(स्थापना : १९५८). स्थापनेवेळीचे नाव – सेन्ट्रल पब्लिक हेल्थ इंजिनिअरींग इन्स्टिट्यूट; सीफेरी – CPHERI. वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदच्या (कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च; ‘सीएसआयआर’) आधिपत्याखाली नीरीचे काम चालते. तसेच विज्ञान आणि प्रौद्योगिकी मंत्रालय, भारत केंद्र सरकारकडून तिचे नियंत्रण होते. निरीचे मुख्यालय नागपूर आणि पाच क्षेत्रीय कार्यालय मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकता आणि हैदराबाद येथे आहेत.
स्वत्रंत भारतात उद्योगक्षेत्रासोबतच कारखान्यांची संख्या, विशिष्ट भूप्रदेशांवरील घनता आणि त्यांचे प्रकार यात भर पडत होती. पर्यावरण समस्या जीवशास्त्रीय आणि रासायनिक दृष्ट्या सोडवणे जटील होत होते. त्यामुळे पर्यावरणासंबंधी समस्यांना तोंड देण्यासाठी १९७४ मध्ये सीफेरीचे नाव बदलून नीरी करण्यात आले आणि त्यांची कार्यकक्षा वाढविण्यात आली.
सध्या पर्यावरण रक्षण, अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी आधुनिक तंत्र विकसित करणे ही नीरीची जबाबदारी आहे. परिसरातील सरकारी आस्थापनांना संशोधनाचा फायदा उपलब्ध करून देणे हा संस्थेच्या कामाचा भाग आहे. समान उद्देश असणाऱ्या अन्य संस्थांना मदत करणे आणि मदत घेणे असे कामही नीरी नियमितपणे करते. वैज्ञानिक, अभियांत्रिकी आणि तांत्रिक उच्चतम गुणवत्ता मिळवत राहणे आणि शाश्वत विकासासाठी त्या गुणवत्तेचा वापर करणे यासाठी नीरी सतत प्रयत्न करत राहते. ग्रामीण, शहरी, निमशहरी नागरी वस्तीतील हवेचे, पाण्याचे प्रदूषण रोखणे, घटवणे आणि टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे आणि ते गरजू संस्थांना देणे हा नीरीच्या कामाचा एक भाग आहे.

नीरीच्या संशोधकानी विविध संशोधनावर एकस्वे (पेटंट) मिळवली आहेत. उदा., निर्धूर चूल, कमी प्रदूषणकारक आणि अधिक सुरक्षित हरित फटाके. हरित फटाक्यांच्या निर्मितीचे तंत्रज्ञान आठशेच्यावर फटाके-कारखानदारांना दिले आहे. हरित फटाक्यांमागचे विज्ञान प्रत्यक्ष किंवा दूरस्थ व्याख्याने देऊन केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये आणि अन्य इच्छुक, रस घेणाऱ्या शाळांच्या विद्यार्थ्यांना समजवायला सुरुवात केली आहे. गंगा नदीतील घरगुती सांडपाणी, मैला, कचरा व मानवी आणि पाळीव जनावरांचे मृत देह यांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्याकरिता नीरीने ‘नमामी गंगे’ मिशनला साहाय्य केले. तसेच स्वच्छ भारत अभियानामध्येही सहभाग घेतला. नैसर्गिक आपदांमध्ये पिण्यालायक स्वच्छ, निर्जंतुक पाणी उपलब्ध होण्याकरिता ‘निरी-झर’ असे वीज न लागणारे, पाणी गाळणारे उपकरण नीरीने तयार केले आहे. तसेच नीरीने विकसित केलेले विद्युत् अपघटन पद्धत पिण्याच्या पाण्यातील फ़्लुरॉइडचे प्रमाण लिटरला १ मिग्रॅ. इतके कमी करणारी आहे.
