निंबाळकर, सदाशिव प्रल्हाद : (२७ जुलै १९२६ – ३० सप्टेंबर २०२१). भारतीय योगाचार्य आणि मुंबईतील ‘योग विद्या निकेतन’ संस्थेचे संस्थापक. निंबाळकर गुरुजी म्हणून प्रसिद्ध. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना व्यायाम, खेळ आणि शारीरिक शिक्षणाची आवड होती. बी.एड्. आणि एम.ए. पूर्ण केल्यानंतर अहिल्यानगर येथे काही काळ त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. पुढे त्यांनी हिंदी शिक्षक सनद तसेच ‘शारीरिक शिक्षण प्रशिक्षण संस्था, कांदिवली (मुंबई)’ या शासकीय संस्थेतून डी.पी.एड्. पदविका प्राप्त केली. त्यानंतर गिरगाव, (मुंबई) येथील मारवाडी कमर्शियल हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. तेथूनच ते ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर उपप्राचार्य म्हणून निवृत्त झाले (१९८४).

मुंबईत असताना त्यांची ‘कैवल्यधाम’ या योगसंस्थेचे संस्थापक-संचालक स्वामी कुवलयानंद यांच्याशी भेट झाली. त्यानंतर योग अभ्यास हे त्यांच्या जीवनाचे ध्येय ठरले. त्यानंतर त्यांनी तेरा वर्षे कैवल्यधाम संस्थेच्या चर्नीरोड, मुंबई तसेच लोणावळा या केंद्रांमध्ये योग शिक्षक म्हणून काम केले.

स्वामी कुवलयानंदांनी योगाचा वैज्ञानिकदृष्ट्या तौलनिक अभ्यास, तसेच आधुनिक तंत्रज्ञान आणि वैद्यकीय उपकरणांचा वापर करून योगाचा रोगनिवारण आणि आरोग्य रक्षणासाठी उपयोग यादृष्टीने अभ्यास केला होता. त्यांचा हा वारसा निंबाळकर गुरुजींनी पुढे चालवला. स्वामीजींच्या पश्चात त्यांनी पत्नी शकुंतला निंबाळकर व सहकाऱ्यांसह २४ मार्च १९७४ रोजी ‘योग विद्या निकेतन’ संस्थेची स्थापना केली.

निंबाळकर गुरुजींनी स्वामी कुवलयानंदानी पुरस्कृत केलेल्या अभ्यासक्रमात भर घालून नवीन चार भागांत विभागलेला क्रमान्वित योग अभ्यासक्रम तयार केला. त्यांनी सदैव पारंपरिक हठयोगाचाच आधार घेतला. सूर्यनमस्कार व योगाभ्यास हे दोन्ही प्रकार जरी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असले तरीही या दोहोंचे शरीरावर होणारे परिणाम अतिशय भिन्न आहेत. सूर्यनमस्कारात श्वासाची गती वाढते, तर योगासने करताना श्वासाची गती कमी होते आणि म्हणूनच या दोन्ही प्रकारांची सरमिसळ करणे चुकीचे आहे, असे निंबाळकर गुरुजींचे मत होते. दोन्ही प्रकार अभ्यासताना त्यामध्ये किमान अर्धा तास तरी अंतर असावे, असे ते नेहमीच सांगत. ते सूर्यनमस्काराला एक सर्वांगीण व्यायाम प्रकार आणि सूर्योपासना मानत होते. सूर्यनमस्कारांचा योगाभ्यास म्हणून समावेश केला गेला नाही, तरी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना ते सूर्यनमस्कार शास्त्रोक्त पद्धतीने शिकवीत असत. म्हणूनच सर्वांसाठी स्वास्थ्यसंवर्धक आणि सर्वांगीण व्यायाम म्हणून सूर्यनमस्काराचा ‘निसर्गोपचार पदविका अभ्यासक्रमात’ समावेश केला आहे.

