यामानाका, शिन्या : (४ सप्टेबर १९६२). जपानी वैद्य आणि संशोधक. शरीरातील विद्यमान पेशींपासून मूलपेशी (स्टेम पेशी) निर्माण करण्याची पद्धती त्यांनी विकसित केली. या पद्धतीमध्ये प्रौढ पेशींच्या केंद्रकात (उदा., संयोजी-ऊती पेशी) विशिष्ट जनुक समाविष्ट करून प्रौढ अवस्थेतून बहुशक्तिक (प्लुरिपोटेंट) अवस्थेत पेशी परत येतात. बहुशक्तिक पेशी शरीराच्या इतर पेशी प्रकारात फरक करण्याची क्षमता मिळवितात. त्यामुळे या पेशींना प्रेरित बहुशक्तिक मूलपेशी (प्लुरिपोटेंट स्टेम पेशी; iPS) म्हणतात. परिपक्व अथवा प्रौढ पेशींच्या पुन:कार्यक्रमण करता येण्याच्या शोधासाठी त्यांना ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ सर जॉन बी. गर्डॉन यांच्यासह २०१२ मध्ये शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक या विषयाचे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.

यामानाका यांचा जन्म जपानमधील ओसाका येथे झाला. ओसाका कयाकु विद्यापीठाला संलग्न असलेल्या टेनोजी ज्यूनियर हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यांनी कोबे युनिव्हर्सिटीतून एम.डी. पदवी संपादन केली (१९८७). पुढील दोन वर्षे त्यांनी नॅशनल हॉस्पिटलमध्ये निवासी वैद्यच्या पदावर सेवा दिली. पुढे त्यांनी ओसाका सिटी हॉस्पिटलमध्ये औषधिविज्ञानमध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त केली (१९९३). त्याच वर्षी ते सॅन फ्रान्सिस्को येथील ग्लॅडस्टोन इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हस्कुलर डिसीजमध्ये सामील झाले. तेथे त्यांनी स्पर्धारोधन (नॉक आऊट) उंदरांच्या वेगवेगळ्या जातींमध्ये (ज्या उंदरांमध्ये विशिष्ट जनुकाच्या कार्याची तपासणी करण्यासाठी जनुक निष्क्रिय करतात) सी-मायसी जनुकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. ओसाका सिटी युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत असतांना (१९९६-९९) त्यांनी नारा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये पदभार स्वीकारला. त्याकाळात त्यांचे संशोधन मूलपेशीवर अधिकाधिक केंद्रित केले. क्योटो विद्यापीठातील इन्स्टिट्यूट फॉर फ्रंटियर मेडिकल सायन्सेसमध्येही ते कार्यरत होते (२००४). तेथे त्यांनी पेशींमध्ये बहुशक्तिक निर्माण करण्याचे मार्ग शोधण्यासाठी अभ्यास केले. ग्लॅडस्टोन इन्स्टिट्यूटमध्ये वरिष्ठ तपासनीस म्हणूनही त्यांनी काम केले (२००७).

यामानाका यांना अल्पावधीतच एफबीएक्सओ -१५ जनुक स्पर्धारोधन करण्यात यश मिळाले. स्पर्धारोधन जनुक म्हणजे सजीवातील जनुक निष्क्रिय करणे होय. जनुक निष्क्रिय केल्याने त्यांचे नेमके कार्य समजते. एफबीएक्सओ -१५ जनुक उंदरातील भ्रूण पेशीमध्ये कार्य करते. उंदराच्या स्पर्धारोधन पेशीमधून प्रेरित बहुशक्तिक मूलपेशीची निर्मिती झाल्यावर या जनुकाचे नेमके कार्य समजले. पेशीच्या केंद्रकामध्ये बहुशक्तिक मूलपेशीसाठी नेमका अडथळा कशाचा आहे, हे त्यापूर्वी समजत नव्हते. यामानाका यांच्या प्रयोगशाळेत भ्रूण पेशीप्रमाणे बहुशक्तिक मूलपेशी विकसित करण्यावर संशोधन चालू होते. पेशी केंद्रकाचे कार्यक्रमण पुन्हा करता आले तरच हे शक्य होईल असा अंदाज पूर्वीपासून होता. सामान्य पेशीचे बहुशक्तिक मूलपेशीमध्ये बदल होण्यासाठी चार जनुके आवश्यक असतात, असे समजले. पुढे त्यांना मानवी भ्रूण पेशींची निर्मिती मानवी त्वचेतील तंतुजनक पेशीपासून (फायब्रोब्लास्ट) बनवण्यात यश मिळाले (नोव्हेंबर २००७). यातील पंचवीस टक्के जनुके विषाणूमधून मिळवण्यात आली होती. प्रौढ पेशींच्या केंद्रकांचे पुन:कार्यक्रमण करण्यात हे जनुक मूलभूत भूमिका बजावते. तथापि, बहुशक्तिक मूलपेशी तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान सी-मायसीच्या सक्रियतेमुळे मूलपेशी उंदरांमध्ये प्रत्यारोपित केल्या गेल्या तेव्हा अर्बुदाची निर्मिती झाली. त्यानंतर यामानाका यांनी पेशींना कर्करोगरहित बनवण्यासाठी आणि त्याद्वारे बहुशक्तिक मूलपेशींच्या उपचारात्मक सुरक्षिततेतील एक मोठी चिंता दूर करण्यासाठी सी-मायसीशिवाय बहुशक्तिक मूलपेशी तयार केल्या. साधारणत: २००८ मध्ये त्यांना हे यश मिळाले. औषधविज्ञान आणि उपचारासाठी रुग्णांच्या आवश्यकतेप्रमाणे बदललेल्या भ्रूण पेशी निर्मितीसाठी हे तंत्र अत्यंत उपयोगी ठरणार होते. उदा., कंपवात, मधुमेह अशा आजारांवर सध्या उपलब्ध नसलेले उपचार करणे शक्य होईल असे त्यांना वाटले. अशाच प्रकारचे संशोधन सर जॉन बी. गर्डॉन यांनी १९६२ मध्ये बेडूक माशांच्या आतड्याच्या पेशीपासून नव्या बेडकाची निर्मिती केलेली होती. तर इयान विल्मुट यांनी १९९७ मध्ये पेशी केंद्रक स्थानांतरण केल्याने डॉली मेंढी जन्माला आली.

यामानाका यांना अनेक मानसन्मान आणि पारितोषिके प्रदान करण्यात आली आहे, त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे बीबीव्हीए फाउंडेशन फ्रॉनटियर नॉलेज अॅवार्ड (२०१०), वुल्फ प्राइझ ऑफ मेडिसीन (२०११), मिलेनियम टेक्नॉलॉजी प्राइज (२०१२), जीवविज्ञानातील संशोधनाबद्दल तीन दशलक्ष डॉलरचा पुरस्कार (२०१३)

यामानाका सध्या हिरोशिमा विद्यापीठामध्ये इमिरेटस प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत.

कळीचे शब्द : #मानवी भ्रूण पेशी, संदर्भ –

संदर्भ :

समीक्षक : किशोर कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.