ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबेरी फिन : (१८८४). अमेरिकन साहित्याच्या इतिहासातील महत्त्वाची कादंबरी. मार्क ट्वेन (सॅम्युअल लँगहॉन क्लेमेन्स) (१८३५-१९१०) लिखित ही एक साहसकथा आहे. मिसिसिपी नदीच्या विशाल पात्रातून हकलबेरी फिन आणि पळून आलेला गुलाम जिम यांच्या प्रवासाचे कथन म्हणजे ही कादंबरी. अमेरिकन समाजाचे एकोणिसाव्या शतकातील वास्तव यामध्ये आहे. तत्कालीन अमेरिकन समाजातील दांभिकपणा, वंशवाद आणि तथाकथित सुसंस्कृतपणावर यात भाष्य केले आहे.

प्रस्तुत कादंबरीत मिसिसिपी नदी ही केवळ एक भौगोलिक स्थान म्हणून येत नाही, तर ती एका शक्तिशाली समाजाचे प्रतीकात्मक रूप आहे. नदीकाठचे जीवन हे सुसंस्कृत समाजाचे प्रतीक आहे. ज्या ठिकाणी नियम व कठोर कायदे आहेत त्या ठिकाणी ढोंगीपणा आणि वंशभेदाने ग्रासलेला समाज आहे. विधवा डग्लस आणि मिस वॉटसन यांचे घर, हकचे वडील पॅप फिन यांचे हिंसक वर्तन. आणि समाजातील इतर घटक हे सर्व हकला बंधनात अडकवून ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. याउलट, नदी आणि त्यावरचा तराफा (Raft) हे स्वातंत्र्याचे, नैसर्गिकतेचे आणि खऱ्या मानवतेचे प्रतीक आहेत. तराफ्यावर असताना, हक आणि जिम सामाजिक बंधनांपासून मुक्त होतात. तिथे ना वर्गाचा भेद असतो, ना वंशाचा. ते दोघेही एकमेकांशी समानतेने आणि आदराने वागतात. नदी त्यांना समाजाच्या क्रूर वास्तवापासून दूर घेऊन जाते. एका अशा जगात नेते, जिथे केवळ त्यांचे स्वतःचे नियम आणि नैतिकता चालते. समीक्षक लिओ मार्क्स (Leo Marx) (१९१९-२०२२) कांदबरीच्या विश्लेषणात नमूद करतात की, नदी हे Pastoral Ideal अर्थात निसर्गरम्य, आदर्श जीवनाचे प्रतीक आहे, जे औद्योगिक आणि दांभिक समाजाच्या विरोधात उभे राहते.
मार्क ट्वेन यांनी सदर कादंबरीतून समाजातील दांभिक प्रवृत्तीवर तसेच मानवी मूल्यांच्या नैतिक पतनावर कठोर प्रहार केला आहे. हक आणि जिमच्या प्रवासात त्यांना विविध प्रकारचे लोक भेटतात. तथाकथित ‘सुसंस्कृत’ समाजाचे प्रतिनिधित्व करणारे हे लोक असतात. ग्रेंजरफोर्ड आणि शेफर्डसन ही दोन उच्चभ्रू कुटुंबे आहेत, जे दांभिक अहंकाराच्या नावाखाली पिढ्यांपिढ्या एकमेकांची हत्या करत आहेत. चर्चमध्ये शांततेचे प्रवचन ऐकणारे हे लोक, बाहेर येताच एकमेकांवर गोळ्या झाडतात. यातून ट्वेन यांनी समाजातील निरर्थक हिंसाचार आणि सन्मानाच्या खोट्या संकल्पनांवर व दांभिक आचरणावर टीका केली आहे. ‘ड्यूक’ आणि ‘किंग’ हे दोन बहुरूपे स्वतःला राजघराण्यातील सदस्य असल्याचे भासवून भोळ्याभाबड्या जनतेला लुबाडतात. धर्म, श्रद्धा आणि लोकांच्या भावनांचा गैरवापर करतात. ही पात्रे समाजातील फसवणूक, लोभ आणि अंधश्रद्धेचे प्रतीक आहेत. कर्नल शेरबर्न एका माणसाची दिवसाढवळ्या हत्या करतो आणि नंतर त्याला शिक्षा देण्यासाठी आलेल्या जमावाला त्यांच्या भ्याडपणाबद्दल सुनावतो. या प्रसंगातून ट्वेन यांनी जमावाच्या अविचारीपणावर आणि भ्याड मानसिकतेवर प्रकाश टाकला आहे.
