नाक, घसा यांची शुद्धी करणारी हठयोग षट्कर्म शुद्धिक्रियांपैकी एक क्रिया. नेतीसह धौती, बस्ती, नेति, त्राटक, नौली आणि कपालभाती या हठयोगातील सहा शुद्धिक्रिया शरीरांतर्गत विविध भाग व पोकळ्या शुद्ध करण्याच्या क्रियांचा समूह आहेत. म्हणून त्यांना ‘षट्कर्म’ असेही म्हणतात.
सुलभ आणि सहज श्वासोच्छवासामुळे सर्व शारीरिक आणि मानसिक कार्ये सुरळीत होतात. श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत नासिका हे प्रवेशद्वार आहे. श्वसनमार्ग मोकळा आणि स्वच्छ ठेवण्यासाठी असलेल्या अनेक शुद्धिक्रियांपैकी नेती ही प्रमुख क्रिया मानली जाते. शरीर जसे पाण्याने व घर्षणाने स्वच्छ करतो, त्याप्रमाणे नेती क्रियेत पाण्याने किंवा सूत्राच्या (धाग्याच्या) घर्षणाने नाकाच्या आतील त्वचा स्वच्छ केली जाते.
‘हठप्रदीपिके’तील (२.३०-३१) आणि घेरंड संहितेमध्ये (१.५०-५१) नेती क्रियेचे वर्णन बारा बोटे लांब गुळगुळीत असणारा धागा नासिकेतून आत घालून तोंडातून बाहेर काढणे असे केले आहे. ‘हठरत्नावली’ या ग्रंथात (१.४०-४२) उंदराच्या शेपटीसारख्या गुळगुळीत सहा वितस्ती (१ वितस्ती = १२ बोटे) लांबीच्या धाग्याला नेतिसूत्र (नेतीसाठी वापरला जाणारा धागा) असे म्हणतात. हा धागा नासिकेतून आत घालून तोंडातून बाहेर काढून धाग्याचे टोक पकडून फिरवावे. आणि तत्पश्चात नासिका मार्गात घासावे.
नेतीचे प्रकार : प्राचीन काळात नेतिक्रिया सूत्र (धागा) वापरून करत असल्याचे आढळते. परंतु, प्रत्यक्षात नेतीचे जलनेति, सूत्रनेति, रबरनेति आणि वेसणनेति असे चार प्रकार प्रचलित आहेत.
जलनेति : या नेती प्रकारात नाकपुड्या व वायुमार्ग शुद्ध करण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. परंतु, या शुद्धिक्रियेत साधारण पाणी न वापरता कोमट (शरीराच्या तापमानाइतके गरम) व खारट पाण्याचा वापर केला जातो. शुद्धिक्रियेतील या विशिष्ट पाण्यामुळे नाकपुड्यातील मल विरघळतो. पाण्यातील मिठामुळे परासरण (Osmotic) क्रिया अधिक जलद होण्यास मदत होते आणि नाकातील जळजळ कमी करून स्वच्छतेची प्रक्रिया सुधारते. तसेच खारट पाण्याचा परासरण दाब सामान्य पाण्यापेक्षा जास्त असल्यामुळे खारट पाणी सामान्य पाण्याइतके सहजपणे नाजूक रक्तवाहिन्या आणि आतील त्वचेमध्ये प्रवेश करत नाही. साधारण एक लिटर पाण्यात एक मोठा चमचा मीठ या प्रमाणात वापरले जाते. जलनेतीसाठी निर्जंतुक (Sterilized) जलनेती कप, कोमट आणि खारट पाणी यांची आवश्यकता असते.