योग प्रसारासाठी निंबाळकर गुरुजींनी अनेक उपक्रम राबविले. यामध्ये त्यांनी योगविषयक विविध कार्यशाळा घेतल्या, वर्तमानपत्रांतून योगाचे महत्त्व सांगणारे लेख लिहिले. विशेष उल्लेखनीय म्हणजे ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये वर्षभर प्रसारित झालेली ‘आरोग्यासाठी योग’ ही लेखमालिका (१९७६). याचदरम्यान प्रथम मुंबई दूरदर्शनवर मराठीतून व त्यानंतर दिल्ली दूरदर्शनने देखील गुरूजींना हिंदीतून योगविषयक कार्यक्रम सादर करण्यास आमंत्रित केले होते. या उपक्रमाद्वारे निंबाळकर गुरुजींनी प्रसारित केलेल्या ‘योग विद्या घरोघरी’ या घोषवाक्याला एकप्रकारे बळकटी लाभली.

निंबाळकर गुरुजींनी ‘प्राणायाम’ (राज्य पुरस्कार १९८४-८५), ‘आरोग्यासाठी योग’ (राष्ट्रीय पुरस्कार १९७७), ‘अस्थमा आणि योग’, ‘महिलांसाठी आनंददायी योग’, ‘ध्यानसाधना’ इ. एकूण २९ योगविषयक पुस्तके लिहिली.  विविध संस्थांनी त्यांच्या अभ्यासक्रमातही या पुस्तकांचा आवर्जून समावेश केलेला आढळतो. त्यांचे ‘आरोग्यासाठी योग’ हे पुस्तक तर आजही योगविषयक साहित्यातील एक मापदंड समजले जाते.

निंबाळकर गुरुजींनी योगासने, प्राणायाम, बंध, मुद्रा, ध्यान याचबरोबर हठयोगातील शुद्धिक्रिया म्हणजेच षट्कर्मांचे आरोग्यविषयक महत्त्व ओळखून ते योग अभ्यासक्रमात समाविष्ट केले. योगाचे अंतिम ध्येय जरी कैवल्य किंवा मोक्षप्राप्ती असले, तरी अष्टांगयोग साधनेतील या प्रवासात यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान यातून उत्तम शारीरिक व मानसिक आरोग्याची प्राप्ती होते, असे त्यांचे मत होते. त्यांनी योगप्रसार करताना आपले ध्येय इतपतच सीमित ठेवून यातून सुदृढ व समाधानी समाज निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करण्यावर भर दिला.

निंबाळकर गुरुजींनी प्राणधारणा, सजग भेदात्मक शिथिलीकरण, यौगिक हालचाली, आसनांमध्ये अर्ध, पूर्व सारखे सुलभ पर्याय तसेच योगाचे शरीरांतर्गत स्थानीय, सह व केंद्रीय असे परिणामाचे वर्गीकरण; शिवाय अत्यावश्यक, साहाय्यक व पारंपरिक असे तंत्रांचे वर्गीकरण इ. योगात अंतर्भूत करून योगाप्रति बहुमूल्य योगदान दिले. यामुळे पारंपरिक योग तंत्राचे सुलभीकरण करून सर्वसामान्य लोकांना योगाबद्दल मार्गदर्शन करणे अत्यंत उपयुक्त ठरले. योगाबरोबरच निंबाळकर गुरुजींचा निसर्गोपचारावर विश्वास होता. त्यांनी २००० मध्ये ‘योग उपचार, निसर्ग जीवनशैली व निसर्गोपचार’ हा अभ्यासक्रम योग शिक्षकांसाठी सुरू केला. ‘योग प्रशिक्षक अभ्यासक्रम’ या पदविका अभ्यासक्रमानंतर ‘योग विद्या निकेतन’चा योग शिक्षकांसाठीचा हा प्रगत पदविका अभ्यासक्रम आहे.

निंबाळकर गुरुजींचा नवी मुंबई महानगरपालिकेने ‘नवी मुंबई रत्न’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला (२००२-०३). तसेच भारत सरकारने ३० जून २००४ रोजी त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्यांच्या योगप्रसार कार्याचा गौरव केला.

वयाच्या ९५ व्या वर्षी मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • निंबाळकर, सदाशिव प्र., ‘आरोग्यासाठी योग’, योग विद्या निकेतन, मुंबई, २०१६ (२३ वी आवृत्ती).
  • Tawde, Nitin, Legacy Series : Yoga Vidya Niketan, Yogavani, May 2021.

समीक्षक : दुर्गादास सावंत


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.