कोविड काळात नीरीने विषाणू संक्रामणापासून वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचे संरक्षण करण्यासाठी पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई) संच बनविले. आरटीपीसीआर (कोरोनासाठी) चाचणीसाठीची द्रव्ये, हाताचा स्पर्श न करता हात निर्जंतुक करण्याची उपकरणे, विषाणू प्रतिबंधक गाळण मुखपट्ट्या बनवणे ही नवे काम नीरीने आपातकालात सुरू केले. आरटीपीसीआर चाचणी संदर्भातील आवश्यक रीतसर मान्यता इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून मिळवली. आरटीपीसीआर चाचणीसाठी किंचित मीठमिश्रित पाण्याच्या गुळण्या केल्याने रुग्णाच्या नाकातून नमुनाद्रव्य मिळवणे सोपे होते. हे तंत्र भारतात तर लगेच मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागलेच पण इतर अनेक देशांनीही या बिनखर्चिक, रुग्णस्नेही, केवळ तीन तासात चाचणी निकाल देणाऱ्या पद्धतीचा स्वीकार केला.
सीएसआयआर आणि निरी यांनी संयुक्त प्रयत्नांनी ‘फायटोरीड प्रकल्प’ हाती घेतला. फायटोरीड या नावातच वनस्पतींच्या मदतीने प्रदूषके घटविणे हा उद्देश सुचवला जातो. या तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय एकस्व नीरीला मिळाले. नैसर्गिक पाणथळ जागातील झाडे, रोपे सांडपाण्याचा जगण्यासाठी जसा वापर करतात त्याच तत्त्वावर फायटोरीड प्रकल्प सांडपाण्यातून चांगले पाणी मिळवत आहे. या प्रकल्पाचा हेतू महापालिका, शहरी, औद्योगिक, कृषि क्षेत्रातील सांडपाणी मनुष्य वापरायोग्य करणे. फायटोरीडप्रमाणे नीरीचा आणखी एक प्रकल्प सौर ऊर्जा वापरून पाण्यातील फ़्लुरॉइडचे प्रमाण कमी करणे. फ़्लुरॉइडचे प्रमाण वाढले तर हाडांच्या रचनेवर वाईट परिणाम होतो आणि जन्मभर मुलांना दुर्बल करतो. अधिक खोल कूपनलिकेच्या पाण्यात विरघळलेल्या पाण्यात फ़्लुरॉइडचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते. ग्रामीण भागातील मुलांच्या हाडांवर वाईट परिणाम होऊ नये यासाठी नीरीच्या सौर ऊर्जा वापराने पाण्यातील फ़्लुरॉइड घटवता येते.
तणनाशक रसायननिर्मितीत तयार होणारी प्रदूषके औद्योगिक सांडपाण्यातून आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे कमी करणे नीरीच्या तंत्रज्ञानाने शक्य झाले आहे. उदा., कर्करोगकारक डायॉक्सिन आणि नायलॉन निर्मितीत वापरले जाणारी फ्युरनसारखी संयुगे. ग्रामीण भागात वापरण्यायोग्य ‘नालगोंडा तंत्र’ नीरीने १९७४च्या सुमारास शोधून काढले. त्यात तुरटी, चुना आणि ब्लिचिंग पावडरचा उपयोग करून दोनशेपासून पाच-सात हजारपर्यंत वस्तीच्या गावांना बऱ्यापैकी शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात असे.
नीरीने विषारी आणि धोकादायक पदार्थांच्या कचरा व्यवस्थापनासाठीही तंत्रे विकसित केली आहेत. खाणीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्यातील आर्सेनिकची मात्रा घटविण्यासाठी नीरीने गोव्यात झुआरी उद्योग समूहाला साहाय्य केले. हिंदुस्तान युनिलिव्हर या बहुराष्ट्रीय उद्योग समूहाला त्यांच्या कोडाईकनाल पारा निर्मिती कारखान्यातून होणाऱ्या जमिनीत पारा झिरपण्याच्या प्रदूषणाच्या समस्येवर मात करायला नीरीचा उपयोग झाला. नीरीने हवेतील आर्सेनिक मात्रा तपासण्याचे उपकरण एका ठिकाणाहून सहज दुसरीकडे नेता येते. ते कारखान्यांत भिन्न जागी ठेऊन हवेचे नमुने तपासण्यास उपयुक्त ठरले. नीरी आता सेतूसमुद्रम, नमामी गंगे मिशन, स्वच्छ भारत अभियानसारख्या प्रचंड प्रकल्पांच्या अभ्यासासाठी निवडली जात आहे.