जलनेति रीती : स्नानगृहात उभे राहून उजव्या हातात मिठाचे पाणी भरलेला जलनेती कप घ्यावा. हनुवटी छातीच्या दिशेने आत घेऊन, तोंड समोर ठेवून मान डाव्या बाजूला झुकवावे. तोंड उघडे ठेवून, तोंडानेच श्वासोच्छ्वास चालू ठेवावा. त्यानंतर जलनेती कपाच्या नळीचे चिंचोळे तोंड उजव्या नाकपुडीत हळूवार सरकवावे. डोके व शरीर स्थिर ठेवून जलनेती कप हळूहळू वर न्यावा. कपातील पाणी उजव्या नाकपुडीतून आत शिरून पाण्याची डाव्या नाकपुडीतून धार पडू लागेल. पाणी संपेपर्यंत कप हळूहळू वर न्यावा. पाणी संपताच कप बाजूला करून सौम्य रीतीने शिंकरून नाकपुड्या साफ कराव्यात. कप पाण्याने पुन्हा भरून डाव्या नाकपुडीने पाणी आत जाऊन उजव्या नाकपुडीने बाहेर येईल अशा पद्धतीने जलनेती करावी. अशा प्रकारे दोन्ही बाजू मिळून एक आवर्तन पूर्ण होईल. जलनेती क्रिया पूर्ण झाल्यावर नाकाजवळील पोकळ्यांमध्ये राहिलेले पाणी बाहेर काढून नाकपुड्या कोरड्या करणे, हा या क्रियेतला आवश्यक भाग आहे. त्यासाठी उजव्या, डाव्या आणि दोन्ही नाकपुड्यांनी झटकेदार प्रश्वासांची (श्वसन-मार्गशुद्धी क्रिया) प्रत्येकी १० आवर्तने करावीत. ६०-१०० झटक्यांची कपालभाती क्रियेची २-३ आवर्तने करावीत.
एक किंवा दोन्ही नाकपुड्या बंद असल्यास ही क्रिया वर्ज्य करावी. पाण्याच्या स्पर्शाने अंतस्त्वचेला क्षोभ होत असल्यास किंवा मेंदूमध्ये झिणझिण्या येत असल्यास पाण्यातील मिठाचे प्रमाण वाढवावे.
सूत्रनेति : शरीराच्या एखाद्या भागाला मालिश किंवा मर्दन केले असता तेथील रक्ताभिसरण सुधारते आणि तेथील स्नायू व मज्जातंतूंची प्रतिकारशक्ती आणि संवेदनशक्ती वाढते. नेतीच्या या प्रकारात नाकाच्या आतील श्लेष्मल त्वचेला सूत्र वापरून मर्दन केले जाते. प्राचीन काळात विशिष्ट पद्धतीने तयार केलेले सूत्र वापरून नेतीचा अभ्यास केला जात असे. साधारण २५ ते ३० सेंमी. लांबीच्या ७-८ निर्जंतुक केलेल्या स्वच्छ सुताच्या दोरींनी घट्ट वळलेल्या दोरीच्या एका किंवा दोन्ही टोकास मेण किंवा एरंडीच्या तेलासारखे थोडेसे घट्ट तेल लावून तयार केलेल्या दोरीचा सूत्र म्हणून वापर करण्यात येतो.

सूत्रनेति रीती : सूत्रनेतीच्या अगोदर जलनेतीचा अभ्यास केल्याने नाकातील अंतस्त्वचेचा मल ओला होऊन सुटण्यास आणि घर्षण सुलभ होण्यास मदत होते; किंवा आदल्या रात्री २-४ थेंब तूप अथवा कोणतेही खाण्याचे शुद्ध तेल प्रत्येक नाकपुडीत सोडल्याने त्याचा वंगण म्हणून उपयोग होतो. बोटांची नखे कापून हात स्वच्छ करून घ्यावेत.
