थापना १८९९ मध्ये झाली असून तिचे मुख्यालय स्वित्झर्लंड मधील जिनीव्हा येथे आहे. ही संस्था १४० पेक्षा अधिक राष्ट्रीय परिचर्या संघटना एकत्र येऊन हा महासंघ तयार झाला आहे. ही संस्था तीन कोटीपेक्षा जास्त परिचारिकांचे प्रतिनिधित्व करते.

स्थापना व संस्थापक : इ. स. १८९९ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषदेमध्ये एथेल गॉर्डन फेनविक (व्यावसायिक ओळख : श्रीमती बेडफर्ड फेनविक) यांनी परिचर्या प्रश्नांवर विचार होण्यासाठी प्रस्ताव मांडला. सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी परिचर्या शिक्षणाचा तसेच व्यावसायिक नीतिमत्तेच्या मानकांचा दर्जा सुधारणे हा मुख्य उद्देश समोर ठेवून त्यासाठी परिचारिकांच्या राष्ट्रीय संघटनांचे जाळे तयार करणे, हा यामागील मुख्य हेतू होता. हा प्रस्ताव सादर केल्यानंतर एक तात्पुरती समिती स्थापन करण्यात आली आणि १९०० मध्ये पहिले संविधान व अधिकारी निवडले गेले. पॅन अमेरिकन एक्सपोजन येथे १९०१ मध्ये पार पडलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिचर्या परिषदेमध्ये परिचारिका नोंदणीच्या बाजूने ठराव मंजूर केला गेला.

प्रमुख्य मूल्ये : भारतीय परिचर्या परिषद (Indian Nursing Council; INC) ही परिचारिका संसाधनांचे वाटप, आरोग्य सेवा आणि इतर सामाजिक व आर्थिक सेवांमध्ये समानता आणि सामाजिक न्यायाची देखरेख किंवा संवर्धन करते. परिचारिका शुश्रुषा करताना रुग्णाप्रति आदर, प्रतिसाद, करुणा, विश्वासार्हता आणि सचोटी यासारख्या व्यावसायिक मूल्यांचे पालन करते.

ध्येय (Mission) : परिचर्या व्यवसायाचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणे, व्यवसायाच्या उन्नतीसाठी परिचारिकांच्या कल्याणाला प्रोत्साहन देणे आणि आरोग्याचा पुरस्कार करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय आहे.

उद्देश (Vision) : जागतिक समुदायाकडून परिचारिकांना आणि परिचर्या व्यवसायाला मान्यता व पाठिंबा मिळावा तसेच सर्वांसाठी आरोग्य सेवा साध्य करण्यासाठी परिचर्या व्यवसायात गुंतवणूक करणे हा उद्देश्य समोर ठेऊन ही संस्था कार्य करत असते.

मूलभूत उद्दिष्टे :

  • जागतिक स्तरावर परिचर्या व्यवसाय, आरोग्य आणि सामाजिक धोरणांवर प्रभाव टाकून परिचारिकांचा व्यवसायिक, सामाजिक आणि आर्थिक दर्जा वाढविणे.
  • परिचारिकांची शुश्रूषेतील कार्यकुशलता व दर्जा उंचावण्यासाठी राष्ट्रीय परिचारिका संघटनांना साहाय्‍य करणे.
  • प्रभावी राष्ट्रीय परिचारिका संघटना उभारण्यासाठी प्रोत्साहन देणे.
  • परिचर्या आणि परिचारिकांचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणे.
  • परिषदेच्या कामकाजासाठी व परिचारिकांच्या हितासाठी निधी उभारणे व त्याचा योग्य विनियोग करणे.
संघटनात्मक तक्ता

सदस्यत्व : राष्ट्रीय परिचारिका संघटनेचे सदस्यत्व असलेली कोणत्याही देशातील पुरुष किंवा महिला परिचारिका हे सर्वसाधारणपणे आपणहूनच आंतरराष्ट्रीय परिचर्या परिषदेचे सदस्य होतात. व्यक्तिगत पातळीवर या संघटनेचे सदस्यत्व घेता येत नाही.

सदस्यत्वाचे निकष व प्रकार : यामध्ये युती किंवा मैत्री आणि पारंपरिक असे दोन प्रकार आहेत.