नीरीच्या मुंबई क्षेत्रीय भागाने मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य संपवण्याच्या दृष्टीने एकंदर अकरा मोठे जलाशय, धरणे आणि शुद्धीकरण प्रक्रिया केंद्रे एकमेकांना दोन मीटर वा अधिक व्यासाच्या नळयांनी जोडण्याची योजना आखली आहे. तसेच मुंबई क्षेत्रीय कार्यालयाने न्यायालयाच्या आदेशानुसार २०१८ मध्ये महाराष्ट्रातील २७ प्रमुख शहरांतील आवाजाच्या पातळीचे मापन केले. कामाच्या दिवशी आणि सुटीच्या दिवशी मोटारगाड्यांचे भोंगे कधी किती वाजतात, गाडी चालकांची भोंगे वाजवण्याची पद्धत, भोंग्यांच्या आवाजाची तीव्रता, अनावश्यक कर्कश गोंगाटाचे चालकांवर, रस्त्यावरील लोकांवर, रहदारी पोलिसांवर होणारे परिणाम यांचा अभ्यास करुन प्रत्यक्ष कोणत्या कृती केल्या वा टाळल्या पाहिजेत हे नीरीचे तज्ज्ञ सुचवतात. मुंबईचे क्षेत्रीय कार्यालय मुंबईतील मिठी नदीचा अभ्यास करीत आहे. तसेच भुवनेश्वरमधील तलाव, नाले यांच्या स्वच्छता आणि विकासासाठी नीरी साहाय्य करत आहे.
नागपूर-मुंबई जोडणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे दहा जिल्हे आणि सव्वीस तालुके यांची पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने तपासणी करत राहणे ही नीरीची जबाबदारी आहे. मालाची वा प्रवासाची रेल्वे वाहतूक रस्त्यावरून होणाऱ्या प्रवासापेक्षा कमी प्रदूषणकारक असते, असे मुद्दे नीरी धोरणकर्त्यांच्या आणि सामान्य लोकांच्याही निदर्शनास आणून देते आणि पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करते.
जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, युनायटेड नेशन्स इन्व्हायर्नमेंट प्रोग्राम अशा संस्था नीरीची मदत घेतात आणि विकसनशील देशांतील पर्यावरण समस्यांबद्दल विचार विनिमय करतात. नीरीमध्ये सूक्ष्मजीवशास्त्र, जीवरसायनशास्त्र, जैविक तंत्रज्ञान, रेणवीय जीवशास्त्र, रसायन आणि पर्यावरण अभियांत्रिकी, संगणक तज्ज्ञ, रसायनशास्त्र अशा नाना शाखांतील तज्ज्ञ आहेत. निरीच्या शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांचे शोधनिबंध नियमितपणे प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकांतून प्रकाशित होत असतात. उदा., जर्नल ऑफ हॅझार्डस मटेरियल्स, करंट सायन्स, बायोरेमेडिएशन इत्यादी. जनसामान्यांसाठी नीरीचे एक ज्ञानस्त्रोत केंद्र आहे. ते दर तीन महिन्याला एक इ-पत्रिका हिंदी–इंग्रजी भाषांतून प्रकाशित करते. अन्य भारतीय भाषांतूनही लोकांपर्यंत पोहोचण्याचा नीरी प्रयत्न करते. इ-पत्रिकेत नीरीचे कार्यक्रम, प्रकल्प, प्रशिक्षण वर्ग यांबद्दल माहिती असते. नीरी आणि लहान मोठी सरकारी, निमसरकारी, खासगी आस्थापने–भारतातील आणि परदेशीय आस्थापने यात सामंजस्य करार होत असतात, तंत्रज्ञाने हस्तांतरित होत असतात, त्यांचा लाभ भारताला आणि जगालाही होत असतो.
कळीचे शब्द : #पर्यावरण #तंत्रज्ञान #प्रयोगशाळा #नागपूर
संदर्भ :
- https://www.neeri.res.in/#
- https://www.neeri.res.in/contents/banner_details/phytorid-wastewater-treatment-technology/5b193f6eaacd7#googtrans(en|en)
- https://www.pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=1677727
समीक्षक : मोहन मद्वाण्णा
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.