सूत्रनेती क्रिया उभे राहून किंवा उकिडवे बसून करता येऊ शकते. पाण्यात भिजवलेले सूत्र हातात घेऊन मेण लावलेल्या टोकाकडून ५ ते १० सेंमी.च्या घट्ट भागास अर्धवक्र आकार द्यावा. मस्तक किंचित मागे व हनुवटी वर करून अर्धवक्र आकार दिलेल्या टोकाला उजव्या नाकपुडीत सरकवावे. डोळे व तोंड उघडे ठेवावेत. सुरूवातीस सूत्र आत सरकवताना सूत्राला आत घेण्यास शरीर विरोध करील. अशावेळेस चित्त शांत व स्थिर ठेवून प्रयत्न करत राहावा. सूत्र आत सरकवताना घशात खवखव किंवा खोकल्याची भावना निर्माण झाली की सूत्राचे टोक घशात आले असे समजावे. त्यानंतर मस्तक सरळ करून किंचित पुढे झुकवून तर्जनी व मध्यमा अशी दोन बोटे घशात घालून सूत्राचे टोक पकडून तोंडाबाहेर काढावे. शरीर सरळ करून दोन्ही हातांनी सूत्राची दोन्ही टोके पकडावीत. हात पुढे-मागे हळुवार फिरवत सूत्र आत-बाहेर करून नाकाच्या आतील भागास मर्दन करावे. १० ते १२ वेळा मर्दन करून सूत्र तोंडातून बाहेर काढावे आणि पाण्याने स्वच्छ धुवावे. अशाच पद्धतीने सूत्र डाव्या नाकपुडीतून आत घालून डावी नाकपुडी शुद्ध करावी.
नाकाच्या आतील बाजूस सूज असल्यास, नाक चोंदले असेल, जास्त प्रमाणात सर्दी असल्यास किंवा मधील पडदा विचलित झाला असल्यास सूत्रनेतीचा सराव करू नये. नाकातील अंतस्त्वचा नाजूक व कोमल असल्यामुळे सूत्र जोराने घासू नये, अन्यथा त्वचेला इजा होऊन रक्तस्राव होण्याचा त्रास उद्भवू शकतो. नासागिलायू (ॲडोनाईड्स्) किंवा गिलायू (टॉन्सिल्स) सुजलेले असल्यास किंवा त्यांची अतिरिक्त वाढ झाली असल्यास ही क्रिया वर्ज्य करावी.
रबरनेति : सूत्रनेतीमधील सूत्राचे घर्षण नाकातील अंतस्त्वचेला अनेक वेळा सहन होत नाही. त्वचा सोलून निघणे, अधिक खरवडणे, परिणामी जळजळ निर्माण होणे किंवा रक्तस्राव होणे अशा संभाव्य त्रासांना सामोरे जावे लागू शकते. परिणामी पुन्हा सूत्रनेती करू नये, अशी भावना होणे स्वाभाविक आहे. ह्या अडचणीस दूर करण्यासाठी स्वामी कुवलयानंद यांनी सूत्राऐवजी ‘रबर कॅथेटर’ (सुषिरी/नळी) या साधनाचा वापर प्रयोगाद्वारे यशस्वी करून दाखवला व त्याचा वापर करण्यास सुरुवात केली. सूत्रनेतीचा हा आधुनिक आणि नवा पर्याय सध्या बऱ्याच ठिकाणी वापरण्यात येतो. रबर कॅथेटर लवचीक, मऊ आणि गुळगुळीत असल्याने नाकातील अंतस्त्वचेला इजा होत नाही. तसेच, एकच कॅथेटर अनेक वेळा वापरता येत असल्यामुळे ही अधिक टिकाऊ असते. परंतु, प्रत्येक वेळी वापरण्यापूर्वी कॅथेटर उकळत्या पाण्यात टाकून निर्जंतुक करून घेणे अत्यावश्यक आहे. रबरनेतीची रीती सूत्रनेतीप्रमाणेच असून सूत्राऐवजी रबर कॅथेटर वापरण्यात येते.
वेसणनेति : या प्रकारात घोडा किंवा बैल यांना नियंत्रित करण्यासाठी घालण्यात येणाऱ्या वेसणीप्रमाणे सूत्र किंवा रबर कॅथेटर दोन्ही नाकपुड्यांत घातले जाते, त्यामुळे त्यास वेसणनेती असे म्हणतात. सूत्र वापरल्यास ‘सूत्रवेसणनेति’ आणि रबर कॅथेटर वापरल्यास त्यास ‘रबरवेसणनेति’ असे म्हणतात. सूत्र किंवा रबर नेतीमध्ये दोन्ही नाकपुड्यांतून घशात उतरणारे श्वसनमार्ग साफ केले जातात, परंतु या दोन्ही मार्गांना जोडणारा मधला मार्ग दुर्लक्षित रहातो. तो भाग साफ करण्यासाठी वेसणनेती उपयुक्त ठरते.

