इंडोनेशिया येथील एक पुरातत्त्वीय स्थळ. २००४ मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून पूर्व इंडोनेशियातील फ्लोरेस बेटावर एका अनपेक्षित आणि महत्त्वपूर्ण शोधामुळे पुरामानवशास्त्रातील मानवी उत्क्रांती आणि स्थलांतर यांविषयी अनेक प्रश्न उभे झाले. या बेटावर लिआंग बुआ गुहा, माता मेंगे आणि वोलो सेगे येथे झालेल्या उत्खननांतून अनेक महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले.

नव्याने मिळालेले फ्लोरेस मानवाचे जीवाश्म (दंडाचे हाड, छोटे दात), माता मेंगे (इंडोनेशिया). (After Yousuke Kaifu et al. 2024)

फ्लोरेस बेटावर १९५६ मध्ये विलुप्त झालेल्या विशाल हत्तीचे जीवाश्म सापडले आणि या महत्त्वपूर्ण शोधाची सुरुवात झाली. नंतर १९६४ मध्ये विलुप्त झालेल्या पिग्मी हत्तीचे जीवाश्म मिळाले, ज्याचे नामकरण Stegodon trigonocephalus florensis असे केले. या नंतर १९७० मध्ये येथे काही दगडी हत्यारे मिळाली, परंतु हत्तीचे जीवाश्म आणि दगडी हत्यारे हे नक्की कोणत्या स्तरातून मिळाले याबद्दल संदिग्धता होती. १९८० मध्ये तांगी तालो येथे विशाल कासव आणि पिग्मी हत्तीचे मिळून एकूण ८० जीवाश्म मिळाले. १९९० ते १९९१ या दरम्यान इंडोनेशिया आणि डच शास्त्रज्ञांनी मिळून जीवाश्म आणि दगडी हत्यारे मिळालेल्या स्थळांचा शोध घेऊन नव्याने अभ्यास केला. याच दरम्यान १९९४ मध्ये माता मेंगे येथे ४५ दगडी हत्यारे आणि विशाल हत्तीचे जीवाश्म एकाच स्तरातून मिळाले आणि त्यांचे सहअस्तित्व हे सिद्ध झाले. २००१-२००४ या काळात लिआंग बुआ गुहेमध्ये केलेल्या उत्खननातून फ्लोरेस मानवाचे जीवाश्म मिळाले आणि मानवी उत्क्रांतीसंबंधी एक नवीन अध्याय  सुरू झाला.

लिआंग बुआ (Liang Bua): फ्लोरेस बेटाच्या पश्चिम भागातील या चुनखडीच्या गुहेत ऑस्ट्रेलियन पुरातत्त्वज्ञ मायकेल मोरवूड यांच्या नेतृत्वाखालील एका चमूला जवळजवळ पूर्ण असा एका स्त्रीचा सांगाडा (एलबी १), अनेक प्राण्यांची अश्मीभूत हाडे आणि अश्मयुगीन दगडी हत्यारे सापडली. पीटर ब्राउन या सदस्याने या मानवी सांगाड्याचे वर्णन आणि विश्लेषण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. एलबी १ ही स्त्री लहान देहयष्टीची (पिग्मी/बुटकी) म्हणजे एक मीटर उंचीची होती, त्यामुळे या स्त्रीला हॉबिट/फ्लोरेस मानव असे नाव दिले गेले. या व्यतिरिक्त दोन मानवी सांगाडे मिळाले आहेत (एलबी २, एलबी ३). अनेक अश्मीभूत दात आणि अश्मीभूत मानवी हाडे विखुरलेली मिळाली आहेत. हे मानवी जीवाश्म ८ ते १० मानवांचे असावेत, असा अंदाज बांधला गेला.

लिआंग बुआ गुहेतील (२००१-२००४; २००७-२०१४ या काळात) १२ ते १५ मी. जाडीच्या गाळाच्या उत्खननातून १० मुख्य स्तरांमध्ये विभागणी केली (एलबी १ ते एलबी १०). यातील स्तर क्रमांक एलबी ५ आणि एलबी ६ मध्ये फ्लोरेस मानवाचे जीवाश्म सापडले आणि एलबी ७ ते एलबी ९ या स्तरातून दगडी हत्यारे मिळाली. फ्लोरेस जीवाश्म मिळालेल्या स्तरांचे कालमापन थोरियम-युरेनियम (230Th/234U) पद्धतीने १,००,००० ते ६०,००० वर्षपूर्व असून दगडी अवजारे सु. १,९०,०० ते ५०,००० वर्षपूर्व या काळातील आहेत.