कादंबरीतील सर्व प्रसंग दाखवून देतात की, जो समाज तथाकथित सुसंस्कृत वाटतो, तो आतून किती पोकळ, उथळ, हिंसक आणि अनैतिक आहे. ‘हकलबेरी फिन’च्या केंद्रस्थानी काळा-गोरा भेद, वंशवाद आणि गुलामगिरीचा प्रश्न आहे. कादंबरी प्रकाशित झाल्यापासून त्यातील ‘निगर’ (Nigger) या शब्दाच्या वापरामुळे ती वादग्रस्त ठरली. तथापि, अनेक समीक्षकांच्या मते, ट्वेन यांनी हा शब्द त्या काळातील वास्तवाचे चित्रण करण्यासाठी वापरला आहे, वंशवादाचा पुरस्कार करण्यासाठी नाही. या कादंबरीचे खरे सामर्थ्य जिमच्या पात्रात आणि हकच्या त्याच्यासोबतच्या नात्यात आहे. सुरुवातीला, हक जिमकडे समाजाच्या नजरेतून पाहतो – एक पळून आलेला गुलाम, जी एक ‘मालमत्ता’ आहे. पण जसजसा त्यांचा प्रवास पुढे जातो, तसतसे हकला जिममधील मानवीपणा दिसू लागतो. त्याला कळते की, जिमलाही कुटुंब आहे, भावना आहेत आणि स्वातंत्र्याची तीव्र इच्छा आहे. या नैतिक संघर्षाचा कळसबिंदू तेव्हा येतो, जेव्हा हक जिमला पकडून देण्याकरिता पत्र लिहिण्याचा निर्णय घेतो. पण पत्र पाठवण्यापूर्वी त्याला जिमसोबत घालवलेले चांगले क्षण आठवतात. तेव्हा तो समाजाच्या आणि धर्माच्या शिकवणीला झुगारून देतो आणि म्हणतो, All right, then, I’ll go to hell (ठीक आहे, तर मग मी नरकात जाईन). हा क्षण अमेरिकन साहित्यातील सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. येथे हक सामाजिक नियमांपेक्षा आपल्या अंतरात्म्याच्या आवाजाला आणि मानवतेला महत्त्व देतो. तो एका गुलामासाठी, एका मित्रासाठी नरकात जायला तयार होतो, जे समाजाच्या दृष्टीने एक मोठे पाप होते. हे गुलामगिरीच्या अमानवीय प्रथेवर थेट प्रहार करणारे नैतिक विधान आहे.
हकच्या वैयक्तिक आणि नैतिक विकासाची गाथा म्हणजे ही कादंबरी आहे. कादंबरीच्या सुरुवातीला तो एक खोडकर, समाजाच्या नियमांना मानणारा मुलगा असतो. पण, नदीवरील अनुभवांमुळे, विशेषतः जिमच्या सहवासामुळे, तो एक स्वतंत्र विचार करणारा आणि स्वतःच्या विवेकानुसार वागणारा तरुण बनतो. तो समाजाकडून मिळालेली वंशवादाची शिकवण नाकारतो आणि अनुभवातून शिकतो. त्याचा हा प्रवास एका मुलाच्या शारीरिक प्रवासापेक्षाही त्याच्या नैतिक जाणिवांचा प्रवास आहे. तो ‘सुसंस्कृत’ जगाचा खोटेपणा ओळखून खऱ्या मानवतेचा स्वीकार करतो.
‘ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबेरी फिन’ ही केवळ एक साहसकथा नाही तर एक गंभीर आणि सखोल सामाजिक संदर्भ प्रकट करणारी कादंबरी आहे, जी अमेरिकन समाजाच्या अंतरंगातील वास्तव मांडते. हे मांडत असताना मिसूरी निग्रो बोलीसह, नैर्ऋत्येकडच्या जंगलामधील बोलीचा वापर मार्क ट्वेन यांनी चपखलपणे केला आहे. मिसिसिपी नदीच्या प्रवासाच्या रूपकातून मार्क ट्वेन यांनी स्वातंत्र्य, नैतिकता, वंशवाद, जीवनमूल्ये आणि मानवी नातेसंबंधांवर चिरंतन भाष्य केले आहे. हक फिनचा ‘नरकात जाण्याच्या तयारीचा’ निर्णय हा व्यक्तीच्या विवेकाचा समाजाच्या अन्यायी नियमांवरील विजय आहे.
अर्नेस्ट हेमिंग्वे (१८९९-१९६१) या कांदबरी संदर्भात मत प्रकट करताना म्हणतात की, All modern American literature comes from one book by Mark Twain called Huckleberry Finn. (सर्व आधुनिक अमेरिकन साहित्याचा उगम मार्क ट्वेनच्या ‘हकलबेरी फिन’ या ग्रंथात आहे.) या विधानावरून प्रस्तुत कादंबरीचे महत्त्व आणि तिचा अमेरिकन साहित्यावरील दूरगामी प्रभाव स्पष्ट होतो. आजही ही कादंबरी तिच्यातील वादग्रस्त मुद्द्यांमुळे आणि कालातीत संदेशामुळे वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त करते. मराठीमध्ये या कादंबरीचे, भास्कर रामचंद्र भागवत यांचा ‘भटकबहाद्दर’ (१९६६) आणि अवधूत डोंगरे यांचा ‘हकलबेरी फिनची साहसं’ (२०२०) या नावाने अनुवाद प्रकाशित झाले आहेत.
संदर्भ :
- Eliot, T.S., Introduction to The Adventures of Huckleberry Finn, In The Cresset Press edition, 1950.
- Fishkin, Shelley Fisher, Was Huck Black?: Mark Twain and African-American Voices, Oxford University Press, 1993.
- Marx, Leo., The Machine in the Garden: Technology and the Pastoral Ideal in America, Oxford University Press, 1964.
- Smith, Henry Nash, A Sound Heart and a Deformed Conscience. In Mark Twain : The Development of a Writer, Harvard University Press, 1965 .
- Trilling, Lionel, Huckleberry Finn In The Liberal Imagination : Essays on Literature and Society, Doubleday Anchor Books, 1953.
- Twain, Mark, Adventures of Huckleberry Finn, Chatto & Windus, 1884.
समीक्षक : सुनील सावंत
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.