  • युती / मैत्री (Alliance) : एखाद्या देशांतर्गत असणाऱ्‍या विविध राष्ट्रीय परिचारिका संघटना जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठी एकत्र येऊन युती करतात व या संघटनेचे सदस्यत्व घेतात. या युतीमार्फत राष्ट्रीय सर्वसमावेशक अधिकारी (national generalist) व तज्ञ गट (specialist group) नेमला जातो.
  • पारंपरिक (Traditional) : या श्रेणी अंतर्गत एखाद्या देशातील राष्ट्रीय परिचारिका संघटना ही त्या देशाचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करते. जर राष्ट्रीय परिचारिका संघटना ही त्यांच्या देशातील सहा टक्के किंवा त्यापेक्षा अधिक परिचारिकांचे प्रतिनिधित्व करत नसेल तर त्याव्यतिरिक्त संख्येची आवश्यकता पूर्ण करणारी, तसेच राष्ट्रीय परिचारिका संघटनेची आवश्यक संख्या पूर्ण करणाऱ्या संघटना (National Nurse Academy; NNA) देखील सहभागी होऊ शकतात.

सदस्यत्वाचे फायदे :  

  • ICN चे सदस्य म्हणून राष्ट्रीय परिचारिका संघटनांना जगातील सर्वोच्च धोरण ठरविण्याचा अधिकार मिळू शकतो. ICN च्या कामातील त्यांचे योगदान जागतिक रणनीतीस आकार देण्यास, परिचर्या व्यवसाय परिभाषित करण्यास, परिचर्या नेतृत्व तयार करण्यास व जगभरातील व्यवसायाला बळकटी देण्यास मदत करते. ICN चे संशोधन, आभासी चर्चासत्र (वेबिनार) आणि कार्यक्रम देशातील कामकाजाची स्थिती आणि आरोग्य संबंधीचे परिणाम सुधारण्यास मदत करतात.
  • ICN च्या जागतिक अनुभवाच्या व कौशल्याच्या आधारे NNA ला त्यांच्या शासनासोबत धोरणनिश्चितीसाठी, त्यांचे काम प्रकाशित करण्यासाठी आणि उच्चस्तरीय कार्यक्रमांमध्ये सहभाग मिळविण्यासाठी तज्ञांचे समर्थन मिळते.
  • ICN सदस्यत्वाचा भाग म्हणून NNA स्वतःचे ज्ञान व कौशल्य जागतिक स्तरावर मांडू शकतात. तसेच गंभीर आणि वर्तमान माहितीमध्ये सहभागी होण्याचा विशेषाधिकार प्राप्त होतो. ICN च्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात.

संघटनेची रचना व कार्यकारिणी :

ICN ची एक श्रेणीबद्व रचना आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय परिचारिका संघटनांच्या प्रतिनिधींचे प्रशासकीय मंडळ (Council of National Representatives; CNR) हे  अधिसदस्य मंडळ असते, जे १२ सदस्यीय संचालक मंडळाची निवड करते. या मंडळाचे अध्यक्षच संचालक मंडळाचे प्रमुख असतात. तीन उपाध्यक्ष आणि आठ सदस्य हे ICN च्या भौगोलिक क्षेत्रामधून निवडून आलेले असतात. ICN परिषद झााल्यानंतर लगेचच ICN अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली CNR ची बैठक दर दोन वर्षांनी होते.

दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन जिनीव्हा मुख्यालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्‍यांमार्फत केले जाते. ज्यामध्ये (१) वित्त आणि कार्यकारी, (२) परिचर्या, (३) संवाद आणि कार्यक्रम या तीन मुख्य विभागांचा सहभाग असतो.

कामाचे स्वरुप :

परिचर्या व्यवसाय पुढे नेणे, परिचारिकांची उन्नती करणे व सर्वांसाठी आरोग्य हे मुख्य ध्येय अनुसरून ICN कार्य करते. यामध्ये प्रामुख्याने ध्येयधोरणे ठरविणे, जागतिक आरोग्यासाठी भागीदारी, नेतृत्व प्रस्थापित करणे, संघटनेचे जाळे पसरविणे इत्यादींचा अंतर्भाव असतो.