माता/माटा मेंगे (Mata Menge): फ्लोरेस बेटाच्या मध्य भागातील सोओ नदीच्या खोऱ्यातील माता मेंगे या ठिकाणी २०१४ मध्ये झालेल्या उत्खननातून मानवी जबड्याचे तुकडे, लहान दात, दंडाचे हाड (humerus), दगडी हत्यारे आणि प्राण्यांचे जीवाश्म (विशालकाय हत्ती, विशाल कासव, मोठे उंदीर) मिळाले.  दंडाच्या हाडाचे जीवाश्म एका प्रौढ व्यक्तीचे असून त्याचा आकार ६०,००० वर्षपूर्व कालमापन असलेल्या फ्लोरेस जीवाश्मापेक्षा ९ ते १६ टक्क्यांनी लहान आहे. तसेच येथे मिळालेले मानवी दातही आकाराने लक्षणीयरीत्या लहान आहेत, परंतु त्यातील एक दात इरेक्टस मानवाच्या दातांशी साध्यर्म दर्शवितो. एका संशोधनानुसार हे मानवी जीवाश्म किमान ७ लाख वर्षपूर्व जुने आहेत. यावरून असे अनुमान केले आहे की, पिग्मी/लहान देहयष्टीची प्रजाती इरेक्टस मानवापासून विकसित झाली आणि फ्लोरेस बेटावर मध्य प्लाइस्टोसीन काळापासून ती दीर्घकाळ अस्तित्वात होती.

वोलो सेगे (Wolo Sege): सोआ नदीच्या खोऱ्यात २००५ मध्ये वोलो सेगे येथे उत्खननातून ४८ दगडी हत्यारे मिळाली. या दगडी हत्यार समूहात प्रामुख्याने आकाराने लहान असलेली छिलके आणि काही दुधारी (bifacial) हत्यारे मिळाली. छिलके कोणत्या अश्मयुगीन संस्कृतीचे आहेत हे सांगता येणे कठीण आहे. तर दुधारी हत्यार (pick) हे अश्युलियन संस्कृतीचे आहे का याविषयी तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. ही हत्यारे तयार करण्यासाठी रूपांतरित ज्वालामुखीय खडकाचा वापर केला आहे. तर काही छिलके गारेच्या दगडाचे (chalcedony) बनविले आहेत. ही हत्यारे ज्या स्तरातून मिळाली त्याच्या वरच्या ज्वालामुखीय खडकाच्या (इग्निम्ब्राइट) स्तराचे कालमापन एक दशलक्ष आहे. त्यामुळे ही दगडी हत्यारे फ्लोरेस बेटावरील सर्वांत जुनी आहेत असे म्हणतात.

फ्लोरेस बेटावरील वरील तीन ठिकाणी मिळालेले मानवी जीवाश्म, मानवाने तयार केलेली दगडी हत्यारे आणि प्राण्यांचे जीवाश्म यांवरून निश्चितपणे असे म्हणता येते की, या दुर्गम बेटावर लहान देहयष्टी असणारे मानव आणि प्राणी यांचे सहअस्तित्व १० लाख वर्षांपासून होते. हॉबिट मानवाने या काळात पर्यावरणीय बदलांना सामोरे जात आपले अस्तित्व टिकवले. त्यामुळेच हे पुरावे मानवी उत्क्रांती आणि मानव–पर्यावरण परस्परसंबंधांच्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. परंतु या संशोधनातून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत : फ्लोरेस मानव कसा विकसित झाला असावा? त्याचे पूर्वज कोण असावेत? ते फ्लोरेस बेटावर कसे पोहचले? बेटावर सतत होणाऱ्या पर्यावरणीय बदलांमुळे फ्लोरेस मानव लुप्त झाला का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे भविष्यात मिळतील अशी आशा आहे.

संदर्भ :

  • Anneke H. van Heterena & John de Vosb, ‘Stone implements from Java and Flores: A history of the discoveries’, Comptes Rendus Palevol, 11: 181-189. 2012. https://doi.org/10.1016/j.crpv.2011.07.006
  • Brumm, A.; Jensen, G.; van den Bergh, G.; Michael J. Morwood; Iwan Kurniawan; Fachroel Aziz & Michael Storey, ‘Hominins on Flores, Indonesia, by one million years ago’. Nature 464, 748–752, 2010. https://doi.org/10.1038/nature08844
  • Thomas Sutikna; Matthew W. Tocheri; Michael J. Morwood; E. Wahyu Saptomo; Jatmiko; Rokus Due Awe; Sri Wasisto; Kira E. Westaway; Maxime Aubert; Bo Li; Jian-xin Zhao; Michael Storey; Brent V. Alloway; Mike W. Morley; Hanneke J. M. Meijer; Gerrit D. van den Bergh; Rainer Grün; Anthony Dosseto; Adam Brumm; William L. Jungers and Richard G. Roberts, ‘Revised stratigraphy and chronology for Homo floresiensis at Liang Bua in Indonesia,’ Nature 532: 366–369.,2016.
  • Yousuke Kaifu; Iwan Kurniawan; Soichiro Mizushima; Junmei Sawada; Michael Lague; Ruly Setiawan; Indra Sutisna; Unggul P. Wibowo; Gen Suwa; Reiko T. Kono; Tomohiko Sasaki; Adam Brumm, & Gerrit D. van den Bergh, ‘Early evolution of small body size in Homo floresiensisNature Communications 15 (1), 2024.  https://www.nature.com/articles/s41467-024-50649-7

समीक्षक : जयेंद्र जोगळेकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.