वेसणनेति रीती : ही क्रिया उभे राहून किंवा उकिडवे बसून करता येते. पाण्यात भिजवलेले सूत्र किंवा रबर कॅथेटरचे एक टोक उजव्या नाकपुडीतून नाकात सरकवत घशामध्ये आल्यावर दोन बोटांच्या साहाय्याने तोंडातून बाहेर काढावे. नंतर दुसरे टोक डाव्या नाकपुडीतून नाकात सरकवत घशामध्ये आल्यावर दोन बोटांच्या सहाय्याने तोंडातून बाहेर काढावे. तोंडातून बाहेर आलेली दोन्ही टोके एकमेकात गुंतवावीत. नंतर नाकाजवळील सूत्र किंवा रबर कॅथेटरचा वक्र भाग सावकाश बाहेर ओढावा. गोलाकार झालेले सूत्र किंवा रबर कॅथेटर हळूहळू फिरवत असताना जोडलेला भाग तोंडातून घशात जाऊन नाकातून बाहेर येतो. आता ही जोड सोडून, उजव्या बाजूचे टोक उजव्या हाताच्या चिमटीत आणि डाव्या बाजूचे टोक डाव्या हाताच्या चिमटीत पकडून उजवीकडून व डावीकडे क्रमवार हळुवार फिरवावे. अशाप्रकारे १० ते १२ वेळा मर्दन करावे, त्यामुळे नाकाच्या मधल्या आडव्या भागाला घर्षण जाणवते. तत्पश्चात कोणतेही एक टोक पकडून सूत्र किंवा रबर कॅथेटर एका नाकपुडीतून सावकाश बाहेर काढावे. या नेती क्रिया शक्यतो योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कराव्या.
नेती क्रियेचे लाभ : नेती क्रियेमुळे मस्तिष्क शुद्ध होते, दिव्य (सूक्ष्म) दृष्टी प्राप्त होते आणि जबड्याच्या वरील भागातील सर्व दोष नाहीसे होतात. नाकातील अंतस्त्वचा शुद्ध होते. नाकातील मज्जातंतूंची टोके उत्तेजित होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते. दमा, सर्दी, खोकला किंवा इतर श्वासांच्या दोषांवर उपायकारक म्हणून कार्य करते. डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लाल होणे यासारखे नेत्रदोष दूर होतात. दोन्ही नाकपुड्या साफ आणि मोकळ्या झाल्याने श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत सुलभता येते. मांसांकुराची, हाडांची वाढ किंवा नाकातील पडद्याची वक्रप्रवृत्ती यावर परिणामकारक ठरते. नेती क्रियेच्या अभ्यासाने खेचरी मुद्रा सिद्ध होते व कफदोष नष्ट होतात. नाकातील रक्तसंचय दूर होतो. प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून लाभदायक ठरते.
संदर्भ :
- निंबाळकर, सदाशिव प्र., ‘यौगिक क्रिया- आरोग्याचा पाया’, योग विद्या निकेतन, मुंबई, २००३.
- मिश्र, गिरिरत्न, सहाय, ज्ञान शंकर, ‘हठरत्नावली’, चौखम्बा सुरभारती प्रकाशन, वाराणसी, २०२०.
- स्वामी दिगम्बरजी, झा, डा. पिताम्बर, ‘हठप्रदीपिका’, कैवल्यधाम लोणावळा, पुणे, १९७०.
- स्वामी निरंजनानन्द सरस्वती, ‘घेरण्ड संहिता’, योग पब्लिकेशन्स ट्रस्ट, मुंगेर, बिहार, २००५.
समीक्षक : नितीन तावडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.