  • जागतिक आरोग्य (Global Health) : सर्वांना आरोग्य साध्य करण्यासाठी आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक ध्येयधोरणे तयार करण्यामध्ये जागतिक आणि क्षेत्रीय स्तरावर सहभागी असणे .
  • विधाने (Statements) : भूमिका स्पष्ट करणे; जागतिक आरोग्य आणि परिचर्या व्यवसायाशी निगडित वर्तमान विषयावर तसेच एखाद्या गंभीर समस्यांवरील ICN ची भूमिका स्पष्ट करणे.
  • पारिस्थितिक विधाने (Situational Statements) : १४० पेक्षा अधिक राष्ट्रीय परिचारिका संघटनांचे महासंघ म्हणून आणि जगभरातील लाखो परिचारिकांचा आवाज म्हणून ICN आरोग्य, कल्याण व व्यावसायिक प्रगतीशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये तोडगा काढण्यासाठी परिस्थितीनुसार विधाने वापरते. जे विशिष्ट विषयांवर मार्गदर्शन आणि भूमिका स्पष्ट करतात.
  • नियमन आणि शिक्षण (Regulations & Education) : परिचर्या व्यवसायाचे नियमन, आचरण, शिक्षण आणि सराव यासाठी मानके स्थापित करून आणि त्यांची अंमलबजावणी करून सामाजिक आरोग्याचे संरक्षण करते.
  • सामाजिक – आर्थिक कल्याण (Social-economic welfare) : ICN जगभरात परिचर्या, आरोग्य आणि सामाजिक धोरणावर तसेच व्यावसायिक आणि सामाजिक – आर्थिक मानकांना प्रोत्साहन देते व प्रभावित करते.
  • परिचर्या विद्यार्थी (Nursing student) : ICN सर्व स्तरावरील परिचर्या विद्यार्थ्यांच्या योगदानाला महत्त्व देते. ICN च्या व्याख्येनुसार परिचर्या विद्यार्थी यामध्ये पदवीपूर्व, पदवी, पदव्युत्तर या सर्वांचा समावेश होतो.
  • धोरणे आणि विषय संक्षिप्त (Policy & topic briefs) : परिचर्या आणि जागतिक आरोग्य विषयावर आधारित आणि धोरण विकासावर प्रभाव टाकण्यासाठी तयार केलेल्या कृती करण्यायोग्य उपायांचे सादरीकरण करतात. आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या समस्या आणि नवीन प्रवाह यांबद्दल उपयुक्त माहिती देतात. ज्यामध्ये परिचर्येचे महत्त्व अधोरेखित केलेले असते.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यपद्धती : आंतरराष्ट्रीय स्तरावर सकारात्मक संबंध प्रस्थापित करणे, ही प्रक्रिया परिचर्या व्यवसायाला सध्याच्या आणि भविष्यातील स्थितीसाठी मदत करते. ICN चे वाढते जाळे आणि सामाजिक संबंध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिचर्या व व्यतिरिक्त संघटनांशी मजबूत संबंध असण्याचे महत्त्व अधोरेखित करते.

संयुक्त राष्ट्रांच्या विशेष संस्था या विशेषत: जागतिक आरोग्य संघटनेसोबत परिचर्या आणि प्रसूतिशास्त्रासाठी जागतिक धोरणात्मक दिशा २०२१-२५, प्रगत परिचर्या सराव, रुग्ण सुरक्षा, असंसर्गजन्य रोग व मानसिक आरोग्य, प्रााथमिक आरोग्य सेवा, संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण तसेच हवामान बदल आणि आरोग्य  या महत्त्वाच्या विषयांवर कार्य करते.

ICN आणि संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांमधील सहयोग – आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO), जागतिक बँक (World Bank), युनेस्को, युनिसेफ तसेच राष्ट्रीय, प्रादेशिक, आंतरराष्ट्रीय परिचर्या व इतर संघटनांशी सक्रीय कार्य करते. यामध्ये अर्थशास्त्र, धोरण विकास, कार्यबल, लैंगिक समानता, शिक्षण, हवामान बदल व ग्रहविषयक आरोग्य, वकिली, महिला सक्षमीकरण, शांतता व शांतता शिक्षण, संसाधनांमधील विषमता, आरोग्य आणि त्यांचे सामाजिक निर्धारक, शाश्वत विकास उद्दिष्ट्ये इ. बाबींचा समावेश आहे.

आरोग्य क्षेत्रातील सर्वांत मोठा आरोग्य व्यवसाय म्हणून परिचारिका या देशांना शाश्वत विकास उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या क्षमतेशी आंतरिक रीत्या (intrinsic) जोडलेल्या आहेत. संयुक्त राष्ट्र महासभा (U N general assembly), जागतिक आरोग्य सभा (World Health Assembly) आणि महिला स्थितीवरील आयोग (Commission for the Status of Women) यासांरख्या प्रमुख संस्थांच्या विविध बाजूने आणि समांतर कार्यक्रमांचे आयोजन करते.

संदर्भ :

  • Perry, A. G.; Potter, P. A. Fundamental of Nursing, 9thed., 2016.
  • www.icn.ch

समीक्षक : सरोज वा. उपासनी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.